Pregnancy: गरोदरपणात मेंदूत होतात 'हे' बदल

फोटो स्रोत, Daniela Cossio
- Author, फिलिपा रॉक्सबी
- Role, आरोग्य रिपोर्टर, बीबीसी न्यूज
गरोदरपणाच्या काळात विसराळूपणा वाढणं, गोंधळ होणं, अचानक ब्लँक होणं असं झाल्यास त्याला प्रेग्नन्सी ब्रेन किंवा बेबी ब्रेन म्हटलं जातं. पण ही फक्त एक संकल्पना नसून प्रेग्नन्सीच्या काळात मेंदूत खरंच बदल होतात, हे आता अभ्यासातून समोर आलंय.
गर्भार राहण्यापूर्वी, गरोदरपणाच्या 9 महिन्यांच्या काळात आणि त्यानंतर मेंदूमध्ये काय बदल होतात याचा पहिल्यांदाच सखोल अभ्यास करण्यात आला आणि त्यामध्ये हे बदल दिसून आले.
गरोदरपणाच्या काळात मेंदूत कोणते बदल होतात?
या अभ्यासासाठी 38 वर्षांच्या एका निरोगी महिलेच्या मेंदूचे 26 MRI स्कॅन्स करण्यात आले. भावना आणि लोकांसोबत वेळ घालवण्याबद्दलच्या - Socialising बद्दलच्या भावनांबद्दलच्या प्रक्रिया - Processing करणाऱ्या मेंदूच्या भागामध्ये लक्षात येण्याजोगे बदल झाल्याचं संशोधकांना आढळलं. बाळाला जन्म दिल्याच्या दोन वर्षांनंतरही हे बदल टिकून होते.
या बदलांचे परिणाम किती व्यापक असतात, हे ठरवण्यासाठी आता आणखी अनेक महिलांवर अशा पद्धतीचं संशोधन केलं जाणार आहे.
Postnatal Depression म्हणजे बाळाच्या जन्मानंतर येणारं डिप्रेशन आणि Pre-eclampsia म्हणजे गर्भारपणातली एक डिसॉर्डर ज्यामध्ये रक्तदाब वाढतो, किडनी किंवा यकृताचं नुकसान होऊ शकतं, अशांची लक्षणं अशा प्रकारच्या स्कॅन्सद्वारे दिसतात का, याविषयीचा अभ्यासही करण्यात येणार आहे.
गर्भारपणात मेंदूत होणाऱ्या या बदलांविषयीचं संशोधन करणाऱ्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सँटा बार्बराच्या न्यूरोसायंटिस्ट एमिली जेकब्स सांगतात, "प्रेग्नन्सीच्या पूर्ण कालावधीमध्ये पहिल्यांदाच असं मानवी मेंदूचं तपशीलवार मॅपिंग करण्यात आलंय. बदल घडण्याच्या प्रक्रियांदरम्यानचा मेंदू आम्ही असा यापूर्वी कधीही पाहिलेला नाही. आता आपण मेंदूमध्ये होणाऱ्या बदलांचं रियल टाईम, म्हणजे लगेचच त्या वेळी निरीक्षण करणं आता शक्य झालंय."
गरोदरपणात बाईच्या शरीरात मोठ्या प्रमाणात होणारे बदल सर्वश्रुत आहेत. पण मेंदूमध्ये नेमके कसे बदल होतात आणि का होतात याबद्दल फारशी माहिती नाही.
अनेक महिला प्रेग्नन्सीदरम्यानचा विसराळूपणा, वेंधळेपणा किंवा अचानक काहीही न सुचणं (Brain Fog) याचं वर्णन करताना. याला प्रेग्नन्सी ब्रेन (Pregnancy Brain) किंवा बेबी ब्रेन (Baby Brain) असं म्हटलं जातं.
यापूर्वी महिलांच्या मेंदूंचे गर्भारपणापूर्वी आणि बाळंतपणानंतर स्कॅन करून अभ्यास करण्यात आले होते. पण गरोदरपणाच्या काळात मात्र अशाप्रकारचे स्कॅन करण्यात आले नव्हते.
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या सेंटर फॉर न्यूरोबायोलॉजी ऑफ लर्निंग अँड मेमरीच्या संशोधक एलिझाबेथ च्रास्टिल यांच्या मेंदूचा अभ्यास या संशोधनासाठी करण्यात आला. अशा प्रकारचं संशोधन करण्याबद्दलची चर्चा सुरू असताना त्या IVF (in-vitro fertilisation)द्वारे प्रेग्नन्सी प्लान करत होत्या. आता त्यांना 4 वर्षांचा मुलगा आहे.
गरोदर असताना स्वतःच्याच मेंदूचा सखोल अभ्यास करता येणं, त्याची गरोदर नसणाऱ्या महिलांच्या मेंदूच्या स्कॅन्ससोबत तुलनात्मक पडताळणी करता येणं अनोखं असल्याचं डॉ. च्रास्टिल सांगतात.
त्या म्हणतात, "स्वतःचाच मेंदू असा बदलताना पहायला जरा विचित्र वाटतं, पण मला हेही माहिती आहे की अशा प्रकारच्या संशोधनाची सुरुवात एका न्यूरोसायंटिस्टनेच करणं गरजेचं होतं."

