'लोकमान्य टिळक आणखी काही वर्षं जिवंत असते तर फाळणी टळली असती'

फोटो स्रोत, PIB
- Author, अनंत प्रकाश
- Role, प्रतिनिधी, बीबीसी
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती. महात्मा गांधींच्या आधी राष्ट्रीय पातळीवरचे नेते म्हणून लोकमान्य टिळकांचं नाव घेतलं जायचं. महात्मा गांधींनी सुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहताना आपल्या काळातले एक मोठे नेते असं संबोधलं होतं.
पण सध्याचं राजकारण आणि राजकीय पक्षांतून टिळक दूर झालेले दिसतात. राजकारणात धर्माचा शिरकाव केल्याचा आरोपसुद्धा त्यांच्यावर होतो.
लोकमान्य टिळकांवर 100 Years of Tilak-Jinnah Pact हे पुस्तक लिहिणाऱ्या सुधींद्र कुलकर्णींना मात्र ही बाब अतिशय दु:खद वाटते.
सुधींद्र कुलकर्णी म्हणतात, "टिळक कधीच हिंदुत्वववादाचा पुरस्कार करणारे नेते नव्हते. डाव्या पक्षांच्या नेत्यांनाही टिळक नीट समजतच नाहीत. भारतात हिंदू हा सगळ्यात मोठा समाज आहे. शिवजयंती आणि गणेशोत्सव या सार्वजनिक सणांद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभं करून जनजागृती करणं हे टिळकांचं उद्दिष्ट होतं."
"पण हा मुस्लीमविरोधी विचारसरणीचा परिणाम नव्हता. ते मोहरममध्ये सुद्धा सामील झाले होते. लखनौच्या अधिवेशनात त्यांनी सांगितलं की मला ब्रिटीश शासन संपवायचं आहे. असं करताना जर काहीकाळासाठी जर सत्ता मुस्लिमांच्या हातात गेली चालेल कारण ही मंडळी आपलीच आहेत. त्यामुळे त्यांना हिंदुत्ववादी म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे."
टिळकांचं राजकारण
लोकमान्य टिळकांनी 1908 ते 1914 पर्यंत देशद्रोहाच्या आरोपाखाली मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगली.
त्याचं कारण टिळकांनी आपल्या केसरी या वृत्तपत्रात मुज्जफरपूरमधले क्रांतिकारी खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकींच्या खटल्याबाबत लिहित स्वराज्याची मागणी केली होती. या दोघांवरही एका युरोपियन महिलेच्या हत्येचा आरोप होता.
प्रकरणाची सुनावणी जस्टिस दिनशॉ डावप नावाचे एक न्यायाधीश करत होते आणि त्यावेळी टिळकांचे वकील होते मोहम्मद अली जिन्ना.

फोटो स्रोत, PMO India
जिन्ना यांनी टिळकांना जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. पण हा प्रयत्न यशस्वी झाला नाही आणि टिळकांना सहा वर्षांची शिक्षा झाली.
सुधींद्र कुलकर्णी म्हणतात, "सगळ्या महापुरुषांसारखीच अनुभवांच्या आधारावर टिळकांची विचारांची बैठक बदलली. आधीचे आणि नंतरचे टिळक यांच्यात फार बदल होता. मंडालेच्या तुरुंगात पाठवणी ही त्यांच्या आयुष्यातली मोठी घटना होती. तुरुंगातून परतल्यावर त्यांचे विचार आणि राजकारण दोन्ही बदललं होतं."
टिळक-जिन्ना आणि भारताचे दोन तुकडे
स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही भारत आणि पाकिस्तानवर विभाजनाचे व्रण कायम आहेत. मात्र सुधींद्र कुलकर्णी यांचा मुद्दा लक्षात घेतला तर लोकमान्य टिळक आणखी काही वर्षं जिवंत असते तर भारताचं भविष्य वेगळं असतं.

फोटो स्रोत, Hulton Archive
ते म्हणतात, "टिळक आणखी काही वर्षं जिवंत असते तर कदाचित भारताची फाळणी टळली असती. कारण 1916 मध्ये झालेल्या टिळक- जिन्ना करारात टिळकांनी हिंदू-मुस्लीम एकता आणि दोन्ही समाजांच्या सत्तेतल्या भागीदारीचा फॉर्म्युला काढला होता. तो जर तसाच असता तर पुढे भारताची फाळणी झाली नसती आणि हा सगळा त्रास वाचला असता."
टिळकांच्या जवळ मात्र गांधीच्या दूर
तसं पाहिलं तर जिन्नांना मुस्लीमांचे नेते म्हणून पाहिलं जातं. कुलकर्णी सांगतात की जिन्ना स्वत:ला कधीच मुस्लिमांचे नेते मानत नसत. राजकारणात धर्माचा शिरकाव होऊ नये असंही त्यांन वाटायचं. म्हणूनच गांधीजींच्या खिलाफत चळवळीला पाठिंबा देण्याला त्यांचा विरोध होता.
मात्र मोहम्मद अली जिन्ना टिळकांच्या शेवटच्या दिवसात त्यांच्या जवळ आले होते. दोघांमध्येही हिंदू-मुस्लीम समाजाच्या राजकीय भागीदारीबाबत एकमत झालं होतं. पण 1920 साली टिळकांच्या मृत्यूनंतर मात्र जिन्ना काँग्रेसच्या राजकारणापासून दूर गेले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








