बुलिमियाः जेवल्यावर किंवा काहीही खाल्ल्यावर उलटी काढण्याचा आजार काय असतो?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांमध्ये बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि उच्च कॅलरीचा आहार यामुळे एकूणच गरजेपेक्षा अतिरिक्त वजनामुळे त्रास होत असणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे.
लहान मुले, पौगंडावस्थेतील मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांमध्येही लठ्ठपणा, गरजेपेक्षा जास्त वजन असलेलं दिसून येतं.
आपल्या खाण्याच्या पद्धती, आपण खाण्यासंदर्भात करत असलेल्या विचारांमुळे काही लोकांमध्ये विशिष्ट प्रकारची मनोवस्था (Mental condition) आणि आजार( diesease) तयार होतात. अशा आजारासारख्या सवयींना इटिंग डिसॉर्डर्स (Eating disorders) असं म्हटलं जातं.
यामध्ये बिंज इटिंग डिसॉर्डर, अॅनोरिक्सिया नर्वोसा, अव्हॉयडंट रिस्ट्रिक्टिव्ह फूड इंटेक डिसॉर्डर, नाईट इटिंग डिसॉर्डर असे प्रकार दिसून येतात.
त्यापैकीच बुलिमिया (bulimia) हा एक आजार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
खाण्याच्या आजाराकडे लक्ष न दिल्यास अनेक दुष्परिणाम वाढू शकतात. नवे शारीरिक मानसिक त्रास सुरू होऊ शकतात. ती व्यक्ती लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी या आजाराला बळी पडू शकते.
तिची जीवनशैली बिघडते, कामाचे ठिकाण, समाजातील इतर अनेक गोष्टी-घटनांमध्ये वागताना परिणाम दिसून येतात. आपले पोट आणि मानसिक आरोग्य यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे.
बुलिमिया म्हणजे काय?
अत्यंत कमी वेळेत जास्त प्रमाणात खाद्यपदार्थ तडस लागेपर्यंत पोटात भरुन घेणं आणि असं वारंवार करणं याला सतत खाण्याचा आजार म्हणजेच बिंज इटिंग डिसॉर्डर म्हणतात.
तर असं करणाऱ्या लोकांपैकी काही लोक मनामध्ये अपराधी भावना आल्यामुळे हे अन्न लगेच पोटाबाहेर काढण्याचा प्रयत्न करतात.
यासाठी ते उलटी काढणे, पोट साफ करणारं विरेचक घेणं, अतिरेकी व्यायाम करणं किंवा हे सगळं एकत्र करण्याचा प्रयत्न करतात.
आपलं वजन वाढलंय किंवा वजन वाढेल ही मनामध्ये आलेली कल्पना त्यांना इतकी त्रासदायक वाटू लागते की त्यामुळे ते असा पर्याय शोधतात. साधारणतः 17 ते 18 वयाच्या मुलांमध्ये यांची सुरुवात झाल्याचे दिसून येते.
सर्व वयोगटात आढळणारा हा आजार असला तरी पौगंडावस्थेची शेवटची वर्षं आणि प्रौढावस्थेच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये तो होण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये महिलांचं प्रमाणही जास्त असतं.
बुलिमियाची लक्षणं
बुलिमियाची काही ठळक लक्षणं दिसून आली आहेत. युनायटेड किंग्डमच्या एनएचएस या आरोग्यसेवेने काही लक्षणं सांगितली आहेत. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे
- वजन वाढण्याची सतत वाटणारी भीती
- स्वतःच्या वजन आणि आकारावर नकारात्मक टीप्पणी करत राहाणं.
- मूड बदलत राहाणं- कधी चिंता तर कधी ताण येणं
- खाण्याबद्दल भरपूर विचार करत राहाणं
- अपराधी वाटणं, लाज वाटणं, लपवालपवी
- जेवणखाण असलेले कार्यक्रम टाळणं
- खाण्यावर नियंत्रण नाही असं वाटणं

फोटो स्रोत, Getty Images
काही शारीरिक लक्षणं
- सतत दमल्यासारखं लाटणं
- आजारी असल्यासारखं वाटणं
- घसा दुखणं पोट फुगणं
- पोटात दुखणं
- चेहरा सुजणं
- स्वतःला इजा करून घेणं
काही लोक खाद्यपदार्थांचा साठा करुन ठेवतात, काही लोक सतत वजन तपासून पाहातात, स्वतःच्या वजनाची, दिसण्याची इतरांशी तुलना करुन पाहातात. समाजापासून, लोकांपासून दूर राहाण्याचा प्रयत्न करतात.

