शेकडो हत्या, आण्विक चाचण्या, कठोर नियंत्रण आणि...- किम जोंग उन यांच्या सत्तेची 10 वर्षं

किम जोंग उन
    • Author, लॉरा बिकर
    • Role, बीबीसी न्यूज, सेऊल

किम जाँग-उन या सत्तावीस वर्षांच्या अननुभवी तरुणाने उत्तर कोरियातील सत्तेची सूत्रं हाती घेतली त्याला दहा वर्षं झाली आहेत. या दशकामध्ये जाँग-उन यांचं नाव माध्यमांमध्ये जितकं गाजलं, तितकं इतर जागतिक नेत्यांचं क्वचितच गाजलं असेल. पण किम जाँग-उन यांच्या राजवटीमधील जगणं कसं आहे?

प्योंग्यांगच्या रस्त्यांवर सर्वत्र शोकाकुल आवाज येत होते.

शालेय गणवेशातील विद्यार्थी ढोपरावर बसून ढसाढसा रडत होते. निराश झालेल्या महिला स्वतःच्या काळजापाशी हात ठेवून शोकाकुल झाल्याची छायाचित्रं प्रसिद्ध झाली.

उत्तर कोरियाचे 'प्रिय नेते' किम जाँग-इल यांचं वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाल्याच्या बातम्या कठोर नियंत्रणाखालील सरकारी माध्यमांनी दिल्या. ही तारीख होती- 19 डिसेंबर 2021.

जगभरातील कोरियन विश्लेषक आपापल्या टेबलापाशी जाऊन बसले आणि एका माणसाशी संबंधित कागदपत्रं काढून तपासायला लागले. हा माणूस म्हणजेच किम जाँग-उन.

केवळ 27 व्या वर्षी जाँग-उन 'थोर उत्तराधिकारी' झाले होते. पण त्यांना खरोखर कशात काही यश मिळेल, असं फारसं कोणाला वाटलं नव्हतं. वय आणि अनुभव यांचा सन्मान करणाऱ्या समाजात या दोन्हीतील कोणत्याच निकषाची पूर्तता न करणाऱ्या व्यक्तीची राजवट कशी चालेल?

अनेकांनी उत्तर कोरियात सैनिकी बंड होईल किंवा तिथला अभिजनवर्ग सत्ता ताब्यात घेईल अशी भाकितं वर्तवली होती. पण जगाने किम जाँग-उन या तरुण हुकूमशहाचा अंदाज बांधताना गफलत केली. जाँग-उन यांनी स्वतःचं स्थान दृढ केलं आहेच, शिवाय त्यांनी 'किम चाँग-उनवाद' अशा नवीन युगाचा आरंभ केला आहे.

त्यांनी सुरुवातीलाच प्रतिस्पर्धांचा नायनाट केला, शेकडो लोकांच्या हत्या करण्यात आल्या आणि मग त्यांनी परराष्ट्र कामकाजाकडे लक्ष वळवलं. चार आण्विक चाचण्या, 100 दृतगतिमान क्षेपणास्त्रांच्या चाचण्या आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा करताना मिळालेली आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी, अशा घडामोडी त्यांच्या आजवरच्या कार्यकाळात घडल्या आहेत.

पण अण्वास्त्रांच्या त्यांच्या ध्यासापोटी देशाला बरीच किंमतही मोजावी लागली आहे. सध्या उत्तर कोरिया संकटात आहे, देशातील गरिबी आणखी वाढली आहे आणि जाँग-उन यांनी सत्ता हाती घेतली तेव्हापासून आतापर्यंत देश अधिक एकटा पडला आहे.

तर, जाँग-उन यांच्या राजवटीत राहणं कसं आहे?

देश सोडून गेलेल्या उत्तर कोरियातील दहा जणांनी- यात एक उच्चस्तरीय राजनैतिक अधिकारीही आहेत- किम जाँग-उन यांच्या 10 वर्षांच्या कारकीर्दीवर भाष्य केलं.

