लोकमान्य टिळक : पुण्यातल्या वादग्रस्त 'टी-पार्टी'ची भन्नाट गोष्ट

टिळक, पंचहौद मिशन पुणे

फोटो स्रोत, PIB KARAN RASKAR

फोटो कॅप्शन, लोकमान्य टिळक
    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

विचार करा... सुमारे 130 वर्षांचा काळ. परधर्मीय माणसाकडून अन्न घेणं, पाव खाणं-चहा पिणंही निषिद्ध असताना पुण्यामध्ये पंचहौद मिशन चर्चमध्ये लोकमान्य टिळकांसह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात चहापानही झालं... पण याच चहाच्या पेल्यांची किणकिण या सर्वांसाठी पुढे अनेक वर्षांसाठी डोकेदुखी ठरणार होती...

भारतीय राजकारण आणि समाजकारणामध्ये योगदान देणाऱ्या नेत्यांमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. 1856 साली जन्मलेले लोकमान्य टिळक 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांमध्ये कार्यरत होते.

1857 नंतरच्या बंडानंतर कंपनीकडून थेट इंग्रजांनी हात घेतलेला कारभार, इंग्रजी सुधारणांचं आलेलं वारं, पाश्चिमात्य शिक्षणाची ओळख, ख्रिस्ती धर्मप्रसाराची म्हणजेच पर्यायाने आणखी एका बदलाची सुरुवात टिळक कार्यरत असलेल्या काळामध्ये होत होती.

परंपरा धरून ठेवायच्या की नव्या सुधारणा स्वीकारायच्या, नव्या धर्माशी कसे वागायचे, सुधारणा कशा करायच्या? इतकी सहस्त्र वर्षे चाललेल्या धार्मिक चालीरितीमध्ये कसे बदल करायचे? स्त्रियांच्या शिक्षणांचं काय करायचं? स्वातंत्र्य कसं मिळवायचं? अशा प्रश्नांची चाहूल या काळात लागली होती.

किंबहुना त्या प्रश्नांच्या गर्तेत सर्वच विचारी लोक सापडले होते. वर्तमानपत्रातून बाजू मांडणं, नवे ग्रंथलेखनही सुरू झालं होतं. याच काळामध्ये पुण्यामध्ये एक प्रकरण घडलं आणि गदारोळ माजला. त्याच्या पुढची अनेक वर्षे त्याचे पडसाद निरनिराळ्या माध्यमातून उमटत राहिले. हे प्रकरण होतं 'पंचहौद मिशन'.

चहा पिणे, पाव खाणे, समुद्र ओलांडून देशांतरी जाणं, परधर्मीयाच्या घरी खाणं यासारख्या गोष्टींना समाजमान्यता मिळालेली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण समजून घेताना त्याकाळची सामाजिक पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल.

पंचहौद मिशन

पुण्याच्या गुरुवार पेठेत पंचहौद मिशन हे चर्च आहे. आजही पुण्याचे हे चर्च महाराष्ट्रातील जुने आणि महत्त्वाचे चर्च म्हणून ओळखले जाते. टिळक आणि तत्कालीन पुण्यामधील लोकांच्या आयुष्यात आलेले चहाचे प्रकरण याच चर्चेमध्ये घडले आणि 'पंचहौद मिशन प्रकरण' नावाने ते अजरामर झाले.

टिळक, पंचहौद मिशन पुणे

फोटो स्रोत, KARAN RASKAR, PUNE

दुर्देवाने पंचहौद मिशन प्रकरण कसे घडले, त्यात टिळकांसह अनेक लोक ओढले गेले याची चर्चा आणि त्याबद्दल आजवर लेखन झालेले आहे परंतु त्यानंतर टिळकांनी घेतलेली सुधारकी भूमिका, नव्या बदलाच्या बाजूने त्यांनी लावून धरलेला रेटा याबद्दल फारसे लिहिले गेलेले नाही. टिळकांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा या प्रकरणानंतर त्यांनी घेतलेल्या भूमिकेत असल्याचं दिसून येतं.

