'कमलनाथ माझा तिसरा मुलगा आहे', जेव्हा इंदिरा गांधी असं बोलल्या...

मध्य प्रदेश, काँग्रेस, कमलनाथ

फोटो स्रोत, AFP

    • Author, प्रदीप कुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कमलनाथ मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. काँग्रेसनं त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. कमलनाथ यांच्या नेतृत्वातच मध्य प्रदेशात काँग्रेसनं या निवडणुका लढवल्या होत्या.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

कमलनाथ यांच्या गेल्या 3 दशकांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.

line

गेली अनेक वर्षं अंतर्गत बंडाळ्यांमध्ये अडकलेल्या काँग्रेसला मध्य प्रदेशात सत्तेपर्यंत नेण्याची किमया कमलनाथ यांनी कशी साधली? याचा घेतलेला आढावा.

मंगळवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मध्य प्रदेशात सत्तेचा पट कोणाकडे हे स्पष्ट झालं नव्हतं. पारडं इकडून तिकडे सातत्याने झुकत होतं. भारतीय जनता पक्ष आपलं सरकार वाचवण्यात यशस्वी ठरू शकतं असे कयास देशभरातल्या न्यूज रुमम्समध्ये वर्तवण्यात येते होते.

शिवराज चौहान यांचे विश्वासू सहकारी आणि ज्येष्ठ भाजप नेत्याशी दूरध्वनीवरून बोलणं झालं. तेव्हा ते म्हणाले, "बंडखोरांमुळे थोडं नुकसान होतं आहे, मात्र आम्ही सरकार बनवू. संख्याबळ थोडं कमी असेल पण सरकार आमचंच असेल."

काँग्रेसच्या गोटात काय चाललं आहे हे समजून घेण्यासाठी कमलनाथ यांच्याशी घनिष्ठ ओळख असणाऱ्या ज्येष्ठ पत्रकाराशी बोलणं झालं. ते म्हणाले, "भाजपच्या नेत्यांना माहिती नाही की आता त्यांचा मुकाबला कमलनाथ यांच्याशी आहे. भाजपचं संख्याबळ बहुमतापेक्षा कमी असेल तर ते सरकार बनवू शकणार नाहीत."

राज्यपालांना ईमेल तसंच प्रत्यक्ष माणसाद्वारे सरकार बनवण्यासाठी दावा करण्यात आला (कमलनाथ यांनी सरकार स्थापनेच्या दाव्यासाठी फॅक्सचा पर्याय निवडला नाही. फॅक्समुळेच जम्मू काश्मीरमध्ये महबूबा मुफ्ती यांचं सरकार तयार होऊ शकलं नाही). दुसऱ्या दिवशी सकाळी राज्यपालांना 121 आमदारांच्या समर्थनासह सत्तास्थापनेचा दाव्याची कागदपत्रं सादर करण्यात आली.

या चतुर खेळीमागे 71 वर्षीय कमलनाथ यांचा अनुभव होता. गेले काही वर्षं काँग्रेसमध्ये कमलनाथ यांच्या करिष्म्याचा अभाव दिसत होता. हा करिष्मा त्यांनी मध्य प्रदेश रणसंग्रामात हुशारीने उपयोगात आणला.

राज्यपालांना देण्यात आलेल्या पत्रात हे स्पष्ट झालं की भाजपच्या 109 आमदार वगळता बाकी सगळे काँग्रेसच्या बाजूने आहेत. याआधी भाजप आमदारांची बैठक झाली. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आकडा गाठण्यासाठी काय करता येईल यासाठी खल रंगला. मात्र तो जादुई आकडा आपल्याला गाठता येणार नाही याची जाणीव भाजपला झाली.

सात महिन्यात कमलनाथांची कमाल

मध्य प्रदेशातलं राजकारण जवळून पाहणाऱ्या विश्लेषकांनी काँग्रेसचा हा विजय कमलनाथांमुळेच शक्य झाल्याचं सांगितलं. जेमतेम सात महिन्यांपूर्वी कमलनाथ यांनी मध्य प्रदेश काँग्रेसची धुरा हाती घेतली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला आणि हिंदुत्ववादी राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या मध्य प्रदेशात पंतप्रधन नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या रणनीतीसह लोकप्रिय धोरणांसाठी प्रसिद्ध मुख्यमंत्री शिवराज चौहान यांचं आक्रमण कमलनाथ यांनी एकहाती पेलून निष्प्रभ केलं.