नवीन सुरुवात

किम जाँग-उन यांच्या वडिलांचं निधन झालं त्या दिवशी विद्यार्थीदशेतल्या किम ग्योम-ह्योक याला गोळीच खावी लागली असती, असं कृत्य त्याच्याकडून घडलं. त्या दिवशी त्याने पार्टी दिली होती.

"भयंकर होतं सगळं. पण त्या वेळी आम्हाला खूप आनंद झालेला," असं तो म्हणतो.

व्हीडिओ कॅप्शन, किम जाँग ऊन उत्तर कोरियाला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकतील का?

नवीन तरुण नेते म्हणजे किम जाँग-उन यांना स्किईंगची व बास्केटबॉलची आवड आहे, त्यामुळे ते काही नवीन कल्पना राबवतील, काही बदल घडवतील, असं ग्यूम-ह्योक याला वाटत होतं.

"किम जाँग-उन यांच्याकडून आम्हाला आशा होत्या. ते युरोपात शिकले होते, त्यामुळे ते आमच्यासारखाच विचार करत असतील, असं वाटत होतं," असं तो म्हणतो.

किम जोंग उन

ग्यूम-ह्योग एका उच्चभ्रू कुटुंबातील मुलगा होता आणि त्या वेळी तो बीजिंगमध्ये शिकत होता- उत्तर कोरियात मोजक्याच विशेषाधिकारी लोकांना हा पर्याय परवडतो.

चीनमधील वास्तव्यादरम्यान त्याला अधिक संपन्न जगाची जाणीव झाली आणि त्याने इंटरनेटवर त्याच्या मायभूमीतील बातम्या शोधायला सुरुवात केली.

"सुरुवातीला माझा विश्वासच बसत नव्हता. उत्तर कोरिया कसा आहे, याबद्दल पाश्चात्त्य लोक खोटं बोलत असल्याचं मला वाटलं. पण याबाबती माझ्या भावना आणि माझे विचार वेगवेगळ्या दिशांना जात होते. जास्त काही शोधत बसू नको, असं माझे विचार म्हणत होते. पण अधिक शोध घ्यायची माझी भावना उत्कट होत होती."

उत्तर कोरियातील दोन कोटी 50 लाख जनतेवर कठोर नियंत्रण राखण्यात आलं आहे, त्यामुळे त्यातील बहुतेकांना जागतिक घडामोडींची फारशी माहिती होत नाही, शिवाय आपल्या देशाबद्दल बाहेरचं जग काय विचार करतं आहे याचीसुद्धा त्यांना माहिती नसते.

आपला नेता अनन्यसाधारण दैवी गुणांनी संपन्न असून आपण त्याच्याशी पूर्ण निष्ठा बाळगायला हवी, असं त्यांना शिकवलं जातं.

या पार्श्वभूमीवर याँग-उन यांच्यासारखा तरुण माणूस सत्तेत आल्यामुळे ग्यूम-ह्योक याला काही आशा वाटत होती.

शंका

पण इतर अनेकांच्या मनात शंका होती. किम जाँग-उन हे विशेषाधिकारी कुटुंबात वाढलेलं मूल असून राज्य हाकायला सक्षम नाही, अशी कुजबुज प्योग्यांगमधील सत्तावर्तुळांमध्ये होत होती.

उत्तर कोरियाचे कुवेतमधील माजी राजदूत रयू ह्यून-वू बीबीसीशी बोलताना म्हणाले की, देशाचं नेतृत्व वडिलांकडून मुलाकडे हस्तांतरित होत असल्याबद्दल त्यांच्या सहकाऱ्यांची चीडचीड होत होती.

