सापाची कात हातात घेतल्यास विषबाधा होते का? जाणून घ्या संपूर्ण वैज्ञानिक माहिती

- Author, लक्कोजू श्रीनिवास
- Role, बीबीसी न्यूज
झाडा-झुडपात, लहान लहान छिद्रं, खडकांच्या फटींमध्ये, घराच्या भिंतींवरील कोपऱ्यांत आपल्याला अनेकदा सापांची कात दिसते. ही कात पाहिल्यावर आपण घाबरुन जातो.
ती कात हातात पकडली तर तुम्हाला विषबाधा होईल, असं काही लोक सांगतात. कात काढताना आपण सापाला पाहिलं तर साप आपला सूड घेईल, असंही काही जण म्हणतात.
पण खरंच यात किती सत्यता आहे? जगातील सर्व प्रकारचे साप कात टाकतात का? किती दिवसांनी साप कात टाकतो? साप कात टाकणं विसरतो का? आणि मुळात साप कात का टाकतो? हे तुम्हाला माहिती आहे का, चला जाणून घेऊयात.
या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आंध्र विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका सी. मंजुलता आणि ईस्टर्न घाट वाइल्ड लाइफ सोसायटीमध्ये संवर्धन जीवशास्त्रज्ञ म्हणून काम करणारे मूर्ती कंठीमहंती यांच्याशी 'बीबीसी'ने संवाद साधला.


कात टाकणं नैसर्गिक आहे का?
त्वचा (सापाच्या शरीरावरचा थर) सोडणं किंवा काढणं ही सापांमध्ये होणारी अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे, असं सी. मंजुलता यांनी सांगितलं.
याबाबत अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की, अशी प्रक्रिया माणसांमध्येही घडत असते. पण आपण रोज आंघोळ करत असल्यामुळे हे आपल्याला लक्षात येत नाही.
पण सापांसाठी, जुन्या थराखाली नवीन थर तयार झाल्यानंतर जुना थर सोडण्याची प्रक्रिया म्हणजेच कात टाकणं होय. साप एकाच वेळी त्याची संपूर्ण कात टाकतो.

शरीराचा आकार वाढल्यावर जसं आपण जुने कपडे सोडून, योग्य अशा आकाराचे नवीन कपडे घेतो. अगदी तशाच प्रकारे साप देखील त्यांच्या त्वचेवरील थर घट्ट होऊन त्याखाली नवीन थर तयार झाल्यावर जुने थर सोडतात. त्यालाच कात टाकणं म्हणतात.
साप त्याच्या त्वचेचा बाह्य थर काढण्यासाठी त्याचे डोके एखाद्या खडबडीत ठिकाणी घासतो. त्याठिकाणी शरीराचा तो थर म्हजे कातिला एक भेग जाते किंवा रेषा तयार होते. त्या ठिकाणापासून साप जुन्या थराला सोडून बाहेर येतो. यालाच कात टाकणे म्हणतात.
3 हजारांहून अधिक प्रजाती
सापाचीही वाढ होत असते. अशावेळी सापाचं शरीर वाढत असताना त्याची त्वचा देखील नैसर्गिकरित्या ताणली जाते आणि घट्ट होऊ लागते. हीच प्रक्रिया मनुष्यामध्येही होत असते.
जेव्हा त्वचा घट्ट होते, तेव्हा साप त्याच्या बाह्य त्वचेला किंवा वरच्या थराला सोडतो. म्हणजेच आपण त्याला कात टाकणं असं म्हणतो.
साप त्याची कात एकाच वेळी पूर्णपणे सोडतो, त्यामुळं ती कात अगदी एखाद्या खऱ्याखुऱ्या सापासारखीच दिसते.

फोटो स्रोत, यूजीसी
जगात कात टाकणाऱ्या सापांच्या 3000 हून अधिक प्रजाती आहेत. कात न टाकणारे साप नाहीत, असं प्रा. मंजुलता यांनी सांगितलं.
कात टाकणं म्हणजे सूक्ष्मजीव आणि घट्ट झालेल्या त्वचेचा थर काढून टाकणं. साप एका विशिष्ट कालावधीसाठी एकाच वेळी संपूर्ण कात टाकतो.
जुन्या त्वचेवरील सूक्ष्मजीवांपासून बचाव करण्यासाठी सापांना कात सोडण्याची प्रक्रिया फार उपयोगी ठरते, असंही त्यांनी सांगितलं.
सापाची दृष्टी अंधुक होते
'कात टाकणं म्हणजे त्या सापाच्या वरच्या थराखाली नवीन थर तयार होण्यासारखंच समजायला हवं,' असे मूर्ती कंठीमहंती यांनी सांगितलं.
साप कात टाकतानाच्या स्थितीचं वर्णन करताना कंठीमहंती म्हणाले, "जेव्हा सापाला त्याच्या त्वचेमधील नवीन थर तयार झाल्याचं कळतं, तेव्हा तो लगेचच जुना थर सोडण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी त्याची डोळ्यांची स्थिती फारशी स्पष्ट नसते म्हणजे त्याला त्यावेळी नीट दिसत नसतं."
कारण, त्याच्या डोळ्यांवरही एक थर तयार होत असतो. त्यामुळे डोळे निळसर होऊन जातात. अशा स्थितीत साप लगेच कात टाकण्यासाठी तयार होतात.
कात टाकताना साप अस्वस्थ असतो. जेव्हा तो कात टाकतो तेव्हा तो लगेच सक्रिय होतो. तो एकदम ताजातवाना होतो.
कारण कात टाकताना अस्वस्थेमुळं त्यानं काहीही खाल्लेलं नसतं. त्यामुळे कात टाकण्याच्या प्रक्रियेनंतर तो भूक भागवण्यासाठी उत्साहाने फिरतो, असंही ते म्हणाले.

