आरोग्य: 'मला व्यायामाचं व्यसन जडलं आणि सगळंच बिघडत गेलं'

व्यायाम करणारी महिला

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, निकोला केली
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्विस

सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असलेला व्यायाम घातक ठरू शकतो का? यासंबंधी असलेल्या अॅप्समुळे परिस्थिती अधिकच चिघळू शकते का?

वॅलेरी स्टीफन. व्यायामाचं महत्त्व मनापासून पटलेली महिला. रोजचा मॉर्निंग वॉक ठरलेला.

त्या सांगतात, "मी जेव्हा धावते तेव्हा मी काहीतरी साध्य करत आहे, असं वाटतं. हळूहळू माझ्या धावण्याचा वेग वाढला, शारीरिक ताकदही वाढली. हे माझ्यासाठी यशाच्या छोट्या-छोट्या पायऱ्या चढण्यासारखं होतं."

वॅलेरी यांनी जवळपास 10 वर्षांपूर्वी फिटनेससाठी केवळ जॉगिंग सुरू केलं. कालांतराने त्यांनी 5 किलोमीटर पळण्याच्या शर्यतीत भाग घेतला. मग 10 किलोमीटर शर्यतीत भाग घेतला. त्यानंतर मॅरेथॉन. मात्र, हळूहळू केवळ जॉगिंग करण्यासाठी त्या सकाळी खूप लवकर उठू लागल्या आणि इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्त्व धावण्याला देऊ लागल्या.

त्या सांगतात, "मला जाणवू लागलं, की मी हळूहळू व्यायामाच्या अधीन होत आहे आणि लवकरच याचं रुपांतर व्यसनात झालं."

"माझं कुटुंब, माझं काम, माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर याचा परिणाम झाला. हळूहळू व्यायामामुळे माझं नुकसान होऊ लागलं."

व्यायामाचं व्यसन जसजसं वाढतं गेलं वॅलेरी आपल्या जीवाभावाच्या लोकांपासून दुरावू लागल्या.

Valerie Stephan

त्या म्हणतात, "माझ्या नात्यावर याचा विपरित परिणाम होऊ लागला. काहींना मी काय करतीये हे कळतच नाही किंवा मी व्यायाम का करते, हे ते बघतच नाहीत. त्यांना वाटायचं मला वेड लागलं आहे."

भेटल्यानंतर आपण स्क्वॅश खेळू किंवा पोहायला जाऊ, याच अटीवर वॅलेरी मित्र-मैत्रिणींनाही भेटायच्या. दिवसभरासाठी व्यायामाचं टार्गेट पूर्ण झाल्यावरच त्या आराम करायच्या.

"मित्र-मैत्रिणींना वाटायचं मला त्यांना भेटायची इच्छा नाही. पण, मला त्यांना भेटायची इच्छा असायची. फक्त मी माझा व्यायाम योग्य प्रकारे केला नाही तर मला फार अपराधी वाटायचं. हे माझ्यासाठी दोन दगडांवर पाय ठेवण्यासारखं होतं."

व्यायामाच्या अतिरेकाचा त्यांच्या इतर महत्त्वाच्या नात्यांवरही परिणाम झाला होता.

Stretch

त्या सांगतात, "मी कधीच आराम करायचे नाही. मी सतत पळायला जायचे. घरी वेळ घालवावा, असं मला कधीच वाटायचं नाही."

"मला दाखवायचं होतं, की मी 'सुपरह्युमन' आहे आणि सगळं माझ्या नियंत्रणात आहे. पण, भावनिकदृष्ट्या हे सगळं माझ्यासाठी किती अवघड होतं, हे मला जाणवू द्यायचं नव्हतं."

अनेक वर्षं स्वतःचं शरीर आणि मन दोघांनाही अतिरेकी ताण दिल्याने वॅलेरी यांना नैराश्याने ग्रासलं. त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी वेळ हवा होता. त्यासाठी त्यांनी ऑफिसमधून चार महिन्यांची रजा घेतली.