फोटो स्रोत, Getty Images
मानसिक ताण, नैराश्याच्या अनेक टप्प्यांवर असलेले लोकही सतत खाण्याच्या आजाराला बळी पडतात. स्वतःबद्दलच्या अपेक्षा पूर्ण न करता येणं, कौशल्यं नसल्याची भावना किंवा एखादी गोष्ट पूर्ण करण्यात येत असलेल्या अडथळा यामुळेही आहाराच्या सवयींवर परिणाम होऊ शकतो.
ताण-तणाव आणि नैराश्यामुळे उच्च कॅलरींचा आहार कळत किंवा नकळत घेणं दिसून येतं. तुमच्या आहार पद्धती, खाणं, शरीराचा आकार, वजन यावर कोणी टिप्पणी करत असेल तसेच सतत बारीक होण्याचा विचार त्यातही समाजाकडून, कामाच्या ठिकाणी तशी अपेक्षा असेल तर या आजाराला लोक बळी पडू शकतात.
आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीला बुलिमिया आहे का हे ओळखण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देता येईल.
- एखादी व्यक्ती फार वेगानं जेवत-खात असेल.
- खाल्ल्याखाल्ल्या बाथरूमकडे जात असेल
- अतिरेकी व्यसन लागल्यासारखा व्यायाम करत असेल
तर त्या व्यक्तीला काही त्रास होत आहे का हे विचारता येईल.

फोटो स्रोत, Getty Images
बुलिमियाचा त्रास सुरू असलेल्या व्यक्तीचे वजन वाढ किंवा कमी झालेले दिसते. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याचं दिसून येतं. रक्तामधील साखरेची पातळी सतत वरखाली होत असते. एकाग्रतेवर परिणाम होतो तसेच मूडही सतत बदलत राहातो.
दमल्यासारखं वाटतं तसेच झोपेमध्ये अडथळे येतात. पोट फुगणे, बद्धकोष्ठ, पोट दुखणे, दातांच्या आरोग्यावर परिणाम झालेला दिसून येतो.
प्रत्येक व्यक्तीने आपल्या आहारामध्ये असा कोणताही टोकाचा बदल होऊ नये यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत याबद्दल एनएचएसने काही उपाय सुचवले आहेत.
यानुसार आपण काय खात आहोत याचं निरीक्षण करण्याची गरज आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यानिरीक्षणामुळे तुमच्या सवयींकडे तुमचे लक्ष जाईल. आपण दिवसभरात काय आणि किती खाणार आहोत याचा आधीच विचार केल्यास अतिखाणं, सतत खाणं तसेच उपाशी राहाणं या गोष्टी टळतील.
आपल्याला कोणती गोष्ट झाल्यावर एकदम खावसं वाटतं किंवा उलटी काढाविशी वाटते याचं निरीक्षण केल्यास मदत होऊ शकते.
आपल्या भावनांमुळे होणारे बदल ओळखून त्यासाठी मदत घेता येईल.
कोणत्याही आजाराचं निदान हे डॉक्टरांनाच करू द्यावे.
स्वतःच आपली लक्षणं ठरवून कोणतेही उपचार घेऊ नयेत.इंटरनेटवरील माहिती आपण घ्यावी मात्र कोणत्याही आजाराचं निदान, औषधाची गरज, त्याचं प्रमाण हे निर्णय डॉक्टरांद्वारेच घ्यायचे असतात. परस्पर निर्णय घेऊन त्यानुसार वागणं अत्यंत धोकादायक असतं.
जर एखादी व्यक्ती फार मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थ अगदी कमी वेळात खात असेल, आपण किती खातोय हे इतरांपासून लपवत असेल, खाण्याचा विनाकारण साठा करुन ठेवत असेल तर त्यांना धोक्याची जाणीव करुन दिली पाहिजे.
बुलिमियाबद्दल तज्ज्ञ काय सांगतात?
मुंबईस्थित मनोविकारतज्ज्ञ डॉ. कीर्ती तांडेल बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, “बिंज इंटिंग करणाऱ्या व्यक्ती आपण खाल्लेले अन्न शरीराबाहेर काढण्यासाठी विविध मार्गांचा वापर करतात. यात उलटी काढणे, पोट साफ होण्याचं विरेचक घेणं असे प्रकार होतात. त्यातही उलटी काढणे हे जास्त दिसून येतं. बुलिमिया असलेली व्यक्ती खाऊन झाल्यावर उपवास करणं, अतिरेकी व्यायाम करणं असे प्रकारही करतात. या व्यायामातून त्यांना आनंद मिळत नाही. अपराधीपणाच्या भावनेतून असे प्रकार केले जातात.”
ते पुढे म्हणाले, “काही वेळा डिहायड्रेशन झालेले रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. तेव्हा त्यांच्या डिहायड्रेशनमध्ये बुलिमिया हे कारण असल्याचं दिसून येतं. त्यामुळे रुग्ण थेट बुलिमियासाठी उपचाराला आले नाहीत तरीही अशा डिहायड्रेशन, रक्तदाब कमी होणं अशा घटनांमधून समजतात. नैराश्य-चिंतारोगाच्या रुग्णांशी बोलल्यावर त्यांच्यापैकी काही लोक बुलिमियासारखे प्रकार करत असल्याचं दिसतं.”

