अगदी मटण बर्गरसारखं दिसणारं हे बर्गर शुद्ध शाकाहारी आहे!

फोटो स्रोत, IMPOSSIBLE FOODS
- Author, अॅलिसन वॅन डिगिलन
- Role, बीबीसी व्यापार तंत्रज्ञान प्रतिनिधी
एकोणीस वर्षीय इव्हान मकोरमॅक एका कॅफेमध्ये बसून आपल्या समोर ठेवलेल्या मोठ्या लज्जतदार बर्गरकडे एकटक बघतोय. 'हा दिसतोय तर मांसाहारी बर्गरसारखाच. त्याचा सुवासही तसाच आहे. ते थोडं लालसरही दिसतंय. मग हा कसा काय एक व्हेज बर्गर असू शकतो?'
कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन आणि जंगलतोड करण्यात मांस उद्योगाचा प्रमुख वाटा आहे. या उद्योगाला पाणीही प्रचंड मोठ्या प्रमाणात लागतं. पण प्रयोगशाळेत तयार केलेले काही पर्यायी शाकाहारी पदार्थ आपली मांसाहाराची सवय सोडवू शकतात का?
सिलिकॉन व्हॅलीतील तंत्रज्ञान कंपन्या यावर पैज लावायला तयार आहेत. आणि याचाच एक प्रयोग आता मकोरमॅकवर झाला.
"इतर बर्गर्सच्या तुलनेत तो किती खमंग आणि कुरकुरीत आहे ना! मला हेच आवडलं," इव्हान त्या बर्गरचा एक बाईट घेतल्यावर सांगतो. "त्याचं टेक्चर माझ्या मते त्यातला सगळ्यांत मोठा भाग आहे."
सिलिकॉन व्हॅलीतील 'इंपॉसिबल बर्गर्स'नं गहू, खोबऱ्याचं तेल आणि बटाटे वापरून बनवलेला हा बर्गर त्याच्या चिकनप्रेमी कॉलेज मित्रांनाही कदाचित सहज फसवू शकेल, असा त्याला विश्वास आहे.
2035 पर्यंत मांसाऐवजी तंत्रज्ञान वापरून प्रक्रिया केलेलं अन्नाचं राज्य प्रस्थापित करण्याची या फर्मचे CEO पॅट ब्राऊन यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे.
त्यांची प्रेरणा काय? पर्यावरण.
ते शेतावरच्या प्राण्यांकडे छोट्या कारखान्यांसारखेच पाहतात. आणि सध्याच्या मांस, मत्स्य आणि डेअरी उद्योगाबद्दल त्यांना चीड आहे.

"या उद्योगांमध्ये पृथ्वीवरचं सर्वाधिक विध्वंसक तंत्रज्ञान आहे - खनिज तेल उत्पादन, वाहतूक व्यवस्था किंवा अगदी खाणकाम आणि लाकुडतोडीपेक्षाही जास्त विध्वंसक," असा त्यांचा दावा आहे.
"हा उद्योग हरितगृह वायूंचा मुख्य स्रोत आहे. आणि पाण्याचा सर्वांत जास्त वापर इथेच होतो, तसंच पाण्याचं सर्वाधिक प्रदूषण यातच होतं," असं ते सांगतात.
त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन - FAO) मते, एकूण हरितगृह वायूंपैकी 18 टक्क्यांसाठी पशुधन उत्पादन जबाबदार असतं. तर सेंटर फॉर अॅग्रिकल्चर अँड बायोसायन्स इंटरनॅशनलच्या म्हणण्यानुसार, पशु प्रथिनांच्या निर्मितीसाठी वनस्पती प्रथिनांच्या तुलनेत 11 पट जास्त जीवश्म इंधनाची गरज असते.

