तात्या टोपे कोण होते? त्यांचा मृत्यू नक्की कधी झाला?

तात्या टोपे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तात्या टोपेंना पकडण्याच्या क्षणाचे चित्र
    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"40 हजार सैनिक खऱ्याखुऱ्या तात्या टोपेंना आणि त्यांच्या 5 हजार सैन्याला पकडायला सज्ज आहेत", हे वाक्य आहे मेजर जनरल जीएसपी लॉरेन्स यांनी भारत सरकारच्या सेक्रेटरींना लिहिलेल्या पत्राचं. तेही 1863 सालचं. म्हणजेच युद्ध संपून आणि तात्या टोपेंचा मृत्यू होऊन 4 वर्षं झाली तरी ब्रिटिशांना तात्या टोपे मेल्याची खात्री पटत नव्हती.

तात्यांच्या मृत्यूबद्दल अशा अनेक वदंता, दंतकथा तयार झाल्या. काही लोकांना तात्या टोपेंना मारलं जाऊ शकत नाही, तसं त्यांना वरदान आहे असं वाटत होतं. काहीही असलं तरी तात्या टोपेंचा मृत्यू ब्रिटिश साम्राज्याची डोकेदुखी नक्कीच झाला असणार असं अनुमान काढता येतं.

1857 चा उठाव किंवा स्वातंत्र्यसमर होऊन आता 165 वर्षं व्हायची वेळ आली. पण आजही या घटनेचं कुतुहल संपलेलं नाही की अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत.

हिंदू-मुस्लीम एकत्र येऊन ब्रिटिश साम्राज्याला भारतातून हाकलण्याच्या या प्रयत्नाचे पडसाद पुढे अनेक वर्षं उमटत राहिलेच, त्याहून भारतीय लोक एकत्र आले तर आपल्याला हा देश कधीही सोडावा लागेल याची जाणिव इंग्रजांना नव्याने झाली.

1857-58 साली भारतात घडलेल्या या घटनेला नक्की काय म्हणायचं याबाबत आजही वेगवेगळ्या कल्पना मांडल्या जातात. जसं की हा नुसता उठाव की स्वातंत्र्ययुद्ध, संस्थानिकांनी स्वतःच्या मागण्यासाठी लढा उभारला की सामूहिक स्वातंत्र्यासाठी आणि परकीय सत्तेला पराभूत करण्यासाठी? यासर्व प्रयत्नांबद्दल देशी-परदेशी लेखकांनी भरपूर लिहून ठेवलं आहे त्यामुळे अनेक मतं-मतांतरं दिसून येतात.

तात्या टोपे कोण होते?

तात्या टोपे यांचं मूळ नाव रामचंद्र पांडुरंग टोपे. महाराष्ट्रातलं येवला हे त्यांचं मूळ गाव. त्यांचे वडील पांडुरंग हे वेदशास्त्र आणि सर्व धर्मग्रंथ मुखोद्गत असणारे एक ज्ञानी व्यक्ती होते. त्यामुळेच दुसऱ्या बाजीरावांनी त्यांना पुण्याला बोलावून घेतले.

तात्या टोपे यांचे येवल्यातील घर

फोटो स्रोत, PARAG TOPE

फोटो कॅप्शन, तात्या टोपे यांचे येवल्यातील घर

ज्यावेळेस दुसऱ्या बाजीरावांना पुणं सोडून उत्तर भारतात कानपूरजवळ बिठूरला स्थानबद्ध व्हावं लागलं, तेव्हा त्यांच्याबरोबर अनेक लोक पुण्यातून जाऊन स्थायिक झाले. त्यामध्येच पांडुरंग टोपेही होते. कालांतराने पांडुरंग यांची पत्नी आणि रामचंद्र, गंगाधर ही मुलं बिठुरला येऊन राहिली.