व्यायामाचा अतिरेक हे 'वर्तनासंबंधीचं व्यसन' या श्रेणीत मोडतं, असं मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. यात व्यक्ती अगदी वेडीपिशी होते. एखादीच गोष्ट त्याच्यासाठी अनिवार्य होऊन जाते किंवा मग ती व्यक्ती स्वतःच्या खाजगी आयुष्यात अगदी निष्क्रिय होऊन जाते. खाजगी आयुष्याकडे दुर्लक्ष करते.

जवळपास 3% लोक या व्यसनाला बळी पडतात आणि धावणाऱ्या लोकांमध्ये याचं प्रमाण 10% असल्याचं सांगितलं जातं.

नॉर्थ लंडनमधल्या प्रायोरी हॉस्पिटलमध्ये सल्लागार मानसोपचार तज्ज्ञ असलेले डॉ. चेत्ना कँग सांगतात, वॅलेरीप्रमाणे खाजगी ताणापासून मुक्तता हवी असणाऱ्या हौशी धावपटूना हे व्यसन जडण्याची भीती अधिक असते.

ते म्हणतात, "बरेचदा लोक आमच्याकडे नात्यातील दुरावा, चिंता, नैराश्य या कारणांसाठी येतात. मात्र, तुम्ही जेव्हा खोलात जाता तेव्हा लक्षात येतं, की यामागचं मुख्य कारण व्यायाम आहे."

ते पुढे सांगतात, "हे खूप कॉमन नसलं तरी याचं प्रमाण वाढत आहे."

Presentational grey line

व्यायामाचं व्यसन म्हणजे काय?

डॉ. कॅझ नॅमन बाल आणि किशोरवयीन मुलांच्या मानसोपचारतज्ज्ञ आहेत. खानपानविषयक विकारांमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलं आहे. त्या सांगतात, की त्यांच्या रुग्णांमध्ये बरेचदा व्यायामाचा अतिरेक आढळून येतो.

  • व्यायामाचं व्यसन म्हणजे नेमकं काय, याची व्याख्या करणं कठीण आहे. याविषयावर अजून संशोधन सुरू आहे आणि यासाठी वेगवेगळ्या संज्ञा वापरल्या जातात. उदा. exercise dependence (व्यायामावरील अवलंबित्व) , compulsive exercise (सक्तीचा व्यायाम) and obligatory exercise (अनिवार्य व्यायाम).
  • सर्वसामान्यपणे व्यायाम मानसिक आरोग्यासाठी उत्तम असतो. सौम्य नैराश्य किंवा अतीव चिंता हाताळण्याचा व्यायाम उत्तम मार्ग आहे. मात्र, व्यायामाचा अतिरेक केल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
  • फिटनेसप्रती जागरुक असलेल्यांना व्यायामाचं व्यसन जडण्याची शक्यता अधिक असते. विशेषतः यश आणि प्राविण्य यामुळे तुम्ही प्रेरित होत असाल तर ही शक्यता जास्त असते.
  • तुम्ही सोशल मीडियावर माहिती टाकत असाल तर तुम्ही व्यायाम करता हे सार्वजनिक होतं, चढाओढ वाढते. त्यामुळे ज्यांना व्यसन जडण्याची शक्यता असते अशांसाठी हे घातक ठरू शकतं.
Presentational grey line

स्ट्रेस फ्रॅक्चर्स, त्वचाविकार, रोग प्रतिकार क्षमता मंदावणं ही व्यायामाच्या व्यसनाची काही लक्षणं आहेत.

महिला "female athlete triad" ला बळी पडण्याची शक्यता असते. यात मासिक पाळी बंद होणं, हाडांचं दुखणं आणि खाण्या-पिण्यासंबंधीचे विकार जडण्याची शक्यता असते. तर पुरुषांमध्ये अतिरेकी व्यायामामुळे कामेच्छा कमी होण्याचा धोका असतो.

