निरीश्वरवादामुळे धर्मच नामशेष झाला तर?

धर्म, धार्मिक, जीवनशैली, सांस्कृतिक.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, छटपूजेवेळी हिंदू भाविक.
    • Author, रेचल न्यूवर
    • Role, बीबीसी फ्यूचर

निरीश्वरवाद अर्थात देवाचे अस्तित्व नाकारणारी विचारधारा जगात अनेक ठिकाणी मूळ धरू लागली आहे. त्यामुळे अध्यात्म आता इतिहासजमा होणार का? या प्रश्नाचं उत्तर फार क्लिष्ट आणि गुंतागुंतीचं आहे. रेचल न्यूवर यांनी केलेला उहापोह.

माणसाचे आयुष्य मृत्यूनंतर पूर्णपणे संपते, यावर जगभरातील लाखो लोकांचा विश्वास आहे. अशा लोकांची संख्या आता वाढते आहे - ज्यांना या जगात देव नाही, पुनर्जन्म नाही किंवा कुठलीही अध्यात्मिक अवस्था नाही, असं ठामपणे वाटते. या विचारधारेला आता गती मिळू लागली आहे, मोठ्या प्रमाणावर नसला तरी या विचाराला पाठिंबा मिळू लागला आहे. काही देशांमध्ये तर कधी नव्हे तो इतक्या उघडपणे निरीश्वरवादाचा स्वीकार होताना दिसतो आहे.

"आज आजूबाजूला दिसतात तेवढे नास्तिक याआधी जगात कधीच नव्हते, संख्येनेही आणि मानवतेच्या एकूण प्रमाणातही," असं प्रा. फिल झुकरमन यांना वाटतं. झुकरमन हे समाजशास्त्र आणि धर्मनिरपेक्ष अभ्यास या विषयांचे कॅलिफोर्नियातील क्लेरमाउंट येथील पिट्झर कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत तसेच 'लिविंग द सेक्युलर लाइफ' या पुस्तकाचे ते लेखकही आहेत.

गॅलप इंटरनॅशनलने 57 देशातल्या 50 हजाराहून अधिक लोकांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, 2001 ते 2005 मध्ये धार्मिक असणाऱ्यांचं प्रमाण 77 टक्क्यांहून 68 टक्क्यांवर आलं. तर स्वतःची ओळख नास्तिक अशी सांगणाऱ्यांचं प्रमाण तीन टक्क्यांनी वाढलंय. त्यामुळे जगभरातल्या कट्टर निरीश्वरवाद्यांचं प्रमाण अंदाजे 13 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

जरी परमेश्वराचं अस्तित्व नाकारणाऱ्यांचं हे प्रमाण बहुमतात नसलं तरी भविष्यातल्या परिस्थितीची ही नांदी असेल का? जागतिक विचारधारेतला हा ट्रेंड असाच चालू राहणार असल्याचं गृहित धरलं तर एक दिवस धर्माचं अस्तित्वच पूर्णपणे संपुष्टात येईल का?

भविष्याबद्दलचं भाकीत आताच वर्तवणं अशक्य आहे. पण धर्म, धर्माचा उगम आणि काही लोकांना धर्माविषयी इतकी आत्मीयता का वाटते किंवा काहींना धर्माचा इतका तिटकारा का वाटतो, यासारख्या माहितीच्या आधारावर येणाऱ्या दशकात किंवा शतकात देव आणि माणसातलं नातं कसं असेल, याचा थोडाबहुत अंदाज लावत येऊ शकतो.

एखाद्या व्यक्तीला वा देशाला निरीश्वरवादाचा पुरस्कार करण्यासाठी असा कोणता ठाम मुद्दा कारणीभूत ठरतो का, याचा अभ्यास अजूनही जाणकार करत आहेत. पण याबाबतचे काही मुद्दे साधारणपणे लक्षात येतात.

सध्याच्या अनिश्चित वातावरणात धर्माचं आवाहन केल्यानं मिळणाऱ्या सुरक्षेची भूमिका. म्हणूनच ज्या देशांमध्ये निरीश्वरवाद्यांची संख्या अधिक आहे, त्या देशांमध्ये नागरिकांना उच्चदर्जाचं आर्थिक, राजकीय आणि मूलभूत गरजांचं स्थैर्य मिळाल्याचं दिसून आलं आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखं ते काय?