"पुन्हा घरातच सत्ता राहणार का, असा पहिला प्रश्न माझ्या मनात आला. वारसाहक्काप्रमाणे उत्तराधिकारी निवडण्याच्या प्रक्रियेला उत्तर कोरियातील लोक कंटाळले होते. विशेषतः अभिजन वर्गाला काहीतरी नवीन आणि अभिनव घडायला हवं होतं. काहीतरी वेगळं घडायला नको का, असं आम्हाला वाटत होतं."

किम जोंग उन

1948 साली उत्तर कोरियाची स्थापना झाली तेव्हापासून देशावर किम कुटुंबियांचं राज्य राहिलं आहे. कौटुंबिक वारसा पवित्र असतो, असं देशातील लोकांना शिकवलं जातं. घराणेशाहीला वैधता देण्याचा हा प्रकार आहे.

"'म्हणजे या प्रिय नेत्याची आपण आयुष्यभर सेवा करत राहायचेय, असंच ना?' असे उद्गारही माझ्या कानावर आले."

"सत्तावीस वर्षांच्या तरुणाला देश चालवण्याबद्दल काय माहिती असणार आहे? सगळंच विचित्र आहे."

आश्वासन

उत्तर कोरियातील लोकांना 'पुन्हा कधीच काटकसरीने जगावं लागणार नाही', असं आश्वासन नवीन नेत्याने 2012 साली केलेल्या भाषणात दिलं.

उत्तर कोरियात 1990 च्या दशकात पडलेल्या प्राणघातक दुष्काळामध्ये हजारो लोकांचे प्राण गेले होते, त्या पार्श्वभूमीवर अन्नाचा तुटवडा आणि लोकांच्या व्यथा संपवण्याची नवीन नेत्याची इच्छा असल्याचं लोकांना वाटलं. हे आश्वासन मोठंच होतं.

परराष्ट्र कार्यालयातील अधिकाऱ्यांना अधिक आंतरराष्ट्रीय गुंतवणूक मिळवण्याचे आदेश देण्यात आले. देशातील काही जणांना हे बदल जाणवले.

देशाच्या पूर्व किनाऱ्यावरील एका प्रांतात राहणारे, गाडी चालवण्याचा पेशा असणारे यू स्योंग-जू म्हणतात की, उत्तर कोरियातल्या सुपरमार्केटमध्ये जास्त वस्तू दिसायला लागल्या होत्या.

"उत्तर कोरियातील खाद्यपदार्थांची उत्पादनं चिनी उत्पादनांपेक्षा चांगल्या चवीची, चांगलं पॅकिंग असणारी होती आणि त्यांचा पुरवठाही चांगला होता, ही आमच्यासाठी आश्चर्याची नि अभिमानाची बाब होती. खरं तर त्यातून आमच्या अहंकाराला पुष्टीच मिळाली."

शुद्धीकरण

किम जाँग-उन यांना काही लोकांपासून धोका जाणवत होता आणि त्यांच्याबाबत जाँग-उन यांच्या मनात स्वाभाविकपणे सदिच्छेची भावना नव्हती. विशेषतः त्यांचे काका जांग सोंग-थ्येक यांनी शक्तिशाली साथीदारांचं जाळं निर्माण केलं होतं.

जांग सोंग-थ्येक हेच देशाचे नवीन नेते होण्याची शक्यता आहे, असं प्योंग्यांगच्या उत्तरेला शेकडो मैल दूर चिनी सीमेजवळच्या एका गावात राहणारे दुकानदार चोई ना-राए यांना वाटत होतं. "चीनच्या बाबतीत देश खुली भूमिका घेईल आणि आम्हाला मुक्तपणे परदेशात प्रवास करता येईल, अशी आशा आमच्यातील अनेकांना वाटत होती," अशी आठवण ते सांगतात.

"चांग सोंग-थ्येक सत्तेत आले असते, तर त्यांनी उत्तर कोरियात बरेच आर्थिक बदल केले असते, असं आम्हाला वाटलं. आम्हाला अर्थातच हे मोठ्यांदा बोलणं शक्य नव्हतं, पण आमची अपेक्षा तशी होती."

