ड्रग्ज, दहशत, शस्त्रास्त्रं- उत्तर कोरियातील राजवटीबाबत एका गुप्तहेरानं केलेले खुलासे

किम कुक-सोंग
फोटो कॅप्शन, किम कुक-सोंग
    • Author, लॉरा बिकर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

किम कुक सोंग यांच्या जुन्या सवयी गेलेल्या नाहीत. मुलाखतीसाठी त्यांच्याशी आठवडाभर बोलणं सुरू होतं, पण त्यांचं कोणीतरी ऐकतंय की काय, या शंकेने ते अजूनही अस्वस्थ आहेत. कॅमेऱ्यासमोर असताना त्यांनी काळ्या काचांचा चश्मा घातला होता आणि त्यांचं खरं नाव आम्हाला माहितेय, अशी खात्री आमच्या टीममधल्या फक्त दोघांनाच वाटते.

किम कुक-सोंग यांनी 30 वर्षं उत्तर कोरियातील बलशाली गुप्तचर संस्थेमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून केलं.

ते म्हणतात, "ही संस्था सर्वोच्च नेत्याचे डोळे, कान आणि डोकं म्हणून कार्यरत होती."

आपण अनेक गुपितं लपवून ठेवली, टीकाकारांची हत्या करण्यासाठी मारेकरी पाठवले आणि जास्त पैसे कमावण्यासाठी अंमली पदार्थांची बेकायदेशीर प्रयोगशाळा तयार केली.

माजी वरिष्ठ कर्नल किम कुक-सोंग यांनी त्यांची कहाणी बीबीसीला सांगायचं ठरवलं. उत्तर कोरियातील इतक्या वरिष्ठ सेनाधिकाऱ्याची मुलाखत एखाद्या मुख्यप्रवाही माध्यमातून प्रसिद्ध व्हायची ही पहिलीच वेळ आहे. आपण 'अतिशय प्रिय' आणि निष्ठावान कम्युनिस्ट सेवक होतो, असं किम कुक-सोंग सांगतात.

उत्तर कोरियाची व्यूहरचना

परंतु, उत्तर कोरियामध्ये पदवी आणि निष्ठा यांच्यामुळे काही सुरक्षिततेची हमी मिळत नाही.

कुक-सोंग यांना २2014 साली स्वतःचा जीव वाचवण्यासाठी देश सोडावा लागला आणि तेव्हापासून ते दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये राहून तिथल्या गुप्तचर संस्थेसाठी काम करत आहेत.

उत्तर कोरिया पैसे कमावण्यासाठी उतावीळ झालेला असून त्यासाठी अंमली पदार्थांच्या व्यापारापासून ते मध्य-पूर्वेत व आफ्रिकेत शस्त्रास्त्रांच्या विक्रीपर्यंत शक्य ते सर्व मार्ग अवलंबले जातात.

उत्तर कोरियाच्या या निर्णयांमागे कोणती व्यूहरचना आहे आणि दक्षिण कोरियावर हल्ला कसा करण्यात आला, हे किम कुक-सोंग यांनी आम्हाला सांगितलं. उत्तर कोरियाचे गुप्तहेर व तिथल्या गुप्तचर संस्थांचं सायबर जाळं जगात कुठेही पोचू शकतं, असा दावाही त्यांनी केला.

किम जोंग उन

फोटो स्रोत, Reuters

बीबीसीला त्यांच्या या दाव्याची स्वतंत्र पडताळणी करता आली नाही, पण त्यांच्या ओळखीची शहानिशा आम्ही केली आणि त्यांच्या काही दाव्यांचा पुरावा आम्हाला मिळाला.

उत्तर कोरियाचा लंडनस्थित दूतावास आणि न्यूयॉर्कमधील त्यांचं मिशन या ठिकाणी संपर्क साधला पण आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

'दहशतवादी कृतिपथक'

उत्तर कोरियाचे विद्यमान सर्वोच्च नेते किम जोंग उन यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळाची माहिती किम कुक-सोंग यांनी दिली. स्वतःला 'योद्धा' म्हणून सिद्ध करण्यासाठी तरुण किम जोंग उन उत्सुक होते, असं ते सांगतात.

