कान्होजी आंग्रे यांनी ब्रिटिशांना हरवलं पण पराभवाचं खापर मराठी व्यापाऱ्यावर कसं फुटलं?

फोटो स्रोत, RUPESH BUNDHE
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी
रामा कामती हे नाव काही फक्त एका व्यक्तीचं नसून मुंबईच्या इतिहासातलं नव्हे भारताच्या न्यायदानाच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं प्रकरण आहे. किंबहुना 18 व्या शतकातला सर्वात कुप्रसिद्ध खटला असंही याला म्हटलं गेलं.
ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर बून, कान्होजी आंग्रे, इंग्रज, पोर्तुगीज, मराठे, आपल्याच शहरातील सुप्रसिद्ध व्यक्तीबद्दल केलेला बेबनाव, फसवणूक आणि खोट्या आऱोपांवर रचलेल्या खटल्याचं मिश्रण या प्रकरणात आहे. आज भारतीय आणि ब्रिटिश न्यायव्यवस्थेचा अभ्यास करायचा झाला तर हे प्रकरण टाळून पुढे जाता येत नाही.
स्वतःवर आलेलं नामुष्कीचं बालंट दूर करण्यासाठी गव्हर्नर चार्ल्स बून आणि काही लोकांनी मुंबईतले व्यापारी रामा कामती यांना एका प्रकरणात गोवलं आणि रामा कामती यांना आजन्म कारावासाची शिक्षा 1720 साली ठोठावण्यात आली.
यावर्षी या प्रकरणाला 300 वर्षे पूर्ण होत आहेत.
रामा कामती कोण होते?
रामा कामतीचे प्रकरण असं सरसकट म्हटलं जात असलं तरी त्यांच्या नावाचे उल्लेख अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आले आहेत. काही ठिकाणी राम कामत, रामा कामत, रामजी कामत, रामा कामटी, कोमटी असाही आलेला आहे.
काही लोकांना ते कामटी असावेत असाही समज यामुळे झाला. परंतु त्यांचे मूळ नाव कामत असे होते. गोव्यामधून आलेल्या कामत या गौड सारस्वत कुटुंबांपैकी ते होते. कोकणीमुळे कामतचे कामती झाले आणि तेच कागदपत्रांमध्ये रुढ झाले.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईमधले एक सधन आणि प्रसिद्ध व्यापारी म्हणून त्यांची ओळख होती. 17 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 18 व्या शतकाच्या सुरुवातीचा विचार केला तर त्या काळात मुंबईचा आकार अत्यंत लहान होता. मुंबईची बेटं अत्यंत लहान होती. तसेच शहरापेक्षा ते एक व्यापारी बंदराचं केंद्र म्हणून ओळखलं जात होतं.
या तेव्हाच्या लहानशा मुंबईत रामा कामतींनी स्वतःचं नाव कमावलं होतं. त्यांचा तंबाखू आणि नारळाचा व्यापार होता. ब्रिटिशांनी मुंबईत पाऊल ठेवण्याआधी त्यांचं कुटुंब मुंबईत आलं होतं असं सांगितलं जातं.
ते कंपनीच्या लष्करातील सर्वोच्च पदावर असलेले भारतीय होते. मनोहर माळगावकर यांच्या मते ते कंपनीचे सेनाप्रमुख मेजर स्टॅन्टन आणि सुभेदार यांच्यामधल्या पदावरती असावेत.
वाळकेश्वर आणि सेंट थॉमस कॅथिड्रल
लष्करी अधिकारी आणि व्यापारी असले तरी रामा कामतींना समाजातल्या त्यांच्या स्थानामुळे ओळखलं जात होतं. मुंबईतला श्रीमंत देशी माणूस, धार्मिक वृत्तीचा माणूस म्हणून त्यांची जास्त ख्याती होती. आज जे वाळकेश्वराचं मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार याच रामा कामतींनी 1715मध्ये केला होता.
