... तरीही उत्तर कोरियात परतायचंय : कोरियन गुप्तहेरांची कैफियत

उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, आण्विक नि:शस्त्रीकरण
फोटो कॅप्शन, किम यंग सिक यांनी दक्षिण कोरियातील तुरुंगात 26 वर्षं काढली.

आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तर कोरियाच्या डावपेचात्मक हालचालींवर दोन माणसं बारीक लक्ष ठेवून आहेत. कोण आहेत ही माणसं? बीबीसीच्या लौरा बिकर यांचा विशेष रिपोर्ट.

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाच्या सर्वोच्च नेत्यांदरम्यान संवाद सुरू झाल्यामुळे आता अनेक वर्षांनंतर का होईना, आपल्याला मायदेशी परतता येईल का या आशेवर उत्तर कोरियाचे हे 2 गुप्तहेर आहेत.

दक्षिण कोरियातल्या उत्तर कोरियाच्या 19 गुप्तहेरांना मायदेशी परतायचं आहे. सध्या सुरू असलेल्या परिषदांच्या फेऱ्या हा त्यांच्यासाठी आशेचा किरण आहे. त्यातलेच एक आहेत किम योंग सिक.

किम योंग सिक तेव्हा जेमतेम विशीत होते. आपल्या देशाची होणारी परवड पाहणं सहन होणारं नाही हे त्यांच्या लक्षात आलं.

उत्तर आणि दक्षिण कोरियाला परकीय देशांच्या वेढ्यातून सोडवावं असं त्यांना वाटायचं. परकीय देशांनीच कोरियाचे तुकडे केले आहेत असं त्यांना वाटायचं.

1962 मध्ये रेडिओ इंजिनियर म्हणून उत्तर कोरियाचे गुप्तहेर वापरत असलेल्या बोटीवरून ते दक्षिण कोरियाच्या दिशेने निघाले.

"बाहेरचे देश कोरियाचे लचके तोडत होते. ते पाहून मला दु:ख होत असे. कोरियाच्या लोकांमध्ये भांडणं लावण्यात त्यांचा पुढाकार असे. मी तेव्हा तरुण होतो. उत्तर कोरियात राहणाऱ्या माझ्या कुटुंबाविषयी मला अतिशय प्रेम होतं. कोणीही आम्हाला विलग करू शकत नव्हतं. आम्ही प्रचंड धमाल करायचो. पण एवढं सगळं असूनही मी दक्षिण कोरियात आलो. कारण माझा देश होरपळत होता," अशा शब्दांत किम योंग सिक आठवणी सांगत होते.

कोणी पकडू नये, कोणाला कळू नये म्हणून गुप्तहेरांच्या बोटीनं दूरचा रस्ता पत्करला. त्यांनी जवळजवळ जपान गाठलं होतं. पण त्याआधी त्यांनी वळून दक्षिण कोरियाचा दक्षिण पूर्व भागाकडे कूच केली.

मात्र आपल्या कामाला न्याय देण्यापूर्वीच त्यांची बोट ताब्यात घेण्यात आली आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. त्यांनी तब्बल 26 वर्षं दक्षिण कोरियाच्या तुरुंगात काढली. त्यांची आता सुटका झाली आहे. त्यांना दक्षिण कोरियाचं नागरिकत्व देण्यात आलं आहे. परंतु दक्षिण कोरियात राहणं कधीही मायभूमीसारखं वाटलं नाही, असं ते सांगतात.

उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, आण्विक नि:शस्त्रीकरण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दक्षिण कोरियाची माणसं ठराविक अंतरावरूनच उत्तर कोरियाला पाहू शकतात.

तुरुंगातल्या आठवणी सांगताना ते म्हणाले, "तुरुंगातलं आयुष्य खूपच खडतर होतं. दक्षिण कोरियन समाजात स्थिरावण्यासाठी तुम्हाला विचारधारा बदलावी लागते. मी बदललो नाही म्हणूनच छोट्या छोट्या कारणांसाठी माझा छळ करण्यात येत असे."