उत्तर कोरियाने 2009 साली एक नवीन गुप्तचर संस्था स्थापन केली- तिचं नाव 'टेहळणी विभाग' असं होतं. त्या वेळी किम जोंग-उन त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि वडिलांच्या जागी येण्यासंदर्भात जोंग-उन यांची तयारी सुरू होती. या टेहळणी विभागाचे प्रमुख होते किम जोंग-चोल. उत्तर कोरियाच्या सर्वोच्च नेत्याचे सर्वाधिक विश्वासू सहकारी म्हणून जोंग-चोल ओळखले जात.

कर्नल कुक-सोंग सांगतात की, उत्तर कोरियाच्या एका माजी अधिकाऱ्याची हत्या करण्यासाठी 'दहशतवादी कृतिपथका'ची स्थापना करावी, असा आदेश मे 2009 मध्ये वरून देण्यात आला. हा अधिकारी उत्तर कोरियातून पलायन करून दक्षिण कोरियात आश्रय घेऊन राहत होता.

कुक-सोंग सांगतात, "देशाचे सर्वोच्च नेते असलेल्या आपल्या वडिलांना खूश करण्यासाठी किम योंग-उन यांनी हा मार्ग स्वीकारला होता. ह्वांग जांग-योप यांची गुप्तपणे हत्या करता यावी, यासाठी दहशतवादी कृतिपथकाची स्थापना करण्यात आली. मी व्यक्तीशः या कामासाठी आदेश दिला होता."

किम जोंग उन

फोटो स्रोत, Reuters

कोणे एके काळी ह्वांग जांग-योप उत्तर कोरियातील सर्वांत बलशाली अधिकारी राहिले होते. ते उत्तर कोरियाच्या धोरणांचे एक प्रमुख शिल्पकार होते. ते 1997 साली दक्षिण कोरियाला निघून गेल्यानंतर त्यांना कधीही माफ करण्यात आलं नाही. एकदा सोलमध्ये त्यांनी उत्तर कोरियाच्या सरकारवर कठोर टीका केली, तेव्हापासून योंग-उन यांचं कुटुंब त्यांचा सूड उगवू इच्छित होतं.

नेत्याबद्दलची निष्ठा

परंतु, हा हत्येचा प्रयत्न फसला. आजही या हत्येच्या कारस्थानाबद्दल उत्तर कोरियाच्या सैन्यातील दोन मेजर सोलमध्ये 10 वर्षांचा तुरुंगवास भोगत आहेत. या कारस्थानात आपला हात होता, हे उत्तर कोरियाने कधीही मान्य केलं नाही. उलट, दक्षिण कोरियानेच ही योजना आखल्याचा दावा उत्तर कोरियाने केला.

किम कुक-सोंग यांच्या विधानामुळे या घटनेची निराळी बाजू समोर येते. ते म्हणतात, "उत्तर कोरियामध्ये दहशतवाद हे एक राजकीय साधन आहे. त्याद्वारे किम योंग-इल आमि किम योंग-उन यांची प्रतिष्ठा जपली जाते. आपल्या महान नेत्याबद्दलची निष्ठा दाखवण्याचा उत्तराधिकारी व्यक्तीचा हा प्रयत्न होता."

हा घटनाक्रम इथेच थांबला नाही. एक वर्षाने, 2010 साली दक्षिण कोरियाच्या नौदलाचं 'चेओनान' हे जहाज एका पाणतीराच्या लक्ष्यस्थानी येऊन बुडालं. त्यात 46 जणांचा मृत्यू झाला.