बिठुरला तात्या टोपे दुसऱ्या बाजीरावांचे पुत्र नानासाहेब यांच्या संपर्कात आले. नानासाहेब आणि मोरोपंत तांबे यांची कन्या मनकर्णिका म्हणजेच पुढे झाशीच्या राणी झालेल्या लक्ष्मीबाई यांच्याबरोबर त्यांची ऊठबस होती. तात्या टोपे या सर्वांमध्ये वयानं ज्येष्ठ होते

1857चा उठाव

1857 साली नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, अवधचे नवाब, मुघल सत्ताधीश आणि बुंदेलखंडातली अनेक संस्थानं ब्रिटिशांविरोधात उभी राहिली. दक्षिणेतल्याही संस्थानांमध्ये याचे पडसाद उमटले होते. उठावाचे प्रयत्न त्यावेळेस झाले होते. परंतु उठावाच्या मुख्य भूमिकेत नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, लक्ष्मीबाई आणि इतर नेते होते.

झाशीचा किल्ला

फोटो स्रोत, ONKAR KARAMBELKAR

फोटो कॅप्शन, झाशीचा किल्ला

अनेक ब्रिटिश आणि देशी इतिहासकार या उठावाशी ग्वाल्हेरच्या शिंदेंचा संबंध नव्हता अशी मांडणी करतात. परंतु काही भारतीय इतिहासकारांनी या उठावात ग्वाल्हेरच्या संस्थानिकांचाही सहभाग होता असे लिहिले आहे.

ग्वाल्हेरच्या शासनकर्त्या बायजाबाई शिंदे यांनी उठावाच्या पूर्वतयारीसाठी प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं. अनेक शासनकर्त्यांनी इंग्रजांचा रोष ओढावला जाऊ नये म्हणून हे बंड सैनिक करत आहेत, आमच्या हातात काहीच नाही अशी भूमिका घेऊन युद्धाला आतून मदत केली होती. त्यामुळे असे प्रश्न आजही उपस्थित होतात.

तात्या टोपेंची भूमिका काय?

तात्या टोपे म्हटले तर एक पेशव्यांच्या सेवेतील एक व्यक्ती होते. सैन्याच्या नेतृत्वाचा कोणताही जुना अनुभव नसला तरी त्यांनी स्वकर्तृत्वावर नेतृत्व प्राप्त केलं. 1857 पासून पुढे जवळपास दोन वर्षं त्यांचा सगळा वेळ युद्ध आणि प्रवासातच गेलेला दिसतो.

बायजाबाई शिंदे आणि ग्वाल्हेरचा किल्ला

फोटो स्रोत, D. B. PARASNIS, GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, बायजाबाई शिंदे आणि ग्वाल्हेरचा किल्ला

तात्या टोपे यांचे वंशज आणि 'तात्या टोपेज ऑपरेशन रेड लोटस' या पुस्तकाचे लेखक पराग टोपे यांच्या मते या बंडाच्या मूळ प्रेरणास्रोत बायजाबाई शिंदे होत्या, त्या बंडाचं नियोजन तात्या टोपे यांचं होतं आणि ते अंमलात आणण्याचं मुख्य काम नानासाहेबांनी केलं.

तात्या टोपे यांचे येवल्यातील घर

फोटो स्रोत, PARAG TOPE

फोटो कॅप्शन, तात्या टोपे यांचे येवल्यातील घर

तात्या टोपे नानासाहेबांचे मित्र, दिवाण, पंतप्रधान, सैन्यप्रमुख अशा अनेक भूमिकांमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं.

1857 साली युद्धाला तोंड फुटल्यावर सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये तात्यांचे नियोजन यशस्वी झाल्याचंही दिसून येतं.

1857मध्ये दिल्लीत उठाव झाल्यावर 1858 साली लखनौ, झाशी, ग्वाल्हेर अशी एकेक शहरं स्वतंत्र होत गेली. ती नंतर गमवावीही लागली. पण सुरुवातीच्या काळात दिल्ली, कानपूर, लखनौ, आझमगड, वाराणसी, अलाहाबाद, फैजाबाद, बाराबंकी, सालन, गोंडा असा प्रदेश स्वतंत्र करण्यात यश नक्कीच आलं होतं.

