मानसिक आरोग्य : एकटे राहाणारे लोक जास्त सुखी असतात का?

एकल महिला

फोटो स्रोत, Deepak Sethi/getty

    • Author, ख्रिस्टीन रो
    • Role, बीबीसी फ्युचर

'एकला चलो रे'चा नारा देत वाटचाल करणं अवघड मानलं जातं. मात्र नवीन संशोधनानुसार एकटं असणं अनेक दृष्टीनं फायदेशीर असल्याचं स्पष्ट होत आहे.

मी एकलकोंडी आहे असंच म्हणूया. कधीमधी लोकांमध्ये मिसळणारी. एखादा ठरलेला कार्यक्रम अचानक रद्द झाला तर मला मनातून हायसं वाटतं. लोकांना भेटल्यावर, गप्पा सुरु झाल्यावर थोडा वेळ झाला की `आता बास' असं वाटायला लागतं.

इतकंच कशाला, मी एकदा दहा दिवसांच्या विपश्यना शिबिरालाही गेले होते. ध्यानधारणा करायला नव्हे; आवाज नको, कोणाशी बोलायला नको, शांतता मिळावी म्हणून.

कदाचित त्यामुळेच असेल, लेखिका अनेली रुफस यांचं म्हणणं माझ्यापर्यंत थेट पोहोचतं. त्यांच `लोनर्स मॅनिफेस्टो' - `पार्टी ऑफ वन' विचार करायला लावणारं आहे खरं.

लोनर्स मॅनिफेस्टो - टीव्हीवरच्या कार्यक्रमात शिक्षा म्हणून मुलांना आपापल्या खोल्यांमध्ये जायला फर्मावलं जासं, ते काही मला झेपत नाही. माझी खोली मला अतिशय आवडते. त्या बंद दाराआड एकट्यानं राहणं मला फार आवडतं. माझ्यासाठी शिक्षा म्हणजे चुलतभावाबरोबर खेळ खेळणं. खोलीत जा ही काय शिक्षा झाली?

अशा प्रकारचं एकलकोंडं वागणं हे अर्थातच आदर्श मानलं जात नाही. एकलकोंड्या स्वभावामुळे सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात हे अनेक संशोधनातून मांडलं गेलं आहे.

ज्या देशांमध्ये वृद्धांच्या संख्येत झपाट्नं वाढ होते आहे, अशा ठिकाणी तर विशेषकरून सामाजिक संबंधांचं महत्त्व सांगितलं जात आहे.

युरोपातील रॉयल कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्सच्या अभ्यासानुसार, मधुमेहामुळे जसा अकाली मृत्यूचा धोका संभवतो, तसाच एकाकीपणामुळे संभवतो.

माणसाचं माणसाशी नातं असणं हे केवळ रोगप्रतिकारक प्रणालीसाठीच नाही तर बौध्दिक आणि शारीरिक क्षमतेसाठीही महत्त्वाचं आहे.

एकटेपणा, प्रतिभा, व्यक्तिमत्व विकास
फोटो कॅप्शन, एकटेपणा व्यक्तिमत्त्वाला पूरक ठरू शकतो असं नवं संशोधन सांगतं.

टोकाच्या एकाकीपणामध्ये अडकलेल्या व्यक्तींच्या वर्तनावरून हे सिद्ध होतं. पालकांकडून शारीरिक, मानसिक छळ झालेली मुलं, एकांतवासातले कैदी, दीर्घकाळ एकाकी राहिलेल्या-डांबलेल्या व्यक्ती मुक्त झाल्यानंतरही कित्येक वर्ष मानसिक अस्थैर्याशी झगडतात.

मात्र ही उदाहरणं अगदी टोकाच्या आणि इच्छेविरुद्ध एकाकीपणाच्या दरीत ढकलल्या गेलेल्या माणसांची आहेत. आपल्यापैकी काहींना एकटं राहायला आवडतं; त्यांचं काय? - त्यांच्यासाठी दिलासा देणारं एक संशोधन पुढे आलं आहे. अशा `एकला चलो रे' व्यक्तींना त्यांच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात काही फायदा होतो असं हे संशोधन मांडतं.

