#BBCShe : इथे उच्च शिक्षण असल्यावरच मिळतो चांगला नवरा!

विशाखापट्टणम
    • Author, दिव्या आर्य
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

ती तरुणी आपल्या बहिणीची गोष्ट सांगताना जरा गोंधळलेली दिसत होती. तिच्या बहिणीनं इंजिनिअरिंगमध्ये उत्तम गुण मिळवले होते. पण ते सगळं सोडून तिला लग्न करावं लागलं.

"ती आता दोन मुलांची आई आहे आणि तिच्या वैवाहिक आयुष्यात सुखी आहे. तिला बरंच काही करायचं होतं, पण तिला तशी संधी कधीच मिळाली नाही," ती पुढे सांगत होती.

आंध्र प्रदेशच्या किनारी भागात असलेल्या विशाखापट्टणममध्ये #BBCShe या प्रकल्पाच्या निमित्तानं आम्ही तिथल्या विद्यार्थिनींशी बोलत होतो. संधी न मिळाल्याचं दु:ख अनेकींच्या बोलण्यातून व्यक्त होत होतं.

नुसतीच पदवीची भेंडोळी

करिअर सोडून लग्न लावून देण्याची भीती त्यांना सतावत होती.

विशाखापट्टणम

आम्ही बोलत होतो त्या खोलीत जेनेटिक्स, फार्मकॉलॉजी, लॉ आणि एमबीए अशा अनेक तांत्रिक विषयांचं शिक्षण घेणाऱ्या मुली होत्या. त्यातील काही पदव्युत्तर शिक्षण घेत होत्या तर काही पीएचडी करत होत्या.

आकडेवारी काय सांगते?

आम्ही मागच्या आठवड्यात बिहारमध्ये याच प्रकल्पावर काम करत होतो. त्या तुलनेत हा लक्षणीय बदल होता. बिहारमध्ये अजुनही मुली प्राथमिक शिक्षणापासून वंचित आहेत.

मुलींनी उच्च शिक्षण घेण्याच्या बाबतीत आंध्र प्रदेश बराच पुढे आहे.

All India Survey of Higher Education AISHE 2015­-16 च्या सर्वेक्षणात आंध्र प्रदेश Gross enrolment ratio (GER)च्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तामिळनाडूचा या बाबतीत पहिला क्रमांक आहे.

Gross enrolment ratio (GER) चा अर्थ एकूण विद्यार्थ्यांपैकी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं गुणोत्तर असा होतो.

भारतात या गुणोत्तरासाठी 18-23 या वयोगटाचं सर्वेक्षण होतं.

विशाखापट्टणम

मुलींसाठी हा आकडा 23.5% इतका आहे.

भारतात इतर ठिकाणी या आकड्यांमध्ये प्रचंड तफावत आहे. बिहारमध्ये हे प्रमाण 12.6 टक्के आहे तर तामिळनाडूमध्ये हे प्रमाण 42.4% आहे.

GERच्या बाबतीत आंध्र प्रदेशचा पहिल्या पाच राज्यात समावेश होतो. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या मुलींचं प्रमाण तिथे 26.9% आहे.

उच्च शिक्षणात जास्त मुली म्हणजे नोकरीत स्त्रियांचं प्रमाण जास्त असा अर्थ होतो. पण आंध्र विद्यापीठातील मुलींचा अनुभव मात्र याबाबतीत वेगळा आहे.

एका 22 वर्षीय विद्यार्थिनीनं एक आश्चर्यकारक विधान केलं. ती म्हणाली, "आमचे आईवडील आम्हाला चांगली पदवी घेण्यासाठी विद्यापीठात शिकायला पाठवतात खरं, पण ते करिअर बनवण्यासाठी नाही तर चांगला नवरा मिळावा म्हणून."

या विधानाशी सगळ्याजणी सहमत झाल्या. टाळ्यांच्या कडकडाटात तिच्या विधानाला अनुमोदन मिळालं.

त्यांच्या कुटुंबातूनच लग्न करण्याचा त्यांच्यावर दबाव होता हे स्पष्ट दिसत होतं.

भारतात प्रत्यक्ष काम करणाऱ्या आणि कामाची इच्छा असणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण 24% आहे. जागतिक पातळीवर हे प्रमाण 39% आहे.

जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार या संदर्भात 185 देशांमध्ये भारताचा 172 वा क्रमांक आहे.

भारतात 1990 मध्ये हे प्रमाण 28 टक्के होतं. त्यात घट होऊन हे प्रमाण 2016 साली 24 टक्क्यावर आलं.

आंध्र प्रदेशचा या बाबतीत सगळ्याच मोठ्या राज्यात वरचा क्रमांक आहे. पण तिथेसुद्धा हे प्रमाण घटल्याचं आढळून आलं.

विशाखापट्टणम

2000मध्ये हे प्रमाण 46% होतं तर 2011मध्ये ते 36% होतं.

Centre for Economics and Social Studies या संस्थेनं सर्वेक्षणाअंती एक अहवाल सादर केला आहे. नोकरी करणाऱ्या विवाहित स्त्रियांच्या संख्येत शहरी आणि ग्रामीण भागात घट झाली आहे.

लग्न हाच उद्देश

आंध्र विद्यापीठात ग्रामीण भाग आणि शहरी भागातील स्त्रियांचं मिश्रण आहे.

ग्रामीण भागातील मुलींचं लग्न लवकर होतं कारण कमी वयात लग्न केलं तर हुंडा कमी द्यावा लागतो. त्याचवेळी उच्च शिक्षण हे हुंड्याच्या रकमेच्या वाटाघाटी करण्यासाठी कामाला येतं असं शहरी भागातील मुलींचं म्हणणं आहे.

त्यांच्यापैकी एकीनं सांगितलं, "तुमच्याकडे चांगली पदवी असेल तर तुम्हाला चांगली नोकरी मिळते. इथे तुमच्या चांगल्या पदवीमुळे कमी हुंडा द्यावा लागतो."

मी पाटणा ते विशाखापट्टणम असा मोठा प्रवास केला. हा प्रवास सांस्कृतिक, शारीरिक आणि विकासाच्या पातळीवरचा होताच. पण महिलांचे प्रश्न इथेही फक्त लग्न हुंड्याभोवतीच फिरत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)