चीनमध्ये अज्ञात विषाणूचा संसर्गाने चार लोकांचा मृत्यू

फोटो स्रोत, Reuters
चीनमध्ये गेल्या दोन दिवसात 139 जणांना एका अज्ञात विषाणूची लागण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. वुहान शहराच्या बाहेरही या विषाणूचा संसर्ग झाल्याचं अधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच मान्य केलं आहे.
वुहान व्यतिरिक्त चीनच्या बीजिंग आणि शेन्झेन प्रांतात विषाणू संसर्गाचे नवीन रुग्ण सापडले आहेत. या विषाणुची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता 200 वर पोहोचली आहे आणि मृतांची संख्या चारवर पोहोचली आहे.
89 वर्षाच्या एका वृद्धाचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. या विषाणुमुळे न्युमोनिया होतो आणि त्यामुळे मृत्यू ओढवतो. जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूमुळे आलेलं संकट सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी असल्याचं जाहीर करण्याबाबत विचार करत आहे. स्वाईन फ्लू आणि इबोलाच्यावेळी अशा प्रकारचं पाऊल उचलण्यात आलं होतं. बुधवारी होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल.
हा विषाणू व्यक्तीद्वारे पसरतो यावर चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शिक्कामोर्तब केलं आहे. यामुळेच दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांना वेगळ्या वॉर्डात ठेवलं होतं.
विषाणू संसर्ग झालेल्यांचा शोध आणि चाचण्या घेण्यात वाढ झाल्यामुळे अधिकाधिक रुग्णांची माहिती समोर येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
हा नवीन विषाणू पहिल्यांदा डिसेंबर महिन्यात चीनमधील वुहान प्रांतात आढळून आला होता. आता तो चीनबाहेरही पसरला आहे. थायलंडमध्ये विषाणू संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत, तर जपानमध्ये एक रुग्ण सापडला आहे.
युकेमधील तज्ज्ञांच्या मते संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही अधिकृत संख्येपेक्षा प्रचंड असू शकते.
काय आहे सध्याची परिस्थिती?
वुहान प्रांतातील अधिकाऱ्यांनी सांगितलं, की गेल्या दोन दिवसांमध्ये 136 नवीन रुग्ण सापडले असून या विषाणूमुळे तीन रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत.
रविवारपासून (19 जानेवारी) वुहानमध्ये 170 जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
बीजिंगच्या डाक्झिंग जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं, की जे दोन लोक वुहानला जाऊन आले होते, त्यांच्यावर न्यूमोनियाचे उपचार सुरू करण्यात आले असून त्यांना या विषाणूचीच लागण झाली असावी.

वुहानला जाऊन आल्यानंतर एका 66 वर्षीय वृद्धामध्येही विषाणू संसर्गाची लक्षणं दिसून आल्याचं शेन्झेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. जेवढा अंदाज होता, त्यापेक्षा अधिक लोकांना विषाणुची लागण झाल्याची भीती शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.
कोणतीही काळजी न घेता प्राण्यांच्या संपर्कात येऊ नका, सर्दी-खोकला किंवा फ्ल्यूची लक्षणं असणाऱ्या व्यक्तीशी कोणतीही जवळीक टाळा, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येक आहे.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं सुरूवातीला म्हटलं होतं, की हा विषाणू नियंत्रणात येऊ शकतो आणि त्याचा प्रतिबंधही करता येईल. मात्र या विषाणूवर बारकाईनं लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण त्याचा स्रोत, संक्रमण आणि वाढ कशी होते हे स्पष्ट नसल्याचंही राष्ट्रीय आरोग्य आयोगानं म्हटलं होतं.

फोटो स्रोत, EPA
चीनमध्ये या आठवड्यात चांद्र कालगणनेवर आधारित नवीन वर्ष सुरू होत आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी हजारो लोक प्रवास करतील. त्यादरम्यान या विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी काळजी घेण्यात येत आहे.
काय आहे हा विषाणू?
या विषाणूचे नमुने गोळा केले जात असून त्याची प्रयोगशाळेत तपासणी सुरू आहे. चीन आणि WHO नं हा विषाणू coronavirus असल्याचं स्पष्ट केलं आहे.
Coronavirus हा विषाणूमधील एक प्रकार आहे. पण त्यांपैकी केवळ सहा (सध्याचा नवीन विषाणू गृहीत धरल्यास सात) विषाणुंमुळेच लोकांना संसर्ग होतो.
सुरूवातीला या विषाणुमुळे सर्दी-पडशाचीच लक्षणं दिसतात. पण नंतर मात्र श्वसनाला त्रास होतो. 2002 साली चीनमध्ये पसरलेला सार्स (severe acute respiratory syndrome) हा coronavirus मुळेच झाला होता.
या नवीन विषाणूच्या genetic code चं विश्लेषण केल्यानंतर त्याचे सार्सचा प्रादुर्भाव करणाऱ्या coronavirus शी साधर्म्य आढळून आलं आहे.

हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