व्हीडिओ कॅप्शन, 'इथे फक्त शेतकरी धर्म आहे, आंदोलनात दुसरा कुठला धर्म असण्याची शक्यताच नाही'

झुकरमन म्हणतात, "समाजात आलेल्या स्थैर्यामुळे धार्मिक विचारांवरचा विश्वास हळूहळू कमी होताना दिसतो आहे." भांडवलशाही, तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षण यांचा परस्परसंबंध म्हणजे धार्मिकतेला हरताळ हेच समीकरण काही लोकसंख्येच्या बाबत दिसून येतं, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

विश्वासार्हतेचा पेच

जपान, युके, कॅनडा, दक्षिण कोरिया, नेदरलँड, चेक रिपब्लिक, इस्टोनिया, जर्मनी, फ्रान्स आणि उरुग्वे (जेथे बहुतांश लोकसंख्या मूळची युरोपीय आहे) या देशांमध्ये शतकापूर्वी वा त्याही आधी धर्म सर्वोच्च स्थानी होता. पण आता त्याच देशात धर्मावर विश्वास असणाऱ्यांचं प्रमाण घसरलं आहे. या बदलामागे मोठं स्थित्यंतर आहे.

या देशांमध्ये भक्कम शिक्षणसंस्था, सुरक्षेची हमी देणारी सामाजिक प्रणाली, तुरळक असमानता आणि तुलनेने अधिक आर्थिक सुबत्ता दिसते. "मुळात आपल्याबरोबर काही विपरीत घडेल याबाबतची भीती या लोकांमध्ये कमीच आहे," असं मत न्यूझीलंडमधील ऑकलंड विद्यापीठातले मानसशास्त्रज्ञ क्वेंटिन अटकिन्सन यांचं आहे.

धर्म, धार्मिक, जीवनशैली, सांस्कृतिक.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, युक्रेनमध्ये एक भाविक प्रार्थना करताना.

देव मानणाऱ्यांची संख्या जगात अनेक ठिकाणी कमी होताना दिसते. अत्यंत धार्मिक म्हणता येईल अशा ब्राझील, जमैका आणि आयर्लंडमध्येही हे घडते आहे. झुकरमन तर म्हणतात, "आजच्या घडीला काहीच समाजांमध्ये 40-50 वर्षांपूर्वी होती त्यापेक्षा जास्त धार्मिकता वाढली आहे. याला इराणचा अपवाद असू शकेल. पण त्याचंही नेमकं सांगता येत नाही कारण कदाचित धर्मनिरपेक्ष लोकांना आपल्या भावना लपवाव्या लागत असतील."

अमेरिकाही याला अपवाद आहे. जगातल्या सर्वाधिक श्रीमंत, उच्चभ्रू लोकांचा खंड असूनही इथे देवभोळ्यांची संख्या मोठी आहे. (ताजी माहिती थोडे वेगळे अंदाज वर्तवत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या प्यु सर्वेक्षणानुसार, 2007 ते 2012 दरम्यान अमेरिकेतील निरीश्वरवाद्यांचं प्रमाण 1.6 टक्क्यांवरून 2.4 टक्क्यांवर वाढलं आहे.)

देव मानणाऱ्यांची संख्या कमी रोडावते असली तरी देवाचं, धर्माचं अस्तित्व संपुष्टात आलेलं नाही, असं अॅरा नोरेनझायन या समाज मानसशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. प्रा. नोरेनझायन व्हॅंकूवर, कॅनडा येथील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक असून 'बिग गॉड्स' या पुस्तकाचे ते लेखकही आहेत.

नोरेनझायन म्हणतात, "आपल्याला जाणवणारी सध्याची वास्तवातली सुरक्षाही वाटते त्याहून अधिक क्षणभंगूर आहे. एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं : दारूच्या नशेत असणारा ड्रायव्हर आपल्या प्रियजनांचा जीव घेऊ शकतो, एखाद्या असाध्य आजाराचं निदान डॉक्टरांकडून होऊ शकतं, वादळामुळे एखादं शहर बेचिराख होऊ शकतं."

