जन्म-मृत्यू : मेलेल्या माणसाच्या मनात काय चाललंय ओळखता येईल का?

- Author, रॉजर हायफिल्ड
- Role, बीबीसी न्यूज.
हजारो रुग्ण सद्यस्थितीत जीवन व मृत्यूमधील 'vegetative state'मध्ये अडकून पडलेले आहेत. या रुग्णांना या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी तीन शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.
"कल्पना करा... तुम्ही एका खोक्यामध्ये बंद आहात. हे खोके डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत पूर्णपणे पक्कं आहे...
हा एक विचित्र बॉक्स आहे, कारण तुम्ही तुमच्या अवतीभवती चालू असलेल्या सर्व गोष्टी ऐकू शकता परंतु तुमचा चेहरा व ओठ इतक्या घट्टपणे आवळले आहेत की तुम्ही काहीच बोलू शकत नाही, अथवा आवाज करू शकत नाही...
सुरुवातीला हा एक खेळ आहे असं तुम्हाला वाटतं.
परंतु हळूहळू हेच तुमचं वास्तव बनतं व त्याचबरोबर तुम्ही कुटुंबीयांना तुमच्या अवस्थेवर दुःखी होताना, तुमच्या भविष्याबद्दल काळजी करताना बघता, ऐकता.
तुमचं शरीर क्षणोक्षणी बदलतं - कधी खूप थंड, कधी खूप गरम व सतत लागलेली तहान या गोष्टींमुळे तुम्ही अस्वस्थ होता.
हळूहळू तुमच्या कुटुंबीयांच्या, आप्तेष्टांच्या, मित्रमैत्रिणींच्या भेटी कमी-कमी होत जातात.
तुमचे जीवनसोबती तुम्हाला सोडून आयुष्यात पुढे जातात आणि या गोष्टींबद्दल तुम्ही काहीच करू शकत नाही."
अँद्रियां ओवेन सांगत आहेत- ओवेन आणि मी Skype वर बोलतोय. मी, लंडन, यु.के. मध्ये बसून, तर ओवेन साडेतीन हजार मैल दूर असलेल्या, कॅनडामधील वेस्टर्न ऑंटेरियो विश्वविद्यालयात बसून बोलत आहेत. लालसर केस, बारीक कोरीव दाढी असलेला ओवेनचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता. जसजसे ते त्या लोकांच्या यातनेबद्दल आवेशानं बोलत होते. जे स्वतःबद्दल काहीच बोलू शकत नव्हते ते लोक म्हणजे ओवेन यांचे रुग्ण.
'Vegetative state' या अवस्थेतील लोक जागे तर असतात परंतु जाणीवरहितच राहतात. ते डोळे उघडू शकतात, ते इकडे-तिकडे बघताहेत असं भासू शकतं. ते कधीतरी हसतातही, एखाद्याचा हात पकडू शकतात, कधी ते कण्हतात, आवाज काढतात. परंतु अवतीभवती चालू असलेल्या गोष्टी बघून, ऐकून समजणे किंवा त्यांना प्रतिसाद देणं यास ते असमर्थ असतात. त्यांच्या हालचाली हेतुपूर्ण नसून प्रतिक्रियात्मक असतात. त्यांच्यामधील आठवणी, भावना, इच्छा, हेतू या सर्व गोष्टी, ज्या आपल्याला व्यक्ती म्हणून घडवतात, नष्ट झालेल्या दिसतात. त्याचप्रमाणे त्यांचे मन, मेंदू कायमची बंद असतात. तरी जेव्हा कधी त्यांच्या डोळ्यांची पापणी हलताना तुम्ही बघता तेव्हा तुम्ही विचारात पडता की कदाचित त्यांच्यात देखील जाणिवा अजूनही शिल्लक आहेत.

दशकभरापूर्वी याचं उत्तर उदास करणारं परंतु सहानभूतीपूर्ण 'नाही' असं असलं असतं, परंतु आता नाही. ब्रेन स्कॅनर्सच्या मदतीनं ओवेनना आढळलं की, जरी काही लोक पिंजऱ्यासमान शरीरामध्ये अडकून असले तरी विचार करण्यास व गोष्टी अनुभव करण्यास समर्थ असतात. अर्थात याची तीव्रता वेगवेगळी असते. गेल्या काही दशकांमध्ये सजग आजाराच्या (conscious disorders) रुग्णसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आश्चर्य वाटेल, पण विरोधाभास असा की याचं कारण, जीवघेण्या अपघातामधून रुग्णांना सुखरूप वाचवण्यात मात्र डॉक्टरांना यश येत गेलं आहे.
आज जगभरातील असंख्य नर्सिंग होम व चिकित्सालयात vegetative state व conscious disorders नं ग्रासलेले रुग्ण आढळतात. केवळ एकट्या युरोपमध्ये प्रत्येकवर्षी नव्यानं कोमात गेलेल्या रुग्णांची संख्या जवळजवळ 2 लाख 30 हजार इतकी आहे. त्यातील सुमारे 30 हजार रुग्ण कायमस्वरूपी vegetative state मध्ये आहेत.
ओवेनपेक्षा जास्त ही गोष्ट कोण समजू शकेल. 1997साली, ओवेन यांची मैत्रीण रोजच्यासारखी सायकलनं आपल्या कामावर निघाली. ऍन (नाव बदललं आहे)च्या मेंदूमधील एका रक्तवाहिनीमध्ये काही भाग कमजोर होता. त्याला brain aneurysm म्हणतात. घरातून निघाल्यानंतर पाच मिनिटांच्या आत aneurysm फुटला व ती झाडावर जाऊन कोसळली. ती पुन्हा कधीच शुद्धीवर आली नाही.
