वाढत्या कोलेस्टेरॉलची काळजी पंचविशीतच घ्या...

हृदयविकार

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, फर्गस वॉल्श
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

लोकांनी आपल्या कोलेस्टेरॉलची पातळी पंचविशीतच तपासावी, असं संशोधकांचं म्हणणं आहे. याचं कारण म्हणजे कोलेस्टेरॉल वाढलं नसलं तरी पंचविशीत त्याची जी पातळी असेल त्यावरूनच भविष्यात हृदयविकाराचा किती धोका आहे ते कळू शकतं.

'लॅन्सेट' नावाच्या मेडिकल जर्नलमध्ये हे नवीन संशोधन प्रसिद्ध झालं आहे. यात अनेक वर्ष शरीरात 'बॅड कोलेस्टेरॉल' साठलं तर त्याचे शरीरावर काय परिणाम होतात याबद्दल सखोल चर्चा झाली आहे.

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी डाएट आणि औषधांनी जितक्या कमी वयात प्रयत्न सुरू होतील तितकं चांगलं असं या अभ्यासात म्हटलं आहे.

कोलेस्टेरॉल म्हणजे काय?

कोलेस्टेरॉल म्हणजे एक प्रकारची चरबी, जी काही अन्नपदार्थांमध्येही असते आणि आपल्या यकृतात तयार होते.

इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन असे हार्मोन्स तसंच व्हिटॅमिन-डी तयार करण्यासाठी या कोलेस्टेरॉलची गरज भासते.

कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत.

  • हाय डेन्सिटी कोलेस्टेरॉल - या कोलेस्टेरॉलला 'गुड' कोलेस्टेरॉल असं म्हणतात. कारण यामुळे शरीर तंदुरुस्त राहातं.
  • लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल - या 'बॅड' कोलेस्टेरॉल म्हणतात कारण याने आपल्या हृदयाजवळच्या धमन्या ब्लॉक होतात.

अभ्यासकांचे निष्कर्ष

अभ्यासकांनी 19 देशांमधल्या 4 लाखाहून अधिक माणसांचा अभ्यास केला. या अभ्यासात त्यांच्या असं लक्षात आलं, की कमी वयात ज्या लोकांचं बॅड कोलेस्टेरॉल जास्त असतं त्यांना चाळीशीनंतर हृदयविकारचा अधिक धोका असतो.

पस्तीस किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांचं लिंग, वय, त्यांच्या शरीरात असणाऱ्या बॅड कोलेस्टेरॉलची पातळी, डायबेटिस, ब्लड प्रेशर, वजन, उंची आणि धूम्रपानाचं व्यसन या गोष्टींचा अभ्यास करून त्यांना कधी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो याचा अंदाज संशोधकांनी वर्तवला.

कोलेस्टेरॉल

फोटो स्रोत, BLACKJACK3D/GETTY

या अभ्यासाचे सह-लेखक तसंच युनिव्हर्सिटी हार्ट सेंटर, हॅम्बर्ग इथले प्रोफेसर स्टेफान ब्लँकेनबर्ग यांनी म्हटलं, "सध्या ज्या प्रकारे कोलेस्टेरॉलची पातळी मोजली जाते त्यानुसार त्या व्यक्तीला जास्तीत जास्त पुढच्या 10 वर्षात हृदयविकाराचा धोका आहे की नाही त्याचा अंदाज येतो. पण त्या व्यक्तीच्या प्रकृतीनुसार तसंच तिची जीवनशैली, सवयी आणि कोलेस्टेरॉलच्या पातळीमुळे तिला संपूर्ण आयुष्यात हृदयविकाराचा धोका आहे की नाही हे लक्षात येत नाही, खासकरून तरूणांच्या बाबतीत."

युकेमध्ये दरवर्षी 80 लाख लोक कोलेस्टेरॉल कमी करण्याची औषधं घेतात.

एका आकडेवारीनुसार दर 50 पैकी 1 व्यक्ती जी कोलेस्टेरॉल कमी करण्याची औषधं घेते, तिला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते.

सदृढ जीवनशैली, व्यायाम आणि आरोग्यदायी आहार यामुळेही कोलेस्टेरॉल कमी होतं.

तिशीतल्या लोकांनी कोलेस्टेरॉल कमी करण्याची औषधं घ्यावीत का?

अगदीच तशी आवश्यकता नसेल तर नाही. अभ्यासकांनी कोणत्याही प्रौढ व्यक्तीने हाय कोलेस्टेरॉलसाठी गोळ्या घ्याव्यात, असं थेटपणे सांगितलेलं नाही.

प्रोफेसर ब्लँकेनबर्ग यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "तरूणांनी आपली कोलेस्टेरॉल पातळी जाणून घ्यावी आणि सर्वसमावेशक विचार करून निर्णय घ्यावा. मग कोलेस्टेरॉल कमी करण्याच्या गोळ्या घ्यायच्या असल्या तरी निर्णय त्यांनी स्वतः घ्यायला हवा."

योग्य डाएटमुळे कोलेस्टेरॉल कमी होतं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, योग्य डाएटमुळे कोलेस्टेरॉल कमी होतं

पण ब्लँकेनबर्ग यांच्यामते यात एक धोका आहे. "लोक आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्यापेक्षा औषधांवरच निर्भर राहतील आणि कोलेस्टेरॉल कमी करण्याच्या गोळ्यांचे प्रथमदर्शनी काही साईडइफेक्टस नसले तरी अनेक दशकं त्या गोळ्या घेत राहिल्याने शरीरावर काय परिणाम होऊ शकतात, यावर अजून अभ्यास झालेला नाही."

"या संपूर्ण अभ्यासाचा उद्देश वाढतं कोलेस्टेरॉल आरोग्यासाठी किती धोकादायक आहे हे ठसवण्याचा आहे. त्याने हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण अनेक पटींने वाढतं," ब्रिटिश हार्ट फाउंडेशनचे प्रोफेसर सर नीलेश समानींनी म्हटलं.

"यामुळे हेही लक्षात येतं, की जे लोक आपलं कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी योग्य वयात प्रयत्न करतात, चांगला आहार घेतात किंवा औषधं घेतात, त्या लोकांना भविष्यात हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)