सध्या वातावरण बदलाचं सावट जगावर घोंघावत आहे. येणाऱ्या वर्षांत हे सावट अधिक गडद होईल. त्यावेळी नैसर्गिक संसाधनांचे दुर्भिक्ष कमालीचं जाणवेल.

अशावेळी लोकांचे कष्ट, त्यांना भोगावे लागणारे दुःख याला सीमा उरणार नाही आणि लोकांना पुन्हा एकदा परमेश्वराचाच भरवसा वाटेल, त्याचाच आधार वाटेल. प्रा. नोरेनझायन याबाबतच अगदी अचूक निरीक्षण नोंदवतात, "आपले दुःख, वेदना यातून लोकांचा एक दिलासा हवा असतो. पण एखादाही आशेचा किरण त्यांना दिसला नाही, तेव्हा ते परिस्थितीचा अर्थ लावू पाहतात. हा अर्थ लावण्यासाठी त्यांना धर्माची मदत होते. आपल्याला माहिती असलेल्या एखाद्या धर्मनिरपेक्ष आदर्शवादी तत्त्वज्ञानापेक्षा किंवा कारणापेक्षा धर्माचा आधार अशावेळी अधिक वाटतो."

धर्म, धार्मिक, जीवनशैली, सांस्कृतिक.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रमझान महिन्याच्या अखेरीस येमेनमधील मुली पारंपरिक हिना आरेखनासह

धर्माचा, देवाचा आधार हा किती विश्वसनीय आहे याची प्रचिती जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या हॉस्पिटलमध्ये आणि नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी वारंवार येत असते. उदाहरणादाखल, 2011 मध्ये न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च या भागात मोठा भूकंपाचा तडाखा बसला. धर्मनिरपेक्ष समाज हे इथले वैशिष्ट्य होते. मात्र भूकंपाचा तडाखा ज्यांनी अनुभवला, त्यांच्यामध्ये अचानक देवाचा धावा करण्याची वृत्ती वाढू लागली.

धर्माचं प्राबल्य या भागात नव्यानं मूळ धरताना दिसलं. पण विशेष म्हणजे उर्वरित देश होता तसाच धर्मनिरपेक्ष राहिला. आणखी एक वेगळं उदाहरण, इतिहासातल्या घडामोडीतलं. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानमध्ये धर्माचे मोठ्या प्रमाणावर पतन झाल्याचं दिसलं. तेही अणुबॉम्बचा वर्षाव झाला, त्याच ठिकाणी नाही, तर देशाच्या बहुतांश भागात. तरीही ख्राइस्टचर्च मॉडेललाच आपली अधिक पसंती दिसून येते. या अनुषंगाने प्रा. झुकेरमन म्हणतात, "जर एखादी भयंकर घटना अनुभवल्यामुळे अनेक लोक जर निरीश्वरवादी होणार असतील तर एक दिवस आपण सगळेच निरीश्वरवादी होऊ."

देवाचे मन

जर जगातली सगळी दुःखे, सगळी संकटे एखाद्या जादूप्रमाणे नाहीशी झाली, अत्यंत शांततापूर्ण, न्याय्य जीवन जरी आपल्या वाट्याला आलं तरी धर्माचं अस्तित्व कायम राहील, कारण देवाच्या आकाराचं एक छिद्रच जणू आपल्या पेशींच्या न्युरोसायकोलॉजीमध्ये अस्तित्वात आहे!

खरं तर उत्क्रांतीचा हा जो परिणाम आहे त्याचे आपण आभारच मानायला हवे.

हे समजून घेण्यासाठी दुहेरी प्रक्रिया सिद्धांताच्या (Dual Process Theory)मूळापर्यंत जावं लागेल. हा प्राथमिक मानसशास्त्रीय सिद्धांत असे म्हणतो - आपल्याकडे दोन मुख्य प्रकारच्या विचारसंस्था असतात : सिस्टिम 1 आणि सिस्टिम 2. यापैकी सिस्टिम 2 चा विकास पहिलीच्या तुलनेत अलीकडच्या काळातला आहे. तर सिस्टिम 2 मध्ये प्राधान्याने येतो डोक्यातला विचार - आपल्या सगळ्यांच्या आत एक निवेदक असतो, जो निरंतर, न थकता स्वागत करत असतो... जो कधीच शांत बसत नाही. काही जण याला आतला आवाज, 'मन की बात' वगैरेही संबोधतात. पण त्याच्यामुळेच आपण गोष्टींचं नियोजन करतो आणि तर्कसुसंगत वागण्याचा प्रयत्न करतो.