मध्य प्रदेश, काँग्रेस, कमलनाथ

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, कमलनाथ हे राहुल गांधींचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.

कमलनाथ यांनी भाजपला चीतपट करण्याची वेळही अनोखी साधली. गेल्या अनेक दशकांपासून मध्य प्रदेश काँग्रेसला बंडाळ्यांनी ग्रासलं आहे. एकमेकांचे पाय खेचण्यात धन्यता मानणाऱ्या नेत्यांचा भरणा काँग्रेसमध्ये होता.

कमलनाथ यांची कारकीर्द जवळून पाहणारे ज्येष्ठ पत्रकार आलोक मेहता सांगतात, ''कमलनाथ यांचं हेच वैशिष्ट्य आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची कला त्यांच्याकडे आहे. निकाल आपल्याच बाजूने लागेल अशी त्यांची योजना असते''.

दिग्विजय सिंह असतील किंवा ज्योतिरादित्य सिंधिया- कमलनाथ यांनी सगळ्यांमध्ये ताळमेळ साधत वाटचाल केली. एकजूट राहील, फाटाफूट होणार नाही याची काळजी घेतली. त्याचा परिणाम आपल्यासमोर आहे. 15 वर्षांनंतर मध्य प्रदेशात काँग्रेसचं सत्तेत पुनरागमन झालं आहे.

26 एप्रिल 2018 रोजी कमनाथ यांनी मध्य प्रदेश काँग्रेसची सूत्रं हाती घेतली. तेव्हापासून भोपाळ हीच त्यांची कर्मभूमी झाली. नेतृत्वाची धुरा हाती येताच त्यांनी सगळ्यांत आधी काँग्रेस कार्यालयाचं रुपडं पालटलं. इमारतीला रंगरंगोटी करण्यात आली.

संजय गांधी यांची तसबीरही अवतरली. मध्य प्रदेशात काँग्रेसने हाती घेतलेल्या मोहिमेत तीन-चतुर्थांश टक्के यंत्रणा कमलनाथ यांनीच कार्यान्वित केल्याची वार्ता आहे.

राष्ट्रीय पातळीवर कमलनाथ यांची उपयुक्तता एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्री होण्याच्या तुलनेत नक्कीच मोठी आहे, असं पत्रकार आलोक मेहता यांना वाटतं. मात्र एनडी तिवारी, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी राज्यात जाऊन मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी हाताळली आहे.

लो प्रोफाइल राहणी असणारे कमलनाथ

कमलनाथ यांची कार्यक्षमता आणि राजकीय ताकद याबाबत त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या मनातही संदेह नाही. परंतु कमलनाथ स्वत: नेहमीच लो प्रोफाइल राहतात.

गांधी कुटुंबीयांशी घनिष्ठ संबंध, पन्नास वर्षांची राजकीय कारकीर्द, स्वत:चं अब्जावधी रुपयांचं उद्योग जगतातलं साम्राज्य या गोष्टींच्या बळावर ते चर्चेत राहू शकतात, पण ते तसं करत नाहीत.

कमलनाथ हे संजय गांधी यांचे शाळेतले सहाध्यायी होते. डून स्कूलपासून सुरू झालेली त्यांची मैत्री मारूती कार निर्मितीपर्यंत आणि त्यानंतर युवा काँग्रेसच्या प्रवासापर्यंत कायम होती.

पत्रकार विनोद मेहता यांनी आपल्या 'संजय गांधी-अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात कमलनाथ यांच्याविषयी लिहिलं आहे. काँग्रेसच्या प्रभावकाळात संजय गांधींनी पश्चिम बंगालमध्ये सिद्धार्थ शंकर रे आणि प्रियरंजन दासमुन्शी यांना टक्कर देण्यासाठी कमलनाथ यांना रिंगणात उतरवलं होतं.