फोर्टमध्ये त्यांनी एक लक्ष्मी-व्यंकटेशाचं मंदिरही बांधलं होतं. आजही ते मुंबईत मनोहरदास रस्त्यावर आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इंग्रज लोकही त्यांचा भरपूर सन्मान करायचे. 1718 साली मुंबईत सेंट थॉमस कॅथिड्रलच्या उद्घाटनप्रसंगी ख्रिसमसला त्यांना आमंत्रित केलं होतं. यावरुन त्यांची त्यावेळच्या समाजातली पत लक्षात येते.
कंपनीमध्ये वजन
रामा कामती यांचं कंपनीच्या कारभारात आणि मुंबईच्या आर्थिक व्यवस्थेत किती मोठं स्थान होतं याबद्दल आरमार अभ्यासक प्रतीश खेडेकर यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली.
ते सांगतात, "1680 मध्ये रामजी हा कंपनीच्या खजिन्यात सराफ म्हणून काम करत होता. 1689-90 मध्ये जंजिऱ्याच्या सिद्दीने मुंबईवर हल्ला केला, माजगाव काबीज केले आणि मुंबईच्या किल्ल्याला वेढा दिला. या वेळी रामजीने शिपाईगिरी करून मुंबईच्या संरक्षणात कामगिरी बजावली.
14 फेब्रुवारी 1690 रोजीच्या नोंदीवरून असे दिसते की, इंग्रजांच्या मोर्च्यावरील एका गर्नाळाचा गोळा जागीच फुटला. याच्या गोळ्याच्या ठिकऱ्या रामजीच्या पायास लागून त्याला इजा झाली.
या वेळेपर्यंत त्याने सराफाच्या नोकरीतून कमावलेले पैसे बागायत व पेढी व्यवहारात गुंतवून मोठा नफा कमावला होता.
1694 मध्ये त्याला मुंबई बेटाच्या उत्पन्नाचा "ओव्हरसियर-जनरल" नेमला होता. खजिन्यातील सराफाची नोकरी त्याच्या भावाला देण्यात आली. 1694 मध्ये माझगाव येथील ज्या मुसलमान स्थानिकांनी सिद्दीची मदत केली होती त्यांच्या जमिनी कंपनीने जप्त करून तेथील बागायती व भातशेतीची जबाबदारी रामजीवर सोपवली."
सैन्यातला हुद्दा आणि टांकसाळीचा प्रमुख
रामा कामत यांना कंपनीच्या शिपायांमध्ये वरचं स्थान मिळालं होतं आणि मुंबईच्या टांकसाळीचं प्रमुखपदही त्यांना मिळालं होतं. याबाबत प्रतीश खेडेकर म्हणतात, "23 जून 1694 रोजी त्याला कंपनीच्या भारतीय शिपायांच्या पलटणींचा "मस्टर मास्टर जनरल" म्हणजेच मुख्य हजेरी घेणारा बनवण्यात आले. 1706 मध्ये माझगाव येथील म्हातारपाखाडी येथे भाताची शेती सुरु केली.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचवर्षी त्याने मुंबई आणि माहीम येथील सीमाशुल्काची मक्तेदारी मिळवली आणि हा मुंबईच्या टांकसाळीचा प्रमुख झाला तो अगदी कैद होईपर्यंत राहिला.
1687 ते 1720 पर्यंत जवळपास सगळीच वर्षे तंबाखूची मक्तेदारी रामजीलाच मिळाली. 1707 साली मुंबई व माहीम धरून पाच दारू भट्ट्यांची मक्तेदारी त्याच्याकडे होती. पण हे काम त्याने पुढच्याच वर्षी सोडून दिले. 1719 मध्ये त्याचा मुलगा बाबू उर्फ बाळकृष्ण कामत कंपनीच्या खजिन्यात सराफ म्हणून काम करत होता."
