गरोदरपणात बाईच्या शरीरात काय काय बदल होतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अॅडम टेलर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गरोदरपणात बाईचं शरीर अनेक बदलांमधून जात असतं. काही बदल सामान्य असतात, जसं की वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे डोहाळे लागणं, चेहऱ्यावर लाली येणं किंवा सकाळी सकाळी उलट्या होणं.
या बदलांबद्दल चर्चाही होते, पण काही बदल असे असतात जे वरवर दिसत नाहीत आणि त्याची चर्चाही फारशी होत नाही.
काही दिवसांपूर्वी काही महिलांनी सोशल मीडियावर आपल्या नाकाचे प्रेग्नन्सी आधीचे आणि नंतरचे फोटो शेअर केले.
या ट्रेंडला आता 'प्रेग्नन्सी नोस' असं म्हणतात. यात दिसतंय की गरोदरपणात महिलांच्या शरीरावर सूज येते आणि शरीराच्या अवयवांचा आकारही बदलतो.
प्रत्येक महिलेच्या शरीरातील हार्मोन्स वेगवेगळे असतात आणि त्यामुळे प्रत्येकीचं शरीर वेगवेगळ्या बदलांमधून जातं. असं का होतं हे पूर्णपणे स्पष्ट नाहीये.
अर्थात यात काळजी करण्यासारखं काही नाही, बाळ झाल्यानंतर साधारण सहा आठवड्यांनी बाईचं शरीर पूर्ववत होतं.
गरोदरपणात इस्ट्रोजन हार्मोनची पातळी वाढते. वाढलेल्या इस्ट्रोजनमुळे शरीरातल्या रक्तवाहिन्या शिथिल होतात. त्यामुळे नाकातला रक्तप्रवाह वाढतो, त्यामुळे नाकाचा आकार वाढतो आणि त्याचा आकारही बदलतो. नाक सुजल्यासारखं वाटतं.
या हार्मोनल बदलांमुळे महिलेचं नाक सतत वाहात राहातं, नाकातून कधी कधी रक्तही येतं. दर पाचपैकी एका महिलेला हा त्रास होतो.
गरोदरपणात महिलेच्या शरीरात अजून काय बदल होतात ते पाहू.
हृदयाचा आकार बदलतो

फोटो स्रोत, Getty Images
गरोदरपणात महिलेच्या हृदयाचा आकारही बदलतो. गर्भातल्या भ्रुणाची वाढ नीट होण्यासाठी हे आवश्यक असतं. भ्रुणाची वाढ नीट व्हावी म्हणून पोटातले अवयव फुगतात, परिणामी हृदय वरच्या बाजूकडे दाबलं जातं.
यामुळे हृदयाच्या आसपास जाड स्नायूंची भिंत तयार होते आणि हृदयाचा आकारही बदलतो. गरोदरपणात हृदयाला जास्त काम करावं लागतं. या काळात हृदय इतर वेळेपेक्षा मिनिटाला आठ ठोके जास्त देतं. कारण भ्रुणापर्यंत रक्त पोहचवायचं असतं.
काही महिलांच्या शरीरातलं रक्ताभिसरण दुप्पट होतं कारण पोटातल्या बाळाला पुरेसा ऑक्सिजन पुरवायचा असतो
त्वचेचा रंग बदलतो?
गरोदरपणात महिलेच्या चेहऱ्यावर तेज येतं असं अनेकदा म्हटलं जातं. काही महिलांचा रंग उजळतो.
पण कधी कधी गरोदर महिलेच्या चेहऱ्याचा रंग काळवंडतोही. मेलास्मा नावाच्या त्वचेशी संबधित आजारामुळे असं होतं.
यात महिलांच्या डोळ्याखाली काळं वाढतं, नाक, हनुवटी, तोंडाजवळचा भाग काळे पडतात.
ही अतिशय सामान्य समस्या आहे. जवळपास 75 टक्के गरोदर महिलांना याचा त्रास होतो. बाळाचा जन्म झाल्यावर किंवा बाळाला अंगावरचं दूध पाजणं बंद केल्यानंतर त्वचा पूर्ववत होते.

फोटो स्रोत, Getty Images
मेलास्माचं नक्की कारण माहीत नाही पण इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन हार्मोनमुळे असं होण्याची शक्यता आहे.
महिलेच्या निपल्सच्या आजूबाजूची त्वचाही काळी होते. याचं कारण माहीत नसलं तरी यामुळे नवजात अर्भकाला दूध पिण्यासाठी निपल पटकन कुठे आहे ते पटकन कळतं.
नवजात अर्भकांना रंगात फरक करता येत नाही, तसंच त्यांना आपल्या चेहऱ्यापासून 30 सेंटिमीटरच्या पलिकडे असलेली गोष्ट दिसत नाही. त्यामुळे शरीराच्या इतर भागापेक्षा काळा भाग त्यांना पटकन ओळखता येतो. पण अनेक महिलांचे निपल्स गरोदरपणानंतरही जरासे काळवंडलेलेच राहातात.
केसांची वाढ तसंच केस गळणं
अनेक महिलांचे केस गरोदरपणात वाढतात आणि चमकदार होतात. याच कारण म्हणजे शरीरात इस्ट्रोजनचं प्रमाण वाढलेलं असतं. त्यामुळे केसांची वाढ होते. पण याचा एक दुष्परिणाम म्हणजे फक्त डोक्यावरच्या नाही, शरीरावरच्या सगळ्याच केसांची वाढ होते.
अनावश्यक केसही वाढतात. पाठीवर, पोटावर, चेहऱ्यावर अनेक ठिकाणी केस वाढलेले दिसून येतात. पण बाळंतपणानंतर हे केस गळतात.

फोटो स्रोत, Getty Images
पण मग डोक्यावरचे केसही गळतात. बाळंतपणानंतर साधारण चार महिन्यांनी महिलेच्या डोक्यावरचे आणि अंगावरचे केस गळायला सुरुवात होते.
काही काळाने डोक्यावरचे केस नॉर्मलला येतात, पण याला वेळ लागू शकतो.
तोंडाचं आरोग्य
गरोदरपणात तोंडाचं आरोग्यही बिघडतं. वाढलेल्या इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनमुळे तोंडात इन्फेक्शन, रक्त येणे आणि दाढांना इजा होणे अशा गोष्टी होतात. 70 टक्के गरोदर महिलांच्या दाढा या काळात सुजतात.
जर गरोदरपणात महिलेला सतत उलट्या होत असतील तर त्यामुळे दातांचं आरोग्य धोक्यात येतं. कारण उलटीवाटे बाहेर पडणाऱ्या पोटातल्या अॅसिडमुळे दातांवरच आवरण विरघळू शकतं आणि यामुळे दात किडू शकतात.
या काळात दात कधी कधी हलतात पण. याचं कारण रिलॅक्सिन नावाचा हार्मोन. हा हार्मोन शरीरातले सगळे स्नायू आणि पेशींना शिशिल करतो म्हणते बाळंतपण सुकर होईल.
कमरेच्या आणि योनी मार्गातले स्नायू शिथिल होण आवश्यक असलं तरी शरीराच्या इतर भागातले स्नायू शिथिल झाल्याने त्रास होतो.
गरोदरपणात महिलांचे दात पडणं क्वचित घडतं.
पण सहसा हे अल्प उत्पन्न गटातल्या आणि वारंवार गरोदरपणातून जाणाऱ्या महिलांच्या बाबतीत घडतं. गरोदरपणात दात पडणाऱ्या महिलांच्या तोंडाचं आरोग्य आधीपासूनच चांगलं नसतं, म्हणून असं होतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








