किम जू आए: किम जॉंग-उन यांची मुलगी, जी होऊ शकते त्यांची उत्तराधिकारी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, लुईस बारुचो
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
किम जू आए हिच्याकडे उत्तर कोरियाचे नेते किम जाँग-उन यांची उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जातंय.
उत्तर कोरियाचे नेते किम जाँग-उन यांची धाकटी मुलगी किम जू आए ही त्यांची उत्तराधिकारी बनू शकते.
दक्षिण कोरियाची गुप्तचर संस्था नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिस (एनआयएस) ने ही शक्यता व्यक्त केली आहे.
चला, किम जू आएविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया.
किम जाँग-उन आपल्या कुटुंबाबाबत कमालीची गुप्तता पाळतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाविषयी अतिशय कमी माहिती उपलब्ध आहे. लग्नानंतर त्यांनी पत्नी री सोल जू यांच्याबाबतही गुप्तता पाळली होती. 2012 मध्ये पहिल्यांदा त्या सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्या होत्या.
दक्षिण कोरियाच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार 2009 मध्ये त्यांचा विवाह झाला होता. 2010 मध्ये त्यांना एक मुलगा देखील झाला. काही वर्षांनंतर किम जू आएचा जन्म झाल्याचं सांगितलं जातं.
किम जू आए कोण आहे?
2013 मध्ये निवृत्त अमेरिकन बास्केट बॉलपटू डेनिस रॉडमन याने उत्तर कोरियाला भेट दिली तेव्हा किम जू आए हिचं नाव पहिल्यांदा सार्वजनिकरित्या समोर आलं.
तो म्हणाला होता की, 'किम यांच्या कुटुंबासोबत मी छान वेळ घालवला आणि समुद्रकिनारी आराम केला आणि त्यांच्या मुलांसोबतही खेळलो. हे सांगताना त्यांनी मुलीचं नाव जू आए असल्याचं नमूद केलं होतं.'

फोटो स्रोत, EPA-EFE/REX/SHUTTERSTOCK
सियोलमधील कूकमिन विद्यापीठात उत्तर कोरियाच्या राजकारणावर संशोधन करत असलेले फेडर ट्रेटिस्की म्हणतात की, "उत्तर कोरियाची प्रसारमाध्यमं देखील किम जू आए ही किम जाँग-उन यांची मुलगी असल्याचं सांगतात. ते तिचं वय किंवा नाव सांगत नाहीत. यापेक्षा अधिक माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही." त्यांचा असा अंदाज आहे की, किम जू आएचं वय 10 वर्षांच्या आसपास आहे.
किम जू आएचं नाव कोणत्याही शैक्षणिक संस्थेत नोंदवण्यात आलं नसल्याची माहिती मागच्या वर्षी ‘एनआयएस’ने दक्षिण कोरियाच्या नेत्यांना खासगीत दिली होती.
राजधानी प्योंगयांगमध्ये ती घरीच अभ्यास करते. तिला घोडेस्वारी, पोहणं आणि स्किईंगची आवड आहे. ‘एनआयएस’च्या या पत्रकार परिषदेत एका व्यक्तीने पत्रकरांना सांगितलेलं की, किम जाँग-उन आपल्या मुलीच्या घोडेस्वारी कौशल्याबाबत समाधानी आहे.
‘एनआयएस’ने सांगितलं की, किम जू आएला एक मोठा भाऊ आणि तिच्या पाठीवर आणखी एक भावंडं आहे. पण ते मुलगा आहे की मुलगी याची माहिती एजन्सीकडे नाही.
आहे हे सर्वजण कधीच एकत्रितपणे सार्वजनिकरित्या दिसलेले नाहीत.
किम जू आएची पहिली सार्वजनिक उपस्थिती
2022 मध्ये एका क्षेपणास्त्र चाचणी दरम्यान किम जू आए सार्वजनिकरित्या पहिल्यांदा आपल्या वडिलांसोबत दिसली होती. त्यानंतर काही लष्करी आणि निमलष्करी कार्यक्रमांमध्येही ती आपल्या वडिलांसोबत दिसली होती.
अलीकडेच, 1 मे रोजी नवीन वर्षाच्या निमित्ताने प्योंगयांगच्या स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात ती आपल्या वडिलांसोबत दिसलेली. या कार्यक्रमात दोघांनी एकमेकांच्या गालाचं चुंबन घेतलेलं.
डिसेंबरमध्ये, उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्र ह्वासांग-18 च्या घेतलेल्या चाचणीच्या वेळी दोघेही एकत्र दिसले होते. हे उत्तर कोरियाचे सर्वात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे.

फोटो स्रोत, REUTERS
नोव्हेंबरमध्ये मलियांग-1 या गुप्तचर उपग्रहाच्या प्रक्षेपणाच्या वेळीसुद्धा ती तिच्या वडिलांसोबत उपस्थित होती. या उपग्रहामार्फत किम जाँग-उन यांना व्हाईट हाऊसवर नजर ठेवता येईल, असा दावा उत्तर कोरियाने केलाय.
फेब्रुवारी 2023 मध्ये रेडिओ फ्री एशियाने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाच्या सरकारने आणखी एका किम जू आए नावाच्या व्यक्तीला त्यांचं नाव बदलण्याचे आदेश दिले होते.
किमच्या कुटुंबाशी संबंधित एखादी गोष्ट असल्यास, अशा गोष्टी अतिशय सामान्य मानल्या जातात, असंही बातमीत म्हटलेलं.
उत्तर कोरियाच्या निरीक्षकांनी असंही नमूद केलंय की, किम जू आए हिचा उल्लेख आता 'प्रिय' ऐवजी 'आदरणीय मुलगी' म्हणून केला जातोय. 'आदरणीय' हे विशेषण उत्तर कोरियाच्या सर्वांत आदरणीय लोकांसाठी राखीव आहे.
किम जाँग-उन हे उत्तर कोरियाचे पुढचे नेते असतील हे निश्चित झाल्यावर त्यांना 'आदरणीय कॉम्रेड' म्हणून संबोधण्यात येऊ लागलेलं.