स्वतःची जहाजं
"रामजी कामत यांच्या व्यापाराचा पसारा एवढा होता की, त्यांना एक मोठा जहाजांचा ताफाच ठेवावा लागत असे. यातील काहींची नावे ज्ञात आहेत: ब्लेसिंग, युनिअन, बॉम्बे मर्चंट आणि रिकव्हरी. याखेरीज एक केच जातीचे जहाज खास इराण येथील बंदर अब्बासशी व्यापारासाठी ठेवलेले होते. या जहाजांवरून शिसं, लोखंड, कथिल, अफू, व साखर सारख्या वस्तूंचा व्यापार तो करीत असे." अशी माहिती प्रतीश खेडेकर देतात.
खांदेरीची नामुष्की
रामा कामतींवर 3 मुख्य आरोप करण्यात आले होते. रामा कामती यांच्याबरोबर दुलबा भांडारी यांच्यावरही कंपनी सरकारतर्फे आरोप ठेवण्यात आले होते. आरोप समजून घेण्याआधी थोडी पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. कंपनीने अरबी समुद्रातील खांदेरी या कान्होजी आंग्रेंच्या बेटावर हल्ला केला होता.

फोटो स्रोत, RUPESH BUNDHE
मोठा दारुगोळा, जहाजं घेऊन केलेल्या या हल्ल्याला केवळ 300 मावळ्यांनी चिमुकल्या खांदेरीवरुन परतवून लावलं होतं. यामध्ये कंपनीची मोठी नामुष्की झाली होती.
इतकी तयारी करुनही संख्येने अगदी अल्प असणाऱ्या कान्होजींच्या मावळ्यांनी केलेला पराभव चार्ल्स बूनच्या जिव्हारी लागला होता. त्यासाठी त्याला खापर फोडण्यासाठी कोणीतरी हवं होतंच.
खांदेरीच्या हल्ल्याची माहिती रामा कामतींनीच आंग्रेंना दिली असा आरोप ठेवण्यात आला. त्यासाठी एक कथित पत्रही समोर आणलं गेलं. तशीच पत्र उंदेरी बेट ताब्यात असणाऱ्या सिद्दीलाही पाठवल्याचा आरोप केला गेला.

फोटो स्रोत, Getty Images
या पत्रांमध्ये आंग्रेचं अनेक विशेषणं लावून कौतुक करुन आम्ही खांदेरीला येत असल्याची बातमी कामतींनी दिली असं भासवलं गेलं. त्यावर त्यांचा शिक्काही होता. यापेक्षाही अनेक हास्यास्पद वाटतील असे आरोप कंपनीने रामा कामती यांच्यावर ठेवले.
सक्सेस जहाजाचं प्रकरण
दुसरं महत्त्वाचं प्रकरण सूरतच्या गोवर्धनदास या व्यापाऱ्याचं 'सक्सेस' नावाचं जहाज आंग्रेंनी पकडले होते. या जहाजावर इंग्रजांचाही माल होता.
इंग्रज आणि आंग्र्यांच्या करारानुसार इंग्रजांची जहाजं आंग्र्यांच्या हद्दीतून जाताना कर माफ करण्यात आला होता. मात्र काही इंग्रज आपला खासगी व्यापार गोवर्धनदासासारख्या व्यापाऱ्याच्या जहाजातून करत आणि जहाज इंग्रजांच्या मालकीचं आहे असं भासवून करमाफी मिळवत.

फोटो स्रोत, Getty Images
हे जहाज पकडल्यावर इंग्रज आणि गोवर्धनदासाने कान्होंजीशी केलेली बोलणी अनेकदा फिसकटली.
शेवटी कंपनीने रामा कामती यांची चर्चेसाठी नियुक्ती केली तरीही वाटाघाटी पुढे सरकल्या नाहीत. मात्र नंतर रामा कामतीनेच हे जहाज इंग्रजांचे नसून गोवर्धनदासाचे आहे असे कान्होजींना सांगितले असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.