या घटनेशी आपला काही संबंध नसल्याचं उत्तर कोरियाने सातत्याने सांगितलं. त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात दक्षिण कोरियाच्या योंगप्योंग बेटावर उत्तर कोरियाने बॉम्बवर्षाव केला, त्यात दोन सैनिक व दोन सर्वसामान्य नागरिक मरण पावले.

चेओनान किंवा योंगप्योंग बेटावर झालेल्या हल्ल्यामध्ये आपला थेट सहभाग नव्हता, असं किम कुक-सोंग सांगतात. पण "गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांसाठी काही या घटना गुपितासारख्या नव्हत्या. उलट या घटनांचा उल्लेख अभिमानाने केला जात होता," असं ते म्हणतात.

"किम जोंग-उन यांच्या विशेष आदेशांनुसार या सैनिकी कारवाया आखल्या व अंमलात आणल्या जातात. हे यश मानलं जातं."

'दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षीय कार्यालयात गुप्तहेर'

दक्षिण कोरियाला नामोहरम करण्यासाठी व्यूहरचना आखण्याची जबाबदारीसुद्धा आपल्याकडे होती, असं किम कुक-सोंग सांगतात. दक्षिण कोरियाला राजकीयदृष्ट्या अंकित करायचं, हा आमचा उद्देश होता. त्यासाठी आम्हाला प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या लोकांची गरज होती.

कुक सोंग म्हणतात, "अनेक वेळा मी गुप्तहेरांना दक्षिण कोरियाला जायला सांगितलं आणि त्यांच्या माध्यमातून काही कारवाया पार पाडल्या."

उत्तर कोरिया

फोटो स्रोत, Getty Images

"एकदा एका उत्तर कोरियाच्या एजन्टला दक्षिण कोरियात पाठवण्यात आलं, त्याने तिथे राष्ट्राध्यक्षीय कार्यालयात कामही केलं आणि तो सुरक्षितपणे उत्तर कोरियाला परतला. ही नव्वदीच्या दशकातील गोष्ट आहे."

"ब्लू हाऊसमध्ये (दक्षिण कोरियाचं राष्ट्राध्यक्षीय कार्यालय) पाच ते सहा वर्षं काम केल्यानंतरसुद्धा तो सुरक्षित परत आला आणि त्याने मजूर पक्षाच्या कार्यालयात काम केलं. उत्तर कोरियाचे गुप्तहेर विविध नागरी सामाजिक संघटनांसोबतच दक्षिण कोरियातील महत्त्वाच्या संस्थांमध्येसुद्धा सक्रिय आहेत, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो."

बीबीसीला या दाव्याची पडताळणी करता आली नाही.

हॅकरांची फौज

दक्षिण कोरियात शिक्षा भोगत असणाऱ्या अनेक उत्तर कोरियाई गुप्तहेरांना मी भेटले आहे. एनक न्यूजचे संस्थापक चॅड ओ'करोल यांनी अलीकडेच एका लेखात लिहिल्यानुसार, "दक्षिण कोरियातील तुरुंगांमध्ये एके काळी डझनावारी उत्तर कोरियन गुप्तहेर होते. विविध प्रकारच्या गुप्तहेरीच्या कामांसंदर्भात अनेक दशकं हे लोक तुरुंगात कैद भोगत होते."

अशा अनेक घटना होत राहिल्या आणि किमान एका प्रकरणात उत्तर कोरियानेच थेट गुप्तहेर पाठवल्याचं उघडकीस आलं होतं. परंतु, एनके न्यूजच्या आकडेवारीनुसार 2017 सालानंतर दक्षिण कोरियात गुप्तहेरगिरीशी संबंधित प्रकरणांमध्ये खूपच कमी लोकांना अटक झाली आहे. उत्तर कोरिया गुप्तचरविषयक माहिती गोळा करण्यासाठी जुन्या मार्गांऐवजी नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेतो आहे, हे यामागचं कारण आहे.

