आईच्या दुधाच्या बँकेला पाकिस्तानात का होत आहे विरोध?

प्रतीकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र

नवजात अर्भकं, बालमृत्यू, मुलांचं कुपोषण हे अत्यंत गंभीर विषय आहेत. जगभरात सगळीकडं त्याच्या झळा पोहोचत असतात. नवजात बाळाला अनेकदा आईचं दूध किंवा स्तनपान मिळत नाही. त्यावेळी बाळाला बाहेरचं दूधही चालत नाही.

अशावेळी दुसऱ्या एखाद्या मातेचं दूध मिळाल्यास त्या बाळाचा जीव वाचू शकतो. त्यासाठी आईच्या दुधाची बँक ही अनोखी संकल्पना जगभरात राबवली जाते. पाकिस्तानात मात्र धार्मिक विरोधामुळं सध्यातरी हा उपक्रम अडखळला आहे. या अत्यंत महत्त्वाच्या पण, तितक्याच अनोख्या संकल्पेविषयी जाणून घेऊयात.

पाकिस्तानात आईच्या दुधाची पहिली बँक सुरू करण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविला जाणार होता. पण, दुर्दैवानं कराचीतील एका मदरशानं आक्षेप घेतल्यामुळं हा प्रकल्प रखडला आहे.

मौलवींनी सुरुवातीला या प्रकल्पासाठी सशर्त परवानगी दिली होती. पण उद्घाटन होण्याच्या काही दिवस आधीच त्यांनी परवानगी रद्द केली.

लोकंसख्येच्या दृष्टीनं पाकिस्तान जगात पाचवा देश आहे. त्यातही विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे युनिसेफच्या आकडेवारीनुसार दक्षिण आशियातील सर्वाधिक बालमृत्यू दर पाकिस्तानात आहे.

जन्मत: आजारी असणाऱ्या आणि अकाली जन्मणाऱ्या (नऊ महिन्यांआधीच) बाळांसाठी त्यांच्या आईचं दूध उपलब्ध नसतं तेव्हा आईच्या दुधाच्या बँकेसारखी सुविधा सर्वोत्तम समजली जाते.

आईचं दूध वेळेवर मिळाल्यास बाळाचा जीव वाचू शकतो. ही सुविधा बाळांसाठी जीवन आणि मृत्यू यातील महत्त्वाचा भाग ठरू शकते.

जीव वाचवण्याचा संघर्ष

बशिरा या पाकिस्तानातील एका मातेची आणि तिच्या बाळाची कहाणी आपल्याला या विषयाचं गांभीर्य दाखवून देते.

कराचीला जाण्यापूर्वी बशिरा ज्या गावात राहायच्या त्याच गावात त्यांचा पहिला मुलगा जन्मत:च दगावला होता.

बाळ

फोटो स्रोत, Getty Images

गेल्यावर्षी कराचीमध्ये बशिरा आणि त्यांच्या पतीला जेव्हा त्याचं दुसरं अपत्य, मुलगी झाली. त्यावेळी तिलाही गमावण्याची भीती त्यांना होती.

"माझ्या बाळाचा लवकर म्हणजे अकाली जन्म झाला होता आणि डॉक्टरांनी मला तिला स्तनपान करण्याचा सल्ला दिला," असं बशिरानं बीबीसीला सांगितलं.

"पण तिच्यासाठी पुरेसं दूध माझ्या शरीरात तयार होत नव्हतं."

"माझ्या मुलीला अतिदक्षता विभागात ठेवलं होतं. सातव्या महिन्यातच तिचा जन्म झाला होता. दुसरीकडं तिच्या आईला म्हणजे मला दुधाचा पुरेसा पान्हा फुटत नव्हता. बाहेरचं दूध देणंही शक्य नव्हतं. तरीही मुलीचा जीव वाचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले," असं बशिराचे पती रहीम शाह म्हणाले.