मुंबईवर हल्ला
कान्होजी आंग्रे यांनी मुंबईवर सहा सात गलबतांनीशी हल्ला करावा अशी सूचनाही केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. आंग्रे यांच्या ताब्यातल्या पनवेलच्या किल्ल्याचा किल्लेदार आपला किल्ला कंपनीच्या ताब्यात देण्यास तयार आहे असं कंपनी सुभेदारानं (अँटोनियो डि कोस्टा) सांगितल्यावर कामती यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असाही आरोप ठेवला गेला. असे एकूण लहान-मोठे सात आरोप कामतींवर ठेवले गेले.

फोटो स्रोत, Getty Images
नेमक्या याच काळात कामती यांनी आपल्या काही किमती वस्तू ठाण्यातल्या घरात हलवल्या होत्या. त्यामुळे फितुरी उघड झाली तर धन सुरक्षित राहावं यासाठीच त्यांनी हे केले असं भासवण्यात आलं. हे आरोप ब्राऊन, फिलिप्स, कर्टनी आणि हॉर्न यांनी निश्चित केले होते.
खटला आणि शिक्षा
रामा कामती आणि त्यांना मदत केल्याचा आरोप ठेवून दुलबा भांडारी यांच्याविरोधात खटला चालला. रामा कामतींनी आपली बाजू मांडलीपण त्याचा उपयोग झाला नाही. (संदर्भः बॉम्बे अॅंड इट्स ज्युडिशियल अॅडमिनिस्ट्रेशन-प्रकरण आठवे)
अँटोनियो, अब्दुल्ला बार्डा, गोविंदा, फकीर बिंगारी यांनी त्यांच्याविरोधात साक्षी दिल्या. न्यायाधीश पार्कर यांनी या खटल्यामध्ये साधी-पुरावे पाहून शिक्षा सुनावल्या.
रामा कामतींना 30 हजार आणि भांडारी यांना 7000 रुपयांचा दंड झाला. (दंडाच्या रकमेबाबत विविध पुस्तकांत वेगवेगळे आकडे आहेत.) तसेच रामा कामती यांना आजन्म कारावासात ढकलण्यात आलं. 1720 ते 1728 अशी 8 वर्षं तुरुंगात काढल्यावर रामा कामती यांचा मृत्यू झाला.
शिक्षेपाठोपाठ रामा कामती यांची सगळी संपत्ती जप्त करण्यात आली. त्यांच्या एका वखारीमध्ये तर कंपनीचं मुख्य न्यायालयही कामकाज करू लागलं. ज्या न्यायालयानं निरपराध माणसाला त्याच्या कुटुंबाला देशोधडीला लावलं त्याच्याच इमारतीतून न्यायदानाचं काम होऊ लागलं.
मुंबई शहराच्या इतिहासाचे अभ्यासक भरत गोठोसकर सांगतात, "रामा कामती यांना गनबाऊ स्ट्रीट म्हणजे आजच्या रुस्तुम सिधवा मार्गावरच्या इमारतीत ठेवण्यात आलं होतं. इथं एकाच इमारतीमध्ये कोर्ट आणि तुरुंग होता. तसेच रामा कामती यांचं बझार स्ट्रीटजवळचं घर जप्त करुन त्याचा टाऊन हॉल करण्यात आला."
शिक्षा ठोठावल्यावर काही वर्षांनी अँटोनियो साक्षीदार आणखी एका खटल्यात सापडला त्यावेळेस त्यानं आपण खोटी साक्ष दिल्याचं कबूल केलं. रामा कामतींची मोहर ज्या सोनारानं केली त्याचाही पत्ता लागला. परंतु रामा कामती तुरुंगातच राहिले.