मध्य प्रदेश, काँग्रेस, कमलनाथ

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, कमलनाथ

आणीबाणीनंतर संजय गांधींना अटक झाली, त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी न्यायाधीशांशी गैरवर्तन करून कमलनाथ तिहार तुरुंगात पोहोचले होते.

याच कारणांमुळे ते इंदिरा गांधींच्या गुडबुक्समध्ये जाऊन पोहोचले. 1980 मध्ये काँग्रेसने त्यांना पहिल्यांदा मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून तिकीट दिलं. त्यांच्या प्रचारासाठी इंदिरा गांधी आल्या होत्या. भाषणादरम्यान त्या म्हणाल्या, काँग्रेस नेता म्हणून कमलनाथ यांना मत देऊ नका. माझा तिसरा मुलगा म्हणून कमलनाथ यांना मत द्या असं भावनिक आवाहन इंदिरा गांधी यांनी केलं होतं.

काँग्रेस पक्षाचं गेली अनेक वर्ष वृत्तांकन करणारे मनोरंजन भारती म्हणतात, सर्वसामान्य माणसंही म्हणू लागली की इंदिराजींचे संजय आणि कमलनाथ हे उजवे-डावे हात आहेत.

पहिल्यांदा कुठे निवडून आले कमलनाथ?

आदिवासी आणि दुर्गम अशा भागातून 1980 मध्ये निवडून येणाऱ्या कमलनाथ यांनी छिंदवाडाचं चित्रच बदलं. याच मतदारसंघातून ते सलग नऊवेळा लोकसभेत निवडून गेले. याच भागात त्यांनी शाळा-कॉलेज तसंच आयटी पार्क उभारलं.

स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी वेस्टर्न कोलफील्ड्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हरसारख्या कंपन्या आणल्या. त्याचवेळी क्लॉथ मेकिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, ड्रायव्हर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हेही त्यांनी सुरू केलं.

संजय गांधी यांचा मृत्यू आणि इंदिरा गांधी यांची हत्या यामुळे कमलनाथ यांच्या राजकीय कारकीर्दीवर निश्चित परिणाम झाला. मात्र तरीही काँग्रेस पक्ष आणि गांधी राजघराण्याशी ते एकनिष्ठ राहिले.

1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत कमलनाथ यांचंही नाव समोर आलं होतं. मात्र सज्जन कुमार, जगदीश टाइटलर यासारख्या नेत्यांप्रमाणे त्यांचा दंगलीतला सहभाग सिद्ध होऊ शकला नाही.

मध्य प्रदेश, काँग्रेस, कमलनाथ

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, गांधी घराण्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत.

1984मधील शीखविरोधी दंगली आणि 1996 मध्ये उघडकीस आलेला हवाला घोटाळा या दोन घटनांचा अपवाद वगळला तर अनेकवर्षं महत्वपूर्ण खात्यांचा कारभार सांभाळूनही कमलनाथ यांचं नाव वादविवादांमध्ये अडकलं नाही. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा किंवा अन्य गंभीर आरोपदेखील झालेला नाही.

पर्यावरण, शहरविकास, वाणिज्य, उद्योगसारख्या महत्त्वपूर्ण खात्यांचा कारभार त्यांनी सांभाळला.

हवाला घोटाळ्यात सहभागाचे आरोप

1996 मध्ये कमलनाथ यांचं नाव हवाला घोटाळ्याप्रकरणी घेतलं गेल्यावर काँग्रेस पक्षाने छिंदवाडातून त्यांची पत्नी अलकानाथ यांना उमेदवारी दिली. त्या निवडून आल्या.

मात्र पुढच्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये कमलनाथ यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. छिंदवाडात कमलनाथ यांचा झालेला तो एकमेव पराभव आहे.

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर कमलनाथ यांनी राजीव गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही काम पाहिलं. आजही राहुल गांधी यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.