फोटो स्रोत, Getty Images
अॅमेझॉन आणि इतर ठिकाणी कुरणं किंवा खाद्य पिकांचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्राचीन वनसंपदेचा नाश केला जात आहे. पण त्याच बरोबर हा उद्योग अब्जावधी लोकांना रोजगार मिळवून देतो, आणि जगातील एक तृतीयांश प्रथिनांचा पुरवठा करतो, हे देखील FAO स्पष्ट करते.
साल 2000 मध्य मांस उत्पादन 229 मेट्रिक टन होतं, मात्र 2050 पर्यंत ते दुपटीनं वाढून 465 मेट्रिक टन होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे ब्राऊन यांच्यापुढे खूप मोठं काम आहे.
सिलिकॉन व्हॅलीतील पर्यावरणवादी आणि शाकाहारी लोकांमध्ये 'इंपॉसिबल बर्गर्स' लोकप्रिय ठरत असले तरी, अमेरिकेतील काही निवडक रेस्टॉरंट्समध्येच सध्या ते उपलब्ध आहेत.
कंपनीच्या ऑकलंडमधील कारखान्यात दरमहा सुमारे पाच लाख पाऊंड्सचे बर्गर्स तयार होतात, आणि 2020 पर्यंत सुपरमार्केटससाठी हे उत्पादन वाढवण्याची त्यांची योजना आहे. त्याच बरोबर त्यांचं मत्स्य उत्पादनावरही काम सुरू आहे.

ब्राऊन यांच्या टीममधील जीवरसायन शास्त्रज्ञांना हिम या रक्तासारख्या दिसणाऱ्या वनस्पती-आधारीत लोहयुक्त रेणूचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याचा मार्ग सापडला आहे. या बर्गरचा स्पर्धात्मक फायदा करुन देणारा हा अक्षरशः "सिक्रेट सॉस" आहे.
मांसाचा वास, चव आणि टेक्चर यांचं विश्लेषण करण्यासाठी या टीमनं गॅस क्रोमॅटोग्राफी-मास स्पेक्रोमेट्री आणि टेक्चर प्रोब यांसारख्या विद्यमान तंत्रज्ञानांचा वापर केला आहे. त्यानंतर वनस्पती-आधारीत प्रथिनांचा वापर करून प्रयोगशाळेत त्याची प्रतिकृती बनवण्यात येते.
'इंपॉसिबल बर्गर्स'चा असा दावा आहे की, मांसाहाराच्या चाहत्यांपैकी 47 टक्के लोकांना त्यातील फरक ओळखता आला नाही. आता 50 टक्क्यांचा टप्पा पार करण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत आहेत.
"ग्राहकांना खूश करण्यासाठी सध्याच्या आमच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या उत्पादनांपेक्षाही जास्त चांगली उत्पादनं आम्हाला निर्माण करावीच लागतील अन्यथा आम्ही पूर्ण अपयशी ठरू," ब्राऊन सांगतात.
उत्पादन वाढवणं हे मोठं आव्हान आहे, त्यामुळेच ही कंपनी आतूरतेनं भागीदारांचा शोध घेत आहे.