अशा प्रकारची अफवा ठेचून काढणं गरजेचं होतं.

त्यामुळे जांग सोंग-थ्येक यांना 'घृणास्पद माणूस' व 'कुत्र्यापेक्षाही घाणेरडा' अशी संबोधनं देण्यात आली, आणि अखेरीस कथितरित्या 'पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वा'चा अनादर केल्याबद्दल त्यांना देहदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

तरुण नेते जाँग-उन त्यांची निष्ठूर बाजू दाखवू लागले होते आणि संकट फार दूर नव्हतं.

कठोर नियंत्रण

शुद्धीकरण अभियानापासून सुटका करून घेण्यासाठी डझनावारी लोक सीमा पार करून चीनला पळाले आणि अखेरीस दक्षिण कोरियात आश्रयाला गेले. आणखी लोक देश सोडून जाऊ नयेत यासाठी प्रयत्न करण्याचं किम जाँग-उन यांनी ठरवलं.

सीमासुरक्षा अभूतपूर्व कडक करण्यात आली. काटेरी तारेचं उंच कुंपण उभारण्यात आलं आणि खाली जमिनीवर सापळे लावण्यात आले. या काळात दलाल म्हणून काम करणाऱ्या हा जीन-वू यांनी सुमारे 100 लोकांना उत्तर कोरियातून पळून जायला मदत केली.

"देशाचे सीमासुरक्षा दल वेगळं आहे. सीमा पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही सरळ गोळी घालून ठार करावं, असे आदेश या दलाच्या जवानांना देण्यात आले होते. अशी गोळी घातली तरी त्यांना कोणाला उत्तर द्यावं लागणार नव्हतं."

किम जोंग उन

"मी सुरुवात केली तेव्हा खूप घाबरलो होतो, पण माझ्या कर्तव्यभावनाही बळकट होती. लहानपणापासूनच माझ्या मनात उत्तर कोरियाविषयी अनेक शंका होत्या. काहीच अधिकार नि स्वातंत्र्य नसलेल्या जनावरासारख्या स्थितीत जगायला माझा जन्म इथे का झाला, असं मला वाटायचं. त्यामुळे हे काम करण्यासाठी मी स्वतःचा जीव धोक्यात घालायला तयार होतो."

पण शेवटी त्यांचं काम प्रशासनाच्या दृष्टीस पडलं आणि त्यांना पळून जावं लागलं. त्यांची आईला तुरुंगात डांबण्यात आलं आणि तिथल्या क्रूर वागणुकीमुळे तिला पक्षाघाताचा झटका आला.

आपल्या आईचा आवाज जेमतेम आठवणाऱ्या जिन-वू यांना या घटनेची बोच कायमच वाटते.

लोकप्रियता

मतभिन्नता दर्शवणारे आणि पक्ष सोडणारे यांच्या विरोधात कठोर कारवाई करत असतानाच आपण सहज संवादासाठी उपलब्ध असतो, आपण आपल्या वडिलांपेक्षा अधिक आधुनिक व स्नेहशील आहोत, असं दाखवण्याचा किम जाँग-उन यांचा प्रयत्न सुरू होता.

त्यांनी री सोल-जू या फॅशनप्रेमी तरुण महिलेशी लग्न केलं. विविध शहरांना व गावांना भेटी देताना जाँग-उन आलिंगन देत असल्याची, अभिवादन करत असल्याची आणि स्मितहास्य करत असल्याची छायाचित्रं प्रसिद्ध होत होती.

हे जोडपं सौंदर्यप्रसाधनांच्या कारखान्यांना भेटी देत होतं, स्वतःच्या सुखचैनीच्या वस्तूंचं प्रदर्शन करत होतं.

पण सर्वसामान्य उत्तर कोरियन माणसांना मात्र जास्त 'आधुनिक' होण्याला बंदी होती.

