येमेनमधील हुती बंडखोरांच्या तळावर अमेरिकेचे हल्ले

हुती

फोटो स्रोत, Getty Images

रविवारी अमेरिकेने येमेनमधील हुतींच्या क्षेपणास्त्र तळांवर हल्ले केले, असं अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (सेंटकॉम) ने ‘एक्स’वरील एका निवेदनात म्हटलंय.

सेंटकॉमने सांगितलं की अमेरिकन सैन्याने हुतींच्या तळांना लक्ष्य केले. तांबड्या समुद्रातील जहाजांना लक्ष्य करण्यासाठी ही क्षेपणास्त्रं वापरण्यात येणार होती, ती अमेरिकेनी नष्ट केल्याचा दावा अमेरिकेनी केला.

अमेरिका-इंग्लंडने हुतींच्या नियंत्रणाखालील भागावर हल्ले केल्याच्या दुसऱ्या दिवशी ही नवीन लष्करी कारवाई करण्यात झाली.

इराणचा पाठिंबा असलेल्या येमेनी हुती गटांकडून तांबड्या समुद्रातील लष्करी आणि मालवाहतूक करणाऱ्या जहाजांवर सतत होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

हुतींच्या हल्ल्यांमुळे मोठ्या शिपिंग कंपन्यांना जलमार्गाचा वापर बंद करावा लागला आहे, ज्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर झालाय.

इजिप्तने म्हटलंय आहे की, सुएझ कालव्यातून मिळणारा महसूल जानेवारी महिन्यात जवळपास निम्म्याने घसरला आहे, मागच्या महिन्यात प्रमुख व्यापारी जलमार्गांने प्रवास करणाऱ्या जहाजांची संख्या एक तृतीयांशपेक्षा कमी झाली आहे.

पॅलेस्टाईन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हुथी बंडखोर काही काळापासून तांबड्या समुद्रातून प्रवास करणाऱ्या इस्त्रायल समर्थक देशांच्या जहाजांवर हल्ले करत आहेत. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारी वाहतुकीवर झाला आहे. या हल्ल्यांमुळे तांबड्या समुद्रातून सुएझ कालव्यातून जाण्याऐवजी जहाजांना लांबचा रस्ता पकडावा लागतोय.

'हल्ल्यांमुळे जमीन हादरली'

अमेरिका-ब्रिटनतर्फे शनिवारी करण्यात आलेल्या संयुक्त हल्ल्यांनी येमेनची राजधानी साना शहरावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ही परिस्थिती इतक्यात बदलणार नाही, असं रविवारच्या हल्ल्यानंतर पुन्हा दिसून आलंय. हे हल्ले ही तर सुरुवात असल्याचा इशारा व्हाईट हाऊसने दिलाय, तर या हल्ल्यांमुळे खचून जाणार नसल्याचं हुथी प्रवक्ते याह्या सारेआ यांनी ट्वीट करत म्हटलंय. या घडामोडी सुरू असतानाच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन पश्चिम आशियाच्या दौऱ्यावर असून अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना भेटी देत आहेत.

हल्ल्यामुळे घरं हादरत होती असं एका मानवाधिकार कार्यकर्त्याने आणि स्थानिक रहिवाशाने बीबीसीला सांगितलं.

अमेरिकेच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या हल्ल्याला योग्य उत्तर दिलं जाईल असा इशारा हुती बंडखोरांनी दिला आहे.

शनिवारच्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना गटाचे लष्करी प्रवक्ते याह्या सारिया यांनी ‘एक्स’वर लिहिलं: “हे हल्ले आम्हाला गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी लोकांच्या समर्थनार्थ आमच्या नैतिक, धार्मिक आणि मानवतावादी भूमिकेपासून परावृत्त करू शकणार नाहीत आणि त्याला कोणतंही उत्तर मिळणार नाही किंवा त्याचे कुठलेही परिणाम भोगावे लागणार नाहीत, असं गृहित धरता कामा नये.”

हुती

फोटो स्रोत, Reuters

व्हाईट हाऊसने यापूर्वी इराणला इशारा दिला होता की आणखी कठोर पावलं उचललं जातील.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी रविवारी अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांना सांगितलं की, “आणखी पावलं उचलली जातील.”

गेल्या आठवड्यात जॉर्डनमधील लष्करी तळावर शत्रूच्या ड्रोन हल्ल्यात तीन सैनिकांच्या मृत्यू झाला होता, त्याला अमेरिकेने प्रत्युत्तर दिलं आहे.

ड्रोन हल्ल्यात कोणताही सहभाग असल्याचं इराणने नाकारलंय आणि इराकमधील इस्लामिक रेसिस्टन्स या त्यांच्या संलग्न संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

सदर हल्ल्यामागे तेहरान असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. हे ड्रोन इराणीयन बनावटीचं असल्याचं म्हटलं होतं.

रविवारी काँग्रेसला लिहिलेल्या पत्रात अध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, शुक्रवारी प्रत्युत्तरादाखल झालेल्या हल्ल्यांमध्ये इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीएस) - आणि ‘आयआरजीएस’शी संबंधित कट्टरतावादी गटातर्फे वापरण्यात येणाऱ्या इमारतींना लक्ष्य करण्यात आलं आहे.

अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांविरोधात या प्रदेशातून निषेध व्यक्त होताना दिसत आहे.

या हल्ल्यांबाबत कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती असं इराकच्या पंतप्रधानांचे सल्लागार फरहाद अलादिन यांनी म्हटले आहे.