या दुर्दैवी घटनेनं ओवेनना हतबुद्ध करून टाकले तरी ऍनच्या अपघाताने त्यांच्या पुढील जीवनाचा पाया रचला. ओवेनच्या मनात विचार घोळायला लागले की असा कोणता मार्ग असू शकतो का ज्याने हे सांगता येऊ शकते की यातील कोणते असे रुग्ण आहेत जे बेशुद्ध, कोमा अवस्थेत आहेत, कोणते शुद्धीत व कोणते या दोन अवस्थांमध्ये अडकलेले आहेत?
त्यावर्षी ओवेन कॅम्ब्रिज मधील मेडिकल रिसर्च कौन्सिल च्या cognition and brain sciences unit (सुसूत्रता आणि मेंदू विज्ञान विभाग) मध्ये दाखल झाले जिथे संशोधकांनी वेगवेगळ्या स्कॅनिंग तंत्राचा वापर केला. त्यातीलच एक Positron Emission Tomography (PET). ही मेंदूमधील वेगवेगळ्या पचनप्रक्रियांना, जसे oxygen व sugar यांचा होणारा वापर दर्शवते. तसेच दुसरी, functional Magnetic Resonance Imaging (fMRI). ही रक्तप्रवाहातील सुक्ष्म चढउतार शोधून काढते, मेंदूतील हालचालींमुळे मेंदूमधील सक्रिय केंद्रे दर्शविते. ओवेन या विचारात पडले की या तंत्रज्ञानाने का ते अशा रुग्णांपर्यंत पोहचू शकतात, जे त्यांच्या मैत्रिणी सारखे संवेदना व विस्मृती दरम्यान अडकलेले आहेत.
जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय
पन्नास वर्षांपूर्वी, जर तुमचं हृदय बंद पडले असता, जरी तुम्ही पूर्णपणे शुद्धीत असू शकले असाल, तरी देखील तुम्हाला मृत घोषित केले गेले असते. कदाचित याच कारणांमुळे इतिहासामधील "मेल्यानंतर पुन्हा परातणाऱ्यांच्या" घटनांची स्पष्टोक्ती मिळू शकते. अलीकडेच सन २०११ मध्ये सेंट्रल तुर्की मधील Malayta प्रांतातील पालिकेने हे जाहीर केले की त्यांनी एक शवगृह बांधले ज्यात चेतावनी प्रणाली आहे व तेथील शव ठेवण्यात येणारे रेफ्रिजरेटर्सचे दरवाजे आतून उघडतात.

फोटो स्रोत, Science Photo Library
समस्या ही आहे की मृत्यूची वैज्ञानिक संज्ञा तितकीच अनाकलनीय आहे जितकी माणसाच्या जागृतावस्थेची संज्ञा आहे. ओवेन याचे स्पष्टीकरण देताना सांगतात, "आजच्या काळात स्वस्थ हृदय हे माणसाच्या जीवित असण्याशी जोडले जात नाही. मला जर कृत्रिम हृदय बसवले गेले असेल तर मला मृत घोषित केले जाईल का? जर तुम्ही लाईफ-सपोर्ट यंत्रणेच्या सहाय्याने जगत असाल तर तुम्हाला मृत समजावे का? स्वयंसिद्धपणे जीवन जगण्यास असमर्थ असणे म्हणजे मृत्यू, ही संज्ञा योग्य आहे का? तर नाही! नाहीतर आपण जन्माला येण्यापूर्वीच्या नऊ महिन्यात मृत अवस्थेत असतो असेच म्हणावे लागेल".
जेव्हा आपण अशा प्रकारच्या लोकांबद्दल विचार करतो जीवन व मृत्यू दरम्यानच्या संधीप्रकाशात झुलताहेत, तेव्हा ही समस्या अधिक अंधुक व अस्पष्ट होत जाते. या लोकांत ते आहेत जे जागृतावस्थेतून ये-जा करताहेत, जे किमान शुद्धावास्थेमध्ये (minimally conscious state) अडकलेले आहेत व जे vegetative state अथवा कोमा ने क्षतिग्रस्त झाले आहेत.
हे रुग्ण सर्वप्रथम १९५०च्या दशकात डेन्मार्कमध्ये artificial respirator च्या निर्मितीअवस्थेत असताना आढळले. artificial respirator हा एक असा शोध ज्याने मृत्यूच्या संज्ञेला पुन्हा परिभाषित केले, विशेषतः 'ब्रेन डेथ' च्या संकल्पनेसंदर्भात बोलायचे झाल्यास. त्याचबरोबर हा शोध अतिदक्षता विभागाच्या निर्मितीसाठी देखील कारणीभूत ठरला. याच artificial respirator च्या भरवशावर कोमा मध्ये गेलेले व कोणताही प्रतिसाद न देणारे रुग्ण अथवा जे पुन्हा कधीही उठू शकणार नाहीत अशा रुग्णांना "vegetbles" अथवा "jellyfish" म्हणून सोडून देण्यात आले. मुळातच रुग्णाचे उपचार करताना, रुग्णाच्या अवस्थेची संज्ञा करणे हे महत्वाचे ठरते. बरे होण्याच्या संधी, उपचारांचे फायदे हे सर्व अचूक निदानावर अवलंबून आहे.
१९६०च्या दशकात, न्यूयॉर्क मधील नयूरोलॉजिस्ट 'फ्रेड प्लम' आणि ग्लासगोमधील नयूरोसर्जन 'ब्रायन जेनेट' यांनी शुद्धावास्थेबद्दलच्या आजारांसंदार्भात (disorders of consciousness) समजून घेण्याकरिता व वर्गवारी करण्याकरिताची अग्रणी कामे केली. प्लम यांनी या संज्ञेला नाव दिले "locked in syndrome" व जेनेट यांनी " glasgow coma scale" हे कोमा रुग्णांची तीव्रता मोजण्यासाठी तयार केले व त्यानंतरच जेनेट यांनी त्यानंतर रुग्णाच्या रेकॉवेरीच्या मोजमापणासाठी, मृत्यूपासून ते सौम्य स्वरूपाचे अपंगत्व, Glasgow outcome scale ची निर्मिती केली. पुढे जाऊन सोबत त्यांनी "persistent vegetative state" ही संज्ञा स्वीकारली - त्या रुग्णांनकरिता जे "काही काळ जागृतावस्थेत असतात, त्यांचे डोळे उघडे असतात व ते हालचाल करतात; त्यांची प्रतिक्रिया ही primitive postural व अवयवाची प्रतिक्षिप्त हालचाली पुरतीच मर्यादित असते त्याचबरोबर ते रुग्ण कधीही बोलत नाहीत", ते लिहितात.