रहिम शाह
फोटो कॅप्शन, रहिम शाह

पण, आधी एक बाळ दगावल्याच्या दुःखात असलेल्या दुसऱ्या एका आईनं त्यांच्या मुलीचा जीव वाचवला.

"मुलीचा जीव वाचवण्यासाठी आम्ही एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये फिरत होतो. अखेर आम्हाला एक महिला सापडली. नुकतीच प्रसूती होऊन तिचं बाळ दगावलं होतं. आम्ही तिला आमच्या मुलीला दूध पाजण्याची विनंती केली. तिनंही अगदी नम्रपणे होकार दिला," असं बशिरा म्हणाल्या.

त्या महिलेची मदत मिळाली नसती, तर आमच्या मुलीचा जीव वाचला नसता, असं रहीम सांगतात.

"रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी बाळाला आईच्या दुधाची अत्यंत आवश्यकता होती," असं त्या पुढं म्हणाल्या.

आईच्या दुधाची बँक

बशिरा यांच्या प्रकरणात दुसऱ्या एका महिलेनं बाळाला स्तनपान केलं होतं. तर अशा प्रकारच्या आईच्या दुधाच्या बँकेत स्तनदा महिलांनी दान केलेलं दूध साठवलं जातं.

या दूधावर आरोग्यविषयक वापराच्या हेतूनं प्रक्रिया केली जाते, त्यानंतर त्याची चाचणी केली जाते आणि मग ते फ्रीझरमध्ये साठवलं जातं. ज्या नवजात बालकांना अशा दूधाची गरज असते त्यांना ते दिलं जातं.

मलेशिया आणि इराणसह काही मुस्लीम-बहुल देशांमध्येही अशा प्रकारच्या सुविधा आहेत.

पण, काही धार्मिक विद्वान या प्रकारची सुविधा स्तनपानासंदर्भातील इस्लामिक कायद्यांच्या विरोधी असल्याचा युक्तिवादही करतात.

जन्म दिलेला नसताना बाळाला स्तनपान केल्यास त्या बाळाशी संबंधित महिलेचं दुधाचं नातं तयार होतं, असं इस्लाममध्ये मानलं जातं. त्यानुसार महिलेनं ज्या मुलांना दूध पाजलेलं असतं ती एकमेकांची भावंडं मानली जातात.

इस्लामिक कायद्यानुसार किंवा त्याच्या मंजुरीनं केल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला 'हलाल' म्हटलं जातं तर या कायद्याविरोधांतील गोष्टींना 'हराम' म्हटलं जातं.

आईचं दूध

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आईच्या दुधाची बँक सुरू करण्याच्या उपक्रमाला पाकिस्तानातील काही धार्मिक विद्वानांनी हराम ठरवलं आहे. इस्लामिक कायद्यानुसार ते निषिद्ध असल्याचं त्याचं म्हणणं आहे.

पण, आईच्या दुधाची बँक इस्लामिक कायद्यानुसार किंवा कायद्याचं पालन करणारी असावी यासाठी अधिकाऱ्यांचे प्रयत्न आहेत.

प्रांताच्या आरोग्यमंत्री डॉ. अझरा पेचुहो यांनी बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं की, त्यांनी काऊन्सिल ऑफ इस्लामिक आयडियॉलॉजीला पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी महिलांकडून मुलांना स्तनपान देताना इस्लामिक कायद्याचं पालन केलं जाण्याची खात्री दिली आहे.

"ज्या महिला दूध दान (डोनर) करतील त्यांची नोंदणी केली जाईल. ज्या गरजू बाळांना आईच्या दुधाची गरज असेल, त्यांना बँकेतील दूध पुरवलं जाईल आणि त्यांच्या पालकांना ही माहिती पुरवली जाईल. या माहितीचा ट्रॅक ठेवला जाईल," अशी खात्री डॉ. पेचुहो यांनी दिली.

