swami vivekanand: माणुसकी हाच सगळ्यांत मोठा धर्म आहे

स्वामी विवेकानंद
फोटो कॅप्शन, स्वामी विवेकानंद
    • Author, नासिरूद्दीन
    • Role, ज्येष्ठ पत्रकार

12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन. हा दिवस राष्ट्रीय युवा दिन किंवा National Youth Day म्हणूनही साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांची शिकवण आजही तरुणांना प्रेरणा देते आणि त्यांचे विचार हे आजही तितकेच समर्पक आहेत. मानवता हाच सर्वांत मोठा धर्म आहे असा संदेश त्यांनी दिला होता.

त्यांनी हा संदेश आपल्या भाषणातून वेळोवेळी दिला आहे पण एका प्रसंगाची आठवण मात्र खूप प्रासंगिक आहे.

हिंदू धर्माचे अधिष्ठाता म्हणून स्वामी विवेकानंद यांचं नाव घेतलं जातं. मात्र धर्माच्या नावावर माणुसकी सोडणाऱ्या गोरक्षकांना त्यांनी फैलावर घेतलं. त्याचीच ही गोष्ट.

ही गोष्ट आहे फेब्रुवारी 1897ची आहे. कोलकत्यामधल्या बाग बाझार परिसरातली ही घटना आहे. स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांचे एक भक्त प्रियनाथ यांच्या घरी थांबले होते. रामकृष्ण यांचे किती तरी भक्त त्यांना भेटण्यासाठी तिथं आले होते. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरू होती.

त्याचवेळी तिथं गोरक्षेचा प्रचार करणारा एक कार्यकर्ता आला होता. त्यांच्यात आणि स्वामी विवेकानंद यांच्यात झालेला संवाद शरदचंद्र चक्रवर्ती यांनी शब्दबद्ध केलं आहे. या संवाद स्वामी विवेकानंद यांच्या विचारांच्या अधिकृत संकलानाचा भाग मानला जातो.

स्वामी विवेकानंद यांनी गोरक्षेच्या कामात गुंतलेल्या या व्यक्तीशी स्वामी विवेकानंद यांनी काय संवाद साधला असेल याचा फक्त विचार करा.

1893ला विश्व धर्म संसदेत हिंदू धर्माची पताका फडकावणारे आणि भगवी वस्त्र परिधान करणारे संन्यासी असलेल्या स्वामी विवेकानंदांनी या गोरक्षकाला जे सांगितलं त्याची कल्पना करणं तुमच्यासाठी कठीण जाईल.

काय आहे हा संवाद?

या गोरक्षकाने साधूसारखे कपडे परिधान केले होते आणि डोक्यावर भगवी टोपी होती. तो बंगालच्या बाहेरच्या हिंदी पट्ट्यातला वाटत होता.

स्वामी विवेकानंद आतल्या खोलीतून या गोरक्षकाला भेटण्यासाठी बाहेर आले. नमस्कार केल्यानंतर या व्यक्तीने स्वामी विवेकानंद यांना गाईचं चित्र दिलं.

त्यांचा हा संवाद 'कम्प्लीट वर्क्स ऑफ विवेकानंद'मध्ये देण्यात आला आहे. खरंतर हा संवाद जसाच्या तसा वाचणं योग्य ठरेल.

स्वामी विवेकानंद

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला वंदन करताना

स्वामी विवेकानंद - तुमच्या एकत्र येण्याचा उद्देश काय आहे?

गोरक्षक - आम्ही देशातील गाईंना कसायांच्या हाती जाण्यापासून वाचवतो. विविध ठिकाणी आम्ही गोशाळा सुरू केल्या आहेत. गोशाळेत आजारी, कमकुवत आणि कसायांकडून विकत घेतलेल्या गाईंचं संगोपन करतो.

स्वामी विवेकानंद - ही तर फारच चांगली बाब आहे. तुमच्या संघटनेच्या उत्पनाचा मार्ग काय, हे जरा सांगाल का?

गोरक्षक - तुमच्यासारख्या महापुरुषांच्या कृपेने जे मिळतं, त्यातूनच आमचं काम चालतं.