धर्म, धार्मिक, जीवनशैली, सांस्कृतिक.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कंबोडियामध्ये बौद्ध भिख्खू.

दुसऱ्या बाजूला सिस्टिम 1 ही आपल्या अंतर्ज्ञान, सहज वृत्ती यांच्यावर आधारलेली असते, ही अधिक स्वयंचलित प्रेरणा आहे. या क्षमता माणसांमध्ये नियमितपणे विकसित होत असतात, मग तो जगाच्या पाठीवर कुठेही जन्मलेला का असेना. खरंतर हिला जीवनावश्यक यंत्रणाच म्हणायला हवं. याची काही उदाहरणं पाहू.

सिस्टिम 1 मुळेच आपल्याला कुजलेले मांस पाहून तिटकारा वाटण्याची नैसर्गिक प्रतिक्रिया द्यावीशी वाटते, दोस्त हो! ती सिस्टिम 1 मुळेच आपल्याला बहाल झाली आहे. आपली प्रांतीय भाषा आपल्याला विचार न करता बोलता येते तसेच लहान बाळांना आपले आई-बाबा ओळखता येतात, सजीव-निर्जीव गोष्टींमध्ये फरक करता येतो. सगळी प्रणाली 1चीच देन. आपल्या आजूबाजूचे जग अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण काही साचेबद्द ठोकताळे तयार करू लागतो. नैसर्गिक आपत्ती किंवा जवळच्या कुणा व्यक्तीच्या मृत्यूचा अशांसारख्या वरवर अचानक घडलेल्या घटनांचा अर्थ लावू पाहतो.

धर्म, धार्मिक, जीवनशैली, सांस्कृतिक.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फिलिपिन्समधील एका धार्मिक मिरवणुकीदरम्यान

इतकेच नाही तर, सिस्टिम 1 दुनियेतल्या खाचखळग्यांतून मार्ग काढत आपल्याला आयुष्याचा साथीदार शोधण्यासाठीही मदत करते. काही विद्वानांच्या मते, या सिस्टिम 1 मुळेच धर्माचा उगम झाला तसेच धर्म जनमानसात स्थिरावला. कसं ते पाहू.

सिस्टिम 1 मुळेच आपल्या आयुष्यातल्या स्वयंभू अंतःप्रेरणा विकसित होतात - या प्रक्रियेला 'Hypersensitive Agency Detection' असं म्हणतात. आपण कुठेही गेलो तरी या भावना, परिस्थिती संबंधित असो वा नसो, आपल्या असण्याचा एक भाग बनतात. हजारो वर्षांपूर्वी याच क्षमतेमुळे आपण संभाव्य धोक्याचा अंदाज बांधू शकलो, उदा- झाडामागे लपलेल्या वाघापासून किंवा झुडुपात लपलेल्या विषारी सापापासून आपला बचाव करू शकलो.

मात्र या अंतर्ज्ञानी आवाजासह याच सिस्टिम 1 मुळे आपण पाहू शकत नसलेल्या गोष्टी कमी महत्त्वाच्या, अनाठायी ठरवून पर्यायाने त्यांच्या पाशात अडकायला पुरते सज्ज झालो- कधी याला परोपकारी देवाची आपल्यावर कृपादृष्टी आहे, असं स्वरूप आलं तर कधी दुष्काळ पडला वा तर भूताखेतांची वा आपल्या अतृप्त पूर्वजांचा हा कोप मानून त्याचे अर्थ लावू लागलो.