मार्टन टर्नर हे मँचेस्टर मेट्रोपोलिटन विद्यापीठात क्रीडा आणि व्यायाम मानसोपचारतज्ज्ञ आहेत. त्यांनी 10 वर्षं धावपटूंबरोबर काम केलं आहे आणि त्यांचा अभ्यास केला आहे. आपण धावपटू आहोत, याचा अभिमान असलेली आणि आपल्या या प्रतिमेच्या पूर्णपणे आहारी गेलेली माणसंही या काळात त्यांना भेटली आहेत.

ते सांगतात, "आपण मनुष्य म्हणवून घेण्यास किती पात्र आहोत, हे धावपटू म्हणून आपल्या यशातून दिसतं, अशी त्यांची समजूत झालेली असते. 'धावपटू म्हणून मी जिंकलो तर मला किंमत आहे. मी हरलो तर माझी काहीच किंमत उरणार नाही.'"

"धावणे हा तुमच्या असण्याचा भाग झालेला असतो. तुम्ही धावत नसाल तर कोण तुम्ही?"

warming up

टर्नर यांच्या अभ्यासातून दिसून येतं, की अशा प्रकारच्या 'अतार्किक समजुती' व्यायामावर अधिक अवलंबून राहाणे, नैराश्य, संताप, चिंता, अतिताणाशी संबंधित असतात.

ते म्हणतात, "या समजुती अतार्किक असण्यामागे तीन मुख्य कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे यामुळे आरोग्याचं हित साधण्यापेक्षा त्याला अपायच अधिक होतो."

"दुसरं कारण म्हणजे यातून मिळणारी प्रेरणा ही अल्पकालिक आणि अपराधबोधाच्या भावनेवर आधारित असते. लोक शरीरस्वास्थ्यासाठी धावण्याऐवजी अपराधबोध टाळण्यासाठी धावतात."

stretching

"तिसरं कारण म्हणजे यामुळे वास्तवाचं भान उरत नाही. केवळ धावून उपयोग नाही तर त्यासोबतच खाणं-पिणं, शरीरातील पाण्याचं प्रमाण आणि चांगली झोपही महत्त्वाची आहे."

खेळामुळे शरीरात अॅड्रेनॅलिन आणि एन्डोर्फिन ही हार्मोन्स स्त्रवत असतात. या हॉर्मोन्सच्या लालसेतून स्वतःची सुटका करणं, अवघड होऊन बसतं.

व्यायामाचं प्रमाण कमी केल्यावर वॅलेरी यांना खूप त्रास व्हायचा. अस्वस्थ वाटायचं आणि यामुळेच आपण व्यायामाच्या दुष्टचक्रात अडकत गेल्याचं त्या सांगतात.

wearable technology

त्यांनी सांगितलं, "ज्या दिवशी व्यायाम करणं शक्य व्हायचं नाही, तेव्हा मला खूप अस्वस्थ वाटायचं. झोप यायची नाही. डोकं दुखायचं. ज्या दिवशी मी व्यायामासाठी बाहेर पडू शकायचे नाही, त्यादिवशी मला जेलमध्ये असल्यासारखं, डांबून ठेवल्यासारखं वाटायचं."

विशेषतः व्यायामासंबंधीचे अॅप्स किंवा स्ट्रॅव्हा, गार्मिन, फिटबिट आणि यासारख्या तांत्रिक उपकरणांनी वेढले गेल्यावर व्यायाम कमी करणं आणखी कठीण होऊन जातं.

वॅलेरी सांगतात, "मला अॅप्स आवडतात. माझा वेग, मी किती व्यायाम केला, व्यायामात किती प्रगती केली, या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी मी रोज अॅप्स बघते."

