कोरोनानंतर धर्माचं स्वरूप बदलून जाईल का?

    • Author, झुबैर अहमद
    • Role, बीबीसी हिंदी
कोरोनानंतरचा धर्म कसा असेल?

फोटो स्रोत, PUNEET BARNALA/BBC

कोरोना व्हायरसची साथ भारतात आल्यानंतर मंदिरं आणि मशिदी बंद केल्या गेल्या मात्र दुसरीकडे रामायण टीव्हीवर दाखवायला सुरुवात केलं. सर्वांत जास्त पाहिला गेलेला कार्यक्रम म्हणून त्याची नोंदही झाली.

या काळात लोक देवावर नाराज होते की त्यांच्या श्रद्धा अधिकच दृढ झाल्या हे पाहावं लागेल.

व्हीडिओ कॅप्शन, कोरोनानंतरच्या जगात धार्मिक श्रद्धा कशा बदलतायत?

याच रामायण मालिकेत सीतेची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिकालीया टोपीवाला यांच्यामते कोरोना व्हायरसच्या साथीनंतर जग आणखी अध्यात्मिक होईल. भारतातील मोठी लोकसंख्या 'निसर्ग आणि अध्यात्मा'च्या वाटेला जाईल असं त्या सांगतात. बागांमध्ये ध्यानाला बसलेल्या लोकांची संख्या वाढल्याचेही दिसेल असं त्या म्हणतात.

अजमेरमधील पूजनीय सूफी संत ख्वाजा मोईनुद्दिन चिश्ती यांच्या दर्ग्याची देखभाल करणारे सय्यद गोहर या व्हायरसला अल्लाचा प्रकोप मानतात.

कोरोना
लाईन

कोरोना व्हायरसला मशिदीत घुसण्याला देवदूतच रोखतील असं गोहर आणि त्यांचे अनेक अनुयायी मानतात.

तर काही लोकांना गोमुत्र पिऊन कोरोनापासून सुटका होते असं वाटतं.

त्यामुळे कोरोनाला दूर ठेवण्यासाठी धार्मिक प्रतीकं आणि प्रथांना अधिकृत मान्यताच मिळाली आहे असं वाटतं.

सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजचे डॉ. हिलाल अहमद म्हणतात, आधुनिक धर्मांमध्ये आणि विज्ञानात कोणताही संघर्ष नाही. इतकंच नाही तर त्यांनी विज्ञान योग्य असल्याची मान्यताही दिली आहे. त्यांच्यासमोर एखादी अभूतपूर्व गोष्ट आली की आपल्या धर्मात ती आधीपासूनच होती असं ते सांगतात.

धर्मांसाठी 'न्यू नॉर्मल'

एखाद्या बाबतीतील अनिश्चितता त्रासदायक असते. परंतु जोपर्यंत एखादी लस तयार होत नाही आणि ती सगळ्या लोकांना दिली जात नाही तोपर्यंत लोकांना या नव्या कोरोनोत्तर जगात आपलं रोजचं जगणं सुरू करता येणार नाही. त्यासाठी काही महिने किंवा वर्षं लागू शकतात असं तज्ज्ञ म्हणतात.

कोरोनानंतरचा धर्म कसा असेल?

फोटो स्रोत, Getty Images

भारतातले लोक पूर्वीपेक्षा जास्त धार्मिक होतील की त्यांची शास्त्रीय समज चांगली विकसित होईल याचा अंदाज लावणं कठीण आहे. तरिही या गोंधळाच्या स्थितीतही काही संकेत मिळत आहेत.

दिल्लीमध्ये राहणाऱ्या सामाजीक कार्यकर्त्या गीता शर्मा यांचं उदाहरण घेऊ. त्या एक स्मार्ट आणि स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. लॉकडाऊनमध्ये कोणतीही तक्रार न करता त्या जगत आहेत. त्यामागे काय कारण असावं असं विचारल्यावर त्या याचं श्रेय ध्यान करण्याला देतात.

त्यांच्यामते त्या आता जास्तच अध्यात्मिक झाल्या आहेत. देवानं आपल्याला अध्यात्माच्या दिशेने जाण्यासाठी एक संधी दिली आहे असं त्याचं मत आहे.

गीता या पत्रकार आहेत, या सध्याच्या काळात त्यांना स्वतःबरोबर वेळ घालवणं आवडतं. कोव्हिडच्या संकटाबाबत त्यांच्या मनात कोणत्याच भावना नाहीत. त्या म्हणतात कोरोना काही शाप नाही तर हा आपल्याला मिळालेला एक धडा आहे, ध्यान करणं हेच त्याला उत्तर आहे.

बंगळुरूमध्ये मोठा आश्रम चालवणारे श्री श्री रवीशंकर यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत. कोरोनामुळे आलेल्या दुःखावर उतारा म्हणून ध्यान करा असा संदेश त्यांनी एका व्हीडिओमार्फत दिला आहे.

सय्यद गोहर यांच्यामते लोक आता जास्त अध्यात्मिक होतील आणि अल्लाच्या अधिक जवळ येतील.

ऑनलाइन प्रार्थनांचं युग

भारतात दोन महिन्यांहून अधिक काळ मशिदी, मंदिरं, चर्च, गुरुद्वारा बंद होत्या. 8 जन रोजी मंदिरं पुन्हा सुरू झाली आहेत. अर्थात त्यासाठी नियमावली आणि निर्बंध आहेत.