उत्तर कोरिया जगातील सर्वांत गरीब देशांमध्ये मोडत असला आणि तो इतर देशांपासून अलग पडला असला, तरी उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये सहा हजार तल्लख हॅकरांची फौज तयार आहे, असा इशारा तिथून पळून आलेल्या लोकांनी आधीच दिलेला आहे.

किम कुक-सोंग यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर कोरियाचे माजी नेते किम जोंग-इल यांनी ऐंशीच्या दशकात 'सायबरयुद्धाच्या तयारासाठी' नवीन लोकांना प्रशिक्षण देण्याचा आदेश दिला होता.

उत्तर कोरिया

फोटो स्रोत, Getty Images

कुक-सोंग सांगतात, "मोरानबोंग विद्यापीठ या कामासाठी देशभरातून सर्वांत प्रतिभावान विद्यार्थ्यांची निवड करतं आणि त्यांना सहा वर्षं विशेष शिक्षण दिलं जातं."

उत्तर कोरियाचे गुप्तहेर

ब्रिटीश गुप्तचर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 2017 साली ब्रिटनमधील सरकारी आरोग्य संस्था एनएचएसवर आणि जगभरातील इतर अनेक संस्थांवर झालेल्या सायबर हल्ल्यांमध्ये उत्तर कोरियातील लझारूस ग्रुपचा हात होता.

या गटाने 2014 साली सोनी पिक्चर्सलाही लक्ष्य केलं होतं, असं मानलं जातं.

किम कुक-सोंग म्हणतात, "या गटाचं कार्यालय '414, लायझन ऑफीस' म्हणून ओळखलं जातं. आम्ही या कार्यालयाकडे किम जोंग-इल यांचा माहिती विभाग म्हणून पाहायचो."

या कार्यालयाशी उत्तर कोरियाच्या नेतृत्वाचा दूरध्वनीद्वारे थेट संपर्क असतो, असा दावा कुक-सोंग करतात.

"या कार्यालयाशी संबंधित एजन्ट चीन, रशिया व आग्नेय आशियातील देशांमध्ये आहेत, असं म्हटलं जातं. परंतु, उत्तर कोरियातसुद्धा हे एजन्ट सक्रिय असतात. उत्तर कोरियाई गुप्तहेरांच्या परस्परांमधील संदेशनाच्या जाळ्यालासुद्धा या कार्यालयाद्वारे संरक्षण पुरवलं जातं."

डॉलरच्या मोबदल्यात अंमली पदार्थ

उत्तर कोरिया पुन्हा एकदा 'संकटा'त अडकल्याची घोषणा किम जोंग-उन यांनी अलीकडे केली होती. जनतेने 'आणखी एका दुष्काळा'साठी तयार राहावं, असं आवाहन त्यांनी एप्रिल महिन्यात केलं होतं.

नव्वदीच्या दशकात किम जोंग-इल यांचा सत्ताकाळ सुरू असताना उत्तर कोरिया एका भयंकर दुष्काळाला सामोरं गेला होता. त्या वेळी किम कुक-सोंग उत्तर कोरियाच्या मोहीम विभागात सक्रिय होते. त्यांना सर्वोच्च नेत्यासाठी 'क्रांतिकारी निधी' उभारण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

अंमली पदार्थांची तस्करी करणं, हा याचा अर्थ असल्याचं किम कुक-सोंग सांगतात.

ते म्हणतात, "किम जोंग-इल यांच्या कार्यकाळात दुष्काळ पडला तेव्हा अंमली पदार्थांचं उत्पादन शिखरावर पोचलं होतं. त्या वेळी सर्वोच्च नेत्यांच्या मोहीम विभागाकडील क्रांतिकारी निधी संपला होता."