तात्या टोपेंनी नानासाहेबांच्या सैन्यातील मुख्य कामं पार पाडल्याचं कागदपत्रांमधून दिसून येतं. मनुष्यबळाचं नियोजन, सैन्य भरती, त्यांचे पगार, प्रशासन यासर्व बाबींमध्ये तात्यांना मोठा मान व निर्णय घेण्यात स्थान असल्याचं दिसून येतं. नानासाहेब, त्यांचे मुख्य सचिव मोहम्मद इसाक आणि तात्या टोपे यांच्या पत्रव्यवहारांमधून तात्यांची ही भूमिका स्पष्ट होते.

झाशीच्या सुटकेचे प्रयत्न

इंग्रजांनी झाशी शहराला वेढा दिल्यानंतर आता झाशीची कोंडी करण्यात त्यांना यश आलं होतं. त्यामुळे झाशी शहराची सुटका करणं अत्यंत आवश्यक होतं. ती मुख्य जबाबदारी पेशव्यांनी तात्या टोपे यांना दिली होती.

तात्यांच्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा प्रसंग मानला जातो. कानपूरजवळच्या काल्पी येथून अत्यंत वेगाने तात्या आपली फौज घेऊन झाशीच्या सुटकेसाठी आले.

झाशीचा किल्ला आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाई

फोटो स्रोत, ONKAR KARAMBELKAR/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, झाशीचा किल्ला आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाई

तात्या टोपेंचं सैन्य या लढाईत अत्यंत सरसपणे लढले असं वर्णन 'माझा प्रवास' हे प्रवासवर्णन लिहिणाऱ्या विष्णूभट गोडसे यांनी केलं आहे. मात्र तात्यांना या लढाईत यश आलं नाही. त्यांच्या तोफा आणि इतर साहित्य इंग्रजांच्या हाती लागलं. पण या लढाईमुळे झाशीतल्या लोकांच्या मनात काही काळ हुरुप निर्माण झाला होता. आता आपली सूटका होईल असा उत्साह त्यांच्या मनात तयार झाला होता.

झाशी-काल्पी-ग्वाल्हेर

झाशीचा वेढा उठवण्यात पेशव्यांना अपयश आल्यानंतर मात्र राणी लक्ष्मीबाई यांना झाशी सोडण्याशिवाय पर्याय राहिला नाही. ब्रिटिश फौजेला चकवा देऊन त्या काल्पीच्या दिशेने आल्या. काल्पीमध्येही पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे इंग्रजांविरुद्ध लढले मात्र त्यात यश आले नाही. त्यामुळे सर्वसैन्य ग्वाल्हेरला गेले. या सैन्यानं ग्वाल्हेरचा पाडाव करताच ग्वाल्हेरचे राजे धोलपूरमार्गे आग्र्याला पळून गेले.

ब्रिटिश सैनिकांच्या गराड्यात झाशीच्या राणीचे सैनिक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ब्रिटिश सैनिकांच्या गराड्यात झाशीच्या राणीचे सैनिक

ग्वाल्हेरला शिंद्यांचं संस्थान आणि किल्ला ताब्यात घेऊन सर्व खजिना ताब्यात घेण्यात आला. याच खजिन्यामधून तात्यांनी सर्व फौजेचा पगार दिला आणि ग्वाल्हेरच्या संरक्षणासाठी ते प्रयत्न करू लागले.

झाशीच्या राणीचा मृत्यू आणि पुढचा लढा

ग्वाल्हेरला पेशवे, झाशीच्या राणी, तात्या टोपे आहेत हे समजल्यावर इंग्रजांनी ग्वाल्हेरच्या दिशेने मोर्चा वळवला. 17 जून 1858 रोजी ब्रिटिश फौज ग्वाल्हेरजवळ येऊन पोहोचली. याच प्रदेशात झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंची इंग्रजांशी थेट लढाई झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

ग्वाल्हेर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ग्वाल्हेर

राणीच्या मृत्यूनंतर मात्र संपूर्ण लढ्याचं चित्र बदलून गेलं. ग्वाल्हेरचा जो मोठा विजय पेशवे आणि सर्व योद्ध्यांना मिळाला होता तो अल्पकाळच टिकला. नानासाहेबांचे भाचे रावसाहेब, तात्या टोपे, बांद्याचे नवाब अलिबहादूर ग्वाल्हेरमधून नाहीसे झाले.

