इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला, पश्चिम आशियात तणाव वाढला

इराणचा इस्रायलवर हल्ला

इराणनं पहिल्यांदाच आपल्या भूमीवरून इस्त्रायलवर 'अभूतपूर्व' हल्ला केला आहे. ड्रोन आणि क्षेपणास्त्र इराणनं इस्रायलवर डागलेत.

इस्रायलच्या संरक्षण प्रणालीने इराणच्या क्षेपणास्त्रांना हवेत प्रत्युत्तर दिलं, यावेळी स्थानिकांना सायरन आणि मोठमोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले.

इराणने इस्रायलच्या दिशेने सोडलेली काही क्षेपणास्त्रं अमेरिकेनेही निकामी केली, अशी माहिती इस्रायलच्या संरक्षण दलाने दिली, तर "विशिष्ट लक्ष्य निर्धारित करून" क्षेपणास्त्र आणि ड्रोन सोडल्याचा दावा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स केलाय.

इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने सांगितलं की, आम्ही हाय-अलर्टवर असून सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवर लक्ष ठेवून आहोत.

या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तातडीने त्यांच्या युद्ध मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे.

या सगळ्या अचानक आणि अभूतपूर्व घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

काही दिवसांपूर्वीच, म्हणजे एक एप्रिल 2024 रोजी सीरियातील इराणच्या दूतावासावर झालेला हल्ला इस्रायलनं केला होता, असा दावा इराणनं केला. सीरियातील दूतावासावरील हल्ल्याचे परिणाम इस्रायलला भोगावे लागतील, असा इशाराही इराणने दिला होता. त्यामुळे इराण इस्रायलवर अशा प्रकारचा हल्ला करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती.

इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायल, लेबनॉन आणि इराकने आपापली हवाई क्षेत्रे बंद केली असून, सीरिया आणि जॉर्डनने त्यांच्या हवाई संरक्षण दलाल सतर्क केलं आहे.

इस्रायलच्या संरक्षण दलाचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी म्हणाले, "इराणने इराणच्या भूमीतून थेट इस्रायलवर हल्ला केला आहे. आम्ही इराणने सोडलेल्या ड्रोनवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. इराणने एक अतिशय आक्रमक आणि गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे."

इराणचा इस्रायलवर हल्ला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ड्रोन हल्ल्यावेळची दृश्य

इराणच्या ड्रोन हल्ल्याच्या बातम्या येण्यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले होते की, इस्रायलची "संरक्षणात्मक यंत्रणा" तैनात करण्यात आली आहे.

नेतन्याहू पुढे म्हणाले होते की, "आम्ही सगळ्या बाजूंनी तयार आहोत. आमच्या देशाचा बचाव करण्यासाठी किंवा आक्रमणासाठी आम्ही सज्ज आहोत. इस्रायल हा एक मजबूत देश आहे. आमचं संरक्षण दल तयार आहे. या देशात राहणारे नागरिक खंबीर आहेत.

"इस्रायलच्या पाठीशी उभ्या असलेल्या अमेरिकेचे तसेच ब्रिटन, फ्रान्स आणि इतर अनेक देशांच्या पाठिंब्याचे आम्ही स्वागत करतो."

या आठवड्याच्या सुरुवातीला इस्रायलच्या संरक्षण आणि परराष्ट्र मंत्र्यांनी इशारा दिला होता की, जर इराणने इस्रायलवर हल्ला केला तर इस्रायल इराणला प्रत्युत्तर देईल.

ऑपरेशन 'मिशन ट्रू प्रॉमिस'

इराणच्या लष्कराने एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की, हा हल्ला इस्रायलकडून होणाऱ्या सततच्या गुन्ह्यांना उत्तर म्हणून करण्यात आला आहे.

एक एप्रिलला सीरियातल्या वाणिज्य दूतावासावर झालेल्या हल्ल्यासाठीही इराणने इस्रायलला जबाबदार धरलं आहे.

इराणने जारी केलेल्या लष्करी निवेदनात या हल्ल्याला ‘Operation True Promise’ असं नाव देण्यात आलं आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या हवाई दलाने इस्रायलच्या दिशेने डझनभर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले आहेत.