२००२ मध्ये जेनेट जे त्या नयूरोसर्जनच्या गटातील एक होते त्यांनी "minimally conscious" ही संज्ञा स्वीकारली. ती अशा रुग्णांना संबोधण्याकरिता जे कधी-कधी जागृतावस्थेत असतात व अंशतः जागरूक असतात, जे जागृतावस्थेचे अनियमित चिन्हे दाखवतात, ज्याकारणे कधी-कधी साधारण सूचनांचे अनुसरण करू शकतात, तर इतरवेळी ते तसे करू शकत नाही. अगदी आजही आपण यावर विवाद करतोय की कोण शुद्धावस्थेत आहे व कोण नाही.
खूप काही सांगणारा scan
केट बैंब्रिज, २६ वर्षीय शिक्षिका, फ्लू सदृश्य आजारानंतर तीन दिवसांनी कोमामध्ये गेल्या. त्यांच्या मेंदूला सूज आली, आणि त्याचबरोबर झोपेचे चक्र नियंत्रित करणाऱ्या पाठीच्या कण्याच्या एका जागेवरही सूज आली. काही आठवड्यानंतर त्यांच्यातील संसर्ग निघूनगेल्यानंतर त्या कोमातून बाहेर आल्या परंतु त्या vegetative state मध्ये असल्याचे निदान झाले. सुदैवाने तेथील अतिदक्षता विभागेचे डॉक्टर डेव्हिड मेनन जे नुकत्याच सुरू झालेल्या कॅम्ब्रिज मधील Wolfson brain imaging centre येथे प्रमुख अन्वेषक होते, ज्याठिकाणी अँद्रियां ओवेन काम करत होते.
१९९७ मध्ये, vegetative state मध्ये असल्याचे निदान झालेल्या केट या कॅम्ब्रिज गटाच्या अध्ययनाच्या प्रथम रुग्ण बनल्या ज्याचे परिमाण १९९८साली प्रकाशित झाले. ते अनपेक्षित व असामान्य स्वरूपाचे होते. केट यांच्यावर करण्यात आलेल्या प्रयोगात त्यांना दाखवण्यात आलेल्या चेहऱ्यांना त्यांनी प्रतिसादच नाही दिला तर त्यांच्या प्रतिक्रिया ह्या प्रयोगामध्ये भाग घेणाऱ्या निरोगी स्वयंसेवकांच्या प्रतिक्रियांपासून यत्किंचितही वेगळ्या नव्हत्या. त्याचबरोबर त्यांच्या scan मध्ये मेंदूच्या मागील भागात लाल रंगाचे ठिपके (ज्याला fusiform gyrus म्हणतात जे आपल्याला चेहरे ओळखण्यास मदत करतात तेथे) तिथे मेंदूमध्ये हालचाल (ब्रेन ऍक्टिव्हिटी) दर्शवतात. केट अशा प्रथम रुग्ण बनल्या ज्यांच्यामध्ये अत्याधुनिक brain imaging (या ठिकाणी PET) covert cognition - अर्थात अप्रकट सजगता दर्शवते. अर्थात, त्यावेळेस हे सर्व प्रतिसाद प्रतिसादात्मक होते की जागृतावस्थेचे संकेत होते हा वादाचा मुद्दा ठरला.
हाती आलेले हे परिणाम फक्त विज्ञानाकरतीच नसून केट व त्यांच्या कुटुंबियांसाठी देखील महत्वाचे होते. "preserved cognitive processing च्या अस्तित्वाने केटसारख्या रुग्णांच्या इलाजाबाद्दलचा निराशावादी दृष्टिकोन बदलला व केट यांच्या आक्रमक इलाजकरिताच्या निर्णयाला पाठिंबा मिळाला"
प्राथमिक निदानाच्या सहा महिन्यांनी केट सरतेशेवटी या अग्निपरिक्षेतून बाहेर आल्यात.
त्या म्हणाल्या, "त्यांच्या म्हणण्यानुसार मी कोणत्याही वेदना समजू शकत नव्हते, याबाबतीत ते किती चुकीचे होते". बऱ्याचवेळेस त्या रडायच्या परंतु नर्सला हे एक प्रकारचा प्रतिक्षेप आहे असे वाटे. अशावेळी त्यांना कित्येकदा बेवारस व असहाय वाटत असे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना या बद्दल कसलीही जाणीव नव्हती की त्याच्या देखरेखीखाली त्या किती त्रस्त होत्या. केटसाठी, त्यांना दिली गेलेली physiotherapy अतिशय भीतीदायक होती: नर्सेसनी त्यांना कधी सांगितलं नाही की ते त्यांच्यासोबत काय करत असत. त्यांच्या फुफुसांमधील mucus काढत्यावेळी त्या प्रचंड घाबरल्या. "मी वर्णन करू शकत नाही इतका तो भयंकर अनुभव होता. मुख्यत्वे तोंडाद्वारे केलेले suction", त्यांनी नमूद केले. "एका क्षणी तर त्यांच्या वेदनेची व निराशेची परिसीमा ही झाली की त्यांनी आपला श्वास बंद करून जीव देण्याचा पयत्न केला. "मी स्वतःला श्वास घेण्यापासून थांबवू शकले नाही, माझ्या शरीराला बहुतेक इतक्यातच प्राण सोडण्याची इच्छा नव्हती".