कम्युनिस्ट विचारधारा स्वीकारण्यासाठी आमच्यावर प्रचंड दडपण टाकण्यात येत असल्याचं उत्तर कोरियाच्या अन्य गुप्तहेरांनीही सांगितलं. दक्षिण कोरियावर वर्चस्ववादी सत्ता असतानाचा हा कालखंड होता.

'जे घडलं ते भीषण'

दक्षिण कोरियातल्या उत्तर कोरियाच्या 19 गुप्तहेरांना मायदेशी परतायचं आहे. सध्या सुरू असलेल्या परिषदांच्या फेऱ्या हा त्यांच्यासाठी आशेचा किरण आहे.

काही वेळा किम आपल्या विचारधारेपासून दूर जातात. मार्क्सवाद कसा चांगला हे ते सांगू लागतात. ते आता 80 वर्षांचे आहेत. परंतु त्यांचा उत्साह जराही कमी झालेला नाही.

"तुम्ही सीमारेषेवर गेलात तर तुम्हाला काटेरी तारांचं कुंपण दिसेल. हे आम्ही तयार केलं का? परकीय देशांनी कोरियाची विभागणी केली. त्यांनीच काटेरी सीमा तयार केली. त्यांच्यामुळेच आम्ही कोरियाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाऊ शकत नाही," असं ते सांगतात.

1953 मध्ये झालेल्या कराराचा त्यांनी उल्लेख केला. या करारामुळेच उत्तर आणि दक्षिण कोरियादरम्यान ना लष्कर प्रदेश तयार करण्यात आला. यातूनच कोरियन द्वीपकल्पाची फाळणी झाली. युद्धविरामासंदर्भातील करारावर उत्तर कोरिया, चीन आणि अमेरिकेने स्वाक्षरी केली.

'हे चांगलं झालं असं तुम्ही कसं म्हणता? मी मरतानाही जे घडलं ते भीषण होतं असंच सांगेन. झालं ते भीषणच होतं. आण्विक नि:शस्त्रीकरण दूरची गोष्ट. परकीय देशांनी आमच्या माणसांमध्ये फूट पाडली. म्हणूनच आम्ही अण्वस्त्रांची निर्मिती केली. त्यांची आमच्याप्रती वागणूक चांगली असती तर आम्ही अण्वस्त्रं निर्मितीमागे लागलोच नसतो'.

मला तिथे चिरनिद्रा घ्यायची आहे

यांग सून गिल हे दुसरे माजी गुप्तहेर. उत्तर कोरियाला जाण्यासाठी तेही आतूर आहेत. खरं तर त्यांची मायभूमी उत्तर कोरिया नाही. उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातील युद्ध संपताना विभागणी झाली. त्यांनी त्यांच्या भावासह प्योनगाँग गाठलं.

उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, आण्विक नि:शस्त्रीकरण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उत्तर कोरियात परतल्यास जगणं सुकर होऊ शकतं असं या देशाच्या गुप्तहेरांना वाटतं.

उत्तर कोरियाशी वागताना दक्षिण कोरिया सावध असतो. यांग उत्तर कोरियात परतल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. "मी गुप्तहेर नाही हे त्यांनी वारंवार सांगितलं, तरीहीतब्बल 37 वर्षं मला तुरुंगात काढावी लागली", असं ते सांगतात.

पत्नी आणि अन्य मंडळी असं यांग यांचं कुटुंब आहे. मात्र तरीही संधी दिली तर उत्तर कोरियात जाऊन राहायला आवडेल असं ते सांगतात.

हे ऐकत असताना मी नकारार्थी मान डोलावली. दक्षिण कोरियात जाण्यासाठी अनेक माणसं आणि त्यांच्या घरचे उत्सुक असतात. असं असताना ही दोन माणसं उत्तर कोरियात जाण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु यांग यांनी त्यामागची भूमिका मांडली.