इराणचा इस्रायलवर हल्ला

फोटो स्रोत, EPA

इराणच्या हल्ल्यावर भारताने काय प्रतिक्रिया दिली?

इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात निर्माण झालेल्या परिस्थितीवर भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एक प्रतिक्रिया जारी केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

भारताच्या निवेदनात असं म्हटलं आहे की, "इस्रायल आणि इराणमधील तणावामुळे या भागातील शांतता आणि सुरक्षेला धोका आहे आणि आम्ही याबद्दल अत्यंत चिंतित आहोत."

"आम्ही दोन्ही बाजूंना हिंसेपासून परावृत्त होण्याचा आणि मुत्सद्देगिरीचा वापर करून शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचा सल्ला देतो."

या निवेदनात पुढे असं लिहिण्यात आलंय की, “या नवीन परिस्थितीचं बारकाईने निरीक्षण केलं जात आहे आणि तिथे राहणाऱ्या भारतीय समुदायाशी संपर्क राखला जात आहे."

अमेरिका आणि इंग्लंडचं इस्रायलला समर्थन

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी संपर्क केला. दोघांमध्ये फोनवरून चर्चा सुरू झाली.

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू फोनवर बोलत असल्याचा फोटो इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आला आहे.

सीबीएस न्यूजनुसार, अमेरिकेने इराणचे काही ड्रोन पाडले आहेत.

नेतन्याहू

फोटो स्रोत, Israeli PM's office

इराणने हल्ला केल्याच्या बातमीनंतर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते ॲड्रिन वॉटसन म्हणाले की, "राष्ट्राध्यक्ष बायडन यांची भूमिका स्पष्ट आहे. इस्रायलच्या सुरक्षेला आमचा पाठिंबा आहे. अमेरिका इस्रायली नागरिकांच्या पाठीशी उभी राहील आणि इराणच्या या हल्ल्यांपासून स्वतःचा बचाव करणाऱ्या इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा असेल."

तर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी इराणच्या या हल्ल्याचा निषेध केला आणि म्हणाले की, "इस्रायलच्या आणि आमच्या सर्व प्रादेशिक भागीदारांच्या सुरक्षेसाठी इंग्लंड त्यांच्यासोबत उभा राहील."

दुसरीकडे, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशन गार्ड कॉर्प्स (IRGC) ने सांगितलं आहे की, "दमास्कसमधील इराणी दूतावासाच्या हल्ल्यासह झिओनिस्ट राजवटी (इस्रायल) ने वारंवार केलेल्या गुन्ह्यांचा बदला म्हणून हा हल्ला केला आहे."

इराणने आता सांगितलं आहे की, आम्ही आणखी हल्ले करणार नाही, पण इस्रायलने प्रत्युत्तरादाखल काही कारवाई केली किंवा अमेरिकेने हस्तक्षेप केला तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ.

जो बायडन आणि त्यांचे सहकारी

फोटो स्रोत, X/@POTUS

फोटो कॅप्शन, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना या हल्ल्याची कल्पना देण्यात आली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन 'जी-7' राष्ट्रांची बैठक घेणार

इराणच्या हल्ल्यावर निवेदन करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले की, रविवारी हे 'जी-7' राष्ट्रांची एक बैठक घेणार आहेत. इराणच्या हल्ल्याला संयुक्तपणे प्रत्युत्तर देण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आलेल्या आहे.

यासोबतच त्यांनी या निवेदनात हेही सांगितलं की त्यांची टीम इस्रायलच्या नेत्यांच्या सतत संपर्कात राहील.

इस्रायलमधील अमेरिकेच्या संपत्तीवर किंवा इमारतींवर हा हल्ला झालेला नसला तरी सर्व प्रकारच्या धोक्यांसाठी अमेरिका तयार असल्याचं बायडन म्हणाले.

"आम्ही आमच्या नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कोणतंही पाऊल उचलायला मागेपुढे पाहणार नाही, " असं बायडन म्हणाले.

इराणच्या हल्ल्याचे काय परिणाम होऊ शकतात?

