World Food Day : तुम्ही अन्नाची नासाडी थांबवलीत तर काय होईल माहितीये का?

फोटो स्रोत, Getty Images
दरवर्षी 1.3 अब्ज टन एवढं प्रचंड अन्न वाया जातं. यातलं बहुतांश अन्न जमिनीच्या पोटात जातं आणि त्याचा हवामान बदलावर परिणाम होतो.
अन्नाची नासाडी हा मानवजातीसमोरची एक मोठी समस्या आहे असं न्यूयॉर्कचे शेफ मॅक्स ला मना यांनी सांगितलं.
'मोर प्लँट्स, लेस वेस्ट' या पुस्तकाचे ते लेखक आहेत. सर्वसामान्य माणूस कसा बदल घडवून आणू शकतात त्यासंदर्भात त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे.

खाणं माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. माझे वडील शेफ होतो, त्यामुळे मी खाण्यापिण्याच्या संस्कृतीत वाढलो.
अन्न कधीही टाकू नका हा संस्कार मला आईवडिलांनी दिला. पृथ्वीवरच्या 9 अब्ज लोकांसमोर खाद्यटंचाई आहे. 28 कोटी लोकांना धड खायलाही मिळत नाही.

फोटो स्रोत, Andrew Burton
अन्नाची नाासाडी हा मानव प्रजातीसमोरचा मोठा प्रश्न आहे. तयार झालेल्या अन्नपदार्थांपैकी एक तृतीयांश अन्न वाया जातं असं अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.
अन्नाची नासाडी म्हणजे केवळ अन्न वाया जातं असं नाही. ती पैशाची, पाण्याची, ऊर्जेची, जमिनीची आणि वाहतुकीची नासाडी असते.
अन्न टाकून देणं हवामान बदलाला कारणीभूत ठरतं. टाकून देण्यात आलेलं अन्न जमिनीत जातं आणि तिथे सडतं. त्यातून मिथेन गॅसची निर्मिती होते.
अन्न नासाडी हा देश असता तर अमेरिका आणि चीननंतर ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन करणारा तो तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला असता.
अन्न वाया जाऊ नये म्हणून तुम्ही हे करू शकता.
स्मार्ट खरेदी करा
गरजेपेक्षा जास्त वस्तू खरेदी करण्याचा अनेकांचा कल असतो. खरेदीला निघण्यापूर्वी यादी करा. यादीत जेवढं लिहिलंय तेवढ्याच गोष्टी खरेदी करा. नवीन वाणसामान खरेदी करण्यापूर्वी जाताना मागच्या वेळी घेतलेल्या गोष्टी आपण वापरल्या ना? याचा आढावा घ्या.

फोटो स्रोत, Getty Images
अन्न सुरक्षितपणे साठवा
योग्य पद्धतीने साठवणूक न झाल्याने प्रचंड प्रमाणावर अन्नाची नासाडी होते. फळं, भाज्या नेमकं कशा साठवाव्या याची अनेकांना माहिती नसते. यामुळे अन्न आंबतं आणि ते कुजू लागतं.

फोटो स्रोत, Getty Images
उदाहरणार्थ, बटाटे, टोमॅटो, लसूण, काकडी, कांदे कधीही फ्रीजमध्ये साठवू नयेत. या भाज्या सर्वसामान्य वातावरणात ठेवाव्यात.
पालेभाज्या आणि औषधी वनस्पती यांची देठं पाण्यात भिजवून ठेवावीत. लगेच संपणार नसेल तर ब्रेड फ्रीझरमध्ये ठेऊन द्यावा. भाजी घेताना पूर्ण तयार झालेली फळं, भाज्या घेऊ नका. शेतकऱ्यांकडून थेट भाजीपाला खरेदी केलात तर उत्तम.
उरलेलं अन्न साठवा (आणि खाऊनही टाका)