छुप्या मार्गांनी देशात पोचलेल्या दक्षिण कोरियन डीव्हीडींमध्ये दिसणारी नवनवीन फॅशन आपणही करावी, अशी इच्छा यून मी यांना वाटत होती. कानातले दागिने, गळ्यातील हार, किंवा अगदी जीन्स घालण्याची त्यांना खूप इच्छा होती.

"एकदा हे नियम न पाळल्याबद्दल मला पकडण्यात आलं आणि एका सार्वजनिक 'शेम स्टँड'वर उभं करण्यात आलं. तिथे एक लोकांचा जमाव मी रडेपर्यंत शाब्दिक टीकेचा मारा करत होता. तू भ्रष्ट आहेस, तुला लाज कशी वाटत नाही, असं ते बोलत होते."

ह्यून-यंगसुद्धा किम जाँग-उन यांच्या पत्नीप्रमाणे गायिका होती. पण तिच्या सर्व गाण्यांमधून जाँग-उन यांचं गौरवीकरण व्हायला हवं असा नियम होता. तिने या विरोधात बंड करायचा प्रयत्न केला, तर तिच्यावर कारवाई झाली.

"मला कलात्मक दृष्टीने जे काही करावं वाटायचं त्यातलं काहीच कधीही मोकळेपणाने करायची मुभा नव्हती. उत्तर कोरियात संगीतावर इतकी नियमनं आणि निर्बंध होते की मला त्याचा खूपच त्रास झाला.

"परकीय प्रभावाची भीती वाटत असल्यामुळे तिथे सरकार अशी नियंत्रणं ठेवतं. त्यांना स्वतःच्या राजवटीविषयी आत्मविश्वास नाही, हे या कठोर नियमनांवरून स्पष्ट होतं."

दक्षिण कोरियातून आलेले के-पॉप व्हिडिओ वितरित केल्याबद्दल किंवा पाहिल्याबद्दल गेल्या दशकभरात किमान सात लोकांना देहदंडाची शिक्षा मिळालेली आहे, असं अलीकडच्या एका मानवाधिकार अहवालात नमूद केलं होतं.

हे परकीय प्रभाव 'विखारी कॅन्सर'सारखे आहेत, असं किम जाँग-उन म्हणाले आहेत.

धमाका

उत्तर कोरियाने प्रत्येक दृतगतिमान क्षेपणास्त्राची चाचणी केली तेव्हा जागतिक पातळीवर माध्यमांमध्ये त्याची चर्चा झाली, पण खुद्द त्या देशात मात्र अपेक्षेएवढी राष्ट्राभिमानाला चालना मिळाली नाही.

"अजूनही आपण लोकांचं रक्त आणि घाम शोषून शस्त्रं बनवतो आहोत, असं लोक म्हणाले असते", असं सत्ताधाऱ्यांशी मतभेद झाल्याने देश सोडून गेलेली एक व्यक्ती सांगते.

किम जोंग उन

"आम्हाला त्यात काही विजय वाटत नव्हता. इतके पैसे या सगळ्या चाचण्यांवर खर्च झाले, आम्ही त्यांच्यासाठी कमावत असणारा सर्व पैसा यात जात होता", असं दुसरी एक व्यक्ती सांगते.

2016 सालच्या दरम्यान परराष्ट्र कार्यालयातील राजदूत रयू यांना नवीन आदेश मिळाले. आता व्यवसाय क्षेत्रावर लक्ष केंद्रित करायचं नव्हतं.

"उत्तर कोरियाला अण्वास्त्रं का गरजेची आहेत, त्याचा उद्देश काय व त्याचं समर्थन का करावं लागतं, याचं स्पष्टीकरण आम्हाला द्यावं लागणार होतं."

राजनैतिक अधिकारी याबद्दल बोलले, तर ही कल्पना आंतरराष्ट्रीय समुदायात रुळू लागेल, अशी आशा यामागे होती.

पण अशा रितीने गोष्टी घडल्या नाहीत.