याचप्रमाणे सिस्टिम 1 आपल्याला कोणत्याही गोष्टींविषयी द्वैतभाव निर्माण करते. आपल्या मनाची, शरीराची एकवाक्यता साधण्यात अडथळा निर्माण होतो. आयुष्यात ही स्थिती लहान वयातच उद्भवते. लहान मुलांना, त्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी कुठलीही असो, आत्मा हा अविनाशी आहे, अमर आहे या तत्वज्ञानाशी संबंधित विचारांवर विश्वास ठेवावासा वाटतो- त्यांना खूप ठामपणे असे वाटते की, या घरात जन्मण्यापूर्वीही त्यांचे अस्तित्व होते आणि यापश्चातही ते राहणार आहे. सध्या अस्तित्त्वात असलेल्या धर्माच्या संकल्पनांमध्ये ही मनोधारणा अगदी बेमालूमपणे मिसळून जाऊ शकते- थोड्याफार कमी-अधिक बदलांसह, धर्माच्या मूळ ढाचा स्वीकारण्यास ही मनोधारणा पूरक ठरते.

धर्म, धार्मिक, जीवनशैली, सांस्कृतिक.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, थायलंडमधील एक भाविक

"माझा एक स्कँन्डेनेव्हियन सहकारी, जो स्वतः मानसशास्त्रज्ञ आहे आणि निरीश्वरवादीही. त्यानं मला सांगितलं, नुकतंच त्याची तीन वर्षांची मुलगी त्याला म्हणाली, "देव सगळीकडे आहे आणि सदासर्वकाळ तो असतोच." घरात देवा-धर्माचे वातावरण नसताना तिला ही कल्पना कुठुन सुचली असा प्रश्न आता त्याला आणि त्याच्या बायकोला पडला आहे." हा अनुभव कथन केला आहे, कॅलिफोर्नियातील पॅसडीना येथील 'थ्राईव्ह सेंटर फॉर ह्युमन डेव्हलपमेंट ॲट फुलेर थिओलॉजिकल सेमिनरी'चे संचालक जस्टीन बॅरेट यांनी. 'बॉर्न बिलिव्हर्स' या पुस्तकाचे ते लेखकही आहेत. "त्यांच्या मुलीसाठी देव म्हणजे कुणीतरी मोठी बाई आहे. याचाच अर्थ तिला लुथेरनच्या चर्चमधून वगैरे ही कल्पना सुचलेली नाही."

या सर्व कारणांमुळेच अनेक विद्वानांचे असे ठाम मत आहे की "आपल्या आकलन करण्याच्या क्षमतेचा परिपाक म्हणजेच धर्म" असे मत नोंदवतात रॉबर्ट मॅकोले. अटलांटा, जॉर्जिया येथील इमोरी विद्यापीठातील सेंटर फॉर माइंड, ब्रेन अँड कल्चर या विभागाचे मॅकोले संचालक आहेत. तसेच व्हाय रिलिजन इज नॅच्युरल अँड सायन्स इज नॉट या पुस्तकाचे ते लेखक आहेत. "माणसांमधील नैसर्गिक क्षमतांना योग्यप्रकारे गुंतवून ठेवण्यासाठी किंवा तसे भाग पाडण्यासाठी केलेली सांस्कृतिक संरचना म्हणजे धर्म."

न सुटणाऱ्या सवयी

निरीश्वरवाद्यांनी सांस्कृतिक आणि उत्क्रांतीय गोळाबेरीज यांच्याशी संघर्ष करायला हवा. नैसर्गिकपणे, मानवप्राण्यांना आपल्यापेक्षा मोठी कुणीतरी शक्ती आहे, आपण तिचा अविभाज्य भाग आहोत यावर विश्वास ठेवावासा वाटतो. कारण या विश्वासाच्या आधारावरच, आयुष्य अगदीच व्यर्थ नाही, ही आशा तग धरून असते. आपल्या मनाला जीवन जगण्यासाठी एखाद्या ठोस ध्येयाची गरज असते आणि त्याच्याशी सुसंगत असं स्पष्टीकरणही हवे असते.

व्हीडिओ कॅप्शन, भेटा कोणताही अधिकृत धर्म-जात नसणाऱ्या महिलेला

प्रा. नोरेनझायन याबाबत म्हणतात, "शिक्षणामुळे किंवा विज्ञानाची कास धरल्यामुळे किंवा तर्कशुद्ध विचार करण्यामुळे लोक अनेकदा त्यांच्या अंतःप्रेरणांवर विश्वास ठेवायला कचरतात. पण कुठेतरी या भावनांचे अस्तित्व असतेच."