गोपाळराव जोशी

डॉ. आनंदीबाई जोशी यांचे पती गोपाळराव जोशी एक चतुर आणि चेष्टेखोर व्यक्ती होते हे अनेकांनी लिहून ठेवले आहे. गोपाळराव जोशी यांनी अनेक गोष्टींची थट्टा उडवण्यासाठी पुण्यात तशा घटना घडवून आणल्या किंवा काही घटनांचे साक्षीदार होऊन त्याची प्रसिद्धीही वर्तमानपत्रांमधून केली.

टिळक, पंचहौद मिशन पुणे

फोटो स्रोत, KARAN RASKAR, PUNE

कोणीही कोणत्याही धर्मात जावे, धर्मांतर विधीची थट्टा उडवावी या हेतूने त्यांनी एकदा पुण्याच्या संगमावर बाप्तिस्मा घेतला आणि काही दिवसांनी ते पुन्हा हिंदूही झाले.

असे अनेक प्रसंग घडवत असताना एकदा मात्र त्यांनी पुण्यातल्या सुशिक्षित, सुधारकांना उघडे पाडण्यासाठी पंचहौद मिशनमधील चहाची योजना आखली. आज चहा आणि इतर पदार्थांना भारतात सहज मान्यता मिळाली असली तरी त्या काळात चहा-बिस्किटाला मान्यता मिळालेली नव्हती. त्यामुळे ते चहा पिणं धाडसाचं होतं.

टिळक, पंचहौद मिशन पुणे

फोटो स्रोत, KARAN RASKAR, PUNE

गोपाळराव जोशी यांनी पंचहौदमधल्या रे. रिव्हिंग्टन यांच्या मदतीने पुण्यातील काही लोकांना व्याख्यानाला उपस्थित राहाण्याचं आमंत्रण दिलं. त्यामध्ये दहा ते बारा महिलासुद्धा होत्या. लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती माधवराव रानडे, वि. का. राजवाडे, वासुदेवराव जोशी, रामभाऊ साने, सदाशिवराव परांजपे, विष्णू मोरेश्वर भिडे, चिंतामण नारायण भट, सीतारामपंत देवधर यांच्यासारखे अनेक लोक उपस्थित होते.

चहा कसा प्यायचा?

पंचहौदमध्ये व्याख्यान झाल्यानंतर या सर्वांसमोर चहा आणि बिस्किटं आणून ठेवण्यात आली. हे पदार्थ असे समोर मांडल्यावर साहजिकच उपस्थितांच्या मनात चलबिचल सुरू झाली. ते खावेत तरी संकट आणि ते समोर मांडू नका हे सांगण्यातली भीड यामध्ये सर्वांची कोंडी झाली. काही लोकांनी चहा पिऊन फस्त केला तर काही लोकांनी चहा पिण्याचा देखावा केला. काही लोकांनी केवळ घोटभर चहा घशात ढकलून आदरातिथ्याचा सन्मान केला.

लोकमान्य टिळकः पंचहौद मिशनच्या चहा प्रकरणामुळे महाराष्ट्राचं समाजमन कसं ढवळून निघालं?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

पण हे सगळं संकट इतक्यात संपणार नव्हतं. त्या पेल्यांमध्ये केवळ चहा नव्हता तर पुढच्या दोन वर्षांमध्ये येणाऱ्या मोठ्या वादळाची ती नांदी होती.

या सर्व घटनेचे साक्षीदार असणाऱ्या गोपाळराव जोशींनी या चहा-बिस्किट प्रकरणाचा वृत्तांत विशेष टिप्पणीसह 'पुणे वैभव' वर्तमानपत्रात उपस्थितांच्या नावासकट छापून आणला. झाले… सगळ्या पुण्यामध्ये एकच वादळी अवस्था निर्माण झाली. सुधारक आणि धर्माभिमानी यांच्यामधल्या या बेदिलीमध्ये गोपाळराव जोशी मात्र नामानिराळे राहाणार होते. त्यांना आता पुढची 'मौज' पाहाता येणार होती.

