राजद्रोह: लोकमान्य टिळक यांच्या मंडाले तुरुंगातील स्मारकाची गोष्ट

राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांनी स्वतःच आपली बाजू मांडली

फोटो स्रोत, Kesari Maharatta Trust, Pune

फोटो कॅप्शन, राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांनी स्वतःच आपली बाजू मांडली
    • Author, सिद्धनाथ गानू
    • Role, बीबीसी मराठी

लोकमान्य टिळक 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हणून ओळखले जातात. 1908 साली राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही झाली.

म्यानमारमधील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी ही शिक्षा भोगली हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, त्यांनी तिथे गीतारहस्य हा ग्रंथ लिहीला हेदेखिल सर्वश्रुत आहे.

पण याच तुरुंगात टिळकांच्या निधनानंतर 39 वर्षांनी त्यांचं स्मारक उभारलं गेलं हे तुम्हाला माहीत आहे का? राजद्रोहाचा खटला, टिळकांचा तुरुंगवास आणि टिळकांच्या निधनानंतर स्वतंत्र भारताच्या सरकारने मंडालेमध्ये बांधलेल्या टिळक स्मारकाची ही गोष्ट.

'राजद्रोह' आणि टिळकांचा कारावास

काँग्रेसमधल्या जहाल गटाचे नेते, स्वराज्य आणि राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते म्हणून टिळकांची ओळख होती. टिळकांवर 11 वर्षांच्या अंतराने दोन वेळा (सन 1897 आणि सन 1908) राजद्रोहाचा खटलाही चालवला गेला. 1908 सालच्या खटल्यानंतर टिळकांना 6 वर्षांची शिक्षा ठोठावली गेली. त्या खटल्यावेळची भारतातील परिस्थिती अत्यंत उलथापालथीची होती.

'जहाल' त्रिकुट: लाल- बाल- पाल

फोटो स्रोत, Kesari Maharatta Trust, Pune

फोटो कॅप्शन, 'जहाल' त्रिकुट: लाल- बाल- पाल

1907 साली काँग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ यांच्यात बेबनाव होऊन फूट पडली होती. 1908 साली मुझफ्फरपूरमध्ये बाँबस्फोट झाले आणि त्यानंतर टिळकांच्या 'केसरी' या दैनिकातून त्यावर अग्रलेख, स्फुटं लिहिली जाऊ लागली.

ब्रिटीश सत्तेविरोधात लोकांना भडकवल्याचा आरोप करत टिळकांवर राजद्रोहाचा ठपका ठेवण्यात आला. टिळकांनी लिहिलेले 'देशाचे दुर्दैव' आणि 'हे उपाय पुरेसे नाहीत' हे दोन अग्रलेख या खटल्यासाठी आधार म्हणून घेतले गेले.

राजद्रोहाचा खटला- घटना कशा घडल्या?

  • 24 जून 1908- टिळकांना मुंबईतल्या सरदारगृह इथून अटक केली गेली. काही दिवसांपूर्वीच टिळक पुण्याहून 'काळ' दैनिकाचे संपादक श्री एस एम काळे यांना त्यांच्यावर सुरू असलेल्या एका खटल्यात कायदेशीर मदत करण्यासाठी मुंबईत आले होते.
  • 25 जून 1908 - टिळकांचं घर आणि प्रेस यांच्यावर छापे पडले, यात टिळकांच्या घरातून एक पोस्ट कार्ड मिळालं ज्यावर स्फोटकांशी संबंधित दोन पुस्तकांची नावं लिहिलेली होती. तिकडे मुंबईत टिळकांचा जामीन अर्ज फेटाळला गेला.
  • 26 जून 1908, मुंबई - टिळकांवर दुसरा आरोप ठेवला गेला आणि तुरुंगातच वॉरंट बजावलं गेलं. कलम 124A आणि 153 खाली दोन स्वतंत्र खटले भरले गेले. टिळक या काळात डोंगरीच्या तुरुंगात होते.
  • 2 आणि 3 जुलै 1908, मुंबई - जस्टिस दावर यांच्यासमोर मोहम्मद अली जिन्ना यांनी टिळकांच्या जामीन अर्जावर युक्तीवाद केला. जामीन पुन्हा फेटाळला गेला. टिळकांच्या खटल्याच्या सुनावणीसाठी एका विशेष ज्युरीची नेमणूक झाली.

13 जुलैपासून खटल्याला सुरुवात झाली. टिळकांवर दोन खटले भरले गेले होते ते एकत्र करून चालवणं कितपत योग्य होतं हा वादाचा विषय ठरला, पण न्यायाधीशांनी त्याला परवानगी दिली.

मराठीतून लिहिलेले दोन अग्रलेख टिळकांवरच्या राजद्रोहाच्या आणि लोकांना भडकवण्याच्या आरोपांचा आधार होते. पण हा खटला ऐकणारी ज्युरी पूर्णतः अमराठी लोकांची होती.