ज्या महिलेनं तिच्या बाळांना स्तनपान केलेलं असणार तसंच दान केलेल्या दूधाचे सेवन गरजू बाळानंही केलेलं असेल. इस्लामनुसार ही दोन्ही मुलं भावंडं ठरतील. साहजिकच इस्लामिक कायद्यानुसार भविष्यात त्यांच्यात विवाह होऊ शकणार नाही.

इस्लामिक कायद्याच्या चौकटीनुसार एकाच महिलेचं दूध प्यायलेल्या भावंडामधील लग्न बेकायदेशीर ठरतं. डॉ. पेचुहो यांनी याच चिंतेसंदर्भात नोंदणीकृत माहितीचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे, त्यानं भविष्यात हा प्रश्न उद्भवणार नाही.

whatsapp
फोटो कॅप्शन, बीबीसीवरील बातम्यांसाठी बीबीसीच्या व्हॉट्सअप चॅनेलला जॉइन व्हा.

मुलांच्या माताचं दूध फक्त तान्ह्या मुलांसाठी आणि मुलींच्या मातांचं दूध फक्त मुलींसाठी पुरवलं जाण्याच्या व्यवस्थेचं नियमन करून आईच्या दुधाची बँकेसंदर्भातील अडथळे दूर करता येतील अशी डॉ. पेचुहो यांना आशा आहे.

2012 मध्ये तुर्कीमधील इस्लामिक विद्वानांनी याच मार्गाचा अवलंब केला होता.

फतवे

25 डिसेंबर 2023 ला कराचीतील अशा आईच्या दुधाच्या बँकेला संबंधित इस्लामिक संस्थेकडून सुरुवातीला सशर्त मंजुरी मिळाली होती.

दान करणारी महिला आणि ज्या बाळाला दूध पाजलं जाणार त्यांची माहिती पुरवण्यासारख्या अटीनुसार ही परवानगी दिली होती.

तसंच मुस्लीम बाळाला फक्त मुस्लीम आईचंच दूध दिलं पाहिजे, असंही त्यांनी यात म्हटलं आहे.

यासाठी पैसे आकारू नयेत, असंही म्हटलं आहे. गर्भधारणेनंतर 34 आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत जन्मलेल्या बाळांना हे दूध देता येईल. त्याचबरोबर जर त्या बाळाची आई जर पुरेसं दूध तयार करू शकत नसेल, तरच आईच्या दुधाची बँकेतील दूध देता येईल असंही म्हटलं आहे.

पाकिस्तानच्या राज्यघटनेनुसार प्रत्येक कायदा आणि सर्व सरकारी विभागांनी शरिया कायदा किंवा इस्लामिक कायद्याचं पालन केलं पाहिजे.

आईचं दूध

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तानातील सरकारी अधिकाऱ्यांना आईच्या दुधाची बँकेसंदर्भात या सर्व अटींची पूर्तता केली जाईल असा विश्वास वाटत असताना कराचीतील एका स्थानिक मदरशानं याबाबत शंका उपस्थित केल्या आहेत.

16 जून 2024 ला सुधारित फतवा जाहीर करण्यात आला. त्या फतव्यात म्हटलं आहे की, इस्लामिक कायद्याचं पालन होण्यासाठी सर्व मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणं आईच्या दुधाची बँकेसाठी खूपच अवघड ठरेल.

सिंध इन्स्टिट्यूट ऑफ चाईल्ड हेल्थ अँड निओनॅटोलॉजी (SICHN) च्या मते, दारुल उलूम कराची या मदरशाकडून फतवा जारी करण्यात आल्यानंतर आईच्या दुधाची बँकेचा उपक्रम रद्द करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही.

"याबाबत पुढील पावलं टाकताना आम्ही दारुल उलूम कराची आणि काउन्सिल ऑफ इस्लामिक आयडियोलॉजी या दोघांकडून या विषयावर आणखी मार्गदर्शन घेऊ," असं हॉस्पिटलने म्हटलं आहे.