तर दुसऱ्या बाजूला, नैसर्गिक जग समजून घेण्यासाठी निरीश्वरवादी, धर्म नाकारणारे विज्ञानाच्या फूटपट्टीचा वापर करतात. पण विज्ञानाच्या कसोटीवरच्या गोष्टींचा स्वीकार करणंही तितकंसं सोपं नसतं. सिस्टिम 1 द्वारे तयार झालेले समज-गैरसमज यांच्या दुरुस्तीचं काम विज्ञानामुळे होतं, असं मॅकोले म्हणतात.

धर्म, धार्मिक, जीवनशैली, सांस्कृतिक.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पुरिम सणादरम्यानचा एक क्षण.

जरी आपल्याला पृथ्वीची प्रदक्षिणा जाणवत नाही, तरी पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे आपल्याला मान्य करायलाच हवं. याच धर्तीवर उत्क्रांतीवाद अटळ आहे, तसंच विश्वाला कोणतंही अंतिम स्वरूप किंवा हेतू नाही, हेसुद्धा आपल्याला स्वीकारायला हवं. आपलं अंतर्ज्ञान जरी आपल्याला याहून वेगळा निर्वाळा देत असलं तरी, आपण चुकत असल्याचं मान्य करणं आपल्याला कठीण असतं.

नवनवीन माहिती, संशोधनं गोळा केली जातात, त्यांचं पृथःकरण होतं त्या आधारावर समोर आलेलं सत्य म्हणजे कायम बदलणारं वास्तव, ही विज्ञानाची मुख्यधारा.

"विज्ञान नैसर्गिक आकलनाच्या पलीकडे काम करतं - त्यावर लगेच विश्वास ठेवणं कठीण आहे," हे मॅकोले यांचे मत अगदी योग्य आहे. यापुढे जाऊन ते म्हणतात, "धर्माबाबत आपल्याला काही शिकायची, समजून घेण्याची गरजच नाही, कारण आपल्याला ते आधीच माहिती आहे." म्हणून धर्मावर विश्वास ठेवणं विज्ञान समजून घेण्यापेक्षा सोपं ठरतं.

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : व्हिएतनामधला हिंदू धर्म संपुष्टात येणार?

"कोणत्याही धार्मिक विचाराला कमी विरोध होतो, याचे अनेक पुरावे मिळू शकतात. म्हणूनच धर्माच्या मगरमिठीतून सुटका करून घेण्यासाठी आपल्याला मानवतेमध्ये अत्यंत ठोस पायाभूत बदल करावे लागतील," असं बॅरेट सांगतात.

हा जैवशास्त्रीयदृष्ट्या निगडीत राहण्याचा मुद्दा बहुदा पुढील निरीक्षणाचं समर्थन करू शकेल. जवळपास 20 टक्के अमेरिकन चर्चव्यवस्थेशी संबंधित नाहीत, तरी 68 टक्के लोक आपला देवावर विश्वास असल्याचं म्हणतात. तर 37 टक्के लोक स्वतःचे वर्णन आध्यात्मिक व्यक्ती असे करतात. कोणत्याही एका विशिष्ट धर्माशी निगडीत नसलं तरी कुठलीशी सर्वोच्च शक्ती जग नियंत्रित करते, यावर त्यांचा विश्वास असतो.

धर्म, परमेश्वर याच्या पुढे जात, जगभरातले अनेक लोक उत्स्फूर्तपणे आणखी एक निरीक्षण सांगतात की त्यांचा देवावर विश्वास नाही पण काही अंधश्रद्धा वा अलौकिक बाबींवर त्यांचा विश्वास आहे. भूतपिशाच्च, भविष्यवेध, कर्मयोग, टेलीपथी वा पुनर्जन्म यांसारख्या गोष्टींवर त्यांचा गाढा विश्वास असल्याचे कळते.

धर्म, धार्मिक, जीवनशैली, सांस्कृतिक.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतातील शीख बांधव दिवाळी सणादरम्यानचा क्षण.