टिळक, पंचहौद मिशन पुणे

फोटो स्रोत, KARAN RASKAR, PUNE

जे स्वतःला सुधारक समजतात ते आता काय भूमिका घेणार आणि जर सुधारकांचा विजय झाला तर धर्माभिमानी कसे गप्प बसणार हे त्यांना पाहाता येणार होतं. जर सुधारणेच्या बाजूने निकाल लागला तर किती दिवस आपण भीड बाळगून जगणार कधीतरी हे व्हायला हवंच होतं असंही गोपाळरावांना म्हणता येणार होतं. थोडक्यात त्यांचा जय ठरलेला होताच.

चौकशीसाठी शंकराचार्यांचं कमिशन

पुण्यातल्या लोकांनी मात्र हे प्रकरण चांगलेच तापवत ठेवले. चहा-बिस्कीट प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून प्रायश्चित्त ठरवण्यासाठी शं‍कराचार्यांकडे दाद मागण्यात आली. व्यंकटशास्त्री निपाणीकर आणि बिंदुमाधवशास्त्री सर्व-धर्माधिकारी यांचं एक कमिशन नेमलं गेलं. या कमिशनचं कामही बरेच महिने रेंगाळत गेलं.

याखटल्यात वादी पक्षातर्फे बाळासाहेब नातू, लक्ष्मणराव ओक, गोविंदराव गद्रे, सरदार ढमढेरे, विष्णूपंत रानडे यांच्यासारख लोक होते तर प्रतिवादींमध्ये पुणे वैभवमध्ये नावे प्रसिद्ध झाली असे लोक होते.

कित्येक लोकांनी आम्ही या कमिशनला जुमानतच नाही अशी भूमिका घेतली. हे कोर्ट काही नेहमीसारखं नसल्यामुळे दोन्ही बाजूंनी प्रचंड आगपाखड आणि टीका चालू राहिली, ती वर्तमानपत्रांतून प्रसिद्धही होत राहिली.

या प्रकरणात वेळ चालल्यावर प्रतिवादींनी वेगवेगळी प्रायश्चित्तं घ्यावीत अशीही चर्चा सुरू झाली. मात्र लोकमान्य टिळकांनी 'ज्या गोष्टीला (म्हणजे चहा पिण्याला) धर्मग्रंथात प्रायश्चित्त नाही त्यासाठी प्रायश्चित्तच का घ्यावे?' अशी भूमिका घेतली. ज्या धर्मशास्त्राचा आधार घेऊन वादी लढत होते त्याचाच आधार टिळकांनी घेतला होता. नंतर हे कमिशन बाजूला ठेवून थेट शं‍कराचार्यांकडेच वादीपक्षाने विनंती केली.

बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य, पुणे पंचहौद मिशन

फोटो स्रोत, PIB

जो प्रकार आपल्या वाडवडिलांनी (चहा पिणे) केलाच नाही त्याला प्रायश्चित्त कसे सापडणार अशी भूमिका वादीपक्षाने शं‍कराचार्यांकडे केली. त्यावर टिळकांच्या प्रतीवादीपक्षाने ज्याला प्रायश्चित्त नाही त्याचा दोषही मानता येणार नाही असं मत मांडलं. न. चिं. केळकरांनी लिहिलेल्या लो. टिळक यांचे चरित्र या ग्रंथात या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

कमिशनचा निकाल

निपाणीकर आणि धर्म-सर्वाधिकारी यांच्या कमिशनने अखेर 46 जणांवर टाकलेल्या फिर्यादीचा निकाल जाहीर केला. यामध्ये 9 जणांवरील फिर्याद विविध कारणांनी मागे घेतली होती. मिशनमध्ये जाऊन चहा न घेतलेल्या 8 जणांना यथाशक्ती दान देण्याचं प्रायश्चित्त सुनावण्यात आलं.