मनोरंजन भारती याविषयी अधिक सांगतात, ''कमी वेळात सगळे रिसोर्स गोळा करण्यात कमलनाथ यांचा हातखंडा आहे. प्रत्येक पक्षात त्यांचे मित्र आहेत. व्यवसायामुळे उद्योग क्षेत्रात त्यांची उठबस आहे. तिथेही त्यांचा गोतावळा मोठा आहे. पक्षाच्या विविध गरजा ते लीलया पूर्ण करतात.''

मध्य प्रदेश, काँग्रेस, कमलनाथ

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, इंदिरा गांधी यांची हत्या आणि संजय गांधी यांचा मृत्यू यामुळे कमलनाथ यांच्या राजकीय कारकीर्दीवर परिणाम झाला.

कानपूरमध्ये जन्मलेल्या कमलनाथ यांचं कुटुंब आणि व्यवसाय पश्चिम बंगालमध्ये आहे. ते स्वत: उद्योसम्राट आहेत. रिअल इस्टेट, एविएशन, हॉस्पिटॅलिटी, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचा व्यापक संचार आहे.

देशातील महत्त्वाची शिक्षणसंस्था असलेल्या IMT गाझियाबादचे ते संचालक आहेत. याव्यतिरिक्त देशभरात कार्यरत 23 कंपन्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये त्यांचा समावेश आहे. नकुलनाथ आणि बकुलनाथ ही दोन मुलं हा कारभार सांभाळतात.

आलोक मेहता यांनी कमलनाथ यांच्या राजकारणापल्याडच्या ओळखीविषयी सांगितलं.

"व्यावसायिक पार्श्वभूमी असल्याने कमलनाथ अनेकांना मदत करतात. त्यांच्या घरी नेहमी माणसांची रीघ लागलेली असती. IMT गाझियाबादच्या माध्यमातून त्यांनी किती कुटुंबांना रोजगार मिळवून दिला हे लक्षात घ्यायला हवं. हे त्यांच्या सामाजिक योगदानासारखं आहे," मेहता सांगतात.

कार्यकर्त्यांसाठी 24 तास उपलब्ध

कमलनाथ यांचं घर आणि कार्यालय कार्यकर्त्यांसाठी 24 तास खुलं असतं हे दिल्लीच्या सत्तावर्तुळात प्रसिद्ध आहे.

''एखाद्या कनिष्ठ पातळीवरील कार्यकर्त्यासाठी कमलनाथ चार वेळाही शब्द टाकू शकतात. हे वागणं त्यांची मोठी ताकद आहे'', असं आलोक मेहता यांनी सांगितलं.

मध्य प्रदेश, काँग्रेस, कमलनाथ

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण नेत्यांमध्ये कमलनाथ यांचा समावेश होतो.

कमलनाथ अतिहुशार आणि चाणाक्ष आहेत. या कानाचं त्या कानाला ते कळू देत नाहीत.

ते एखाद्या विषयावर ठामपणे भूमिका घेऊ शकत नाहीत अशी त्यांच्यावर टीका होते. प्रत्येकाशी चांगले संबंध राखण्यावर त्यांचा विश्वास आहे. मध्य प्रदेशच्या राजकारणात 15 वर्षांच्या कालावधीत त्यांनी एकदाही शिवराज सिंह चौहान यांना कडाडून विरोध केलेला नाही.

मनोरंजन भारती कमनलाथ यांच्या शैलीविषयी सांगतात, "ही त्यांची कार्यपद्धती आहे. काम कसं करायचं, करवून घ्यायचं हे त्यांना चोख माहिती आहे. मध्य प्रदेश निवडणुकांसारखी खडतर मोहीम त्यांच्याकडे सोपवण्यात आली. विजयासह त्यांनी मोहीम फत्ते करून दाखवली आहे."

कमलनाथ यांच्या बरोबरीने त्यांचे सल्लागार आर. के. मिगलानी यांनाही श्रेय देणं आवश्यक आहे. गेल्या 38 वर्षांपासून कमलनाथ यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते कार्यरत आहेत. मिगलानी यांच्या मते कमलनाथ दिलेला शब्द कधीच विसरत नाहीत. त्यामुळे मध्य प्रदेशच्या जनतेला दिलेली आश्वासनं ते विसरणार नाहीत अशी मतदारांना खात्री आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)