"माझ्याकडे ही जबाबदारी देण्यात आली तेव्हा मी परदेशातील तीन लोकांना उत्तर कोरियात बोलावलं. मजूर पक्षाच्या लायझन ऑफिसच्या प्रशिक्षण केंद्रात उत्पादनाचं काम सुरू झालं होतं आणि तिथे अंमली पदार्थ तयार केले जात होते. तिथे आयसीई (क्रिस्टल मेथ) हा पदार्थ तयार केला जात होता. याच्या मोबदल्यात आम्ही किम जोंग-इल यांना देण्यासाठी डॉलर मिळवत असू."

किम जोंग उन

फोटो स्रोत, EPA

अंमली पदार्थांबाबत किम कुक-सोंग सांगत असलेल्या गोष्टी बहुतांशाने खऱ्या असल्याचं दिसतं. उत्तर कोरियामधील अंमली पदार्थांच्या उत्पादनाचा स्वतंत्र इतिहास आहे. तिथून जास्तकरून हेरोइन आणि अफू यांचा व्यापार होतो.

ब्रिटनमध्ये राहून केलेले उत्तर कोरियाचे माजी राजनैतिक अधिकारी थाए योंग-हो यांनी कालांतराने त्यांचा देश सोडला. त्यांनी 2019 साली ऑस्लो फ्रीडम फोरममध्ये सांगितलं होतं की, त्यांचा देश सरकारी पातळीवर अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सहभागी आहे. देशात मोठ्या संख्येने लोक अंमली पदार्थांच्या नादी लागले आहेत आणि उत्तर कोरिया घरोघरी या आव्हानाला सामोरं जातो आहे.

इराण व उत्तर कोरिया यांचे संबंध

अंमली पदार्थांमधून येणारा पैसा कुठे जात होता, तो जनतेसाठी खर्च होत होता का, असं मी कुक-सोंग यांना विचारलं.

ते म्हणतात, "उत्तर कोरियाचा सगळा पैसा तिथल्या नेत्याचा आहे, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. यातून तुम्हाला तिथली परिस्थिती समजून घ्यायला अंदाज येईल. या पैशांमध्ये नेत्याने महाल बांधला, कार खरेदी केल्या, खाण्या-पिण्याचे पदार्थ घेतले, कपडे विकत घेतले आणि विविध प्रकारच्या सुखांचा उपभोग घेतला, असं काहीही होऊ शकतं."

उत्तर कोरियात नव्वदीच्या दशकात पडलेल्या दुष्काळामध्ये मोठ्या संख्येने लोक मरण पावले, असं म्हटलं जातं. किम कुक-सोंग यांच्या म्हणण्यानुसार, इराणला शस्त्रास्त्रांची अवैध विक्री करणं, हा उत्तर कोरियाच्या उत्पन्नाचा दुसरा मार्ग आहे. हा व्यवहार मोहीम विभाग पार पाडतो.

कुक-सोंग सांगतात, "विशेष प्रकारच्या छोट्या पाणबुड्यांचा यात समावेश होता. अशी अत्याधुनिक उपकरणं बनवण्यात उत्तर कोरिया अव्वल होता."

उत्तर कोरियाच्या पाणबुड्या जास्त आवाज करणाऱ्या आणि डिझेलच्या इंजिनवर चालणाऱ्या असतात, त्यामुळे याबद्दलची चर्चा प्रचाराचा भाग असू शकते.

परंतु, ही सौदेबाजी अतिशय यशस्वी होत होती आणि इराणमधील उत्तर कोरियाचे उपसंचालक इराण्यांना त्यांच्या स्विमिंगपूलमध्ये येण्याचं निमंत्रण देत असत.

उत्तर कोरियातील घडामोडींचे तज्ज्ञ प्राध्यापक एंद्रेई लान्कोव्ह यांच्या मते, इराणसोबत प्योंग्यांग करत असलेला शस्त्रास्त्रांचा व्यवहार ऐंशीच्या दशकापासूनच जगजाहीर आहे. या दोन देशांनी गतिमान क्षेपणास्त्रांचीही खरेदी-विक्री केली आहे.