सृजनक्षमता

एकटेपणाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे सृजनशीलतेला खतपाणी मिळतं. कॅलिफोर्नियातल्या सॅन होजे स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये सृजनशीलतेची मानसिकता या विषयाचा अभ्यास करणाऱ्या ग्रेगरी फेइस्ट यांच्या मते सृजनशीलता म्हणजे कल्पकता आणि उपयोगिता या दोन बाबींचा संगम आहे.

खुलेपणा (नवीन विचार आणि अनुभवांसाठीचा खुलेपणा), स्वतःवरचा विश्वास (स्वतःच्या कार्यकौशल्यावरचा विश्वास) आणि स्वायत्तता (स्वातंत्र्य) - याचा उलटा अर्थ `सामाजिक नियमांची कदर नसणारा' आणि `स्वखुषीनं एकटं राहणारा' असाही होऊ शकतो. फेइस्टनं कलाकार आणि शास्त्रज्ञांवर केलेल्या संशोधनातून ठळकपणानं हेच सिद्ध झालं की सर्जनशील मंडळींना लोकांमध्ये मिसळण्यात फारसा रस नसतो.

एकटेपणा, प्रतिभा, व्यक्तिमत्व विकास

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गर्दीतही एकटेपणाची भावना

याचं अजून एक कारण असं की सर्जनशील व्यक्ती दिवसाचा बराच वेळ त्यांच्या आवडत्या कामामध्ये व्यतीत करतात.

फेइस्ट म्हणतो, "अनेक कलाकार मनात जी खळबळ चाललेली असते, त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना आलेले अनुभव धांडोळून व्यक्त होण्याच्या, कलानिर्मितीच्या प्रक्रियेत गुंग झालेले असतात." कलाकारांना मनाचा तळ शोधण्याचा अवसर एकलेपणामुळे मिळतो.

बफेलो युनिव्हर्सिटीमधील मानसशास्त्रज्ञ ज्युली बॉकर यांचा संशोधनाचा विषय आहे सामाजिक वर्तन आणि एकटेपणा. त्यांच्या म्हणण्यानुसार समाजापासून दूर राहणाऱ्यांचेही तीन प्रकार आहेत.

भीती किंवा चिंतेमुळे आलेला लाजाळूपणा, समाजात मिसळण्याची आवड नसल्यामुळे असे प्रसंग आले की टाळाटाळ करण्याचा स्वभाव आणि एकलेपणाचा पर्याय स्वीकारल्यामुळे समाजापासून तुटून राहाणं.

बॉकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या संशोधनामुळे एकलकोंड्या व्यक्तींच्या वागण्यालाही काही सकारात्मक अर्थ असू शकतो हे निदर्शनास आलं.

समाजात मिळून मिसळून न वागणाऱ्या व्यक्ती आणि सर्जनशीलता यांमध्ये जवळचा संबंध आहे असं मत बॉकर यांनी मांडलं. एकलकोंडेपणाचा आणि कुरापतखोर वागण्याचा (aggression) संबंध नाही, मात्र लाजाळूपणा आणि टाळाटाळ करण्याच्या स्वभावाचा आणि एकलकोंडेपणाचा संबंध आहे असंही त्यांच्या संशोधनातून मांडलं गेलं.

एकटेपणा, प्रतिभा, व्यक्तिमत्व विकास

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एकटेपणामुळे नाती जोडण्यास मदत होते असंही स्पष्ट होतं आहे.

समाजाशी, माणसांशी अंतर ठेवून वागणं हे घातक नाही असं मत यापूर्वी संशोधनांमध्ये मत होतं, तर बॉकर आणि सहकाऱ्यांनी सिद्ध केलं की उलट असं वागणं हे फायदेशीरही असू शकतं.

