मध्य प्रदेशात मतमोजणीला एवढा वेळ का लागला?

फोटो स्रोत, EPA
मंगळवारी पाच राज्यांमधल्या निवडणुकांचे निकाल येणार होते. यापैकी राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोरम या चार राज्यातील सत्ता समीकरणं लवकरच स्पष्ट झाली. मात्र रात्री उशिरापर्यंत मध्य प्रदेशमध्ये कुणी जिंकलं, यासंदर्भात अधिकृत आकडेवारी जाहीर होऊ शकली नाही.
11 डिसेंबरला सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतमोजणी 12 डिसेंबरच्या सकाळपर्यंत सुरू होती. 24 तासांनंतरच 230 जागांसंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली. आकडा होता - भाजप 109, काँग्रेस 114, बहुजन समाज पार्टी 02 आणि इतर 05.
मध्य प्रदेशातल्या निकालांना यायला एवढा उशीर झाला की कागदी मतपत्रिकांचे दिवस आठवले. पण Electronic Voting Machines अर्थात EVM असतानाही एवढा उशीर का व्हावा?
EVMमुळे साधारण निकालादिवशी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होतं. त्याला यंदा मध्य प्रदेशात पहिल्यांदाच साथ होती ती Voter-verifiable Paper Audit Trail (VVPAT) मशीनची.
निवडणूक आयोगाच्या दाखल्याने सांगण्यात आलं की असंख्य VVPAT यंत्र पुन्हा मिळाल्याने निकालांना उशीर झाला.

फोटो स्रोत, Getty Images
मध्य प्रदेशातील 230 विधानसभा क्षेत्रातील सर्व ठिकाणच्या मतमोजणी केंद्रांमध्ये किमान एका EVMचं मताधिक्य VVPAT नुसार करण्यात आलं. यामुळेच उशीर झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
VVPAT आकड्यांबाबत साशंकता
मध्य प्रदेशातील 306 मतमोजणी केंद्रांवर सुरुवातीचा अर्धा तास पोस्टल बॅलट म्हणजेच पोस्टाने झालेल्या मतदानाची मोजणी झाली. त्यानंतर EVM मशीनद्वारे नोंद झालेल्या मतांची मोजणी सुरू झाली.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना मोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर VVPATच्या माध्यमातून मिळालेल्या आकड्यांशी पडताळणी करावी लागली.
उमेदवाराला मतमोजणीत काही गडबड झाली आहे, अशी शंका वाटल्यास VVPATशी त्याची पडताळणी करून पाहण्यात आली.
छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगणाच्या तुलनेत राजस्थान आणि मध्य प्रदेशात मतमोजणीला उशीर झाला.
VVPAT आणि EVM यांची पडताळणी करण्याच्या प्रक्रियेत वेळ लागल्याने निकाल जाहीर करण्यास उशीर झाल्याचं मध्य प्रदेशचे निवडणूक अधिकारी आनंद कुमार यांनी सांगितलं. नेमका किती उशीर होईल, याबाबत ठोस सांगता येणार नाही, असंही कुमार मंगळवारी म्हणाले.
मतमोजणीचे सगळे टप्पे पूर्ण झाल्यानंतरच उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचं मध्य प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी V. L. कांता राव यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
मंगळवारी पाच वाजेपर्यंत मध्य प्रदेशातील बहुतांश केंद्रावर मतमोजणी पूर्ण झाली नव्हती. अनेक ठिकाणी जेमतेम दहा फेऱ्या झाल्या होत्या तर काही ठिकाणी 32. निवडणूक अधिकाऱ्यांच्या मते काही ठिकाणी 21 पर्यंत तर अन्य ठिकाणी 10-11 फेऱ्या पार पडल्या होत्या.
मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रमुख कमलनाथ आणि राज्यातील निवडणुकांची धुरा हाती असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिल्लीतील मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. मतमोजणीच्या सगळ्या फेऱ्या झाल्यानंतर सर्टिफिकेटची मागणी केली होती.
यामुळेही मध्य प्रदेशात निकाल जाहीर करायला वेळ लागला अशी चर्चा आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उमेदवार होते, त्याठिकाणी मतमोजणीला अधिक वेळ लागला. या सगळ्या उमेदवारांना सर्टिफिकेट देणंही बाकी होतं.
काही मतदारसंघांमध्ये विजयाचं अंतर इतकं कमी होतं की प्रतिस्पर्धी उमेदवारांनी पुनर्मोजणीची मागणी केली. यामुळेही प्रक्रियेला उशीर झाला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