मोठा डाव

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि किम जाँग-उन यांच्यातील वाढता तणाव अखेरीस एका राजनैतिक प्रदर्शनापर्यंत येऊन थांबला.

पाश्चात्त्य माध्यमं उत्तर कोरियाचे हुकूमशहा जाँग-उन यांना वाया गेलेल्या लठ्ठ मुलाच्या रूपात सादर करतात. पण या वेळी ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशेजारी आत्मविश्वासाने एकाच मंचावर उभे होते.

सिंगापूरमध्ये या दोन नेत्यांनी केलेल्या हस्तांदोलनाची छायाचित्रं उत्तर कोरियातील वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर झळकली.

किम जोंग उन

पण देशाच्या आण्विक कार्यक्रमाला आळा घालण्यासाठी लादण्यात आलेले निर्बंध ताण आणणारे ठरत होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसोबतच्या जाँग-उन यांच्या भेटीची छायाचित्र लोकांना अचंबित करणारी असली, तरी प्योग्यांगबाहेर गावांमध्ये मात्र यावर शांतताच होती.

"या सगळ्याचा अर्थ लावण्याची क्षमता आमच्यात नव्हती. या बैठकीमुळे कशात कोणती सुधारणा आहे, हेच आम्हाला कळत नव्हतं," असं एक दुकानदार चोई ना-राए म्हणतात.

परंतु, या बैठकीत कोणताही करार झाला नाही. निर्बंधांमधून काही दिलासा मिळवावा, यासाठी हे सगळं प्रदर्शन मांडण्यात आल्याचं रयू यांना वाटतं.

"आपली राजवट टिकवून ठेवण्यासाठी अण्वास्त्रं मूल्यवान आहेत, असं उत्तर कोरियातील सत्ताधाऱ्यांना वाटतं, त्यामुळे ते कधीच ही अस्त्रं सोडणार नाहीत."

कोव्हिडचं संकट

परंतु, किम जोँग-उन यांच्या समोर आणखी गंभीर आव्हान उभं राहायचं होतं.

जानेवारी २०२०मध्ये शेजारच्या चीनमध्ये कोव्हिड साथीचा प्रादुर्भाव झाला, तेव्हा उत्तर कोरियाने सीमा बंद केल्या. केवळ लोकांसाठीच नव्हे, तर व्यापारासाठीसुद्धा सीमेवरील व्यवहार बंद झाले.

"कोव्हिडनंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत," असं उत्तर कोरियात गाडी चालवण्याचं काम केलेले जू स्योंग म्हणतात. चिनी सीमेजवळ आपल्या आईशी थोडक्यात बोलण्याची संधी त्यांना मिळाली.

"अर्थव्यवस्थेचा अवकाश संकोचतो आहे, किंमती वाढल्या आहेत. जगणं मुश्कील झालं आहे. माझ्या आईवडिलांना अन्न मिळतंय, पण किंमती प्रचंड आहेत. खूपच तणावदायक परिस्थिती आहे." काही जणांची उपासमार होत असल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

खुद्द किम जाँग-उन यांनी हे 'महासंकट' असल्याचं म्हटलं आहे आणि एका भाषणामध्ये त्यांनी अश्रूसुद्धा ढाळले. कोणत्याही उत्तर कोरियन नेत्याच्या दृष्टीने हे कृत्य अभूतपूर्व होतं.

तिथे डॉक्टर म्हणून काम केलेले किम सुंग-हुई सांगतात की, देशात बहुतांश औषधं काळ्या बाजारात विकत घ्यावी लागतात.

शस्त्रक्रियेच्या खोल्यांमध्ये बरेचदा वीज नसते आणि डॉक्टरांना काही वेळा मोकळ्या हातांनीच शस्त्रक्रिया कराव्या लागतात, कारण ग्लोव्ह्ज उपलब्धच नसतात.