"जेव्हा मॅरेथॉनसारख्या स्पर्धा जवळ येतात आणि तुमचे मित्र तुमच्यापेक्षा जास्त व्यायाम करत आहेत, असं तुमच्या लक्षात येतं तेव्हा तुमच्यावर दबाव येतो."

क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ मार्टीन टर्नर सांगतात, की यंत्राच्या माध्यमातून मिळणारा हा डेटा तुमचं व्यसन अधिक वाढवतो आणि उपचारात बाधक ठरतो.

ते म्हणतात, "मोजमाप तुम्हाला आत्म-सन्मानाचं इंजेक्शन देतं. अॅप्स तुम्हाला सतत सांगत असतात, की तुम्ही कमी पडलात, मागच्यावेळेपेक्षा तुमची ही कामगिरी चांगली नाही, तुमच्या मित्रासारखी तुमची कामगिरी झाली नाही आणि हीच समस्या आहे. तुम्ही सतत इतरांशी स्वतःची तुलना करत असता."

ब्रिटीश ट्रायथलॉन कोच असलेल्या ऑड्रे लिव्हिंगस्टोन यांच्या मते अॅप्स आणि गॅझेट्स यामुळे धावपटूंमध्ये व्यायामाप्रति निकोप दृष्टिकोन तयार होऊ शकत नाही.

उपचाराचा मार्ग

फोटो स्रोत, Getty Images

त्या म्हणतात, "काही जण व्यायामातून आनंद मिळवू शकत नाही. इतर लोक काय करत आहेत, हे बघण्यातच त्यांचा वेळ जातो."

"मी त्यांना सांगते, की तुमची स्वतःची कामगिरी सुधारा. त्यावर लक्ष केंद्रित करा."

आणि हा सल्लाही अत्यंत काळजीपूर्वक द्यायला हवा.

"मी त्यांच्या व्यायामाचं प्रमाण कमी करते. पण त्यांना ते आवडत नाही. ते प्रश्न विचारतात आणि काही जणांना व्यायाम कमी करणं अवघड जातं", असं लिविंगस्टोन सांगतात.

"आपल्याला आरामाची गरज का आहे, हे त्यांना कळतच नाही."

person falling into void

उपचाराचा मार्ग

इतर व्यसनांप्रमाणेच व्यायामाच्या व्यसनाचं दुष्टचक्र भेदून उपचार घेणं लांबलचक आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असते. टर्नर यांच्या मते स्वतःचा स्वीकार करणं ही व्यसनातून बाहेर पडण्याची पहिली पायरी आहे.

ते सांगतात, "धावपटूनं एक गोष्ट करणं आवश्यक आहे. ती म्हणजे आपले विचार, उद्दिष्टं आणि श्रद्धा ओळखून त्यांना सामोरे जाणे."

"वास्तव स्वीकारून लवचिक व्हायची गरज असते. स्वतःला सांगता आलं पाहिजे की 'मी आज व्यायाम केला नाही तर ते कदाचित चुकीचं असेल. पण ही जगातली सर्वात वाईट बाब खचितच नाही.' आणि 'मी व्यायाम केला नाही तर त्यामुळे मी निरुपयोगी पराभूत व्यक्ती ठरत नाही.' असा विचार करणं वास्तववादी आणि कमी नुकसाककारक आहे."

वॅलेरीसाठी पुन्हा संतुलित व्यायामाकडे वळणं आणि आराम करणं, अजूनही मोठं आव्हान आहे. मात्र, त्यांना त्यांच्या घरच्यांची साथ आणि भक्कम पाठिंबा आहे. त्यामुळे आपण यातून नक्की बाहेर पडू, असा त्यांना विश्वास आहे.

त्या म्हणतात, "व्यायाम माझ्यासाठी व्यसन बनलं आहे, हे कळायलाच मला खूप वेळ लागला."

"सोडून द्या, झपाटून जाऊ नका, सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याचा अट्टाहास करू नक आणि स्वतःलाच सांगा, की परफेक्ट होण्याची गरज नाही."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)