केटच्या म्हणण्यानुसार त्यांचे बरे होणे ही विजेचा बल्ब पेटविण्याइतकी सहजसोपी नसून ती जागृतावस्थेकडे हळूहळू केलेली वाटचाल होती. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य फुलण्यासाठी पाच महिन्यापेक्षा जास्त काळ लागला. त्या वेळेपर्यंत त्यांनी त्यांची नोकरी गमावली, कुठल्याही सुगंधाची अथवा चवीची जाणीव गमावली आणि ज्याला आपण एक सामान्य जीवन म्हणू असे सर्व, नेहमीसाठी गमावले. आता त्या त्यांच्या आई-वडिलांसोबत राहतात, त्या अपंग आहेत व त्यांना अजूनही व्हीलचेअर ची गरज भासते. आजारी पडल्याच्या जवळ जवळ वर्षभरानंतर त्या पुन्हा बोलायला लागल्या. जरी त्यांना मिळालेल्या उपचारपद्धतीबद्दल त्यांच्या मनात राग असला तरी त्यांना मिळालेल्या मदतीबद्दल त्या आभारी आहेत.

ओवेन यांना पाठवलेली चिठ्ठी
प्रिय अँद्रियां,
कृपया आपण scans किती महत्वाचे आहेत हे दाखण्याकरिता माझी केस लोकांनसमोर मांडा. माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांना यांबाबत माहिती व्हावी. मी त्यांची खूप मोठी प्रशंसक बनली आहे. मी प्रतिसाद देत नव्हते व माझी अवस्था दिशाहीन होती, परंतु scans नी दाखवले की मी तरीही आत कुठेतरी होते. हे एका जादूसारखे होते, त्यांनी मला शोधून काढले.
लिएघ दक्षिण भागातील जंगलपरिसरात, स्टीवन लौरेस vegetative state मधील रुग्णांचा कित्येक दशकांपासून सुरू असलेल्या संशोधन अंतर्गत अभ्यास करताहेत. १९९०च्या दशकात cyclotron research centre मध्ये कार्यरत असताना जेव्हा त्यांना कळले की PET brain scans मधून ही गोष्ट समोर आली आहे की रुग्ण त्यांच्या नावाला प्रतिसाद देतात, एक अर्थपूर्ण आवाज auditory primary corticesमधील रक्तप्रवाह बदलतो हे समजल्यावर त्यांना याचे आश्चर्य वाटले, दरम्यानच्या काळात अटलांटिकच्या दुसऱ्या बाजूस, निकोलस शिफयांच्या निरीक्षणात या गोष्टी आल्या की गंभीरपणे मेंदूला इजा झालेली असल्यानंतरही त्यांतील काही भाग काहीप्रमाणात कार्यरत राहतो (Clusters of remnant activity). या सगळ्याचा अर्थ काय?

टेनिस खेळायचंय?
"Vegetative अवस्थेमधील मधील कोणताही रुग्ण शुद्धावस्थेत नसतो असे त्यावेळी बऱ्याच डॉक्टरांचे मत होते. त्याचप्रमाणे, अर्थपूर्ण चित्रांकडे बघून मेंदूला चालना मिळते याबाबीला फारसे महत्व देण्याचे कारण नसून एका गुंगवलेल्या माकडामध्येदेखील हे चिन्हे दिसू शकतात", अशी मते काही डॉक्टरांनी मांडली. मागील अनुभवाच्या आधारे हृदय विकाराच्या झटक्याने अथवा स्ट्रोकमुळे मेंदूतील ऑक्सिजनचा पुरवठा संपल्याने जर रुग्ण पहिल्या काही महिन्यात पूर्णपणे बरा झाला नाही, तर तो/ती पूर्ववत होण्याची कुठलाही शक्यता नाही असे मानले जायचे. जे vegetative state मध्ये होते, ज्यांचे मेंदू कार्यरत नव्हते, जे जिवंतही नव्हते व मेलेलेही नव्हते त्या रुग्णांची अवस्था बऱ्याच लोकांच्या म्हणण्यानुसार मृत्यूपेक्षाही भयावह अशी होती. या अशा vegetative state मध्ये असलेल्या रुग्णांची जीवनयात्रा संपवण्याचा त्यांचा अन्नपाणी पुरवठा बंद करणे हा योग्य उपाय मानला जायचा. याला लौरेस "therapeutic nihilism" म्हणतात.
ओवेन, लौरेस आणि शिफ हे vegetative state मधील असलेल्या रुग्णांसंबंधी पुनर्विचार करण्याचे प्रस्ताव मांडत होते - ज्यातील काही रुग्ण असे होते की त्यांना पूर्णपणे शुद्धावास्थेतील व कुलुपबंद म्हणता येईल. याचा कठोरपणे विरोध झाला. शिफ सांगतात,"९०च्या दशकातील वातावरणाबद्दल तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही". "आम्ही ज्याला सामोरे गेलो तो विरोध हा स्वाभाविक संशयाच्या पलीकडील होता".
मागे वळून बघताना लौरेस सांगतात, "डॉक्टर्सना तुम्ही चुकीचे आहेत असं सांगितलेले आवडत नाही".
२००६ साली ओवेन व लौरेस vegetative state मधील रुग्णांशी संवाद साधण्याचा विश्वसनीय मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होते. उदा. जिलीयन (नाव बदलले आहे). जुलै, २००५ मध्ये, २३ वर्षीय जिलीयन आपल्या मोबाईलवर चॅट करताना रस्ता ओलांडत होती त्याच वेळेस तिला दोन गाड्यांनी धडक दिली.