यात 7 युरोपीय आणि 2 पारशी असे 9 सदस्य होते. जिन्नाह, बाप्टिस्टा या वकिलांनंतर खुद्द टिळकांनीच स्वतःची बाजू मांडली. चार दिवसांत मिळून टिळकांनी एकूण 21 तास 10 मिनिटं युक्तीवाद केला, असं खुद्द न्यायाधीशांनीच नोंदवून ठेवलं होतं.

टिळकांची निकालावरील प्रतिक्रिया

फोटो स्रोत, Kesari Maharatta Trust, Pune

फोटो कॅप्शन, टिळकांची निकालावरील प्रतिक्रिया

22 जुलैला दुपारी टिळकांचा ज्युरीसमोरचा युक्तीवाद संपला, संध्याकाळी न्यायाधीशांनी हा खटला त्याच दिवशी निकाली काढणार असल्याचं जाहीर केलं.

दुसऱ्याच दिवशी टिळकांचा जन्मदिवस होता. टिळकांवरचे तिन्ही आरोप ज्युरीने मान्य केले. टिळकांना दोषी ठरवत कोर्टाने 1 हजार रुपयांचा दंड आणि 6 वर्षांचा कारावास सुनावला. टिळकांनी शिक्षा ऐकल्यानंतर म्हटलेल्या ओळी इतिहासात नोंदवल्या गेल्या,

"ज्युरीने मला दोषी ठरवले तर खुशाल ठरवो. पण मी गुन्हेगार नाही. लौकिक गोष्टींचे नियंत्रण करणारी एक शक्ती या न्यायपीठाहून वरिष्ठ आहे. मला शिक्षा व्हावी आणि मी शिक्षा भोगल्यानेच मी अंगिकारलेल्या कार्याला उर्जितावस्था यावी, अशी कदाचित या शक्तीचीच इच्छा असेल."

खटला आजच निकाली निघणार हे कळल्यानंतर कोर्टाबाहेर गर्दी जमू लागली. अध्येमध्ये पावसाच्या सरी येत असूनही लोक निकाल येण्याची वाट पाहत थांबले. कोर्टाबाहेर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टिळकांना शिक्षा झाल्यानंतर मुंबईत असंतोष पसरला

फोटो स्रोत, Kesari Maharatta Trust, Pune

फोटो कॅप्शन, टिळकांना शिक्षा झाल्यानंतर मुंबईत असंतोष पसरला

टिळकांना शिक्षा झाल्यानंतर मुंबईत संताप दिसायला लागला. व्यापाऱ्यांनी बंद पुकारला, गिरणी कामगारांनी संप केला, काही ठिकाणी दंगलीच्याही घटना घडल्या, लष्कराला बोलवून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.

या काळात टिळकांना साबरमतीच्या तुरुंगात ठेवलं गेलं. साबरमतीहून टिळकांना बोटीने रंगूनला आणि तिथून मंडालेला तुरुंगात रवाना केलं गेलं.

मंडालेच्या तुरुंगातले दिवस आणि गीतारहस्य

लोकमान्य टिळकांना सहा वर्षांची शिक्षा मंडालेच्या तुरुंगात राहून भोगायची होती. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांनी सुरुवातीचा काळ आपल्या शिक्षेविरोधात अपील करण्याच्या कामात स्वतःला गुंतवून घेतलं होतं. पण त्यांच्या अपिलाला हाय कोर्टात यश आलं नाही.

केसरी संग्रहालयात मंडालेच्या कोठडीची प्रतिकृती

फोटो स्रोत, Kesari Maharatta Trust, Pune

फोटो कॅप्शन, केसरी संग्रहालयात मंडालेच्या कोठडीची प्रतिकृती

टिळकांनी यानंतर गीतारहस्यच्या लिखाणाला सुरुवात केली. म्यानमारमधील पारागू या लेखकाने टिळकांच्या मंडालेमधील वास्तव्याबद्दल Ganges and Irrawaddy (गंगा आणि इर्रवाडी या अनुक्रमे भारत आणि म्यानमारमधील नद्या आहेत) या आपल्या पुस्तकात लिहिलंय.

पारागू म्हणतात, "सुरुवातीला टिळकांना आपल्या अभ्यासासाठी तुरुंगात पुस्तकं आणि संदर्भग्रंथ आणण्यास मनाई करण्यात आली होती. त्यांनी याचा विरोध केला आणि त्यानंतर त्यांना एकावेळी 4 पुस्तकं आणण्याची परवानगी देण्यात आली. असं करत त्यांनी सुमारे 350-400 पुस्तकं तुरुंगात आणली. त्यांना लिखाणासाठी पेन नव्हे तर पेन्सिल दिली गेली होती. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर टिळकांना गीतारहस्यची हस्तलिखितं परत भारतात आणण्यासाठी परवानगी नाकारली गेली, पण त्यांनी त्याला विरोध करून ती हस्तलिखितं भारतात आणली.'