8 जणांनी प्रायश्चित्तासाठी अर्जच दिला होता. त्यामध्ये न्या. रानडे, चिंतामण भट यांचा समावेश होता. तर 16 जणांनी कमिशनला दादच दिली नव्हती. ते गैरहजरच राहिले, त्यांनी चहा घेतला की नाही हे सिद्धच झालं नव्हतं, परंतु त्यांनाही प्रायश्चित्त सुनावण्यात आलं.

वासुदेवराव जोशी, सदाशिवराव परांजपे, रामभाऊ साने, लोकमान्य टिळक यांनी चहा घेतला होता. टिळकांनी आपण काशीला गेलो असताना प्रायश्चित्त घेतल्याचा पुरावा दिला तर उरलेल्या तिघांना इतर प्रायश्चित्तं सुनावण्यात आली. पुढे हे प्रकरण शं‍कराचार्यांकडेच गेले.

प्रकरण पुन्हा चिघळले

प्रायश्चित्तानंतर हे प्रकरण संपेल असं वाटलं असलं तरी प्रत्यक्षात ते जास्तच चिघळलं. ज्या लोकांनी या कमिशनला दाद दिली नाही त्यांच्यावर थेट ग्रामण्य म्हणजे बहिष्कार लादण्यात आला. त्यांच्याकडे कोण येईनासे-जाईनासे झाले. ते ज्यांच्याकडे जातील किंवा त्यांच्याकडे जे जातील, अन्न घेतील त्यांनाही त्याची झळ बसू लागली.

न्या. रानडे, भट यांनी प्रायश्चित्त घेतल्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली. सुधारकांनी अशी भूमिका घ्यायला नको होती असंही म्हटलं जात होतं. हेकट धर्माभिमानींची खोड मोडण्यासाठी आपण प्रायश्चित्त घेतले असं रानडे यांनी स्पष्ट केलं तर चिंतामण भट यांनी आईच्या आग्रहाचं कारण दिलं. यामुळे पुण्यात शुक्ल म्हणजे धर्माभिमानी आणि कृष्ण म्हणजे बाटलेले लोक असे दोन गटच पडले.

हळूहळू हे वाढत गेले. कृष्णपक्षाशी संबंधात येणाऱ्या लोकांना त्याच्या संसर्गदोष झाला म्हणून रोष सहन करावा लागत असे. कित्येक घरातील जेवणावळी बंद पडल्या, लग्नकार्यात कृष्णपक्षातील लोकांशी संबंध तर येत नाही ना हे पाहिलं जाऊ लागलं. हा दोष टाळण्यासाठी लोक आपल्या मुलींना माहेरी पाठवेनासे झाले. लग्नसमारंभात भटजी मिळणेही दुरापास्त झाले.

टिळकांनाही बहिष्काराची झळ

कृष्णपक्षातल्या लोकांवर लादलेल्या बहिष्काराची झळ सण-समारंभात जास्त जाणवू लागली. खुद्द टिळकांच्या घरातील दोन कार्यांमध्ये ही अडचण आली. त्यांचा मोठा मुलगा विश्वनाथचा व्रतबंध सोहळा आणि मोठ्या मुलीचे लग्न याच काळात झाले.

जुन्या रुढीवादी विचारांचं स्थळ मुलीला मिळालं असतं तर त्रास वाढला असता परंतु प्रार्थना समाजातील सुधारक केतकरांचं घरच सासर म्हणून मिळाल्यामुळे त्यांचा त्रास वाचला पण लग्नासाठी पौरोहित्य करण्यास व्यक्ती मिळण्यात अडथळे आले.