फोटो स्रोत, Getty Images
साक्षीदारांनी साक्षी द्याव्यात यासाठी त्यांचा छळही करण्यात आला होता. एका साक्षीदाराच्या अंगठ्यात स्क्रूही पिळण्यात आला होता. यासर्व धामधुमीत मुंबईतला एक सर्वोच्च श्रीमंत माणूस कफल्लक झाला. काही ठिकाणी इंग्रजांनी नंतर रामा यांचा मुलगा दुर्गाला काही मोबदला दिला असेही सांगण्यात आले आहे. परंतु त्याबद्दल ठोस माहिती मिळत नाही.
ब्रिटिश लेखकांनीच केला निषेध
रामा कामतीवर झालेल्या अन्यायाबद्दल बूनला कधीच क्षमा करता येणार नाही स्टिफन मेरिडिथ एडवर्ड्स या ब्रिटिश लेखकानं स्पष्टपणे 'द राईज ऑफ बॉम्बे अ रिट्रोस्पेक्ट' या पुस्तकात लिहून ठेवलं आहे.
रामा कामतीला झालेली शिक्षा अमानवी असल्याचं ते सांगतातच त्याहून रामा कामतीचा कारकून गोविंद यांच्या अंगठ्यात स्क्रू पिळून वदवून घेणं हे रानटीपणाचं आहे असं एडवर्ड्स लिहितात. त्याचप्रमाणे दुलबा (एडवर्डसनी 'दलबा' असा शब्द वापरला आहे) भंडारी यांनाही झालेल्या शिक्षेचा ते निषेध केला आहे. कालांतराने हे सर्व प्रकरण आणि पत्रं खोटी असल्याचं सिद्ध झाल्याचंही ते नमूद करतात. (पान नं 154-155)
खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी केलेला बनाव
रामा कामतीला झालेली शिक्षा आणि खटला हा सगळा कंपनीची आणि स्वतःची खोटी प्रतिष्ठा वाचवण्यासाठी केलेला बनाव होता असं मत मराठा आरमाराचे अभ्यासक डॉ. सुरेश शिखरे व्यक्त करतात.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "कान्होजी आंग्रे यांचे पश्चिम किनारपट्टीवरील वाढते आरमारी वर्चस्व साम्राज्यवादी ब्रिटिशांना डोळ्यातील काट्यासारखे सलत होते. आंग्रेनी युरोपीय सत्तांच्या 'दस्तक'(कर) वसूल करण्याच्या वर्चस्वाला आणि अधिकाराला सुरुंग लावायला सुरवात केलेली होती. साम्राज्यवादी मनोभूमिका असलेल्या कंपनीला हा धक्का सहन न झाल्याने इ.स. 1710 मध्ये मुंबई येथे गव्हर्नर म्हणून बूनची नियुक्ती केली.

फोटो स्रोत, Getty Images
बून अत्यंत गर्विष्ठ व फाजील आत्मविश्वासी स्वभावाचा इसम होता. आपण जाता-जाता कान्होजीचा पराभव करू या आविर्भावात आंग्रेच्या विरोधात प्रथम कागदोपत्री धमकीवजा घोडी नाचवली आणि नंतर आरमारी मोहिमा उघडल्या, मात्र त्याचा काहीएक इलाज न झाल्याने पर्यायी गव्हर्नरने बुनने मुंबई सल्लागार मंडळाच्या माध्यमातून मुंबईमधील एक प्रतिष्ठित व्यापारी रामा कामती याला मध्यस्थी करायची विनंती केली.
ही मध्यस्थी चालू असतानाच बूनने 17 जून 1718 रोजी मुंबईमधून एक जाहीरनामा प्रसिद्ध करून कान्होजी आंग्रेच्या विरूद्ध युद्ध घोषित केले आणि मोठ्या ब्रिटिश आरमाराने विजयदुर्ग आणि खांदेरी येथे सलग दोन आरमारी मोहिमा काढल्या, बूनची या आरमारी मोहिमेमुळे मुंबई बेटावर आणि दरबारात पार बेअब्रू झाली.