नोरेनझायन म्हणतात, "स्कँन्डेनेव्हियामधील अनेक लोक, आम्ही देव मानत नाही तरी अनेक अलौकिक वा श्रद्धेच्या पार असलेल्या बाबींवरचा त्यांचा विश्वास आपल्याला वाटतो त्याहून अधिक ठाम असतो." ते पुढे म्हणतात की देवबीव न मानणारे धर्माच्या आसपास पोहोचणाऱ्या संकल्पनांकडून स्वतःच्या आयुष्यातील तत्त्वांबाबत मार्गदर्शन घेत असतात, जसं की क्रीडा संघ, योगा, व्यावसायिक संस्था येथील त्यांचे सहकारी वा मित्र. काहीजण निसर्ग, खुद्द धरणीमातेकडूनही तात्त्विक आधार शोधतात.

विश्वास ठेवण्यासाठीची विशिष्ट प्रणाली लोकांना हवी असते, ती प्रत्येकवेळी धर्म असेलच असं नाही. म्हणजे बघा, सध्या चेटुक विद्या अमेरिकेत लोकप्रिय होऊ लागली आहे तर ब्रिटनमध्ये मूर्तिपूजेला नवी झळाळी मिळते आहे.

नास्तिक लोकांमधले धर्माशी संबंधित अनुभवही वेगळ्या रूपात, अनेकदा विचित्र प्रकारे व्यक्त होत असतात. या विधानासाठी, थ्राईव्ह सेंटर फॉर ह्युमन डेव्हलपमेंट येथील मानववंशशास्त्रज्ञ रायन हॉर्नबेक अलिकडच्या काळातील दाखला देतात. ते म्हणतात चीनमधील काही लोकांसाठी 'वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्ट' हा ऑनलाइन गेम आध्यात्मिक महत्त्वाच्या दर्जाला पोहोचला होता. यामागचं कारण बॅरेट यांनी शोधण्याचा प्रयत्न केला.

ते म्हणतात "सध्याच्या समाजात ज्या नैतिक भूमिका तुम्ही घेऊ शकत नाही, त्या आदर्शवत मूल्यांची सांगड घालण्याची, त्यांच्याशी जोडले जाण्याची संधी लोकांना या गेमद्वारे लोकांना मिळत होती."

त्यांच्याच शब्दात सांगायचं तर "लोकांच्या मनात धर्म या संकल्पनेबद्दलची एक जागा असते, ती जर धार्मिक विचारांनी व्यापलेली नसेल तर इतर आश्चर्यकारक मार्गांनी तिची उणीव भरलेली पाहायला मिळते."

सांघिकता

धर्मामुळे सांघिक आणि सहकार्याची भावना वाढीस लागते, असंही नमूद करता येईल. जो कुणी घालून दिलेली मर्यादा ओलांडेल, तो सर्वशक्तीशाली, बलशाली देवाच्या नजरेतुन सुटणार नाही. या धोक्याच्या, भीतीच्या भावनेपोटी अनेक प्राचीन समाजव्यवस्थांचा कारभार नेकीने सुरू होता.

अॅटकिन्सन म्हणतात, "सर्वोच्च शक्तीकडून होणाऱ्या या शिक्षेचे गृहितक अगदी जालीम होते. जर या शिक्षेवर सगळ्यांनी विश्वास ठेवला तर हळूहळू संपूर्ण चमूमध्ये ही भावना कार्यरत होऊन जायची."

पुन्हा एकदा असं म्हणता येईल की, लोकांमधली वेदना, त्यांचे कष्ट आणि त्यांच्यातली असुरक्षितता यांचा उपयोग धर्मातील कठोर नैतिक मूल्यांच्या पालनासाठी होऊ शकतो.

धर्म, धार्मिक, जीवनशैली, सांस्कृतिक.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, धर्माच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

वेगवेगळ्या देशातल्या सुमारे 600 पारंपारिक समाजांच्या विश्वासधारणेबाबतच्या नुकत्याच केलेल्या एका विश्लेषणात, न्यूझीलंडच्या व्हिक्टोरिया विद्यापीठातील जोसेफ बुलबुलीया आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या असं लक्षात आलं की, कठीण हवामानाच्या प्रदेशातील वा नैसर्गिक आपत्तींचा धोका अधिक असलेल्या ठिकाणी देवाशी संबंधित नैतिक बंधनं मोठ्या प्रमाणावर विकसित होतात. असं का?