झाशीची राणी आणि अलिबहादूर यांना पकडून देणाऱ्यांना 10 हजार रुपयांचे बक्षीस आधीच म्हणजे 10 जूनलाच जाहीर झाले होते. आता लक्ष्मीबाई राणींच्या मृत्यूनंतर तात्या टोपे आणि रावसाहेबांवरही प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.

रावसाहेबांनी शरण येण्याचा प्रस्ताव ठेवला मात्र इंग्रजांविरुद्धच्या कटात सहभागी आहे हे सिद्ध झाल्यास कोणतीही हमी देण्यास इंग्रज अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे ते शरण गेले नाहीत. अलीबहादूर इंग्रजांना शरण गेले आणि त्यांना लांब इंदूरला पेन्शन देऊन ठेवण्यात आलं. परंतु तात्या टोपे, रावसाहेब यांनी मात्र लढा सुरूच ठेवला.

रानोमाळ भटकून युद्धाची ठिणगी पेटती ठेवली

ग्वाल्हेर सोडल्यावर मात्र तात्या टोपेंनी आश्चर्यकारकरित्य़ा प्रवास केलेला दिसतो. राजपुताना, माळवा, गुजरात अशा प्रदेशात त्यांनी अत्यंत कमी वेळात, वेगाने प्रवास केल्याचं दिसतं. ग्वाल्हेरमधून बाहेर पडून ते वायव्येला जोऊरामार्गे सिर्मथुराला गेले. त्यानंतर मासलपूरमार्गे आजच्या राजस्थानात असणाऱ्या हिंडौन शहरात जाऊन पोहोचले. त्यानंतर आणखी पश्चिमेला जाऊन मग दक्षिणेला टोंकला गेले.

यानंतर तात्या सतत आपल्या प्रवासाची दिशा बदलत असल्याचं दिसतं. टोंकच्या पूर्वेला सवाई माधोपूरला गेल्यानंतर ते दक्षिणेला व नंतर पश्चिमेला बुंदीला गेले. तिथून ते भिलवाडा, गंगापूर, चित्तूर असा उलटसुलट प्रवास करत राहिले. नंतर पूर्वेला झालरापाटण मार्गे ते पुन्हा आजच्या मध्य प्रदेशात आले. तेथेही बरेच दिवस त्यांचा प्रवास सुरू राहिला. तात्या टोपे आणि रावसाहेब या काळात लहानलहान संस्थानिकांना भेटत होते. आदिवासींना भेटत होते. इंग्रजांविरुद्ध पेटलेली ठिणगी विझू नये यासाठी त्यांनी निकराचे प्रयत्न केले.

1857 च्या बंडातील बंडखोर सैनिक आणि ब्रिटिश फौजेतील सैनिक यांची लढाई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1857 च्या बंडातील बंडखोर सैनिक आणि ब्रिटिश फौजेतील सैनिक यांची लखनौ येथे झालेली लढाई

'झांशीची राणी लक्ष्मीबाई' या पुस्तकाच्या लेखिका प्रतिभा रानडे यांनी रावसाहेब आणि तात्या टोपे यांच्या अखेरच्या दिवसांचे वर्णन केले आहे. रावसाहेब जम्मूजवळ असताना एका भीमराव नावाच्या माणसाने इंग्रजांना मदत केली आणि रावसाहेब पकडले गेले. त्यांच्यावर कानपूरमध्ये खटला चालवला गेला. त्यात कोणताही आरोप सिद्ध झाला नाही मात्र तरीही 20 ऑगस्ट 1862 रोजी पेशव्यांच्या बिठूरमधील राजवाड्यासमोर रावसाहेबांना फाशी देण्यात आलं.

