जेव्हा नितीन देसाईंप्रमाणे अमिताभ बच्चन यांची कंपनी तोट्यात गेली होती

शाहरुख, अमिताभ, गोविंदा
    • Author, मधू पाल
    • Role, बीबीसी मराठीसाठी,
    • Reporting from, मुंबई

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या मृत्यूमुळे देशभरात खळबळ उडाली. लगान, देवदास, जोधा अकबर, प्रेम रतन धन पायो या चित्रपटांचे सेट तयार करणारे नितीन देसाई बुधवारी (2 ऑगस्ट) कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले.

58 वर्षीय नितीन देसाई हे केवळ कला दिग्दर्शकच नव्हते तर त्यांनी बऱ्याच चित्रपटांचं दिग्दर्शन आणि निर्मितीही केली होती. त्यांनी अजिंठा आणि हॅलो जय हिंद या मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं.

शिवाय त्यांनी दौड, हॅलो जय हिंद आणि बाळगंगाधर यांसारख्या काही चित्रपटांमध्येही अभिनय देखील केला होता. कलादिग्दर्शक म्हणून त्यांनी केवळ चित्रपटांचे सेट उभारण्याबरोबरच त्यांनी राजकीय कार्यक्रमांसाठीदेखील काम केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून उद्धव ठाकरेंपर्यंतच्या सभांसाठी त्यांनी मोठी व्यासपीठ तयार केली होती.

नितीन देसाई त्यांच्याच एनडी स्टुडिओमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. त्यांचा हा स्टुडिओ मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये आहे. त्यांची कंपनी एनडी वर्ल्ड आर्ट प्रायव्हेट लिमिटेडवर 252 कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यांनी 2016 आणि 2018 मध्ये 185 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. या कर्जात वाढ होऊन ते जवळपास 252 कोटी इतकं झालं.

जानेवारी 2020 पासून त्यांना कर्ज फेडण्यात अडचणी येत होत्या. असं म्हटलं जातंय की, त्यांच्या कंपनीला खूप मोठं आर्थिक नुकसान झाल्याने ते दिवाळखोरीत गेले. पण सिनेसृष्टीत असं पहिल्यांदाच घडतंय असं नाही. याआधी देखील कित्येकांनी यशाची चव चाखल्यानंतर आपलं सर्वस्व गमावलंय, आर्थिक तंगीमुळे त्यांचा वेदनादायक अंत झालाय.

गुरुदत्त आणि वहिदा रहमान

फोटो स्रोत, Lalita Lajmi

फोटो कॅप्शन, गुरुदत्त आणि वहिदा रहमान

असहाय्य आणि एकाकी अवस्थेत झाला गुरुदत्तचा अंत

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले गुरुदत्त यांनी 'प्यासा', 'साहिब, बीवी और गुलाम', 'चौदहवी का चांद' सारखे अतुलनीय चित्रपट दिले. पण जेव्हा 'कागज के फूल' हा चित्रपट चित्रपटगृहात आला तेव्हा गुरुदत्त मोठ्या दिवाळखोरीत निघाले. कारण हा चित्रपट दणकून आपटला होता.

या चित्रपटाच्या अपयशाने ते मनातून खचले. या चित्रपटावर भरपूर पैसा खर्च झाला होता, त्यामुळे ते कर्जबाजारी झाले. यामुळे ते हताश झाले होते पण अखेरच्या काळात एकटं पडल्यावर त्यांचा धीर सुटला.

त्या काळात गुरुदत्त आणि त्यांची पत्नी गीता दत्त यांच्यात इतके मतभेद झाले की त्यांची पत्नी त्यांच्या मुलीसोबत वेगळी राहू लागली. या फाटाफुटीमागे वहिदा रहमान असल्याचं म्हटलं जात होतं. संसार मोडल्याने ते असहाय्य आणि एकाकी पडले. दुसरीकडे, चित्रपटामुळे त्यांना अर्थिक नुकसान सोसावं लागलं होतं.

त्यांनी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला पण तिसऱ्या वेळी मात्र त्यांना जीव गमवावा लागला. वयाच्या 39 व्या वर्षी गुरुदत्त त्यांच्याच बेडरूममध्ये मृतावस्थेत आढळून आले. असं म्हटलं जातं की, त्यांनी भरपूर दारू प्यायली आणि झोपेच्या खूप गोळ्या घेतल्या.

अमर अकबर अँथनी चित्रपटातील दृश्य

फोटो स्रोत, Manmohan Desai

फोटो कॅप्शन, अमर अकबर अँथनी चित्रपटातील दृश्य

अखेरचा चित्रपट आपटल्याने खचले मनमोहन देसाई

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हिंदी सिनेसृष्टीत सुपरहिट चित्रपट देण्याच्या यादीत मनमोहन देसाई यांचं नाव अग्रस्थानी होतं. अमिताभ बच्चन यांना महानायक बनवण्यात मनमोहन देसाई यांचा मोठा वाटा असल्याचं म्हटलं जातं. देसाई यांनी अनेक हिट चित्रपट तयार केले.