धार्मिक जगात सामाजिक अंतर ठेवण्याला मान्यता मिळत असल्याचं दिसतं. एकेकाळी या जागांवर गर्दी केली जायची.

कोरोनानंतरचा धर्म कसा असेल?

फोटो स्रोत, PUNEET BARNALA/BBC

महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये अजूनही धार्मिक स्थळं सामान्य जनतेसाठी उघडलेली नाहीत. मात्र इंटरनेटवरुन दर्शन घेण्याची सोय करण्यात आलेली आहे. अजमेरच्या दर्ग्यात दरवर्षी लाखो लोक येऊन जातात. राजस्थानमधील कोटा इथं राहाणारे दुकानदार खुर्शीद आलमसुद्धा ख्वाजा मोईनुद्दिन चिश्तींचे भक्त आहेत.

ते म्हणतात, "मी आता दर्ग्यापर्यंत तर जाऊ शकत नाही, म्हणून मी आता व्हीडिओ कॉलवरुन दर्शन घेतो." खुर्शीद यांच्यासारखे अनेक लोक आता इंटरनेटवरुन दर्शन घेत आहेत. हे चालू राहील," असं सय्यद गोहर म्हणतात.

ते म्हणतात, आम्ही इंटरनेटवरुन सेवा देतो मात्र कोरोनोत्तर काळात जगभरात याला मागणी वाढेल.

सुवर्णमंदिराचं कामकाज पाहाणाऱ्या एसजीपीसी संस्थेचे मुख्य सचिव रूप सिंह म्हणतात, आता सुवर्ण मंदिरात जाण्याची शीख भक्त वाट पाहात आहेत . तसेच हरमिंदर साहेब लोकांसाठी कधी खुलं होईल याची वाट भक्त पाहात आहेत. जगभरातले लोक त्याचीच वाट पाहात आहेत यात शंका नाही, परंतु लॉकडाऊनमधील काही निर्बंध नंतरही कायम राहातील असं दिसतंय.

कोरोनानंतरचा धर्म कसा असेल?

फोटो स्रोत, PUNEET BARNALA/BBC

पोप फ्रान्सिस यांची साप्ताहिक प्रवचनं आता इंटरनेटवरुन प्रसारित केली जातात. तर अमेरिकेत चर्च आणि इस्रायलमधील सिनेगॉगमधील धार्मिक अनुष्ठानं इंटरनेटवर येऊ लागली आहेत.

मक्केमधील ग्रॅंड मॉस्क म्हणजे मोठी मशीद आता बंद असते. मात्र दिवसभरात पाचवेळा होणाऱ्या अजानचे लाइव्ह स्ट्रीमिंग केले जाते.

धर्म आणि अर्थशास्त्र यांचं नातं

अचानक बंद झाल्यामुळे धार्मिकस्थळांना मिळणाऱ्या देणगीमध्ये मोठी घट झाली आहे.

दिल्ली शिख गुरुद्वारा प्रबंधन समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा म्हणतात, "पूर्वी हजारो लोक गुरुद्वारामध्ये येत असत आणि दानपात्रात काही दान टाकत असत मात्र आता लोकांचं येणं पूर्ण बंद झालं आहे."

कोरोनानंतरचा धर्म कसा असेल?

फोटो स्रोत, PUNEET BARNALA/BBC

समितीसाठी हा काळ सर्वांत जास्त आव्हानात्मक असावा असं ते सांगतात, ते दररोज टीव्ही आणि इंटरनेटच्या माध्यमातून देणगीचं आवाहन करतात असं ते सांगतात.

लॉकडाऊनपूर्वी दिल्लीमधील बांगलासाहेब गुरुद्वारामध्ये स्वयंसेवक आणि कर्मचारी दररोज 25 हजार लोकांसाठी जेवण बनवायचे आणि शनिवार, रविवारी ही संख्या एक लाखावर जायची. आता लॉकडाऊनमुळे गरिबांना काहीच खाण्यापिण्यासाठी नसल्यामुळे गुरुद्वारामध्ये दररोज 2 लाख लोकांचं जेवण तयार केलं जात आहे.

सिरसा म्हणतात, लॉकडाऊन संपल्यावर ही संख्या दो-तीन पटीनं वाढेल.

कोरोनानंतरचा धर्म कसा असेल?

फोटो स्रोत, Getty Images

गुरद्वारामध्ये येणाऱ्या लोकांची संख्या घटल्यामुळे पूर्वीसारखे पैसे उभं करण्यासाठी काही वर्षं लागतील असं त्याचं मत आहे.

गुरुद्वारा ज्या पैशावर चालायचे तो प्रवाह एकदम कमी झाला आहे.

अर्थात अजूनही जगभरातले लोक इंटरनेटच्या माध्यमातून दान देत आहेत, त्यावर कामकाज सुरू आहे.

सिरसा म्हणतात, "आम्ही एकेक दिवस ढकलत आहोत, धार्मिक संस्था बंद होऊनही लोकांच्या मानवता सेवेत घट झालेली नाही हा एक चांगला अनुभव आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)