"आमचे आरोग्यसेवेचे उपक्रम फक्त वैज्ञानिकदृष्ट्याच नव्हे तर धार्मिकदृष्ट्या देखील योग्य असल्याची खातरजमा करून घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असं हॉस्पिटलनं पुढं म्हटलं आहे.

आईचं दूध

युनिसेफनुसार, पाकिस्तानात 1,000 नवजात अर्भकांपैकी 54 अर्भकांचा मृत्यू होतो. 2030 पर्यंत हे प्रमाण 12 अर्भकांपर्यत खाली आणण्याचं पाकिस्तानचं लक्ष्य आहे.

आईच्या दुधामुळं बाळाला रोगप्रतिकारशक्ती बरोबरच वाढीसाठी आवश्यक असलेली पोषक तत्त्वंदेखील मिळतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO)अंदाजानुसार, "जर 0-23 महिन्यांदरम्यानच्या मुलांना चांगल्या प्रकारे आईचं दूध म्हणजे स्तनपान मिळालं तर दरवर्षी 5 वर्षांखालील 8,20,000 पेक्षा जास्त मुलांचा जीव वाचवला जाऊ शकतो."

लहान बाळ, संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लहान बाळ, संग्रहित छायाचित्र

आईच्या दुधाच्या बँक प्रकल्पाला युनिसेफनं पाठिंबा दिला होता. त्यांनी याबाबत टिप्पणी करण्यास नकार दिला.

2018 मध्ये जागतिक आरोग्य संघटना (WHO)आणि युनिसेफ यांनी सूचना केली होती की, ज्या बाळांना त्यांच्या आईचं दूध मिळणार नसेल त्यांना उपलब्ध असलेलं इतर महिलांचं दूध द्यायला हवं.

अमेरिकन आणि युरोपियन आरोग्य संस्थाही बाळाला दूध पुरवण्यासाठीचा पर्याय म्हणून अशा दुधाची शिफारस करतात.

जागतिक स्तरावर नियमांची कमतरता

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, जगभरात 60 पेक्षा अधिक देशांमध्ये अशाप्रकारे आईच्या दुधाच्या बँक कार्यरत आहेत. पण, त्याला प्रखर धार्मिक विरोध आहे. 2019 मध्ये बांगलादेशात सुरू झालेली अशीच एक बँक धार्मिक पक्षांच्या विरोधानंतर एका महिन्याच्या आत बंद करावी लागली.

अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या शोधनिबंधानुसार, "डोनरची किंवा दात्याची माहिती नसल्यामुळं आईच्या दुधाच्या बँकेतील दूध वापरण्याकडं पाश्चात्य देशांमधील मुस्लीम कुटुंबांचा ओढा नसतो."

आईच्या दुधाची बँक सुरू करण्याबाबत कोणतीही निश्चित मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेनं अलीकडंच यावर काम सुरू केलं आहे.

पाकिस्तानच्या पहिल्या वहिल्या आईच्या दूध बँकेच्या उपक्रमाचं काय होणार हे अद्याप स्पष्ट नाही.

मात्र, कराचीत बशिराचं ते लहान बाळ मोठं होऊन आता, ती एक गोंडस मुलगी बनली आहे. त्यात हॉस्पिटलची भूमिका महत्त्वाची आहे. संभाव्य डोनरची माहिती हॉस्पिटलनं त्यांना एका अनौपचारिक पद्धतीनं पुरवली होती.

बाळाला जशी ऐन मोक्याच्या क्षणी मदत मिळाली त्याप्रमाणेच बशिरा आता इतर मातांना मदत करण्याच्या संधीची वाट पाहत आहेत.

आपल्या मुलीचे प्राण वाचवणाऱ्या त्या महिलेचे आभार मानताना बशिरा म्हणतात, "मी त्या डोनर मातेची कायमची ऋणी आहे. भविष्यात जर मला या उपकारांची परतफेड करण्याची आणि बाळाचा जीव वाचवण्याची संधी मिळाली. तर मी सुद्धा कोणत्याही बाळासाठी हेच करेन."