त्यांनी अमिताभ बच्चनसोबत अमर अकबर अँथनी, सुहाग, नसीब, देश प्रेमी, परवरिश, कुली, मर्द, गंगा जमुना सरस्वती आणि तुफान सारखे चित्रपट केले. हे सर्व चित्रपट सुपरहिट ठरले.

ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रपट समीक्षक रामचंद्र श्रीनिवासन सांगतात की, मनमोहन देसाई यांच्या आयुष्यात एक काळ असा आला होता जेव्हा त्यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले होते. याचा त्यांना मोठा धक्का बसला होता.

चित्रपटांवर खर्च केलेल्या पैशांमुळे ते तोट्यात आले. अशातच त्यांचा मुलगा केतन देसाईचा अनमोल हा चित्रपटही अपयशी ठरला. असेच एकेक चित्रपट अपयशी ठरू लागल्याने ते मनातून आणखीन खचले. आणि एके दिवशी त्यांच्याच घराच्या बाल्कनीतून पडून त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्यूनंतरही अनेक गोष्टींचे खुलासे होत राहिले. काहीजण म्हणतात त्यांनी आत्महत्या केली. पण त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अद्यापही ठोस काही कळू शकलेलं नाही. त्यांच्या मृत्यूचं रहस्य आजही कायम आहे.

जेव्हा 'बिग बी' वर आली काम मागायची वेळ

या शतकातील महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर देखील एकेकाळी दिवाळखोरीची वेळ आली होती. भरपूर संपत्ती आणि प्रसिद्धी कमावल्यानंतर अमिताभ बच्चन यांना देखील आपलं सर्वस्व गमवावं लागलं होतं, त्यांना आपली सर्व संपत्ती गहाण ठेवावी लागली होती.

वर्ष 1999 मध्ये एका मुलाखतीत अमिताभ बच्चन म्हणाले होते, "संपूर्ण जग 2000 सालाच्या आगमनाचं मोठ्या दिमाखात स्वागत करत आहे. पण मी मात्र माझ्या विनाशाचा उत्सव साजरा करतोय."

रामचंद्र श्रीनिवासन सांगतात, "त्याकाळी अमिताभ बच्चन यांची एबीएसील कंपनी तोट्यात गेली होती. त्यांच्याकडे तेव्हा ना चित्रपट होता ना पैसा. त्यांनी कंपनीसाठी बाजारातून मोठ्या प्रमाणावर पैशांची उचल घेतली होती. पण त्यांचे सर्व पैसे बुडाले."

त्या काळात त्यांनी दिलेल्या मुलाखतीत आपण दिवाळखोर झाल्याचं सांगितलं होतं आणि याच काळात आपण लोकांकडे जाऊन काम मागितल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांनी यश चोप्रा यांच्याकडेही काम मागितलं होतं.

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन या सगळ्या गोष्टी प्रसारमाध्यमांमध्ये जाहीर करणार होते. पण त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी त्यांना अडवलं आणि पुन्हा काम करण्याचा आणि स्वतःला पुन्हा संधी देण्याचा सल्ला दिला. जर तू पुन्हा अयशस्वी झालास तर तू ते जाहीर कर असंही हरिवंशराय बच्चन यांनी सांगितलं.

सरतेशेवटी अमिताभ बच्चन यांनी अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडे कामाची मागणी केली.

याच दरम्यान 2000 साली कौन बनेगा करोडपती ही मालिका टेलिव्हिजनवर सुरू झाली. यातून बच्चन यांनी त्यांच्या नव्या कारकिर्दीला सुरुवात केली. बऱ्याच जणांनी त्यांची चेष्टा केली पण ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी छोट्या पडद्यावर आपल्या करिअरला सुरुवात केली. या मालिकेच्या यशाने त्यांचं आयुष्य पुन्हा रुळावर आलं.

राज कपूर

फोटो स्रोत, RK FILMS AND STUDIOS

फोटो कॅप्शन, राज कपूर

'शो मॅन'ला जेव्हा बाजारातून घेतलेले पैसे परत करावे लागले

शो मॅन अशी ओळख असणारे राज कपूर हे त्यांच्या काळातील यशस्वी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांनी जसं मोठं यश मिळवलं तसं त्यांना अपयश आणि आर्थिक तंगीचाही सामना करावा लागला.