शेवटी रानड्यांच्या घरात आश्रित म्हणून राहिलेल्या उपाध्यांकडून त्यांनी कार्य पार पाडलं. असं झालं तरी स्वयंपाक करायला आचारी मिळेनात. त्यामुळे टिळकांच्या शेजाऱ्यांमधील महिलांनी जिन्नस पाठवून मदत केली आणि नंतर बाहेरुन आचारी आणल्यानंतर पंगती उठल्या.

रमाबाई रानडे

फोटो स्रोत, VARADA PUBLICATIONS

फोटो कॅप्शन, रमाबाई रानडे याचं आत्मचरित्र

रमाबाई रानडे यांनी 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी' या पुस्तकात 'पंचहौद मिशनमधील चहा प्रकरण आणि ग्रामण्य' या प्रकरणात याचा उल्लेख केला आहे. बहिष्काराची झळ त्या कुटुंबांतील महिलांना कशी बसली आणि प्रायश्चित्तानंतर घरात झालेली चलबिचल यावरही त्यांनी लिहिलं आहे.

टिळक-आगरकर वाद

या दरम्यानच लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांचाही पंचहौद प्रकरणावरुन वाद सुरू झाला. केसरी आणि सुधारकामधून एकमेकांवर टीका, प्रत्युत्तरं येऊ लागली. सुधारकाच्या 14 नोव्हेंबर 1892 च्या अंकात टिळकांवर टिका करताना धर्माभिमानी म्हणवणारे टिळक केवळ ख्रिस्त्याच्या हातचा चहाच घेत नाहीत तर त्यांनी रेल्वे स्टेशनावर परधर्मीय मेसमनच्या हातचा भात खाल्ला अशा आशयाचं वाक्यही छापलं गेलं होतं.

टिळकांनी 22 नोव्हेंबर रोजी केसरीतून त्याचा प्रतिवाद केला आणि आरोप खोडून काढत पुराव्यांची मागणी केली. पण त्यातून काहीच तोडगा निघत नाही म्हटल्यावर हा वाद आगरकरांविरोधात फिर्याद दाखल करण्याच्या तयारीपर्यंत गेला.

अखेर आगरकरांनी 'बोलणे फोल झाले' या लेखातून टिळकांची माफी मागितली. टिळकांनी त्यावर आपल्या लेखात 'बोलणे फोल झाले आणि डोलणेही वाया गेले' (आगरकरांनी केलेल्या टीकेचा संदर्भ) अशी वाक्यं लिहिली.

एकूणच टिळकांनी या प्रकरणात वेगळीच भूमिका घेतली होती. आपण ज्या समाजात राहातो त्या समाजाच्या बरोबर आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी काशीला गेल्यावर प्रायश्चित्त घेतल्याचं सांगितलं आणि कोणी या प्रकरणाचा उपयोग करुन जुलूम करणार असेल तर तोही चालू देणार नाही अशी भूमिका घेतली.

सुधारकी भूमिका

लोकमान्य टिळकांनी या प्रकरणात आपली बाजू अगदी नेटाने लावून धरल्याचं दिसतं. याबाबत पुण्याच्या खाद्यसंस्कृतीचे अभ्यासक चिन्मय दामले यांच्याशी बीबीसी मराठीने संवाद साधला. ते म्हणाले, "प्रायश्चित्त घेणार्‍यांमध्ये न्यायमूर्ती रानडे होते. त्यांनी प्रायश्चित्त घेणं हा सनातन्यांना त्यांचा नैतिक विजय वाटत होता. रानड्यांनी आणि आगरकरांचे सहकारी असलेल्या सीतारामपंत देवधरांनी प्रायश्चित्त घेतल्यानं सुधारकांची पंचाईत झाली खरी.