कात टाकताना साप तोंडातून विष फेकतो, हल्ला करतो, असा समज काही लोकांमध्ये आहे, यावर कंठीमहंती यांनी लोकांच्या भ्रामक कल्पनांवरही भाष्य केलं आहे.
"शरीरावर कात असताना साप अस्वस्थ असतो. त्यामुळे कोणावरही हल्ला न करता तो अंधारात असलेल्या ठिकाणी राहतो. त् वेळी त्याला त्रास देणारी हालचाल जाणवली तर तो खूप अस्वस्थ होतो आणि हल्ला करतो.
त्याचप्रमाणे, कात सोडताना जर डोळ्याजवळील कात नीट सोडली नसेल, तर तो क्षण त्याच्यासाठी आणखी जास्त त्रासदायक ठरतो."
"त्यामुळे कात टाकताना त्याजवळ काही हालचाल जाणवली तरच तो हल्ला करण्याचा प्रयत्न करतो," असं मुर्ती कंठीमहंती म्हणाले.
साप कितीवेळा कात टाकतो?
"जगातील सापाच्या सर्व प्रजाती कात टाकतात. जे लहान असतात, ते महिन्यात तीन-चार वेळा कात टाकतात," असं कंठीमहंती यांनी सांगितलं. "तर, मोठ्या वयाच्या सापांना वर्षातून एक किंवा दोन वेळा कात टाकावी लागते," असंही ते म्हणाले.
"साप किती वेळा कात टाकतात याची निश्चित गणना नाही. सापानं खाल्लेलं अन्न, तो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाचं तापमान, आर्द्रता यावरही ते अवलंबून असतं. तसेच, सापाची प्रजाती हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे," असं कंठीमहंती म्हणाले.
"डोळ्यांवरील पृष्ठभागापासून शेपटीच्या टोकापर्यंत संपूर्ण कात एकाच वेळी सोडणारी साप ही एकमेव प्रजाती आहे."
सापाचं आरोग्यही बिघडतं
कंठमहंती म्हणाले की, ''शरीराच्या वरच्या पृष्ठभागामुळे जेव्हा अस्वस्थता निर्माण होऊ लागते, तेव्हा साप ते सहन करु शकत नाही.
सेन्सरसारखी यंत्रणा सापाला कात टाकण्यासाठी संकेत देते. त्यामुळे साप त्याच्या वरच्या पृष्ठभागाला काढण्याची तयारी करतो.''

"कात टाकणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जर ही प्रक्रिया होत नसेल तर सापाचं आरोग्य बिघडलं आहे असं मानलं पाहिजे.
त्यावेळी तो सक्रियपणे वावरत नाही. तो त्वचा रोगांसाठी संवेदनशील होतो. अन्न योग्य प्रमाणात घेत नाहीत. अशा प्रकारे एक समस्या दुसऱ्या समस्येचं ओझं घेऊन त्यात सापाचा मृत्यू होऊ शकतो."
त्या वेळी आपण त्याला काही मदत करण्याचा प्रयत्न केला तरी, ते पूर्णपणे अस्वस्थ असतात. त्यांच्याजवळ गेलेल्यांवर ते हल्ला करण्याची शक्यता जास्त असते, असं कंठमहंतींनी 'बीबीसी'ला सांगितलं.
स्पर्श केल्यास काय होईल?
सापानं सोडलेली कात विषासमान असते, असा खोटा प्रचार केला जातो. असं प्रा. मंजुलता यांनी स्पष्ट केलं.
"कातीला स्पर्श केल्यानं काहीही होत नाही. कात हा एक निर्जीव घटक आहे. त्यावर सापाचं विष नसतं. त्यामुळे कातीबाबतच्या अशा अफवांना रोखलं पाहिजे," असे मंजुलता यांनी म्हटलं.
"परंतु, कात टाकलेल्या भागात साप असू शकतो, त्यामुळे सावध राहण्याचा सल्ला देण्यात येतो."

फोटो स्रोत, यूजीसी
"कात टाकलेलं ठिकाण हे त्या सापाच्या निवासस्थानासारखं असतं. म्हणूनच कात टाकल्यावरही तो तिथंच असू शकतो. आपल्याला कात दिसल्यास, तिथं धूर करुन सापाला दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकता," असंही प्रा. मंजुलता म्हणाल्या .
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