स्वामी विवेकानंद - तुमची जमा रक्कम किती आहे?

गोरक्षक - मारवाडी वैश्य समाज या कामासाठी विशेष मदत करतं. त्यांनी या चांगल्या कामासाठी मोठा निधी दिला आहे.

स्वामी विवेकानंद - मध्य भारतामध्ये यावेळी मोठा दुष्काळ पडला आहे. भारत सरकारने म्हटलं आहे की 9 लाख लोक भुकेने मृत्युमुखी पडले आहेत. तुमच्या संघटनेने या परिस्थितीत काही मदतीचं काम केलं आहे का?

गोरक्षक - आम्ही दुष्काळ आणि इतर आपत्तीत काही सहकार्य करत नाही. आमच्या संघटनेच्या स्थापनेचा उद्देश फक्त गोमातेचं रक्षण हाच आहे.

स्वामी विवेकानंद
फोटो कॅप्शन, स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद - तुमच्यासमोर बघता बघता दुष्काळाने लाखो माणसांचा जीव घेतला. तुमच्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसा होता. दुष्काळाचे चटके झेलणाऱ्या उपाशी माणसांना थोडं खायलाप्यायला देणं तुम्हाला तुमचं कर्तव्य वाटलं नाही का?

गोरक्षक - नाही. हे लोकांच्या कर्माचं फळ आहे. पापामुळेच दुष्काळ पडला आहे. जसं कर्म असतं तसंच फळ मिळतं.

गोरक्षकाचं हे बोलणं ऐकून स्वामी विवेकानंदांच्या मोठ्या डोळ्यांमध्ये राग दिसू लागला. एखाद्या तप्त ज्वाळेप्रमाणे त्यांचा चेहरा लालबुंद झाला. मात्र त्यांनी आपला क्रोध आटोक्यात ठेवला.

स्वामी विवेकानंद म्हणाले, "ज्या सभा समितीला माणसांप्रती कणव वाटत नाही, आपल्या बंधूगणांना उपाशीपोटी मरताना पाहून त्यांच्या जीवासाठी एक मूठ धान्य द्यावं असं त्यांना वाटत नाही. मात्र पशुपक्षांसाठी मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य देतात. अशा सभासमितीप्रती माझ्या मनात तसूभरही सहानुभूती नाही. अशा वागण्याने समाजाचं काही भलं होईल असं मला वाटत नाही."

विवेकानंद कर्माच्या सिद्धांताबाबत आपली भूमिका मांडतात. ते म्हणतात, "आपल्या कर्माचं फळ म्हणून माणसं जीव गमावत आहेत. अशा पद्धतीने कर्माला दूषण देण्यात आलं तर जगात कोणालाच काही काम किंवा कर्तव्य करायला नको. पशुपक्ष्यांसाठी तुमचं कामही यामध्येच मोडतं. या कामाबद्दलही हेच म्हणता येईल. गोमाता आपल्या कर्माचं फळ म्हणून कसायाच्या हातात जातात आणि तिथे त्यांचा मृत्यू होतो. अशावेळी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणंही वायफळ आहे."

विवेकानंदांची कोटी

विवेकानंदांचं हे बोलणं ऐकून गोरक्षकाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. तो म्हणाला, "तुम्ही म्हणता ते खरं आहे. मात्र शास्त्र असं सांगतं की गाय आपली माता आहे."

हे ऐकल्यावर विवेकानंदांना हसू आवरलं नाही. हसत हसत ते म्हणाले, "हो. गाय आपली माता आहे. हे मला चांगल्याप्रकारे समजतं. तसं नसतं तर अशा विलक्षण प्रतिभेच्या मुलाला कोणी जन्म दिला असता."

स्वामी विवेकानंद
फोटो कॅप्शन, स्वामी विवेकानंद यांचे तरुणपणीचे छायाचित्र

गोरक्षक या मुद्यावर पुढे काही बोलला नाही. विवेकानंदांनी केलेली उपहासात्मक टिप्पणी त्यांना कळली नसावी. गोरक्षक विवेकानंदांना म्हणाला, "समितीच्या वतीने तुमच्याकडे थोडा शिधा मागण्यासाठी आलो आहे."