शनिवार वाडा पुणे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शनिवारवाडा, पुणे

आपल्या मित्रांचा बचाव व्हावा, मंगलकार्यांमध्ये त्यांना अडचणी येऊ नयेत, कुटुंबकलह कमी व्हावा यांसाठी आपण प्रायश्चित्त घेतल्याचं रानड्यांनी सांगितलं. त्यांनी सुधारणांचा जो कार्यक्रम हाती घेतला होता, त्यात परधर्मी लोकांशी अन्नोदक व्यवहार करण्याचं कलम नव्हतं, असं त्यांचं म्हणणं होतं.

त्यामुळे तसा व्यवहार झाला असल्यास प्रायश्चित्त घ्यायला हरकत नसावी, कारण तसं केल्यानं सुधारणेच्या तत्त्वांना हरताळ फासली जात नाही, असं ते सांगत होते. त्यांच्या मते, संमतिवयाच्या वादापासून लक्ष विचलित करण्यासाठी सुधारणांच्या शत्रूंनी पंचहौद मिशनचं प्रकरण उकरून काढलं होतं, सनातन्यांचा हेतू सफल होऊ नये, म्हणून प्रायश्चित्त घेऊन प्रकरणावर पडदा पाडणं उत्तम होतं."

टिळकांच्या चहापानाच्या भूमिकेबाबत बोलताना चिन्मय दामले सांगतात,"या प्रकरणापुरतं बोलायचं झालं तर टिळकांची भूमिका ही रानड्यांच्या भूमिकेपेक्षा अधिक थेट व सुधारकी होती. या प्रकरणाचं मूळच खाण्यापिण्याशी संबंधित आचरणात असल्यानं सुधारणांशी त्या आचरणाचा संबंध नाही, असं रानड्यांनी म्हणणं योग्य वाटत नाही. आगरकरांची ग्रामण्याबाबतची भूमिका पूर्णपणे बुद्धिप्रामाण्यवादी होती. त्यांनीही रानड्यांवर टीका केली.

टिळक मात्र प्रकरणाच्या मुळाशी जाऊन, आरोपांमधल्या खाण्यापिण्याच्या आचरणाशी असलेल्या संबंधांकडे अजिबात दुर्लक्ष न करता युक्तिवाद करत राहिले. त्यांनी काशीला जाऊन प्रायश्चित्त घेतल्याचं जाहीर केलं, पण या प्रकरणात ते सातत्यानं सनातन्यांविरुद्ध लिहीत-बोलत राहिले. सनातन्यांच्या भूमिकेचं खंडन करणारा पहिला लेख टिळकांनी 23 फेब्रुवारी 1892 च्या 'केसरीत' प्रकाशित केला. या लेखाचा पुढचा भाग 1 मार्चच्या अंकात छापून आला.

लोकमान्य टिळकः पंचहौद मिशनच्या चहा प्रकरणामुळे महाराष्ट्राचं समाजमन कसं ढवळून निघालं?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

सनातन्यांच्या भूमिकेस शास्त्राधार नाही, सबब सनातन्यांची मागणी बिनबुडाची आहे, हे त्यांनी लिहिलं. 'प्रत्येक निषिद्धाचरण ज्ञानत: केल्यानें जर जात मोडते तर बर्फ खाणारे, सोडा पिणारे, कांदे भक्षण करणारे आणि व्याजबट्ट्याचा व्यापार करणारे सर्वच ब्राह्मण लोक जातिबाह्य नाहीत काय?' असा युक्तिवाद त्यांनी केला.

पुढे 1912 पर्यंत हे ग्रामण्य पुण्यातल्या वर्तमानपत्रांत व समाजजीवनात गाजत राहिलं. चहाबिस्किटांसारखे परकीय पदार्थ खाणं धर्मबाह्य आहे, असं सांगणार्‍या भीमशास्त्री झळकीकर, रंगाशास्त्री अशा सनातनी विद्वानांच्या लेखांना टिळक नेटानं उत्तरं देत राहिले. त्यांचा संपूर्ण युक्तिवाद हा त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे धर्मग्रंथांवर, धर्मशास्त्रावर आधारलेला होता. चहा, बटाटा अशा पदार्थांचा उल्लेख स्मृतिग्रंथांमध्ये नाही, सबब त्यांस जुने नियम लावू नयेत, असं ते सांगत राहिले.