मांस उत्पादनाचा आणखी एक मार्ग म्हणजे अक्षरशः प्रयोगशाळेत प्राण्यांच्या पेशींपासून त्याची निर्मिती करणे. या "इन व्हिट्रो" किंवा "क्लीन मीट" दृष्टिकोनाचा पाठपुरावा सिलिकॉन व्हॅलीतील Memphis Meats आणि Just Inc या दोन कंपन्या करत आहेत.
Just Inc च्या प्रयोगशाळेतील ऑटोमेशन इंजिनियर चिंगयाओ यांग यांनी तिथल्या रोबोट्सचा मला परिचय करून दिला. हे रोबोट्स मॉलेक्युलर इंटरऍक्शन अर्थात रेणूंमधील परस्परसंवादाच्या विश्लेषणाचा वेग वाढवण्याचं काम करतात. प्रामुख्याने त्या फास्ट ट्रॅकिंग मॉलेक्युलर रेसिपी आहेत.
"शोधांची शक्यता वाढवण्यासाठी आम्ही डेटा आणि अल्गोरिदम्सचा वापर करत आहोत," यांग सांगतात.
त्यानंतर ज्येष्ठ शास्त्रज्ञ व्हिटॉर इस्पिरीटो सॅंटो आम्हाला फ्रिज सारख्या कंटेनरच्या फळ्या दाखवतात, ज्यामध्ये प्रायोगिक "ग्रोथ कॉकटेल्समध्ये" मुरणाऱ्या पेशींनी भरलेले फ्लास्कस् ठेवले आहेत.
कन्व्हेयर बेल्ट्सवरची उंच भांडी आणि स्टीक्सच्या लाद्या चितारलेले एक चित्र नव्या जगाचं स्वप्न दाखवणारं आहे.
"हे आमचं स्वच्छ मांस उत्पादनाचं शेत आहे," इस्पिरीटो सॅंटो सांगतात. "प्रमाणाचा विचार करता ते अमेरिकेतील सर्वांत मोठ्या कत्तलखान्याशी जुळणारं आहे, पण इथे गाई नाहीत. त्याऐवजी इथे दोन लाख लीटर बायोरिअॅक्टर्स आहेत. मांस म्हणून तुम्ही ज्या ज्या गोष्टींची कल्पना करू शकता, जसं की स्टीक्स, चिकन, अशी सगळी उत्पादनं बायोप्रिंटिंग बनवेल."
कंपनी 2018च्या उत्तरार्धात आपलं प्राथमिक उत्पादन बाजारात आणेल, तर आणखी गुंतागुंतीची उत्पादनं येत्या काही वर्षांत येतील, असं ते सांगतात.
"कोबे बीफ आणि चिकन ब्रेस्टपर्यंत आम्हाला जाऊन पोहचायचे आहे... आम्ही तिथपर्यंत नक्की पोहोचू," असं ते आत्मविश्वासानं सांगतात.
सॅन फ्रान्सिस्को बेच्या संपूर्ण परिसरात, मेम्फीस मीटस् त्यांच्या "स्वच्छ" मीटबॉलसाठी प्रसिद्ध आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी उमा व्हॅलेटी यामागचा मंत्र मला सांगतातः "बेटर मीट, लेस हिट!"

फोटो स्रोत, MEMPHIS MEATS
प्रयोगशाळेत मांस उत्पादन करून, मांस उत्पादनामुळे होणारे हरितगृह वायू उत्सर्जन 90 टक्क्यांनी कमी करता येईल, अशी त्यांना आशा आहे.
बिल गेटस् आणि रिचर्ड ब्रॅन्सन आणि त्याच बरोबर कारगिल आणि टायसन फुडस् यांच्यासारख्या पारंपारिक मांस पुरवठादारांकडून निधी मिळाल्यानं, Memphis Meatsच्या मागे पैशाचे सज्जड पाठबळ आहे.
अलाईड मार्केट रिसर्चच्या म्हणण्यानुसार, 2015 पासून पर्यायी मांस बाजारपेठ ही सामान्यतः 8.4 टक्क्यांनी वाढत असल्याचा अंदाज असून, 2020 पर्यंत त्याचे मूल्य 5.2 अब्ज डॉलरपर्यंत जाऊन पोहोचेल.
पण इतक्या शक्तिशाली अशा जागतिक मांस उद्योगांशी हे टेक स्टार्ट-अप्स खरोखरच दोन हात करू शकतील का? ते तर वेळच सांगेल.
तिकडे कॅफेमध्ये, गेल्या अनेक दशकांपासून शाकाहारी असलेले इव्हान मकोरमॅकचे वडील रिचर्ड मात्र 'इंपॉसिबल बर्गर'बाबत मुलापेक्षा थोडे कमी उत्साही दिसतात. तो इतर व्हेजी पॅटींपासून वेगळा करता येण्याजोगा नसल्याचं त्यांना वाटतं.
"हा सामान्य बर्गरपेक्षा तीन डॉलर्सनी महाग आहे," ते तक्रार करतात. "का? कारण त्यात एक छोटासा रेड फ्लॅग आहे म्हणून?"
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