इकडे तात्या टोपेंची नरवरच्या मानसिंह राजाची भेट झाली. ग्वाल्हेरजवळच्या शिवपुरीच्या जंगलात असताना मानसिंगाने त्यांची माहिती इंग्रजांना दिली. 7 एप्रिल 1869 रोजी तात्या टोपेंना शिवपुरीला आणलं गेलं.

सिप्री गावात आणून त्यांच्यावर घाईघाईने खटला चालवून 18 एप्रिलला फाशीही दिली गेली. त्यांना जिथं फाशी देण्यात आली तिथं एका दगडी ओट्यावर इंग्रजांनी 'दि नटोरिअस तात्या टोपे वॉज हँग्ड हिअर ऑन एटिन्थ ऑफ एप्रिल 1859' असं कोरुन ठेवलं. अशी माहिती रानडे यांनी लिहून ठेवली आहे.

पण फासावर चढवलेला माणूस तात्या टोपे नव्हताच असं म्हणणं इंग्रज अधिकारी औट्रमसह अनेक लोकांचं होतं. फासावर चढवलेली ही व्यक्ती बडोदा संस्थानातील भाऊ तांबेकर नावाची व्यक्ती होती असं म्हटलं जातं.

तात्या समजून अनेक लोकांना फाशी दिली गेली. तात्यांबद्दल इंग्रज अधिकारी मेलिसन यानं तात्यांनी जे केलं ते स्वामिभक्तीसाठी केलं. त्यासाठी त्यांना मिळालेली शिक्षा जास्त आहे, एका स्वामिभक्ताने योग्य त्या मार्गाने स्वामींचे आज्ञापालन केलं होतं, असं म्हटलं होतं.

तात्या टोपेंचे वंशज काय म्हणतात?

तात्या टोपे यांच्या मृत्यूबद्दल जी वेगवेगळी मतं आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचं मत त्यांचे वंशज पराग टोपे यांनी मांडलं आहे. त्यांच्या अभ्यासानुसार तात्या टोपे छिपाबरोद इथं असताना इंग्रजांशी झालेल्या लढाईमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आज हे गाव राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर आहे.

टोपे कुटुंबीय

फोटो स्रोत, PARAG TOPE

फोटो कॅप्शन, तात्या टोपे यांचे वंशज

पराग टोपे यांनी त्यांच्या 'ऑपरेशन रेड लोटस' पुस्तकात तात्यांच्या शेवटच्या लढाईबद्दल मेजर पॅगेटने लिहिलेल्या अहवालाची माहिती देतात. या अहवालात पॅगेटने छिपाबरोदच्या लढाईच्या वर्णनात एका पांढऱ्या अरबी घोड्यावर बसलेल्या व्यक्तीला मारण्यात आलं. त्यानंतर त्याला तात्काळ त्याच्या लोकांनी बाजूला नेलं असं म्हटलं आहे. तोच तात्या टोपे होता, असं पॅगेट म्हणतो.

पण तात्या टोपे यांनी अनेक महिने इंग्रजांना दिलेल्या हुलकावणीमुळे त्यांची एक दंतकथा होऊन बसलीच. पराग टोपे यांच्या मते तात्यांचे सहकारी राम सिंग, राव सिंग आणि जिल जंग यांनी तात्या जिवंत आहेत ही अशी अफवा मुद्दाम कायम ठेवली असावी.

पराग टोपे

फोटो स्रोत, PARAG TOPE/RUPA PUBLICATIONS

फोटो कॅप्शन, ऑपरेशन रेड लोटस पुस्तकाचे लेखक पराग टोपे

काही लोकांना आजही तात्यांना फाशी दिली असं वाटतं तर काही लोकांना ते साधूच्या स्वरुपात बिठूर, येवला, बडोदा असं फिरत राहिले असं वाटतं. सत्य काहीही असो तात्या टोपेंनी 1857-59 या काळात एक असामान्य शौर्याचं आणि धाडसाचं महत्त्वपूर्ण काम केलं होतं यावर कोणालाच शंका घेता येणार नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)