"माझी श्रद्धा ज्या ठिकाणी आहे तिथे मला राहायला आवडेल. माझे आदर्श ज्या परिसरात तिथे वेळ व्यतीत करायला मला आवडेल. मला तिथेच जगाचा निरोप घ्यायला आवडेल."

"माणसाने आपल्या विचारांशी प्रामाणिक राहावं. समाजवादाने मी प्रभावित झालो आहे असं तुम्हाला वाटेल पण मी समाजवाद स्वेच्छेने स्वीकारला आहे. तुरुंगात असताना माझे विचार, श्रद्धास्थानं अधिक बळकट झाली", ते सांगतात.

आमची भेट झाल्यानंतर या दोघांनी सोल शहरात असलेल्या एकत्रीकरण मंत्रालयासमोर आंदोलन केलं. हे मंत्रालय उत्तर कोरियाशी संबंधांचं नियंत्रण करतं.

उत्तर आणि दक्षिण कोरियादरम्यान होणाऱ्या चर्चेदरम्यान आमच्याबद्दल चर्चा व्हावी असं या दोघांना वाटतं. मायदेशी परतता येईल या दृष्टीने दोन्ही देशांनी पावलं उचलावीत असं त्यांना वाटतं.

मात्र तूर्तास दोन्ही देशांनी काहीही प्रतिसाद दिलेला नाही. उत्तर कोरियात जायला मिळेल अशी आशा त्यांना आहे.

उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, आण्विक नि:शस्त्रीकरण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, यांग सून गिल (पांढरी टोपी परिधान केलेले) यांची पत्नी आणि कुटुंबीय दक्षिण कोरियात आहेत. पण त्यांना उ.कोरियात परतायचं आहे.

समाजवादी दृष्टिकोन अनेक उजव्या विचारसरणीच्या मंडळींना खुपतो आहे. दक्षिण कोरियातील समाजात समाजवादविरोधी दृष्टिकोन रुजला आहे.

या विचारसरणीला रोखण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा कायदा तयार करण्यात आला. 1975 मध्ये पार्क च्युंग ही यांच्या कार्यकाळात समाजवादी विचारसरणीचं पालन करणाऱ्या अनेकांना धाकदपटशा दाखवून अटक करण्यात आली. यापैकी आठ जणांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

दक्षिण कोरियातील बहुतांश जण आता मवाळ झाले आहेत. मात्र तरीही त्यांना उत्तर कोरियाचा कम्युनिझम भीतीदायक वाटतो.

सध्याची लोकशाही व्यवस्था अंगीकारण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत करावी लागली आहे. ते तीव्रतेने निषेध व्यक्त करतात. स्वत:ची मतं ठामपणे मांडतात. आपल्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेबद्दल त्यांना आदर आहे. सध्या दक्षिण कोरियाची अर्थव्यवस्था आशिया खंडातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे.

उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, आण्विक नि:शस्त्रीकरण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दक्षिण कोरियाची अर्थव्यवस्था आशिया खंडातल्या दमदार अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.

दुसरीकडे उत्तर कोरिया मुख्य प्रवाहापासून तुटक वागणारा असा गूढरम्य देश आहे. तिथल्या राज्यकर्त्यांविरुद्ध बोलण्याने थेट तुरुंगात रवानही होऊ शकते. प्रसारमाध्यमांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. अर्थव्यवस्थेची स्थिती फारशी आशावादी नाही.

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दोन्ही देशांच्या नशिबी शांतता आली आहे. शांतता करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर प्रचंड लष्करी फौजा बाळगणाऱ्या दोन्ही देशांमध्ये जल्लोष होईल यात शंकाच नाही. या कराराने कोरियन युद्ध औपचारिकदृष्ट्या संपुष्टात येईल.

काटेरी तारांची कुंपणं आणि भूसुरुंग बाजूला झाले तरी उत्तर तसंच दक्षिण कोरियातील सामाजिक आणि वैचारिक दरी मिटण्यासाठी बराच वेळ लागेल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)