एखाद्यावेळी, मदत करणारे शेजारी जन्म-मरणाचा फेरा चुकवणारे ठरू शकतात. यासंदर्भात बोलायचे तर हा अत्यंत मौल्यवान लोकोपयोगी माध्यम म्हणून झाला आहे.

बुलबुलीया म्हणतात, "अत्यंत व्यापक, क्षणार्धात उभं राहणारं, विकसित होणारं असं एखादं कार्य काही वेळेला आपण पाहतो, सांस्कृतिक सीमांचाही ज्यावेळी अडसर ठरत नाही. असं कार्य उभं राहण्यामागचं स्पष्टीकरण सहकार्याची भावना असते या युक्तिवादातील तथ्य पटते."

अखेरीस, धर्माची हातोटी रूढ राहण्यामागे काही साधी गणितंही आहेत. सांस्कृतिक पार्श्वभूमी कोणतीही असो, धार्मिक लोकांना, नास्तिक लोकांच्या तुलनेत अधिक मुलं-बाळं होण्याची शक्यता असते. नोरेनझायन म्हणतात, "या निष्कर्षाचे समर्थन करणारे अनेक सबळ पुरावे आहेत. धार्मिक लोकांमध्येही जे अत्यंत कट्टर आहेत त्यांची जननक्षमता, मवाळ धार्मिकवाद्यांच्या तुलनेत अधिक असते."

या निष्कर्षासह आणखी एका वास्तवाचा विचार करायला हवा. मोठेपणी धार्मिक होणार की नास्तिक, याबाबत बहुतांशवेळा मुलं पालकांचं अनुकरण करतात. हे गृहित धरलं तर धर्मनिरपेक्ष जग अस्तित्त्वात येण्याची शक्यता नगण्यच दिसते.

कायमस्वरूपी विश्वास

मानसशास्त्रीय, ऐतिहासिक, सांस्कृतिक, तार्किक आणि न्युरोलॉजिकल अशा सर्व कारणांमुळे- धर्माचं अस्तित्व कधीही संपुष्टात येऊ शकणार नाही, असं तज्ज्ञांना वाटते. भीतीपोटी असो वा प्रेमापोटी धर्माने आपले चिरस्थायीत्व यशस्वीपणे पुढे नेले आहे. जर असं नसतं तर धर्म आज आपल्यासह नसता.

धर्म, धार्मिक, जीवनशैली, सांस्कृतिक.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रमाझानच्या महिन्याअखेरीस अझरबैजानमधील मुसलमान बांधव प्रार्थना करताना

आणि जरी ख्रिश्चन, मुस्लीम, हिंदू आणि इतरही देवतांवरची आपली नजर ढळली तरी अंधश्रद्धा आणि अलौकिक शक्तींचा जनमानसांवरील प्रभाव कायम असेलच. मात्र एखाद्-दुसऱ्या आपत्तीमुळे अधिक औपचारिक धर्मव्यवस्था जन्माला येऊ शकते.

मॅकोले म्हणतात, "कितीही धर्मनिरपेक्ष सरकार असले तरी सर्व संकटांपासून ते जनमानसांचा बचाव करू शकणार नाहीत." एखादे भयंकर पर्यावरणीय संकट, जागतिक अण्वस्त्र युद्ध वा धुमकेतूची पृथ्वीला होणारी टक्कर असे कोणतेही संकट समोर येऊन ठेपले की देवाचा नवा जन्म झालाच म्हणून समजा.

"दुःखाच्या आणि संकटाच्या काळात लोकांना दिलासा देणारी फुंकर हवी असते. आयुष्याच्या पश्चातही काही असते, एका शाश्वत शक्तीवर आपले प्रेम आहे अशा प्रकारचा विचार लोकांना भावतो." असे झुकेरमन म्हणतात. "देवावर विश्वास असणारे लोक कायम आजुबाजुला असतीलच आणि त्यांचे बहुमत असल्यास मला आश्चर्य वाटणार नाही."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)