पाच महिन्यानंतर जिलीयन यातून बाहेर आल्या हा एक अद्भुत सुखद धक्काच होता. तरीही, याचे उत्तर ओवेन ने लौरेस सोबत २००५ साली सुरू केलेल्या अभ्यासामधून आपल्याला मिळते. २००५ साली केलेल्या प्रयोगामध्ये ओवेन ने आलेल्या निरोगी स्वयंसेवकांना, ते वेगवेगळ्या गोष्टी करत असल्याची कल्पना करावयास सांगितले - जसे की ते गाणे गात आहेत, किंवा त्यांच्या आईचा चेहरा अथवत आहेत. त्याचवेळेस ओवेनच्या डोक्यात एक कल्पना आली. त्यांनी निरोगी स्वयंसेवकांना टेनिस खेळत असल्याची कल्पना करण्यास सांगितले त्या नंतर त्यांनी ते त्यांच्या घरात फिरत असल्याची कल्पना करावयास सांगितले. टेनिस खेळतानाची कल्पना केल्याने मेंदुमधील cortex मधील एक भाग कार्यान्वित होतो ज्याला supplementary motor area म्हणतात. यामध्ये शारीरिक हालचालींच्या mental simulation चा समावेश होतो. तसेच घरामध्ये फिरण्याची कल्पना केल्याने मेंदूतील प्रमुख para hippocampal gyrus, posterior parietal love व lateral promotor cortex हे भाग कार्यान्वित होतात. ह्या दोन क्रियांचे नमुने एकमेकांपासून इतके भिन्न आहेत की ते परस्परविरोधी 'हो' अथवा 'नाही' म्हणून तुम्ही गृहीत धरू शकता. जर लोकांना तुम्ही टेनिस खेळण्या साठी 'हो' व घरामध्ये चालण्यासाठी 'नाही' विचारले तर ते fMRI द्वारे याची उत्तरे देऊ शकतात.
जिलीयन यांच्या निष्क्रिय अवस्थेतील मेंदूमध्ये brain scanners च्या मदतीने डोकावून बघत असताना त्यांनी जिलीयनला त्याच गोष्टीची कल्पना करावयास सांगितले - त्यांच्या हे निदर्शनास आले की त्यांच्या brain scanner मधील निरीक्षणे निरोगी स्वयंसेवकांच्या निरीक्षणांशी मिळती-जुळती होती.
जिलीयनची केस journal science मध्ये २००६ साली प्रकाशित झाली व तिने जगभरात खळबळ माजवली. हाती आलेल्या परिणामांनी लोकांमध्ये आश्चर्य व अर्थातच अविश्वासाचा भावना जागृत केली. ओवेन यांना त्यांच्या क्षेत्रातील वैज्ञानिक, डॉक्टर्स यांच्याकडून दोन प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या - 'हे अतिशय अद्भुत आहे!', अथवा 'तुम्ही हे कसे म्हणू शकतात की ती स्त्री शुद्धावस्थेत आहे?!'
एक जुन्या म्हणीनुसार, 'असामान्य दावे सिद्ध करण्यासाठी असामान्य पुरावे लागतात'. एका टीकाकाराने सांगितलं कि जेव्हा याचा सरळसोट अर्थ लागू शकतो तेव्हा टोकाचे निष्कर्ष काढणे सपशेल चूक आहे. कॅलिफोर्निया विश्वविद्यालयाचे मानास्शास्त्रज्ञ Daniel Greenberg यांनी सूचित केले कि मेंदूमधील ही हालचाल दिलेल्या सुचानेमधील शेवटच्या दोन शब्दांमुळे नकळतपणे झाली जी नेहमी कल्पनाधीन गोष्ट असते.
चाचणी केल्यावर
पराश्केव नाशेव हे युनिवर्सिटी कॉलेज लंडनमध्ये सध्या कार्यरत असलेले नयूरोलॉजिस्ट. ते म्हणतात, "मी ओवेन यांच्या २००६ साली प्रकाशित झालेल्या संशोधनाला विरोध दर्शविला, तो त्यातील अशक्यतेमुळे अथवा त्यातील सांख्यिकीय विश्लेषणाच्या चुकांमुळे नसुन "चुकीच्या अनुमानांमुळे" केला. एका शुद्धावस्थेतील मेंदूत टेनिस खेळण्याची कल्पना केल्यानंतर एका विशिष्ट प्रकारचे भाग कार्यान्वित होतात असे असले तरीही हे गरजेचे नाही की ती निरीक्षणे जागरूकतेची लक्षणे आहेत. जाणीवतः परस्परसंबंध (Conscious correlation) नसतानाही मेंदूतील तोच विशिष्ट भाग भिन्न परिस्थितीतही कार्यान्वित होऊ शकतो. नाशेव पुढे असा युक्तिवाद करतात की जिलीयन यांना मुळात टेनिस खेळण्यासंबंधी निवड करण्याची खऱ्या अर्थाने संधी दिलीच नाही. ज्याप्रमाणे प्रतिसादाचा अभाव हा प्रतिसाद देण्याची असमर्थता अथवा असहयोग मानला जातो त्याचप्रमाणे थेट प्रतिक्रिया ही जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय अथवा प्रतिक्षेप असू शकते.
ओवेन यांच्या मते विषयावर तात्विक उहापोह करण्यापेक्षा अधिक डाटा ची गरज जास्त आहे. याच सदरातील ओवेन, लौरेस व सहकाऱ्यांनी केलेला दुसरा अभ्यास २०१० साली प्रकाशित झाला त्यामध्ये vegetative state अथवा किमान शुद्धावास्थेमधील (minimally conscious state) ५४ रुग्णांच्या तपासण्या केल्या गेल्या व त्यातील ५ रुग्णांचे प्रतिसाद हे जिलीयन च्या प्रतिसादाशी साधर्म्य साधणारे होते. त्याती ४ रुग्ण कथितस्वरूपात vegetative state मध्ये होते. ओवेन, शिफ व लौरेस हे त्यांनी केलेल्या निरीक्षणाअंती सदर विषयामध्ये पर्यायी स्पष्टीकरण शोधण्याचा प्रयत्न करू लागले, जसे, तापसणीदरम्यान रुग्णांच्या मेंदूचे जे भाग त्यांनी तपासले ते इतर वेगळ्या पद्धतीने कार्यान्वित होऊ शकतात.