टिळकांचं मत

टिळकांच्या आयुष्यातील सुधारणेच्या आणि सुधारणांबाबतच्या एकूणच भूमिकांबाबत लेखक विनय हर्डीकर सांगतात, "आगरकरांची जशी 'इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार' ही भूमिका होती तशी टिळकांची भूमिका 'इष्ट असेल ते साध्य करणार' असल्याचं दिसतं.

शाळा कॉलेजं काढून काही होणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी वर्तमानपत्र आणि शिवजयंती, गणेशोत्सवासारखे सार्वजनिक उत्सव सुरू करण्यावर लक्ष दिलं. टिळकांनी प्रायश्चित्त घेऊन पुरावा दिला हा त्यांच्या चातुर्याचा पुरावा म्हटला पाहिजे. पाण्यात राहून माशाशी वैर करता येणार नाही असाच त्याचा अर्थ होतो."

हर्डीकर पुढे सांगतात, " त्यांनी संमतीवयाच्या कायद्यासारख्या प्रकरणांमध्ये यात ब्रिटिशांनी पडू नये अशी भूमिका घेतली. आमच्या धर्मातल्या चुका आम्ही ठरवू असं त्याचं मत होतं. ज्या ज्यावेळेस निकराची भूमिका घेण्याची वेळ आली तेव्हा टिळकांनी आधुनिक भूमिका घेतल्याचं दिसतं. शाळा काढणं, राष्ट्रीय शिक्षणासाठी वर्तमानपत्र काढणं हे त्याचंच उदाहरण आहे. थोडक्यात टिळकांना आजच्या चष्म्यातून पाहाता येणार नाही."

या घटना कशा समजून घ्यायच्या?

आज या घटनेकडे पाहिलं तर त्याचा अर्थ कसा लावायचा हा प्रश्न पडू शकतो. 1885 पासून 1900 पर्यंत अनेक महत्त्वाचे बदल आपल्या समाजात घडत होते.

आज पाहिलं तर वरपांगी या चहापानासारख्या घटना साध्या वाटू शकतात. त्यावर इतका वेळ का घालवला असेल असेही वाटू शकते. पण सुमारे 130 वर्षांपुर्वीचा महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. किंबहुना आजच्या महाराष्ट्राचा पाया या अशा घटनांमध्येच आहे असे म्हणणे गैर नाही.

या प्रकरणाकडे पाहाता टिळकांकडे कोणत्याच प्रकारचा शिक्का मारता येणार नाही असं मत चिन्मय दामले मांडतात. ते म्हणाले, "ग्रामण्य प्रकरणात टिळक तात्पुरते का होईना, सुधारकांच्या गटात गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

टिळकांची एकंदर सामाजिक व राजकीय कारकीर्द पाहता टिळकांवर 'सुधारक किंवा 'सनातनी' असे शिक्के मारता येत नाही.

कालपरत्वे त्यांच्या भूमिका बदलत राहिल्या. सनातनी त्यांना 'छुपे सुधारक' म्हणत तर सुधारकांच्या मते ते सनातनी होते. केवळ बडबड करणारे सुधारक व जातिबहिष्काराची भाषा करणारे शुक्लपक्षीय सनातनी या दोहोंबद्दलही आपल्याला नावड असल्याचं टिळकांनी म्हटलं आहे.