फोटो स्रोत, Getty Images
शिळंपाकं सुट्टीसाठी तयार होत नाही. तुम्ही अतिरिक्त जेवण बनवत असाल तर शिळ्या गोष्टी खाण्याचा एखादा दिवस ठरवून घ्या. ते अन्न फ्रीजमध्ये साठवून ठेवा.
अन्न फेकून देण्यापासून स्वत:ला रोखा. असं करण्यामुळे पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल.
फ्रीझरशी मैत्री करा
फ्रिजमध्ये अन्न साठवणं हा खूप सोपा पर्याय आहे. फ्रिजमध्ये काय काय साठवता येईल याची यादी न संपणारी आहे. सॅलडमध्ये वापरता येणार नाहीत अशा हिरव्या भाज्या फ्रीझरमध्ये बॅगेत किंवा कंटेनरमध्ये ठेवता येऊ शकतात. स्मूदी किंवा अन्य रेसिपीत त्या वापरता येऊ शकतात.
औषधी वनस्पती जास्त प्रमाणात शिल्लक राहिल्या तर ऑलिव्ह ऑईल आणि कापलेल्या लसणासह बर्फाच्या क्यूबमध्ये ठेवता येऊ शकतात. नवीन पदार्थ तयार करताना हे मिश्रण कामी येऊ शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
जेवणात ज्या गोष्टी उरतात त्या खाता येऊ शकतात. ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर जेवण शिजवलं जातं तिथे हा उपाय नक्की अंमलात आणला जाऊ शकतो. अशाद्वारे नेहमी आरोग्यदायी घरचं अन्न तुम्हाला मिळू शकतं.
तुमचा डबा तुम्हीच भरा
आपल्या ऑफिस सहकाऱ्यांसमवेत लंचला जाणं किंवा आवडीच्या रेस्तराँमध्ये जेवणं- आनंददायी असू शकतं. मात्र ते दरवेळी खिशाला परवडणारं असेल असं नाही. यामुळे खाणं वाया जातं.

फोटो स्रोत, Getty Images
पैसा वाचवणं आणि कार्बन फूटप्रिंट कमी करणं यासाठीचा सर्वोत्तम उपाय म्हणजे घरून डबा घेऊन येणं.
सकाळी आवरण्याची घाई असेल तर कालचं शिल्लक राहिलेलं अन्न कंटेनरमध्ये भरून घेऊन या. तुम्हाला तुमचा रेडीमेड डबा मिळू शकेल.
घरगुती अन्न

फोटो स्रोत, Getty Images
अन्नधान्याची नासाडी टाळण्याचा सोपा मार्ग म्हणजे घरातल्या अनावश्यक गोष्टी नष्ट करणं.
शक्य असल्यास खत बनवा

फोटो स्रोत, Getty Images
उरलेल्या अन्नाचं खत बनवणं हा अन्न नासाडी टाळण्याचा उत्तम उपाय आहे. तुमचं राहिलेलं अन्न झाडांना नवी ऊर्जा देऊ शकतं.
प्रत्येकाला शिल्लक गोष्टी कंपोस्ट करणं शक्य नसतं. मात्र तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे इमारत किंवा बंगल्याच्या छतावर कमी जागेत कंपोस्ट यंत्रणा उभारता येते.
ज्यांच्या घराशेजारी बाग आहे, त्यांना कंपोस्ट करणं सोपं होऊ शकतं. शहरांमध्ये घराच्या गच्चीत औषधी वनस्पतींची लागवड करता येऊ शकते.
छोटे उपाय, मोठे परिणाम
तात्पर्य हे की आपण अन्न नासाडी नक्कीच टाळू शकतो आणि ती टाळण्याचे अनेकविध उपाय आहेत. तुम्ही, तुमच्या घरचे रोज किती अन्न वाया घालवतात याचा विचार करा, जेणेकरून ही नासाडी होऊ नये याकरता तुम्ही उपाययोजना करू शकता. पृथ्वीवरच्या महत्त्वाच्या संसाधनांपैकी एक तुम्ही जपू शकता.

फोटो स्रोत, Getty Images
तुम्ही भाज्या आणि किराणा सामानाची खरेदी करता, जेवण कसं तयार करता, कशा प्रकारे खाता याचा अभ्यास करा. कारण यात छोटासा बदल पर्यावरणावर मोठा परिणाम घडवून आणू शकतो. आणि हे करणं फार कठीण नाही.
अन्नाची नासाडी थांबवल्याने तुमचा पैसा आणि ऊर्जा दोन्हीची बचत होऊ शकते. असं करण्याने पृथ्वीवरचा भार तुम्ही हलका करू शकता.
मूळ स्टोरी बीबीसी अर्थ इथे प्रसिद्ध झाली होती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता. )