परंतु २०१०च्या अभ्यासपत्रात स्वयंचलित हालचाली हा युक्तिवाद स्पष्टीकरण म्हणून खारीज केला गेला. ओवेनच्या म्हणण्यानुसार, "मेंदूची कार्यान्वीता इतकी काळ टिकून राहिली की ह्या हालचाली हेतुपुरस्सर असल्याखेरीज दुसरे काहीच असू शकत नाही". त्याचबरोबर, ओवेन त्यांच्या आलोचकांचे खूप आभारी आहेत. त्यांनीच ओवेनना उत्तेजन दिले की ते अशापद्धतीची कार्यप्रणाली विकसित करतील ज्यातून रुग्णांना असे प्रश्न विचारले जातील की फक्त त्यांनाच त्या प्रश्नांची कशी उत्तरे द्यावीत हे माहिती असेल. "तुम्ही सुप्तावस्थेत संवाद साधू शकत नाही, ते अशक्य आहे", ओवेन पुढे म्हणाले.
२००६ सालच्या ओवेन यांच्या अभ्यासपत्रांनंतर, बेल्जियम, युके, अमेरिका, कॅनडा मध्ये केल्या गेलेल्या अभ्यासातुन हे समोर आले आहे की "vegetative" म्हणून ज्यांची वर्गवारी झाली त्यातील बऱ्याचशा रुग्णांचे चुकीच्या पद्धतीने निदान करण्यात आले होते. ओवेन यांच्या म्हणण्यानुसार जवळजवळ २०% रुग्णांचे चुकीचे निदान झाले होते. त्याचबरोबर, शिफ परिस्थिती याही पेक्षा भीषण असल्याचे सांगतात. नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासात असे आढळून आले की जवळपास ४०% रुग्णांचे चुकीच्या पद्धतीने निदान झाले आहे. कथितरीत्या vegetative ठरवले गेलेल्या ह्या रुग्णांमध्ये असे काही रुग्ण आढळले जे अंशतः जागृत होते. याच गटातील जे संवाद साधू शकत होते त्यांना "locked-in" म्हणून त्यांचे त्याप्रकारे निदान व्हावे व ते "पूर्ण किंवा किमान शुद्धावस्थेत (fully or minimally conscious)" असतील व जर त्यांच्या ज्ञानेंद्रिये, अथवा शारीरिक क्षमता नष्ट झाल्या असतील तर त्या पद्धतीने निदान होणे गरजेचे आहे.
२००९ साली लौरेस यांच्या गटाने ५४ रुग्णांपैकी - क्र.२३ रुग्णाला हो-नाही स्वरूपाचे प्रश्न विचारले. नेहमीप्रमाणेच हा त्यांच्या सवयीचा भाग झाला होता: हो म्हणण्याकरिता टेनिस खेळण्याची कल्पना करणे, व नाही साठी घरामध्ये फेरफटका मारण्याची कल्पना करणे. लिएजमधील रुग्ण जो गेल्या ५ वर्षांपासून "vegetative state" मध्ये होता त्याने ६ पैकी ५ प्रश्नांची उत्तरे दिली व ती सर्व अचूक होती. हे सर्व प्रश्न त्यांच्या पूर्वायुष्यबद्दलचे होते - दुखापतीपूर्वी ते कुठे सुट्टीसाठी गेले होते का? अमुक-अमुक हे त्यांच्या वडिलांचे नाव होते का?", तो एक अद्भुत क्षण होता असे लौरेस म्हणाले. "आम्ही सगळे स्तिमित झालो होतो", पुढे ओवेन म्हणाले, ज्यांनी स्वतंत्रपणे चाचण्यांचे मूल्यांकन केले. "तो जागृतावस्थेत आहे हे आम्हाला दाखवून रुग्ण क्र.२३ ला 'पुनरुत्थान करू नये (do not resuscitate)' मधून 'मरू देण्याची परवानगी नाही (not allowed to die)' श्रेणीमध्ये आणले. आम्ही त्यांचा जीव वाचवला नाही, ते त्यांनी स्वतः केलं".
नाशेव यांनी प्रथमतः ओवेनची टीका केल्या नंतर अजूनही त्यांचे मत बदललेले नाही व सदर विषयाबद्दलची अस्वस्थता त्यांनी २०१० साली प्रकाशित झालेल्या पत्रकात प्रकट केली आहे. त्यात ते म्हणतात, "PVS (persistent vegetative state) च्या प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकांना (बहुतेक करून खोटी) आशा दाखवली जाते, त्यासोबतच त्यांच्यावर रुग्णाचे उपचार बंद करण्याची मान्यता दिल्यामुळे अपराधीपणाचे ओझे लादण्यात येते. हे अशा लोकांनकडून केले जाते जे अशी भुरळ पाडतात की रुग्ण दिसत असल्यापेक्षा जास्त जागरूक व जिवंत आहे.
"या विषयभोवतीची ही सगळी मीडिया सर्कस प्रक्षोभणीय आहे, रुग्णांच्या नातलगांना झालेले दुःख पुरेसं आहे, त्यात या मुळे अधिक भर पडता कामा नये".
लौरेस, ओवेन व शिफ यांनी रुग्णांच्या परिवारासमवेत खूप वेळ व्यतीत केल्यामुळे ते त्यांच्या संवेदनांना चांगल्या जाणतात. या बाबतीत प्रतिउत्तर देताना ओवेनने सांगितले की इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर, नातेवाईकांमध्ये डॉक्टर्स व वैज्ञानिकांबद्दल कृतज्ञतेचीच भावना आहे.
रुग्णांचे योग्य निदान करणे हे डॉक्टर्स चे नैतिक कर्तव्य आहे, मग भलेही त्यातून नातेवाईकांमध्ये दुःख, अस्वस्थता अथवा अपराधीपणाची भावना निर्माण होत असली तरी. "आपण प्रत्येक रुग्णाला अचूक निदान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असेलच पाहिजे जेणेकरून आपण त्यांना योग्य ते उपचार देऊ शकतो व त्यांची दक्षता घेऊ शकतो."