एकलकोंड्या व्यक्ती त्यांना हवं तेवढं संभाषण करतात आणि त्यांच्यासाठी तेवढंच पुरेसं असू शकतं. बॉकर यांच्या म्हणण्यानुसार, `एकटं राहाणं ही एकलकोंड्या लोकांची मर्जी असते. त्यांची निवड असते. त्यांना इतरांबरोबर राहून फार फरक पडत नाही.'

अर्थात अशा वर्तनावर सांस्कृतिक परिस्थिती आणि लिंगभेद यांचाही परिणाम होताना दिसतो. उदाहरणादाखल सांगायचं तर, चीन आणि पाश्चिमात्य देशातल्या मिळून मिसळून न राहणाऱ्या मुलांमध्ये तुलना केली तर चीनमधल्या मुलांना शैक्षणिक आणि व्यक्तिगत नातेसंबंधांचे प्रश्न अधिक भेडसावतात असं आढळून आलं. बॉकर यांच्या मते, जग जसं जवळ येत चाललं आहे तसा हा फरक कमी होताना दिसतो आहे.

एकांत-एकलेपणा हा केवळ सर्जनशीलतेसाठी नाही तर इतरही बाबींमध्ये उपयोगी ठरताना दिसतो.

आतला आवाज

पुढारी हा लोकाभिमुख असायला हवा असं सर्वमान्य मत आहे. पण ते देखील हा पुढारी ज्या प्रकारच्या कार्यकर्त्यांबरोबर काम करतो आहे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतं.

2011 मध्ये एका पिझ्झा चेननं केलेल्या अभ्यासानुसार असं निदर्शनास आलं की ज्या पिझ्झा सेंटरमध्ये काहीसे निष्क्रिय कर्मचारी होते, तिथे लोकाभिमुख बॉस असल्याचा जास्त फायदा झाला.

ज्या पिझ्झा सेंटरमध्ये उत्साही कर्मचारी होते, तिथे बॉस कमी बोलणारा, कमी मिसळणारा असला, तर ते जास्त फायद्याचं ठरलं होतं. याचं कारण असं की सक्षम, प्रभावी व्यक्तींसमोरदेखील अंतर्मुख व्यक्ती दबावाखाली येत नाही. ते खुलेपणानं समोरच्याची मतं ऐकून घेऊ शकतात.

एकटेपणा, प्रतिभा, व्यक्तिमत्व विकास

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एकटेपणा प्रतिभेला चालना देतो.

एककल्लीपणा आणि एकतानता यांचा संबंध आहे हे फार पूर्वीपासून आपल्याला माहीत आहेच. कित्येक पुरातन संस्कृतींमध्ये, धर्मांमध्ये, एकांत हा ज्ञानप्राप्तीचा मार्ग असल्याचं सांगितलं आहे.

अलीकडच्या काळात झालेल्या संशोधनांमधून आपल्याला त्यामागचं कारण कळतं. एककल्ली असण्याचा अर्थ मेंदू सक्रिय अवस्थेत पण विश्रांती घेत आहे आणि याचाच अर्थ त्याला एकांत हवा आहे. जेव्हा दुसरी व्यक्ती समोर असते, तेव्हा समोर चाललेल्या घटनांकडे, व्यक्तीकडे लक्ष दिलं जातं. त्यामुळे लक्ष' विचलित होऊ शकतं.

अशा लक्ष विचलित करणाऱ्या घटना न घडता जेव्हा दिवास्वप्नं पाहिली जातात तेव्हा मेंदू default mode network मध्ये सक्रिय असतो.

या नेटवर्कमुळे भूतकाळातील आठवणी आणि इतरांच्या भावना समजून घेणं या क्रिया पार पाडायला मदत होते. मन जखडून ठेवलं नाही तर त्याचा फायदा स्वतःला जाणून घेण्यासाठी तर होतोच पण समोरच्यालाही समजून घेण्यासाठी मदत होते.

यामध्ये विरोधाभास आहे खरा, पण एककल्ली असण्याचा फायदा पुन्हा लोकांमध्ये मिसळण्याची वेळ आली की होतो. विचारांचा केंद्रबिंदू तेवढ्यापुरता हरवल्यासारखा वाटला तरी त्याचा दीर्घकालीन फायदा होतो.