विवेकानंद- मी तर संन्यासी. फकीर माणूस. माझ्याकडे दमडीही नाही. मी तुला काय मदत करणार? मात्र माझ्याकडे जर कधी पैसे असतील तर मी सगळ्यांत आधी उपाशी माणसाला मदत करेन. सगळ्यांत आधी माणसाला वाचवायला हवं. अन्नदान, विद्यादान, धर्मदान करायला हवं. हे सगळं केल्यावर पैसा शिल्लक राहिला तर तुमच्या समितीला काही मदत करू शकेन.

विवेकानंदांचं हे उत्तर ऐकून गोरक्षक काहीही न बोलता निघून गेला.

माणुसकी हाच सगळ्यांत मोठा धर्म

तिथे उपस्थित रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य शरतचंद्र यांच्या शब्दातं सांगायचं झालं तर, "या घटनेनंतर विवेकानंद आमच्याशी बोलू लागले. काय म्हणालो? कर्माचं फळ म्हणून माणसं जीव गमावत आहेत. अशावेळी त्यांच्या प्रति दया दाखवून काय होणार? आपल्या देशाची अधोगती का झाली याचं हे जिवंत उदाहरण आहे. माणसाला माणसाचं दु:ख दिसत नाही, अनुभवता येत नाही. त्याला माणूस का म्हणावं? हे बोलता बोलता स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वात अंगार फुलून राहिला होता. दु:खाने त्यांचं शरीर गदगदलं होतं.

स्वामी विवेकानंद
फोटो कॅप्शन, स्वामी विवेकानंद

हे सगळं बोलणं 121 वर्षांपूर्वीचं होतं. या संभाषणाचा आताच्या काळात काय संदर्भ आहे.

या संवादाचं तात्पर्य हेच जाणवतं की माणुसकी हा विवेकानंदांसाठी मुख्य धर्म आहे. माणुसकीची सेवा हे त्यांच्यासाठी प्रमाण कर्तव्य आहे. स्वामी विवेकानंदांचा उल्लेख करताना आपल्यापैकी कितीजण त्यांची ही शिकवण लक्षात ठेवतात?

थोडा आणखी विचार करा

मेंदूचा वापर मेंदूला आणखी बळकट करतो असं गुणीजन सांगतात. जाता जाता आणखी एक कल्पनाचित्र रंगवूया. आजच्या काळात भगवं वस्त्र परिधान केलेले स्वामी विवेकानंद हयात असते, तर त्यांनी आजच्या घटनांवर काय भाष्य केलं असतं?

स्वामी विवेकानंद
फोटो कॅप्शन, स्वामी विवेकानंद
  • झारखंडची संतोषी, मीना मुसहर, सावित्री देवी, राजेंद्र बिरहोर... आणि दिल्लीच्या तीन बहिणी- शिखा, मानसी आणि पारुल यांचा भुकेमुळे मृत्यू.
  • अखलाक, अलीमुद्दीन, पहलू खान, कासिम, रकबर खान यांची गो तस्करीच्या आरोपांवरून हत्या.
  • गुजरात, आंध्र प्रदेशात गोरक्षणाच्या नावावर दलितांना मारहाण.
  • या हत्या आणि मारहाणीचं वारंवार समर्थन केलं जातं.
  • गोशाळेत गाईंचा मृत्यू.
  • पिक वाया गेल्यानं कर्जाचं ओझं डोक्यावर असलेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू.

विवेकानंदांचा गोरक्षकांशी झालेला संवाद लक्षात घेता ते वर उल्लेखलेल्या प्रसंगावर काय म्हणाले असते?

आज विवेकानंद असते तर आजच्या गोरक्षकाबरोबर त्यांनी असा संवाद साधला असता तर विवेकानंदांचं काय झालं असतं? हा प्रश्न डोक्यात येणं स्वाभाविक आहे.

(नासिरुद्दीन ज्येष्ठ पत्रकार आहेत. या लेखातील मतं त्यांची वैयक्तिक आहेत. )

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)