लोकमान्य टिळकः पंचहौद मिशनच्या चहा प्रकरणामुळे महाराष्ट्राचं समाजमन कसं ढवळून निघालं?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

ग्रामण्यप्रकरणात सनातनी व शंकराचार्य यांच्याकडे गोपाळ कृष्ण गोखले, ह. ना. आपटे यांच्यासारख्या थोड्यांनी सपशेल दुर्लक्ष केलं. त्यांना काहीही त्रास झाला नाही. अशीच भूमिका इतर सुधारकांनी घेतली असती, तर अनेक कुटुंबांना झालेला त्रास वाचला असता. शिवाय चहाबिस्किटांसारखे पदार्थ खाण्यात गैर नाही, हा संदेश निदान काहींपर्यंत पोहोचला असता. पण तसं घडलं नाही. सुधारकांनी ती संधी चुकवली.

एकटे टिळक आगरकरांच्या मृत्यूनंतरही धर्मशास्त्राचा आधार घेत का होईना, पण सनातन्यांवर टीका करत राहिले व चहाबिस्किटांमध्ये काहीही गैर नाही, हे सांगत राहिले.

यानिमितानं एक झालं की, मिशनर्‍यांच्या हातचं खाण्यामुळे धर्मांतर होत नाही, हे अनेकांना नव्यानं कळलं. तसंच, 'तुम्ही आमच्या हातचं खाल्लं, आता तुम्ही आमच्या धर्माचे', असं सांगून आपल्या कळपात एतद्देशीयांना घेता येणार नाही, हे मिशनर्‍यांना कळून चुकलं. 1897 साली पुण्यात प्लेगची साथ आली आणि त्यानंतर दोनेक वर्षांतच मध्यवस्तीत चहाची दुकानं दिसू लागली. लोकांच्या मनातून चहाबिस्किटांची भीती कमी करण्यामागे चहा प्रकरणाचा व टिळकांच्या लेखांचा थोडा का होईना पण नक्कीच वाटा होता."

अरुणा ढेरे यांनी लिहिलेल्या 'विस्मृतिचित्रे' पुस्तकाच्या प्रस्तावनेतून या काळाचं आणि समाजमनाचं आकलन होऊ शकतं. त्या म्हणतात, "एकोणिसाव्या शतकातले सुधारणांचे जग म्हणजे एका विजेच्या तारांची जाळीच म्हटली पाहिजे. कोणत्याही लहानशा सामाजिक वास्तवाला सुधारणेचा स्पर्श व्हावा आणि समाजमनात झणझण उठावी. ती झणझण अनेक तारांमधून पसरत जावी. सगळी जाळीच विद्युतभारित व्हावी. असे अनेक पातळ्यांवर आणि अनेक अर्थांनी जिवंत, क्रिया-प्रतिक्रियांनी गजबजलेले समाजजीवन इतिहास सातत्याने आढळत नाही. सामाजिक प्रश्नांचा इतका सजग ऊहापोह आणि उत्थानाची तीव्र उर्मी हीही काळाच्या एका लहानशा तुकड्यात उत्कटतेने नेहमी जाणवत नाही."

टिळकांसह तेव्हाच्या काळात समाजकारणात वावरणाऱ्या सर्वांची भूमिका लक्षात घ्यायला ही वाक्यं पुरेशी आहेत.

संदर्भ आणि अधिक वाचनासाठी-

  • आमच्या आयुष्यातील काही आठवणी- रमाबाई रानडे- वरदा प्रकाशन
  • फेमिनिस्ट व्हिजन ऑर 'ट्रेजन अगेन्स्ट मेन'?- मीरा कोसंबी- पर्मनंट ब्लॅक
  • लो. टिळक यांचे चरित्र, पूर्वार्ध सन 1899 अखेर- न. चिं. केळकर- प्रकाशक न. चिं. केळकर, पुणे
  • विस्मृतीचित्रे- अरुणा ढेरे- श्रीविद्या प्रकाशन
  • टिळक, गीता आणि 'रहस्य'- विनय हर्डीकर- साप्ताहिक साधना, दिवाळी अंक,2017

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)