मेंदूची मर्यादा
मानवीय मन/मेंदूबद्दल जाणून घेण्याची कला ही सतत, उत्तरोत्तर अधिक विकसित होत आहे. ओवेन व लोरीना नाची यांनी रुग्णांसोबत संवाद साधण्यासाठी अधिक विश्वसनीय व परिणामकारक मार्ग शोधू काढला आहे. हे रुग्ण scanner खाली असताना प्रथम त्यांना हो-नाही स्वरूपाची प्रश्न विचारले जातात त्यानंतर त्यांना "हो" या उत्तराची ध्वनिफीत इतर काही असम्बद्ध शब्द, व आकड्यासह पुनःपुन्हा ऐकवली जाते हे झाल्यावर नंतर लगेचच "नाही" करिता देखील अशीच एक ध्वनिफीत ऐकवली जाते. यानंतर सहभाग घेणाऱ्यांना त्यातील किती उत्तरे योग्य आहेत हे मोजावे लागतात आणि चुकीची असलेली उत्तरे टाळण्यास सांगितले जाते. नाची आणि ओवेन जेव्हा scans चे परीक्षण करतात तेव्हा बौद्धिक/मानसिक प्रयत्न ज्याला selective auditory attention म्हणतात हा प्रकर्षाने जाणवतो. यामुळे मेंदूतील कार्यान्वित भागातील हालचालीत बदलांची निरीक्षणे करून रुग्णांनी दिलेल्या प्रतिसादाची उकल करणे सहजसाध्य होऊ शकेल. त्यानुसारच नंतर झालेल्या अभ्यासात याच पद्धतीचा वापर करण्यात आला व हे दिसून आले की, स्कॉट रूटली या रुग्णास स्वतःचं नाव इतर नावांमधून योग्यरित्या ओळखता आले. त्याचबरोबर त्यांनी आपण दुसऱ्याकुठल्या ठिकाणी नसून एक रुग्णालयात आहेत हे देखील सांगितले.
इतके सगळे असूनही भरपूर समस्या आहेत ज्यांचे पूर्णपणे निराकरण झालेले नाही. सुरुवातीच्या निदानानंतरही या रुग्णांमधील मेंदूतील कार्यान्विता समजून घेण्याची अगदीच तुटपुंजे असे प्रयत्न झाले आहेत असे शिफ म्हणतात. त्यात अजूनही बरेचसे रुग्ण आहेत जे "किमान शुद्धावस्थेत (minimally conscious)" आहेत आणि "टेनिस खेळतानाची" कल्पना, अथवा इतर कल्पना करू शकत नाहीत, अर्थात अतिशय कमी vegetative state मधील रुग्ण या कल्पना करण्यास समर्थ असतात. याचसोबत इतरही काही मर्यादा आहेत ज्यांची प्रामुख्याने खालील कारणे आहेत - प्रयोगादरम्यान रुग्णांना औषधे देणे त्याचप्रमाणे रुग्णांचे प्रचंड प्रमाणात असलेले वैविध्य (अर्थात हे मुळात डॉक्टर्सना एकाच रुग्णांवर वारंवार तीच प्रक्रिया करण्याची गरज पडू नये म्हणून. या नंतर अजून एक महत्वाची समस्या म्हणजे कमी वयोगटातील रुग्णांवर एक ठराविक कालावधीत किती PET scans केले जाऊ शकतात याला एक बंधन आहे, कारण यादरम्यान शरीरामध्ये radioactive tracer शिरवावे लागते.
लाखो डॉलर्स किमतीच्या अतिप्रचंड imaging machines या त्या रुग्णांसाठी अयोग्य ठरतात ज्या रुग्णांच्या मणक्यावर प्रभाव पडलेला असतो. तसेच इतर रुग्ण ज्यांच्या अवयवांची पुनर्बांधणी स्क्रू, प्लेट्स, पिन्स किंवा इतर कोणत्याही धातूंनी बनलेल्या वस्तूंनी केली गेलेली असते त्यांच्यासाठी देखील ही मशीन्स योग्य ठरत नाहीत. तरीही जास्त सोयीस्कर असे पर्याय विकसित होत आहेत. यातच पुढे लौरेस pupil dilatation चा अर्थात डोळ्यांतली बाहुली ताणली जाण्याचा अभ्यास करत आहेत. ही प्रक्रिया मेंदूतील विचारांशी संलग्न आहे (डोळ्यातील बाहुलीचा फैलाव जितका जास्त तितके रुग्णाचे भावनिक उत्तेजन अधिक. त्याखेरीज बाहुलीचा मर्यादित फैलाव हा बौद्धिक कार्यांना दर्शवतो जसे की निर्णय घेण्याची क्षमता). यासाठी आणखी एक पद्धत आहे - रुग्णाच्या हातांत विद्युतघट (electrodes) देणे आणि हलावायास सांगितल्यावर त्याच्या स्नायूंची ठ्रेशोल्ड च्या आतील हालचाल मोजणे.
कदाचित सर्वांत आशादायी पर्याय electroencephalography (EEG). यात डोक्यावर लावलेले विद्युत घटक मेंदूतील विद्युतप्रवाह टिपून घेतात. ही पद्धती इतर पद्धतींपेक्षा स्वस्त, जलद व सहज इकडे-तिकडे हलवता येण्यासारखी आहे (यात फक्त काही मिलीसेकंदाचा फरक आहे. fMRI मध्ये ८ सेकंदाचा फरक आढळतो.) याचा अर्थ असा की संशोधक ३० मिनिटात २०० पर्यंत प्रश्न विचारू शकतील. त्याचबरोबर ही पद्धती अशा रुग्णांसाठी देखील कामी येऊ शकते जे हालचाल करतात, हिसके देतात किंवा ज्यांच्या शरीराचे अवयव कृत्रिमरीत्या पुन्हा जोडले गेले आहेत. ओवेन यांच्या म्हणण्यानुसार, हे रुग्ण अतिशय नाजूक व असुरक्षित आहेत व त्यांना हलविणे हे अत्यंत कठीण काम आहे. त्यामुळे आम्हीच आमच्या सर्व सामानांनीशी रुग्णांना भेटायला जातो.