बीबीसीच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी लीस डुसेट यांचं विश्लेषण :

संपूर्ण जगासाठी हा हल्ला ही एक चिंतेची बाब आहे. हा प्रदेश अनिश्चिततेने व्यापलेला आहे.

इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये बऱ्याच काळापासून अप्रत्यक्ष लढाया होत होत्या पण आता पहिल्यांदाच इराण स्वतःच्या देशातून इस्रायलला लक्ष्य करत आहे.

हा हल्ला इराणचे समर्थन असलेल्या एखाद्या संघटनेचा नाहीये. खरंतर या प्रदेशात इराणने अशा अनेक संघटनांना मदत केली आहे. यांच्याच माध्यमातून इराण त्यांच्या देशावर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत असतो.

 मिसाईल

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने सांगितले की त्यांनी इस्रायलवर "डझनभर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे" सोडली आहेत (फाइल फोटो)

इस्रायलने इराणला दहशतवादाचा जगातील सर्वात मोठा प्रायोजक असं म्हटलं आहे. तर इराणमध्ये1979 ला झालेल्या क्रांतीचा मूळ सिद्धांत हा इस्रायलच्या विरोधात आहे. इस्रायल सरकारला इराण 'झायोनिस्ट राजवट' असं म्हणत आलेलं आहे.

गाझा युद्ध सुरू असताना दर महिन्याला असा संघर्ष सुरु होण्याचा धोका वाढत होता.

इराणने याबाबत एक प्रदीर्घ सामरिक धोरण राबवलं होतं. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी 1989च्या विनाशकारी इराण-इराक युद्धानंतर एखाद्या देशाविरोधात थेट युद्धात उतरण्याचं टाळलं होतं.

त्यामुळे या नवीन संघर्षाचा जागतिक पटलावर काय परिणाम होईल हे येणारा काळच सांगू शकेल.

संयम राखा, संयुक्त राष्ट्राचं आवाहन

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, "या हल्ल्यामुळे हा प्रादेशिक संघर्ष अधिक विध्वंसक आणि मोठा होण्याची भीती आहे."

गुटेरेस यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, "आज संध्याकाळी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणने इस्रायलवर केलेल्या या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. मी हा संघर्ष तात्काळ थांबवण्याची मागणी करत आहे."

गुटेरेस पुढे म्हणाले की. "मी सर्व पक्षांना विनंती करतो की, मध्यपूर्वेतील अनेक आघाड्यांवर मोठ्या लष्करी संघर्षाला कारणीभूत ठरणारी कोणतीही कृती टाळण्यासाठी जास्तीत जास्त संयम बाळगावा. आम्ही वारंवार हे सांगितलं आहे की या प्रदेशाला किंवा जगाला आणखीन एक युद्ध परवडणार नाही."

अँटोनियो गुटेरेस

फोटो स्रोत, Reuters

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक होणार

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेच्या अध्यक्ष व्हेनेसा फ्रेझियर यांनी सांगितलं की, इराणने इस्रायलवर केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद रविवारी तातडीची बैठक घेणार आहे.

इस्रायलने व्हेनेसा फ्रेझियर यांना पत्र लिहून ही बैठक घेण्याची मागणी केली होती. इस्रायलने लिहिलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या शांतता आणि सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

या पत्रात इराणने गाझामधील हमास, लेबनॉनमधील हिजबुल्लाह आणि येमेनमधील हौथींना पाठिंबा देऊन आंतरराष्ट्रीय दायित्वांचे उल्लंघन केल्याचा आणि 'अस्थिरतेला प्रोत्साहन' दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पत्रात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स या इराणी सशस्त्र दलाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची मागणी इस्रायलने सुरक्षा परिषदेकडे केली आहे.

व्हेनेसा फ्रेझियर यांना इराणने देखील एक पत्र लिहिलंय. त्यात 'संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरमधील अनुच्छेद 51 मध्ये उल्लेख केल्यानुसार, इस्रायलच्या वारंवार होणाऱ्या लष्करी आक्रमणाला प्रतिसाद म्हणून स्व-संरक्षणासाठी हा हल्ला केला असल्याचं' सांगत इराणने स्वतःचा बचाव केला आहे.