एककल्ली असणं फायद्याचं आहे असं मानणाऱ्या सुझन केन. 'क्वाएट - द पॉवर ऑफ इन्ट्रॉव्हर्टस् इन द वल्ड दॅट कान्ट स्टॉप टॉकींग' - या पुस्तकाच्या लेखिका आणि 'क्वाएट रेव्होल्युशन'च्या संस्थापिका. ही संस्था शांत आणि अंतर्मुख व्यक्तींसाठी कामाची जागा सुसह्य व्हावी यासाठी काम करते.

"हल्ली आपल्याला वाटतं सर्जनशीलतेसाठी फार लोकाभिमुख असण्याची आवश्यकता आहे. पण ते खरं नाही. कलात्मकतेसाठी, सर्जनशीलतेसाठी अंतर्मुख होण्याची गरज असते," सुझन म्हणतात.

"माणूस हा असा प्राणी आहे की तो एकदा समाजाचा भाग बनला की जे दिसतं ते टिपून घेत जातो. जर आपला मार्ग शोधायचा असेल, स्वओळख करून घ्यायची असेल, तर काही काळासाठी का होईना - एकला चलो रे - हा पंथ स्वीकारणं आवश्यक ठरतं."

एकटेपणा, प्रतिभा, व्यक्तिमत्व विकास

फोटो स्रोत, Photosbyphab

फोटो कॅप्शन, एकटेपणा आरोग्यासाठी प्रतिकूल असतो असं अनेकदा सांगितलं जातं.

उपयुक्त एकांत आणि धोकादायक एकाकीपणा यामधली रेषादेखील पुसट असते. कोणतीही गोष्ट अनुकूल आणि प्रतिकुलतेच्या सीमारेषेवरच उभी असते असं फेइस्ट म्हणतो.

एखाद्या व्यक्तीला लोकांची काडीची पर्वा नसेल, त्यानं सगळ्यांबरोबरचा संपर्क तोडून टाकला तर काहीतरी गडबड आहे हे नक्की. पण सर्जनशील एकांत आणि एकाकीपणा यात फरक आहे.

फेइस्ट म्हणतो, "खरं सांगायचं तर ज्या व्यक्ती कधीच एकट्या नसतात त्या सर्वाधित धोकादायक असतात असं मला वाटतं. अंतर्मुख होणं, स्वतःमध्ये डोकावून बघणं, ताणविरहीत राहणं जमण्यासाठी एकांत मिळणं आवश्यक आहे. अंतर्मुख व्यक्ती मोजक्याच लोकांशी मैत्री ठेवतात. पण ती उत्कट असते - अधिक आनंददायी असते."

दर्जा आणि संख्या यामधली ही रस्सीखेच आहे. मोजके नातेसंबंध जपणं हे सततच्या निरर्थक कलकलाटापेक्षा सुखकर ठरू शकतं.

एकटेपणा, प्रतिभा, व्यक्तिमत्व विकास

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एकटे असण्याचे फायदे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलेत.

त्यामुळे, जर तुमचं व्यक्तिमत्त्व काहीसं एककल्ली असेल, तर ते हट्टानं बदलण्यासाठी जीवाचा आटापिटा करण्याची गरज नाही. तुम्ही काही प्रमाणात लोकांच्या संपर्कात असलात, तुमचा एकांत तुमच्या मर्जीनं, आनंदानं तुम्ही स्वीकारला असेल, तुम्हाला जवळचे, मोजके मित्र-मैत्रिणी असतील, तुमच्या एकलेपणाच्या काळात तुमच्याकडून काही सर्जनशील काम होत असेल, तर लोकांमध्ये सातत्यानं मिसळलंच पाहिजे असा अट्टाहास करण्याचं काही कारण नाही.

तुमचं लोकांमध्ये मिसळणं, तुमच्या मर्जीनुसार ठेवायला तुम्ही मोकळे आहात. मानसशास्त्रज्ञांनीच तुम्हाला तशी मोकळीक दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)