संयुक्त राष्ट्रांचा इशारा

आंतरराष्ट्रीय पातळीवर कठोर निर्बंध लादण्यात आले असूनही उत्तर कोरियाने मोठ्या जनसंहाराची क्षमता असलेली अस्त्रं विकसित करण्याचा कार्यक्रम दीर्घ काळापासून सुरू ठेवला आहे.

याच वर्षी सप्टेंबर महिन्यात उत्तर कोरियाने नव्या प्रकारच्या चार अस्त्रांची चाचणी केली. त्यात दीर्घ पल्ल्यावर मारा करू शकणाऱ्या सामर्थ्यवान क्रूझ क्षेपणास्त्राचा समावेश होता. धावत्या ट्रेनमधून मारता येईल असं गतिमान क्षेपणास्त्र, हायपरसोनिक क्षेपणास्त्र आणि विमानविरोधी क्षेपणास्त्रं आदींचा यात समावेश होता.

उत्तर कोरियातील तंत्रज्ञान काळानुसार प्रगत होतं आहे.

उत्तर कोरिया स्वतःकडील शस्त्रास्त्रं व तंत्रज्ञान यादवी युद्धांनी ग्रासलेल्या देशांमध्ये विकतो, असं किम कुक-सोंग सांगतात. उत्तर कोरियाने सिरिया, म्यानमार, लिबीया व सुदान इथे शस्त्रास्त्रं विकल्याचा आरोप अलीकडच्या वर्षांमध्ये संयुक्त राष्ट्रांनी केला होता.

उत्तर कोरिया विकसित करत असलेली शस्त्रास्त्रं जगभरातील संघर्षग्रस्त प्रदेशांमधील अडचणी वाढवू शकतात, असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला होता.

'एका निष्ठावान सेवकाने विश्वासघात केला'

किम कुक-सोंग यांनी उत्तर कोरियात विशेष सुखसोयींच्या जीवनाचा उपभोग घेतला. किम जोंग-उन यांच्या आत्याने त्यांना मर्सिडिझ-बेझ कार वापरण्याची परवानगी दिली होती, असा कुक-सोंग यांचा दावा आहे.

उत्तर कोरियाच्या सर्वोच्च नेत्यासाठी पैसा गोळा करण्याकरता स्वतंत्रपणे परदेश प्रवास करण्याचीही परवानगी त्यांना होती. किम यांनी दुर्मिळ धातू व कोळसा विकून लाखांची रक्कम गोळा केली आणि ती सुटकेसमध्ये भरून उत्तर कोरियाला आणण्यात आली.

लाखो लोकांना उपासमार सहन करावी लागते आहे, अशा गरीब प्रदेशात अशा जगण्याची कल्पना करणंही अवघड आहे. मग प्रत्यक्षात असं जगणं तर अशक्यच. किम यांनी वैवाहिक संबंधांमधून शक्तिशाली राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते, त्यामुळे त्यांना विविध गुप्तचर संस्थांमध्ये येण्याजाण्याची मुभा होती. परंतु, याच संबंधांमुळे ते आणि त्यांचे कुटुंबीय गोत्यातही आले.

2011 साली सत्तेत आल्यानंतर किम जोंग-उन यांनी त्यांच्या व त्यांचे काका जंग सोंग-थाइक यांच्या लेखी धोकादायक असलेल्या व्यक्तींना बाजूला सारण्याचा निर्णय घेतला.

किम जोंग-इल यांची तब्येत बिघडलेली असल्यामुळे दीर्घ काळ जंग सोंग-थाइक व्यवहाराच्या पातळीवर उत्तर कोरियाचं नेतृत्व करत होते. किम कुक-सोंग यांच्या म्हणण्यानुसार, जंग सोंग-थाइक यांचं नाव किम जोंग-उन यांच्या तुलनेत अधिक लोकप्रिय झालं होतं. ते सांगतात, "जंग सोंग-थाइक दीर्घ काळ टिकू शकणार नाहीत, हे मला तेव्हाच जाणवलं होतं."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)