मासिक पाळी सुरू असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना 'इथे' दिले जातात विशेष बॅज...

मासिक पाळी बॅज

फोटो स्रोत, WWD JAPAN

जपानमधल्या एका मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरने आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष धोरण राबवलं आहे. या कंपनीत मासिक पाळी सुरू असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना खास बॅज म्हणजे बिल्ले दिले जातात.

'त्या' दिवसांमध्ये इतर कर्मचाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांची अधिकची काळजी घ्यावी, हा त्यामागचा हेतू. मात्र, आता या धोरणावर पुनर्विचार करण्यात येणार आहे.

जपानमध्ये 'मिस पिरियड' नावाचं एक कार्टून कॅरेक्टर आहे. हेच कार्टून असलेला बॅज महिला कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. हा बॅज वापरणं किंवा न वापरणं पूर्णपणे ऐच्छिक आहे. या ऑक्टोबर महिन्यातच ही योजना सुरु करण्यात आली होती.

हा बॅज घालणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला इतर कर्मचाऱ्यांनी मदत करावी, त्यांना कामातून थोडा मोठा ब्रेक मिळावा, हा यामागचा उद्देश होता, असं या स्टोअरने सांगितलं.

मात्र या संकल्पनेवर टीका झाल्यावर, या डिपार्टमेंटल स्टोअरच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला सांगितलं, "महिला कर्मचाऱ्यांच्या मासिक पाळीविषयी ग्राहकांना कळावं, हा यामागचा हेतू मुळीच नव्हता."

बॅच सुरू करण्याचा उद्देश

जपानमधल्या दायमारु या डिपार्टमेंटल स्टोअरच्या ओसाका उमेडा भागात असलेल्या शाखेतल्या जवळपास 500 महिला कर्मचाऱ्यांसाठी ऑक्टोबर महिन्यात ही योजना सुरु करण्यात आली होती.

स्वतः कर्मचाऱ्यांनी केलेल्या सूचनांवरुनच बॅज पद्धत सुरू करण्यात आली आणि ती पूर्णपणे ऐच्छिक आहे. स्टोअरमध्ये कपड्यांचं नवीन सेक्शन सुरू करण्यात आलं. त्याचवेळी हे बॅजही सादर करण्यात आले.

या बॅजच्या एका बाजूला 22 ऑक्टोबरपासून 'खास स्त्रियांसाठी' नवं सेक्शन उघडत असल्याचं लिहिलं होतं. तर दुसऱ्या बाजूला 'मिस पिरियड'चं चित्र होतं.

सांकेतिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

मासिक पाळीची माहिती जाहीर करण्यामागे 'कामाच्या ठिकाणचं वातावरण सुधारावं' ही मूळ कल्पना होती, असं दायमारुच्या प्रवक्त्या योको हिगुची यांनी बीबीसीला सांगितलं.

कर्मचारी आणि ग्राहकांचा प्रतिसाद

दायमारुने बॅज योजनेबद्दल 21 नोव्हेंबर रोजी प्रसारमाध्यमांना सांगितलं. त्यावेळी काहींनी त्याचा वेगळा अर्थ काढला. एखाद्या महिला कर्मचाऱ्याची मासिक पाळी सुरू आहे, ही माहिती ग्राहक आणि सहकारी यांना कळावी, असा यामागचा हेतू असल्याचं त्यांना वाटलं.

मात्र, यानंतर लोकांकडून अनेक तक्रारी येऊ लागल्या आणि ही महिलांची छळवणूक असल्याचा आरोपही काहींनी केल्याची माहिती दायमारुच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर स्थानिक मीडियाला दिली.

मासिक पाळी

फोटो स्रोत, Getty Images

दायमारुच्या प्रवक्त्या हिगुची यांनी बीबीसीला सांगितलं, की काही महिला कर्मचाऱ्यांना यात काही अर्थ नसल्याचं वाटलं. तर काही महिला कर्मचाऱ्यांनी बॅच वापरणं टाळलं.

"मात्र, इतर कर्मचारी सकारात्मक होत्या. एखाद्या महिला कर्मचाऱ्याने बॅज लावला असेल तर तुम्ही तिच्या हातातलं ओझं उचलून तिला मदत करू शकता किंवा तिला थोडा जास्त वेळ ब्रेक दिला जाऊ शकतो. सगळेच एकमेकांना अशाप्रकारे मदत करू शकतील."

ग्राहकांनीही फोन करून या योजनेला पाठिंबा दिल्याचं त्या म्हणतात.

पुढे काय घडलं?

या धोरणाबद्दल तक्रारी आल्यानंतर ते रद्द करण्याचा दायमारूचा विचार नसला तरी ते या धोरणावर पुनर्विचार करणार आहेत.

महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीदरम्यान कामाच्या ठिकाणी सुसह्य वातावरण मिळावं, यासाठी हेच धोरण ग्राहकांना 'ती' माहिती कळू न देता वेगळ्या पद्धतीने राबवण्याचा विचार असल्याचं कंपनीच्या प्रवक्त्या हिगुची म्हणतात.

Presentational grey line

जपानमध्ये मासिक पाळीकडे बघण्याचा बदलता दृष्टिकोन

यूको काटो, बीबीसी न्यूज, टोकियो

जगातील इतर अनेक देशांप्रमाणेच जपानमध्येसुद्धा स्त्रिया मासिक पाळीविषयी फारसं बोलत नाही आणि पुरुषांशी तर नाहीच नाही. हा विषय टॅबूच मानला जातो.

मात्र, ही परिस्थिती आता मोठ्या प्रमाणावर बदलू लागली आहे.

जपानची राष्ट्रीय दूरचित्रवाणी असलेल्या NHK या चॅनलवर सकाळी प्रसारित होणारा 'असायची' हा कार्यक्रम फार लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात नुकतंच मासिक पाळीविषयक सदर सादर झालं. एक स्त्री आणि एक पुरुष अशा दोन निवेदकांनी तो कार्यक्रम सादर केला. मासिक पाळीविषयी तुमच्या कुटुंबीयांशी आणि मित्रमंडळींशी मोकळेपणाने कसं बोलता येईल, याविषयी तो कार्यक्रम होता.

मासिक पाळी

फोटो स्रोत, Getty Images

जपानमध्ये जेव्हा कन्झम्पशन कर 8 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आला तेव्हा त्यात मासिक पाळीशी संबंधित उत्पादनांचाही समावेश होता. यावर महिलांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला. तेव्हा समाज माध्यमांवर या विषयावर बरीच चर्चा झाली.

सोशल मीडियामुळे या विषयाला बरीच वाचा फुटली तर दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे मदत शिबिरांमध्ये राहायला गेलेल्या स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी झालेल्या त्रासांमुळे संपूर्ण जपानमधल्या स्त्रिया याविषयी अधिक खुलेपणाने बोलू लागल्या.

या शिबिरांमध्ये राहणाऱ्या स्त्रियांना रक्तस्राव रोखून ठेवा असं सांगितलं गेलं किंवा टॅम्पॉन (मासिक पाळीदरम्यान वापरला जाणारं एकप्रकारचं पॅड) मागणं किती लाजिरवाणी बाब आहे, असंही म्हटलं गेलं. अशा अनेक कथा सोशल मीडियावरून सांगितल्या जात होत्या.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)