फोटो स्रोत, RUPESH BUNDHE
खांदेरी मोहीमेचे अपयश बूनला पचवता आले नाही. अपयशाचे खापर कुणाच्यातरी माथी मारून स्वतःची खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी मॅन्यूएल डी कॅस्ट्रो, रामा कामटी व दुलबा भंडारी या इंग्रजेतर व्यक्तींच्या फितुरीमुळेच इंग्रजांचा पराभव झाला असा बनाव करून त्यांच्या विरुद्ध बूनने कुभांड रचले आणि त्यांना बळीचा बकरा बनविण्यात आले. वसाहतीच्या काळातील ब्रिटीशांच्या वंशवादी आणि साम्राज्यवादी मनोभूमिकेची रामा कामतीचे प्रकरण एक मोठी शोकांतिका होती. "
रामा कामती पुस्तकांमध्ये
रामा कामती प्रकरण मुंबईच्या आणि मुंबईच्या न्यायव्यवस्थेतलं अप्रिय प्रकरण असलं तरी ते प्रसिद्ध मात्र भरपूर झालं. अनेक लेखकांनी, ब्रिटिश लेखकांनी या प्रकरणाचा सविस्तर उल्लेख केला असून आपापल्या परीने अर्थ लावायचा प्रयत्न केला आहे.
बाळकृष्ण बापू आचार्य आणि मोरो विनायक शिंगणे या दोघांनी 1889 साली 'मुंबईचा वृत्तांत' नावाने एक पुस्तक लिहिले होते. या ग्रंथात या लेखकद्वयीने रामा कामती यांचा ओझरता उल्लेख केला आहे.
फक्त चार ओळींमध्ये हा उल्लेख असला तरी त्यावरुन रामा कामती खटल्याची प्रसिद्धी आणि त्याचे पडसाद पुढच्या दीडशे वर्षांहून जास्त काळापर्यंत उमटल्याचे दिसतं. हे दोघेही राम कामतींना 'वाळकेश्वरचा निर्माता' असं संबोधतात.

फोटो स्रोत, Getty Images
हे लेखक म्हणतात, "अठराव्या शतकात रामा कामती नावाचा शेणवी पुरुष प्रसिद्धीस आला. तो सुरुवातीच्या इंग्रजांच्या सैन्यात होता. त्याने मद्रास प्रान्ती लढाईत भाग घेतला होता. त्याचे सील वापरून कोणीतरी खोटे कागद तयार केले. त्याला गव्हर्नरला कैद करण्याच्या आंग्र्यांच्या कटात गोवण्यात आले. कामतीला कैद केले (1720). राजद्रोहाचा आरोप ठेवला.
याच राम कामतीने वाळकेश्वर येथील शिवालयाचे 1715मध्ये जीर्णोद्धार केला होता. इ.स. 1718मध्ये इंग्लिश चर्चचे उद्घाटन झाले, तेव्हा उपस्थित असणारात तो एक एतद्देशीय होता. अशा प्रतिष्ठित गृहस्थांची इंग्रजांनी उचलबांगडी केली."
शिंगणे आणि आचार्य यांच्या पुस्तकांचं हे साधं उदाहरण म्हणता येईल. कारण इतर अनेक ठिकाणी राम कामती यांच्या दातृत्वाचा, वाळकेश्वराच्या जीर्णोद्धाराचा आणि या खटल्याचा तसेच मुख्यत्वे त्याच्यावर अन्याय झाल्याचा स्पष्ट उल्लेख येतो. याचाच अर्थ हे प्रकरण मुंबईच्या समाजजीवनात अगदी खोलवर झिरपलेलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
दुसरं आणखी ठोस उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईचे वर्णन या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक गोविंद नारायण माडगांवकर यांचं देता येईल. माडगांवकरांनी रामा कामतींच्या वाळकेश्वर मंदिराचा उल्लेख केलेला नाही तर सेंट थॉमस कॅथिड्रलच्या ख्रिसमसला इंग्रजांनी बोलावणं केल्याचंही ते सांगतात.