फोटो स्रोत, Elizabeth Chrastil
मेंदूमध्ये 40% ग्रे मॅटर असतं. तर 60% व्हाईट मॅटर असतं. हे दोन्ही मेंदू आणि मज्जारज्जूचे (Spinal Cord) महत्त्वाचे भाग असतात.
मेंदूमध्ये असणारं Grey Matter म्हणजे हालचाली, भावना आणि स्मरणशक्ती यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या ऊती (Tissue). विचार करणं - Reasoning म्हणजे तर्क - विश्लेषण, शिकणं - बोलणं, समजणं या सगळ्या गोष्टींसाठी हा भाग जबाबदार असतो.
गरोदरपणाच्या काळामध्ये डॉ. च्रास्टिल यांच्या मेंदूतल्या या Grey Matterमध्ये सुमारे 4 टक्क्यांची घट झाली. पण बाळंतपणानंतर यातली थोडीच घट भरून आली.

फोटो स्रोत, Laura Pritschet
या ऊतींसोबत मेंदूमध्ये असतं White Matter. यामध्ये Bundles of Axons म्हणजे मज्जापेशींपासून सुरू होणारे तंतू असतात.
मज्जासंस्थेतून संदेश पाठवणं, वाहणं आणि त्यावर प्रक्रिया (Process) करणं हे या White Matter चं काम असतं. ग्रे मॅटर असणाऱ्या मेंदूच्या वेगवेगळ्या भागांत संपर्क प्रस्थापित करणं, मेंदूतलं ग्रे मॅटर आणि तुमचं इतर शरीर यांच्यामध्ये कम्युनिकेशन - संपर्क तयार करणं हे व्हाईट मॅटरचं काम असतं.
डॉ. च्रास्टिल यांच्या प्रेग्नन्सीच्या पहिल्या 6 महिन्यांच्या काळात त्यांच्या मेंदूतील विविध भागांमधील White Matter वाढलं. बाळाच्या जन्मानंतर लगेचच याची पातळी पूर्ववत झाली.
या बदलांचं Puberty म्हणजे मुलं वयात येताना होणाऱ्या बदलांशी साधर्म्य असल्याचं संशोधक म्हणतात.
उंदरांवरही काही संशोधन करण्यात आलं. पिल्लं होण्यापूर्वी मादी उंदरांमध्ये वास घेण्याची क्षमता वाढल्याचं यामध्ये लक्षात आलं. शिवाय त्या स्वतःची काळजी घेत होत्या, Nesting म्हणजे बाळासाठी सुरक्षित जागा तयार करत होत्या.
पण माणसांबाबत या प्रक्रिया अतिशय क्लिष्ट असल्याचं डॉ. च्रास्टिल सांगतात.
त्यांच्या गरोदरपणाच्यादरम्यान त्यांना स्वतःला 'मॉमी ब्रेन'चा फारसा अनुभव आला नसला तरी ग्नन्सीच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये अधिक थकवा आल्याचं, अधिक भावनिक झाल्याचं त्या सांगतात.
गर्भारपणाच्या या 9 महिन्यांच्या काळात मेंदूमध्ये होणारे बदल अधिक तपशीलात समजून घेण्यासाठी आता 10 ते 20 महिलांच्या मेंदूंचे तपशीलवार स्कॅन्स करण्यात येणार आहेत आणि सोबतच त्यांच्याबद्दलची वेगवेगळ्या महिन्यांतली आकडेवारी, त्यांचे अनुभवही गोळा करण्यात येणार आहेत.
डॉ. च्रास्टिल म्हणतात, " मेंदूमध्ये होणाऱ्या बदलांवरून पोस्टपार्टम डिप्रेशन किंवा प्री-इक्लॅम्पसियाचं निदान होऊ शकतं का, किंवा यांचा परिणाम मेंदूवर कसा होतो, हे आपल्याला यातून समजू शकतं."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