फोटो स्रोत, Reuters
संभाव्य उत्तराधिकारी कोण आहे?
उत्तर कोरिया हा एक वेगळा देश आहे, त्यामुळे अलीकडे वारंवार किम जू आए तिच्या वडिलांसोबत का दिसू लागलेय हे उर्वरित जगाला अद्याप समजू शकलेलं नाही.
उत्तर कोरियाच्या लोकांना असं सांगितलं जातं की, किम हे अतिशय पवित्र वंशातून येतात, त्यामुळे तेच देशाचं नेतृत्व करू शकतात.
काही विश्लेषकांचं म्हणणं आहे की एवढ्या लहान वयात मुलीला लोकांसमोर सादर करणं हा देखील उत्तर कोरियाच्या नेत्याचा एक डावपेच असू शकतो, जेणेकरुन सत्ता हाती घेण्यापूर्वी त्यांची मुलगी स्वत:ला व्यवस्थितपणे प्रस्थापित करू शकेल.

फोटो स्रोत, PA MEDIA
काही लोकांचं असं म्हणणं आहे की आपण एक पितृतुल्य व्यक्तिमत्व आहोत हे ठसवण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे.
एडवर्ड हॉवेल हे कोरियन द्वीपकल्पाचे तज्ज्ञ आहेत आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात राज्यशास्त्र विषय शिकवतात. ते म्हणतात, "उत्तर कोरियाचे माजी नेते किम जोंग इल आणि किम इल सुंग यांनी आपण देशाचे आई-वडिल असल्यासारखं भासवून त्याचा खूप प्रचार केला गेला होता."
ते म्हणतात, "म्हणून मला असं वाटतं की, सार्वजनिकपणे तिला तिच्या वडिलांसोबत दाखवणं हे प्रतिकात्मकरित्या सुरू आहे."
1948 मधील स्थापनेपासूनच उत्तर कोरियावर किम कुटुंबातील पुरुष सदस्यांनीच राज्य केलंय. भविष्यात जर किम जू आएने तिच्या वडिलांची जागा घेतली, तर देशाचं नेतृत्व करणारी ती पहिली महिला असेल.
हॉवेल म्हणतात, "उत्तर कोरियाच्या नेतृत्वासाठी किम कुटुंबातील सदस्य असणं अतिशय महत्त्वाचं आहे, मग ती व्यक्ती किम कुटुंबातील सदस्य नसण्यापेक्षा त्या जागी एखादी महिला असणं केव्हाही चांगलं.”
संभाव्य उत्तराधिकारी किती आहेत?
किम जाँग-उन यांची आणखी एक संभाव्य उत्तराधिकारी आहे आणि ती म्हणजे त्यांची बहीण किम यो जोंग.
मार्च 2014 मध्ये सरकारी प्रसारमाध्यमांमध्ये त्यांचा पहिल्यांदा सार्वजनिकरित्या उल्लेख केला गेला होता. कोरियाच्या सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या त्या वरिष्ठ पदाधिकारी आहेत.

फोटो स्रोत, KCNA/EPA-EFE/REX/SHUTTERSTOCK
हॉवेल म्हणतात, "किम जू आए पेक्षा त्या वयाने खूप मोठ्या आहेत आणि त्यांना उत्तर कोरियाच्या राजकारणाचादेखील भरपूर अनुभव आहे." अशा परिस्थितीत मुलगी किंवा बहीण, दोघीही महिला असू शकतात, परंतु सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचं किम असणं. दक्षिण कोरियाची गुप्तचर संस्था ‘एनआयएस’ने असंही म्हटलंय की अजूनही सर्व शक्यतांचा विचार सुरू आहे, कारण यात अनेक घटक लक्षात घ्यावे लागणार आहेत.
फेडर ट्रेटिस्कींना असं वाटतं की, त्यांची मुलगी किम जू आए हिला सार्वजनिकरित्या सर्वांसमोर आणून, किम जाँग-उन त्याच्या संभाव्य उत्तराधिकाऱ्याबद्दल सार्वजनिक आणि उच्चभ्रू वर्गाचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत, परंतु जोपर्यंत उत्तराधिकाऱ्यावर शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत यावर काहीच बोललं जाऊ शकत नाही.
मात्र, ते या गोष्टींशी सहमत आहेत की, किम जाँग-उन यांच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल आत्ताच कोणतंही मतप्रदर्शन करणं हे अतिशय धाडसाचं ठरू शकतं.
ते म्हणतात, "समजा ते त्यांच्या वडिलांप्रमाणे वयाच्या 70 व्या वर्षी मरण पावले, तर 2054 मध्ये हे घडेल. कदाचित तोपर्यंत उत्तर कोरिया हा देश सध्याच्या स्वरूपात टिकून राहील, परंतु तेव्हाचा समाज आत्ताच्या समाजासारखा नसेल.”
ते म्हणतात, "सर्वसाधारणपणे स्त्री-पुरुष समानता मानणे आणि शासक म्हणून स्त्रीचा स्वीकार करणे यामध्ये फरक आहे, हेसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