रामचंद्र श्रीनिवासन सांगतात की, राज कपूर यांच्या आयुष्यात एक काळ असाही आला होता जेव्हा त्यांचं सर्वस्व पणाला लागलं होतं. 'मेरा नाम जोकर' हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी लोकांकडून उसने पैसे घेतले होते. पण राज कपूर यांचा हा चित्रपट पडद्यावर फ्लॉप ठरला आणि त्यांचे सर्व पैसे बुडाले. हे पैसे परत करण्यासाठी त्यांना त्यांचं आहे नाही ते सर्व विकावं लागलं होतं.

त्यांनी त्यांच्या अनेक वस्तू गहाण ठेवल्या. पुढे मोठ्या कष्टाने आणि कसेबसे पैसे गोळा करून त्यांनी बॉबी हा चित्रपट बनवला. ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांना घेऊन बनवलेल्या या चित्रपटाने त्यांची आर्थिक स्थिती सावरली. या चित्रपटामुळे ते पुन्हा यशाची पायरी चढू शकले. एवढंच नाही तर इतकी वर्ष मुंबईत राहून देखील राज कपूर यांच्याकडे स्वतःचं घर नव्हतं. या चित्रपटामुळे त्यांना त्यांचं घर मिळालं.

गोविंदा पत्नी सुनितासह

फोटो स्रोत, HERONUMBER1.GOVINDA/FACEBOOK

फोटो कॅप्शन, गोविंदा पत्नी सुनितासह

नुकसानीमुळे जेव्हा घर विकण्याची पाळी आली

80 आणि 90 च्या दशकातील सुपरस्टार असलेल्या गोविंदा आणि जॅकी श्रॉफ यांच्या आयुष्यातही अशी एक वेळ आली होती जेव्हा त्यांचं सर्वस्व पणाला लागलं होतं.

एका मुलाखतीदरम्यान गोविंदाने सांगितलं होतं की, एके काळी त्याने अनेक ठिकाणी त्याचे पैसे गुंतवले होते. यात त्याचं कोट्यावधींचं नुकसान झालं होतं.

रामचंद्र श्रीनिवासन सांगतात की, याच काळात काम मिळत नसल्याने गोविंदाला अडचणींचा सामना करावा लागला. नंतर त्याला सलमान खानचा पार्टनर हा चित्रपट मिळाला. हा चित्रपट हिट ठरला, आणि गोविंदाला पुन्हा उभं राहण्याची संधी मिळाली.

त्याचप्रमाणे जॅकी श्रॉफला देखील वैयक्तिक आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागला होता. जॅकी श्रॉफ आणि त्याची पत्नी आयशा श्रॉफने बूम या चित्रपटासाठी पैसे गुंतवले होते. चित्रपट फ्लॉप झाला आणि त्यांचे सगळे पैसे पाण्यात गेले. पुढे आयशा श्रॉफने गोविंदा, जॅकी आणि सलमानसोबत 'राजू राजा राम' नावाचा आणखी एक चित्रपट बनवायला सुरुवात केली पण तो चित्रपट कधी पडद्यावर आलाच नाही.

जॅकी श्रॉफ
फोटो कॅप्शन, जॅकी श्रॉफ

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत आयशा श्रॉफने सांगितलं की, बूम चित्रपटाच्या अपयशामुळे ते दिवाळखोरीत निघाले होते. त्यांना पैसे परत करण्यासाठी त्यांचं राहतं घर विकावं लागलं होतं.

कॉफी विथ करण या कार्यक्रमात आयशाने सांगितलं होतं की, "तो काळ आमच्यासाठी खूप वाईट होता. आम्ही सर्व काही गमावलं होतं. पण जॅकी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. पुढे टायगरने बॉलिवूड मध्ये काम करायला सुरुवात केल्यावर मला सांगितलं होतं की मी आपलं घर तुला परत मिळवून देईन. त्याप्रमाणे काही वर्षांनी टायगरने ते घर विकत घेतलं आणि आम्हाला भेट म्हणून दिलं. आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती."

रा वन सिनेमाचं पोस्टर

फोटो स्रोत, RaOne Film Poster

फोटो कॅप्शन, रा वन सिनेमाचं पोस्टर

किंग खानला जेव्हा झळ बसली

बॉलीवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खाननेही त्याच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले होते. त्याला यश अपयश या दोन्ही गोष्टी पाहण्याची सवय झाली होती.

रामचंद्र श्रीनिवासन सांगतात की, शाहरुखलाही आर्थिक तंगीचा सामना करावा लागला होता. 2010 मध्ये शाहरुख खानचा रा-वन हा चित्रपट अपयशी ठरला होता. या चित्रपटात शाहरुख खानने खूप पैसे गुंतवले होते. पण ते सर्व पैसे बुडाले. पण शाहरुख खानने हार न मानता स्वतःला सावरलं आणि पुन्हा उभा राहिला.

हे ही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)