शिफ यांच्या गटातील लोक जरा साशंक आहेत की डिटेक्टर सोबत वापरली गेलेली EEG कार्यप्रणाली खरंच कार्य करते का नाही. त्याचबरोबर "dead salmon effect पासून प्रत्येकानेच सावध राहिले पाहिजे", लौरेस स्वीकृत भावाने बोलले. वरील संदर्भ एका किरकोळ अभ्यासबद्दल दिला आहे ज्यात एक मृत मास्यावर fMRI करण्यात आले होते ज्यात ती कार्यप्रणाली अडखळताना आढळली. ह्यात जेव्हा मूळ BRAIN ACTIVITY व BACKGROUND 'NOISE' मध्ये गफलत झाली ज्यामुळे असा अर्थ निघाला की स्कॅनर मध्ये ठेवलेल्या मृत माश्यात BRAIN ACTIVITY शाबूत आहे म्हणजेच मृत मासा स्वतः विचार करतोय.
अंधाराला प्रकाशित करताना
जीवन व मृत्यूबद्दल विचार करताना आज निरोगी हृदयाबद्दल विचार न करता निरोगी मेंदूबद्दल केला जावा हा विचार अतिशय स्वाभाविक वाटतो. एक रुग्ण जो 'persistent vegetative state" मध्ये आहे त्याच्यातील brain stems कार्यरत असू शकतात. असे रुग्ण कोणत्याही मदतीशिवाय श्वसन करू शकतात. त्यांच्यामध्ये जागृतावस्थेची काही लक्षणे दिसतात व थोडी का होईना त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. याच सोबत तुलना केली असता ब्रेन-डेड व्यक्तीचे PET SCAN कृष्णविवरप्रमाणे मेंदूतील सर्व भाग काळसर दिसतो (abarren neural landscape) जे पुनन्सचं कार्यान्वयीत हिण्याची काहीच शक्यता नाही: असे रुग्ण कृत्रिम मदतीशिवाय जगू शकत नाही.
शिफ मानतात की विविध उपकरणे, औषधी व पेशी उपचार पद्धतीच्या (cell therapies) मदतीने शुद्धावस्था व बेशुद्धावस्थेमधील अंधक्कारमय भाग प्रकाशित केला जाऊ शकतो. असे जरी होऊ शकत असले तरी आपण त्या पासून अजूनही खूप दूर आहोत. आजतागायत केलेल्या सर्व कामातून brain scans चे महत्त्व स्पष्ट लोकसंख्येच्या पातळीवर सिद्ध होते, परंतु रुग्णांना वैय्यक्तिक पातळीवर खात्रीपूर्वक उपचारपद्धती मिळणे आवश्यक आहे. "काही छोटेखानी अभ्यास सुरु करण्याची आपल्याला गरज आहे ज्याद्वारे रुग्णांच्या वैय्यक्तिक पातळीवर आज काय केले जाऊ शकते हे समजेल", शिफ म्हणाले. शिफनुसार, सरतेशेवटी आपण या सर्व विषयाबद्दल एक खूप मोठा सांस्कृतिक बद्दल झालेला बघणार आहोत. लौरेस च्या मते या गोष्टीची सुरुवात भाषेपासून व्हावी व "vegetative" सारखे अवजड शब्द वापरण्याऐवजी "अप्रतीक्रीयाशील जागेपण (unresponsive wakefulness)" सारखे मवाळ व तटस्थ शब्द वापरले जावेत.
शंका व संशय कल्लोळ, भिन्न प्रकारच्या रुग्णांच्या गटांच्या निरीक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी व रुग्णांच्या अवस्थेच्या निदानाच्या मूल्यांकनामध्ये येणाऱ्या अडचणी या सर्व अडथळे व त्रासातूनही संशोधन चालूच आहे. संशोधन सुरवातीच्या टप्यात असूनही आतापासूनच यांचे परिणाम दिसताहेत. रुग्ण आता त्यांच्या डॉक्टर्सना त्यांना दुखण्यापासून मुक्ततेची (pain relief) आवश्यकता आहे अथवा नाही हे सांगण्यास समर्थ झाले आहेत.
इकडे ओवेन यांच्या भविष्यातील योजनांना बद्दल मला सांगावे अथवा नाही या विचारत पडलेले असताना Skype वरील संभाषण संपताना ते हसतात. ओवेन यांची पार्टनर, जेसिका ग्रॅन त्याही एक neuroscientist आहेत, २०१३ सालच्या सुरुवातीस गर्भवती झाल्या. विकसित होत असणाऱ्या मेंदूवर शुद्धावस्था डोळे मिचकावून पाहते तेव्हा काय होईल?
ओवेन यांनी मला त्यांच्या सध्यास न जन्मलेल्या बाळाची एक चित्रफीत इ-मेल ने पाठवली ज्यात जेसिका यांच्या गर्भशायतील मुलाच्या मेंदूतील fMRI SCAN चा एक मोंताज दिसून येतो. ते लिहितात, माझे सहयोगी काही आठवड्यांपासून माझ्या पत्नीच्या पोटावरती fMRI करत आहेत हे बघण्याकरिता की अर्भकाच्या मेंदूला कार्यान्वित करता येते का?, ते लिहितात, "हे अद्भुत आहे".
तळटीप: स्कॉट रुटले यांचा मृत्यू सप्टेंबर, २०१३ साली झाला, मृत्यूसमयी त्यांचा परिवार त्यांच्या सोबत होता. अँद्रियां ओवेन यांची मैत्रीण ऍन या अजूनही "vegetative state" मध्येच आहे. अँद्रियां ओवेन व जेसिका ग्रान यांना ९ सप्टेंबर २०१३ साली मुलगा झाला ज्याचे नाव जकसोन ठेवण्यात आले.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