फोटो स्रोत, Getty Images
वजन कमी करण्यासाठी अशाप्रकारच्या मार्गांचा वापर करणं घातक ठरू शकतं असं मत पुणेस्थित आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक सांगतात.
बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, “उलटी काढणे, विरेचक घेणे याने वजन कायमस्वरुपी कमी होत नाही. त्यासाठी रुग्णाशी बोलून योग्य आहार-व्यायाम याचं गणित ठरवूनच प्रयत्न करावे लागतात. अशा व्यक्तींना आहारातज्ञ लोकांचा सल्ला घेऊन त्याच्या सवयी-आहार यांचा विचार करुनच त्यांचं डाएट ठरवलं जातं. त्यानंतरच वजन कायमस्वरुपी आणि आरोग्यदायी पद्धतीने कमी होण्यासाठी मदत होते. आरोग्यदायी जीवनशैलीसाठी, वजन कमी करण्यासाठी शॉर्टकट नसतो.”

फोटो स्रोत, Getty Images
बुलिमियाच्या उपचारांमध्ये कॉग्नायटिव्ह बिहेवियरल थेरपी, फॅमिली थेरपी, इंटरपर्सन थेरपी अशा विविध उपचारांचा समावेश होतो. रुग्णाला चिंतारोग, ताण, नैराश्य यापैकी काही त्रास होत असेल तर त्यावर औषधे दिली जातात.
आपलं वागणं-खाणं-पिणं या आजारात मोडतंय का हे पाहण्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी. समुपदेशक, डॉक्टर्स, आहारतज्ज्ञांच्या मदतीने यावर नक्कीच मात करता येते.
प्रसिद्ध ब्रिटिश क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफने आपल्या इटिंग डिसॉर्डरचा अनुभव माध्यमांमध्ये सांगितला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना सुरुवातीच्या दिवसात वजन वाढल्यावर आपल्याला बुलिमिया झाल्याचं त्यानं सांगितलं होतं. “मी एक जाड क्रिकेटपटू म्हणून ओळखला जाऊ लागलो. ते अत्यंत भयंकर होतं आणि म्हणून मी बुलिमियाकडे वळलो असं तो म्हणाला होता.”
जेवल्यानंतर मला आजारी पडल्यासारखं वाटायचं. 2007 साली एका सामन्यानंतर अतिरिक्त मद्यपान करुन कॅरेबियन समुद्रात तो बुडाला होता.
या घटनेनंतर त्यानंतर त्याने बुलिमियासारख्या अनेक गोष्टींना थांबवलं असं तो सांगतो.
बुलिमियामुळे आपलं करियर लवकर संपलं असं तो सांगतो.
त्याने शेवटची कसोटी खेळली तेव्हा तो 31 वर्षांचा होता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