माडगांवकर लिहितात, "सध्याचे वालुकेश्वराचें देवालय रामजी कामत या नांवाच्या शेणवी गृहस्थानें सुमारें 50 वर्षांमागे बांधिलें होतें. रामाजी कामत यांस इसवी सन 1728 त देवाज्ञा झाली. त्यांच्या मरणाच्या पंधरा-वीस वर्षांपूर्वी हें देवालय बांधलें असावें.
वालुकेश्वराची जमीन ह्या गृहस्थास सरकारांतून इनाम मिळाली होती असेंही सांगतात. परंतु हें गृहस्थ त्यावेळी प्रख्यात होते, हें वास्तविक आहे. कारण सन 1718मध्यें कोटांतील इंग्रजांच्या मोठ्या देवळाची अर्चा झाली, त्याचा वृत्तांत सुरतचे गव्हर्नर यांस रेवरेंड मिस्तर काब यानें लिहून पाठविला आहे. त्यांत तो असें लिहितो कीं, हा समारंभ पाहाण्यास रामाजी आणि त्याच्या जातीचे गृहस्थ पुष्कळ आले होते. रामाजी कामत हे त्यावेळच्या एत्तदेशीय लोकांच्या लष्करावरील मुख्य सरदार होते."

फोटो स्रोत, Getty Images
फिलिप अँडरसनने रामा कामती प्रकरणावर केलेली टिप्पणी जयराज साळगावकर यांनी 'मुंबई शहर गॅझेटियर' पुस्तकात केले आहे.
अँडरसन लिहितात, " रामा कामती प्रकरण हे गव्हर्नमेंटचेच कारस्थान होते. राम कामतीला उगाच त्यांनी अटक करून वाईट वागणूक दिली. रामा कामतीने फितुरी कदाचित केली असण्याची शक्यता आहे, पण त्याच्याविरुद्ध पुरावा मात्र मिळालेला नाही.
रामा कामती तुरुंगात खितपत पडला होता आणि कामतीचे कुटुंब दारिद्र्यात ढकलले जात होते. न्यायाधीशांनी सोयीस्करपणे म्हटले की, रामा कामतीनेच पत्रे लिहिली आहेत आणि पत्रांना सील लावण्यात आले होते."

फोटो स्रोत, RUPESH BUNDHE
अशा अनेक पुस्तकांमधून रामा कामती यांच्याबद्दल लिहिलेलं आहे.
रामा कामती हे प्रकरण अशा पद्धतीनं आपल्या इतिहासात कायमचं स्थान मिळवून घट्ट बसलं आहे.
संदर्भ आणि अधिक वाचनासाठी-
- बॉम्बे इन द मेकिंग- फिरोज बी.एम. मलबारी- टी. फिशर उनविन
- द राईज ऑफ बॉम्बे अ रिट्रोस्पेक्ट- एस. एम. एडवर्ड्स- केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस
- पुण्यात्मो राम कामती: एक दुखेस्त ऐतिहासीक जीण- शणैं गोंयबाब
- कान्होजी आंग्रे- मनोहर माळगांवकर- (अनुवाद पु. ल. देशपांडे)- साकेत प्रकाशन
- मुंबईचे वर्णन- गोविंद नारायण माडगांवकर- समन्वय प्रकाशन
- मुंबईचा वृत्तांत- बाळकृष्ण आचार्य आणि मोरो शिंगणे- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
- मुंबई शहर गॅझेटियर- जयराज साळगावकर- मॅजेस्टिक प्रकाशन
- द ट्रायल ऑफ रामा कोमटी- मुंबई उच्च न्यायालय संकेतस्थळ
- कानोजी आंग्रे, दस्तक, इंग्रज आणि आरमारी युद्धातील बळीचा बकरा रामा कामटी-डॉ. सुरेश शिखरे (निबंध)
- http://www.gsbkonkani.net/TEMPLES/FORT_TEMPLE.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