"या द्विपकल्पातील दोन देश (उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया) एकमेकांहून किती भिन्न आहेत, हे मी पाहतो, तेव्हा उत्तर कोरियातही भविष्यात कधीतरी रुग्ण व डॉक्टर यांना मानवाधिकारांची हमी मिळेल अशी आशा मला वाटते." जागतिक साथीच्या आजाराला सामोरं जाण्यासाठीची सज्जता उत्तर कोरियाकडे नाही आणि कोव्हिडमुळे सार्वजनिक आरोग्याची तिथे किती हानी झाली याची माहितीसुद्धा उपलब्ध नाही. पण सध्याच्या स्वतःहून लादून घेतलेल्या विलगीकरणाचाही उत्तर कोरियातील लोकांना फटका बसणार आहे.

किम पंथ

आमच्याशी बोललेल्या वरीलपैकी काही व्यक्ती उत्तर कोरियातील सध्याच्या परिस्थितीबाबत इतके भावनिक झाले की देशात विद्रोह होईल असं भाकीत त्यांनी केलं. पण असं काही घडण्याची चिन्हं दूरदूरपर्यंत दिसत नाहीत.

किम कुटुंबाचा पंथ सर्वव्यापी आहे आणि लक्षणीयरित्या स्थिरसुद्धा आहे. त्यांची राजवट कोसळून पडेल, अशी सर्व भाकितं चुकीची आहेत.

उत्तर कोरियाने जगापासून स्वतःला तोडून घेतलं, त्याला 70 वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे, आता तरी या देशाने स्वतःच्या सीमा खुल्या कराव्यात आणि लोकांना मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी इच्छा मला मुलाखत दिलेल्या बहुतांश लोकांनी व्यक्त केली. अनेकांना त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा भेटायचं आहे.

आता त्यांना स्वतःचं मत मांडायचं आणि किम जाँग-उन यांच्या राजवटीखालील जीवन कसं आहे याच्या कहाण्या सांगण्याचं स्वातंत्र्य आहे.

किम जोंग उन

"मी गाण्यासाठी माझं आयुष्य धोक्यात घातलं," असं गायिका ह्यून-हँग सांगतात. "उत्तर कोरियात राहिलेल्यांना मात्र मरेपर्यंत त्यांची गाणी स्वतःच्या काळजातच दडपून टाकावी लागतात."

किम जाँग-उन यांच्या राजवटीला दहा वर्षं पूर्ण होत असताना त्यांचा देश संकटाला सामोरं जातो आहे. त्यांच्याकडे डझनावरी नवीन अण्वास्त्रं आहेत, पण तिथले लोक अजूनही भुकेले आहेत.

दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी 2018 साली प्योंग्यांगचा दौरा केला, तेव्हा सेऊलच्या मध्यवर्ती भागात एक महाकाय पोस्टर लावण्यात आलं होतं. के-पॉप अवकाशात प्रेमाचं प्रतीक दर्शवण्यासाठी विशिष्ट पद्धतीने बोटांची व अंगठ्याची खूण केली जाते, ती खूण कशी करायची हे किम जाँग-उन यांना दाखवलं जात असल्याचं छायाचित्र त्या पोस्टरवर होतं.

याच बोटांनी एक क्लिक करून किम यांना त्यांच्या लोकांचं भवितव्य बदलता येईल, असं मी त्या वेळी लिहिलं होतं.

किम जाँग-उन त्यांच्या लोकांना स्वातंत्र्य देऊ शकतात. त्यासाठीची सत्ता त्यांच्याकडे आहे.

पण आज उत्तर कोरियातील दोन कोटी 50 लाख लोक कधी नव्हे इतके जगापासून दुरावलेले आहेत.

या लेखासाठी मुलाखती दिलेल्या सर्व व्यक्तींनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून उत्तर कोरियातून पलायन केलं आणि ते आता दक्षिण कोरियात व अमेरिकेत राहात आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी काही नावं बदलली आहेत.

रेखाटनं- गेरी फ्लेचर

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)