आत्महत्येबाबत पडणाऱ्या 7 प्रश्नांची उत्तरं

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
जगभरात दरवर्षी 7 लाखांपेक्षा जास्त लोक आत्महत्या करतात. पण, त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 15 ते 19 वर्ष या किशोरवयीन वयोगटात आत्महत्या हे मृत्यूचं चौथ्या क्रमांकाचं प्रमुख कारण आहे.
आत्महत्येमागे नैराश्य, असहाय्यता आणि जीवन व्यर्थ असल्याची भावना असते. यामागे वैद्यकीय कारणंही असतात.
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणजेच Suicide Prevention Day च्या निमित्ताने, आपण तज्ज्ञांकडून आत्महत्येबाबत सामान्यांना पडणारे प्रश्न आणि आत्महत्येचा विचार मनात आलेल्यांशी कसं बोलावं? हे जाणून घेणार आहोत.
1. लोकांच्या मनात आत्महत्येचा विचार का येतो?
एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार येणं किंवा त्याने आत्महत्येची कल्पना करणं, याला मानसोपचारतज्ज्ञ 'सुसाइट आयडिएशन' म्हणतात.
मनात आत्महत्येची कल्पना येण्यास एकच कारणं कारणीभूत नसतं. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याआधी घडलेली घटना निमित्तमात्र असू शकते. त्याक्षणी, जीवन संपवणं हा एकच मार्ग त्या व्यक्तीला दिसतो, असं तज्ज्ञ म्हणतात.
दिलशाद खुराना Mpower या मानसिक आरोग्याशी संबंधित हेल्पलाईनच्या प्रमुख मानसशास्त्रज्ञ आहेत. त्या म्हणतात, "माझ्या जीवनात काहीच उरलेलं नाही. आयुष्य संपवणं हा एकच मार्ग आहे. लोकांच्या मनात येणाऱ्या या विचारांना 'सुसाइट आयडिएशन' म्हणतात."

फोटो स्रोत, Getty Images
नैराश्याचं शेवटचं टोक म्हणजे आत्महत्या असा सर्वसाधारण समज आहे. याचं कारण डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येचं प्रमाण सर्वांत जास्त आहे. मग आत्महत्येचा विचार नैसर्गिक असतो? का यामागे वैद्यकीय कारणं आहेत?
मानोविकारतज्ज्ञ डॉ. अंबरीश धर्माधिकारी सांगतात, "आत्महत्येचा विचार नैसर्गिक नसतो. मेंदूतील बायो-न्यूरॉलॉजीकल बदलामुळे लोकांना जीवन व्यर्थ वाटू लागतं. त्यामुळे, आत्महत्येचे विचार येतात. आत्महत्येच्या 90 टक्के प्रकरणात मानसिक आजार प्रमुख कारण आहे."
डिप्रेशन किंवा नैराश्यात असलेले लोक जगाकडे नेहमीच नकारात्मक नजरेने पहातात. जणू त्यांनी नकारात्मक विचारांचा चष्मा घातलेला असतो.
2. आत्महत्येचा विचार करणाऱ्यांमधील धोक्याची लक्षणं कोणती?
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, साल 2019 मध्ये 77 टक्के आत्महत्या अल्प आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशात घडल्या आहेत.
- डिप्रेशन किंवा नैराश्य
- मानसिक स्थितीत चढ-उतार
- सतत चिंता किंवा अस्वस्थता
- ज्या गोष्टीत आनंद वाटत होता, आता त्या गोष्टीत रस नसणं
- सतत मनात नकारात्मक विचार
- भविष्याबद्दल निगेटिव्ह कल्पना
3. मानसिक आजारानेग्रस्त व्यक्तीत काय बदल होतात?
तज्ज्ञांच्या मते, नेहमी हसमुख किंवा लोकांमध्ये मिसळणारा व्यक्ती अचानक एकटा राहू लागला, अबोल झाला. सिरागेट किंवा मद्यपान अधिक प्रमाणात सुरू होणं. हे व्यक्तीत होणारे बदल आहेत. सतत निराशावादी बोलणं, मृत्यूची भाषा करणं, ही काही आजाराची लक्षणं आहेत. एखाद्याच्या आयुष्यातल्या या बदलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
डॉ. धर्माधिकारी पुढे सांगतात, "आत्महत्येचा विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत वॉर्निंग साईन (धोक्याची सूचना) असतातच असं नाही. पण बऱ्याचदा लोक त्यांच्या भाषेतून किंवा कृतीतून अशा साईन्स देत असतात."
एखादा व्यक्ती ज्या गोष्टी सामान्यत: बोलत नाही. अशा गोष्टी वारंवार होत असतील तर त्या वॉर्निंग साईन असू शकतात.