मंडालेमधील टिळकांचं स्मारक

टिळकांच्या सहा वर्षांच्या कारावासाच्या खुणा मंडालेमध्ये त्यांच्या निधनानंतर काही दशकं टिकून होत्या. भारत सरकारने टिळकांसाठी मंडालेच्या तुरुंगाच्या प्रांगणातच 6 एप्रिल 1959 या दिवशी एक लहानसं स्मारक उभारलं होतं.

7 एप्रिल 1959 'म्यानमा लँझिन' या म्यानमारच्या दैनिकात स्मारकाच्या उद्घाटनाची बातमी.

फोटो स्रोत, Ludu Archive

फोटो कॅप्शन, 7 एप्रिल 1959 'म्यानमा लँझिन' या म्यानमारच्या दैनिकात स्मारकाच्या उद्घाटनाची बातमी.

याबद्दल बोलताना भारताचे म्यानमारमधले राजदूत सौरभ कुमार यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "1954 साली मंडालेला भेट देणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने भारत सरकारला मंडाले तुरुंगात टिळकांचं स्मारक उभारण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत भारत सरकारने 1959 साली मंडाले तुरुंगाच्या प्रांगणात एक लहानसं सभागृह बांधलं. तसंच टिळकांच्या सन्मानार्थ त्या सभागृहाच्या दरवाजावर एक पाटीही बसवली गेली."

या सभागृहाचा ग्रंथालयासारखा वापर केला जात असे आणि या बांधकामासाठी त्याकाळी 50 हजार क्याट्स (म्यानमारचं चलन) खर्च आला होता असं म्यानमारमधील काही दस्तावेजांमधून कळतं. या सभागृहाशेजारीच तुरुंगाच्या प्रांगणातच एक पोहण्याचा तलावही होता.

टिळकांना तुरुंगातल्या ज्या इमारतीत ठेवलं गेलं त्याच्या शेजारच्या इमारतीत म्यानमारमधील इतर राजकीय कैद्यांना 1950 ते 1990 या चार दशकांच्या काळात ठेवलं जात असे. त्यांच्यातल्या काही कैद्यांनी हे सभागृह आणि या तलावाबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत.

1987 सालच्या ऑगस्ट महिन्यात लोकमान्य टिळकांचे नातू आणि महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती जयंत टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगाला आणि या सभागृहाला भेट दिली होती.

लोकमान्य टिळकांचे नातू जयंतराव टिळक यांनी 1987 साली मंडाले कारागृहाला भेट दिली होती.

फोटो स्रोत, Kesari Maharatta Trust, Pune

फोटो कॅप्शन, लोकमान्य टिळकांचे नातू जयंतराव टिळक यांनी 1987 साली मंडाले कारागृहाला भेट दिली होती.

मंडालेचा जुना तुरुंग हा मंडालेच्या किल्ल्याच्या आत होता. 1990 च्या दशकात मंडालेत नवीन तुरुंग बांधण्यात आला आणि संपूर्ण किल्ल्याच्या परिसर म्यानमार लष्कराच्या वापरासाठी देण्यात आला आणि जुन्या तुरुंगाचं बांधकाम पाडण्यात आलं असावं अशी माहिती राजदूत सौरभ कुमार यांनी दिली.

लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची पुण्यात भेट झाली होती.

फोटो स्रोत, Kesari Maharatta Trust, Pune

फोटो कॅप्शन, लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची पुण्यात भेट झाली होती.

म्यानमारच्या तुरुंगात कैद झालेले पहिले भारतीय नेते लोकमान्य टिळक होते. टिळकांची 1914 साली मंडालेमधून सुटका झाली आणि ते पुण्यात परतले तेव्हा पुण्यात मोठा जल्लोष झाला. टिळकांचं जंगी स्वागतही झालं.

बर्मीज लेखक पारागू यांनी आपल्या पुस्तकात एक महत्त्वाचा संदर्भ दिला आहे. ते म्हणतात, '1929 साली महात्मा गांधी जेव्हा म्यानमारमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी मंडालेला भेट दिली होती. त्यावेळी गांधीजींनी म्हटलं होतं, "भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग मंडालेमधून जातो. टिळक, बोस आणि बंगालच्या सुपुत्रांना मंडालेच्या तुरुंगात ठेवलं गेलं होतं."

टिळकांच्या निधनानंतर स्वातंत्र्य चळवळीची सूत्रं सर्वार्थाने गांधीजींच्या हाती आली आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या एका जहाल प्रकरणावर पडदा पडला.

(बीबीसीच्या बर्मीज सेवेचे बोबो लॅन्सिन यांनी दिलेले मंडालेमधील विशेष संदर्भ या लेखात समाविष्ट करण्यात आले आहेत.)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)