4. मनात आत्महत्येचा विचार आला तर काय करावं?
नकारात्मक विचार प्रत्येकाच्या डोक्यात येतात. काहीवेळा मनात येणारा विचार काही क्षणांचा असतो. तर, काही लोकांमध्ये हळूहळू नकारात्मकता वाढत जाऊन हे विचार वाढतात.
मानसिक आजारांबद्दल अजूनही अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे लोक मोकळेपणाने बोलणं टाळतात. अशावेळी मानसिक आरोग्याबाबत समुपदेशन करणाऱ्या हेल्पलाईन महत्त्वाची भूमिका बजावतात.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईच्या केईएम रुग्णालयातर्फे मानसिक आरोग्यावर समुपदेशनासाठी 'हितगुज' हेल्पलाईन कार्यरत आहे. याचं महत्त्व सांगताना विभागप्रमुख डॉ. अजिता नायक म्हणतात, "सुसाईड प्रतिबंध हेल्पलाईन रुग्णांशी संपर्काचा पहिला टप्पा असतो. आत्महत्येचा विचार मनात आल्यानंतर, थेट मानसोपचारतज्ज्ञांकडे जाणं शक्य नाही. अशावेळी या हेल्पलाईनवर संपर्क केल्यामुळे मदत मिळू शकते."
तज्ज्ञ सांगतात मनात आत्महत्येचा विचार आल्यास मानसिक आरोग्यासंबंधी समुपदेशन करणाऱ्या हेल्पलाईनला संपर्क करा किंवा शक्य असेल तर समुपदेशक किंवा डॉक्टरांना भेटा.
आत्महत्येचा विचार का येतो, हा किती गंभीर आहे याचं निदान महत्त्वाचं आहे.
डॉ. धर्माधिकारी पुढे म्हणतात, "आत्महत्येचा विचार येताक्षणी मानसिक आजारानेग्रस्त व्यक्ती स्वत:साठीच धोका असतो. ते स्वत:लाच हानी पोहोचू शकतात. त्यामुळे तात्काळ योग्य उपचार महत्त्वाचे आहेत."
5. तुम्हाला कोणी आत्महत्येच्या विचारांबद्दल सांगितलं तर काय करावं?
तुमच्या जवळच्या व्यक्तीने 'मला आत्महत्या करावीशी वाटते.' असं सांगितलं, तर काय करायचं? या परिस्थितीला कसं हाताळायचं? हा सर्वांत मोठा प्रश्न आहे.
मानसिक आजारानेग्रस्त व्यक्तीला कुटुंबाची साथ सर्वांत जास्त महत्त्वाची असते. मानसशास्त्रज्ञ दिलशाद खुराना याबाबत काही टीप्स देतात.
- शांतपणे समोरच्या व्यक्तीचं ऐकून घ्या. त्याला मन मोकळं करण्यासाठी धीर द्या.
- शांत रहा कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू नका.
- व्यक्तीची समस्या समजून ती मान्य करा.
- ही समस्या नाही असं म्हणून अस्वीकार करू नका.
- त्यांची भावना समजून घ्या.
कुटुंबियांनी आत्महत्येचा विचार करणाऱ्यांना कोणताही निर्णय देऊ नये. त्यांना आपले विचार मांडण्यासाठी योग्य जागा दिली पाहिजे. किरोशवयीन मुलांसोबत मानसिक आजार किंवा आत्महत्या या विषयावर चर्चा करावी. यात संकोच असू नये.
तज्ज्ञ म्हणतात, कुटुंबियांनी आणि सामान्यांनी विचार न करता माहित नसलेला चुकीचा सल्ला देऊ नये किंवा थोडं बाहेर फिरून ये, दोन दिवस सुट्टी घे, आराम कर असे कॅज्युअल सल्ले देऊ नयेत.
6. आत्महत्येच्या विचारांबाबतचे गैरसमज कोणते?
आत्महत्येच्या विचारांबाबत लोकांमध्ये अनेक प्रकारच्या गैरसमजूती आहेत. सामान्यांचा गैरसमज आहे की, विचार किंवा परिस्थिती गंभीर होईपर्यंत लोकांच्या मनात आत्महत्येचा विचार येत नाही.
डॉ. अंबरीश धर्माधिकारी म्हणतात, "आत्महत्येचा विचार मनामध्ये केव्हाही येऊ शकतो."
आत्महत्येबाबत लोकांमध्ये असलेले गैरसमज कोणते याबाबत ते पुढे माहिती देतात -
- आत्महत्येचा विचार फक्त लक्ष वेधण्यासाठी असतो.
- आत्महत्येबद्दल बोललं तर इतरांना आयडिया मिळेल.
- वयोवृद्ध लोक आत्महत्येचा जास्त विचार करतात.
- ज्यांचं सर्व चांगलं आहे ते आत्महत्येचा विचार किंवा आत्महत्या करत नाहीत.
दिलशाद खुराना पुढे सांगतात, "बऱ्याचवेळी हेल्पलाईनवर फोन करणारे आत्महत्येच्या विचारांबाबत व्यक्त होत नाहीत. अशावेळी, "तुम्ही आत्महत्येचा विचार करताय का? असा थेट प्रश्न विचारतो. याचा अर्थ आम्ही त्यांना कल्पना दिली असा होत नाही."
7. आत्महत्येच्या विचारातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काय?
आत्महत्येच्या विचारातून बाहेर येण्यासाठी सुसाइड हेल्पलाईनची मदत, समुपदेशन, सकारात्मक विचार आणि वैद्यकीय मदत हे मार्ग आहेत.
डॉ. धर्माधिकारी म्हणाले, "आत्महत्येचे सातत्याने विचार येत असलेल्या गंभीर प्रकरणात इलेक्ट्रोकन्वल्सिव्ह (ECT) थेरपी अत्यंत उपयुक्त आहे. याला सामान्य भाषेत शॉक थेरपी म्हणतात. पण, यात शॉक दिला जात नाही. यात रिकव्हरी खूप फास्ट होते."
केईएम रुग्णालयाच्या समुपदेशक संगीता राव (नाव बदललेलं) आत्महत्येच्या विचारापासून प्रवृत्त झालेल्या एका महिलेचं उदाहरण देतात. त्या म्हणतात, "एका महिलेची घटस्फोट प्रक्रिया सुरू होती. डिप्रेशनवर उपचार सुरू होते. मी यातून कशी बाहेर पडू? मला आत्महत्येचा विचार येतोय ती वारंवार सांगायची. पण, आता ती एका मोठ्या कंपनीत कामाला आहे."
थॉट मॉडिफिकेशन, चिडचिडेपणा कमी करण्याच्या टेक्निकचा तिला फायदा झाला. त्या सांगतात, "तुम्ही तुमचे जर विचार कोणाला सांगू शकत नाहीत. तर, लिहून काढा. जेणेकरून तुम्ही पॉझिटिव्ह विचार करू शकता."
सिलेब्रिटींच्या आत्महत्येनंतर का वाढतात हेल्पलाईनवर कॉल?
प्रसिद्ध आणि चर्चित व्यक्तीने आत्महत्या केली. तर, आत्महत्येच्या विचारांबाबत हेल्पलाईनवर व्यक्त होणारे कॉल्स अचानक वाढतात.
डॉ. अजिता नायक सांगतात, "प्रसिद्ध व्यक्तीने आत्महत्या केली. तर, लोकांना आपणही वैद्यकीय मदत घेतली पाहिजे याची जाणीव होते. त्यामुळे, जेव्हा मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण होते. लोक मदतीसाठी फोन करतात."
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर केईएम रुग्णालयाच्या हितगुज हेल्पलाईनवर येणारे कॉल्स चार-पाट पटीने वाढले होते.
हितगुजच्या समुपदेशक संगीता राव (नाव बदललेलं) सांगतात, "सुशांतच्या आत्महत्येनंतर 15 दिवस खूप फोन आले. तो यशस्वी होता तरी त्यांनी आत्महत्या केली? अपयश इतका परिणाम करतं? असा लोकांचा प्रश्न होता."
सुशांतच्या मृत्यूनंतर दिवसातून येणारे 20 टक्के फोन मनात आत्महत्येच्या विचार आलेल्या लोकांचे होते. तर, दिवसाला आत्महत्येबद्दल विचारांनी ग्रस्त 1-2 व्यक्ती फोन करून मदत मागतात, असं समुपदेशक म्हणतात.
त्या पुढे सांगतात, "कोव्हिडनंतर 3-4 महिन्यांनी लोकांचे फोन वाढले. बिझनेस चांगला नाही, घरची भांडणं, आर्थिक चणचण यामुळे लोकांच्या मनात आत्महत्येचा विचार जास्त येत होता."
काउंसिलर्स म्हणतात, सामान्यत: आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरूषांचं प्रमाण जास्त आहे. पण, कोरोनासंसर्गाच्या काळात आत्महत्येचा विचार करणाऱ्यांमध्ये पुरूषांची संख्या जास्त आहे. तर, कौटुंबिक संबंधात स्त्रियांमध्ये आत्महत्येच्या विचारांचं प्रमाण जास्त आहे.

महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
- हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
- सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
- इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
- विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








