किम जाँग-उनना ट्रंप व्हाइट हाऊसचं निमंत्रण देण्याची शक्यता

फोटो स्रोत, AFP
सिंगापूरमध्ये 21 जूनला होणारी बैठक फलद्रूप झाल्यास उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांना व्हाईट हाऊसला येण्याचं आमंत्रण देऊ, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सांगितलं.
सिंगापूरच्या बैठकीआधी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी ट्रंप यांची अमेरिकेत भेट घेतली, तेव्हा ट्रंप यांनी हे उद्गार काढले.
"कोरियन युद्ध संपण्याच्या औपचारिक घोषणेसाठी करार होऊ शकतो. वाटाघाटींमधला तो सगळ्यांत सोपा भाग असेल. त्यानंतर काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे," असं ट्रंप यांनी सांगितलं.
उत्तर कोरियाने आण्विक अस्त्रांचा त्याग करावा, असा अमेरिका आणि मित्रराष्ट्रांचा आग्रह आहे. मात्र एका बैठकीत यावर ठोस निर्णय होणार नाही, असं ट्रंप यांना वाटतं.
आण्विक नि:शस्त्रीकरणासाठी प्रयत्नशील असल्याचे संकेत किम यांनी दिल्याचं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पाँपेओ यांनी सांगितलं. मात्र अमेरिकेच्या दृष्टीने निर्धारित अण्वस्त्रांचा त्याग उत्तर कोरिया करणार का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
सिंगापूर बैठकीबद्दल काय मत?
उत्तर कोरियाने अण्वस्त्रांबद्दलची भूमिका बदलावी, यासाठी ट्रंप यांनी प्रचंड दबाब आणण्याचं धोरण अंगीकारलं होतं. मात्र आता मैत्रीपूर्ण वाटाघाटी होणार असल्याने दडपणाची गरज नसल्याचं ट्रंप म्हणाले. परंतु उत्तर कोरियावर आणखी निर्बंध लादले जाऊ शकतात, असे संकेत त्यांनी दिले आहेत. सिंगापूर बैठकीत अपेक्षित घडामोडी घडल्या नाहीत तर बैठकीतून माघार घेईन, असा इशाराही ट्रंप यांनी दिला आहे.
मात्र बैठक यशस्वी झाल्यास किम यांना व्हाइट हाऊसचं निमंत्रण देण्यात येऊ शकतं. "किम बैठकीत सकारात्मक चर्चेच्या दृष्टीने प्रयत्नशील असतील अशी आशा आहे," असं ट्रंप यांनी सांगितलं.
किम यांना फ्लोरिडाच्या त्यांच्या घरी येण्याचं निमंत्रण देणार का, या प्रश्नावर ट्रंप यांनी सावध पवित्रा घेतला. "व्हाइट हाऊस भेटीने चर्चेला सुरुवात होऊ शकते. पुढचं पुढे बघू," असे ते म्हणाले.
बैठकीच्या तयारीबद्दल विचारलं असता ट्रंप म्हणाले, "बैठकीसाठी तयारी करण्याची गरज नाही, कारण माझा पुरेसा अभ्यास झाला आहे. तुमचा दृष्टिकोन कसा आहे, हे महत्त्वाचं आहे. गोष्टी अपेक्षेनुरूप घडवून आणण्यासाठीची मानसिकता आवश्यक आहे."
उत्तर कोरियाला अनेकदा भेट दिलेला बास्केटबॉलपटू डेनिस रॉडमन यांना बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे का, असं विचारल्यावर ट्रंप म्हणाले, "रॉडमन माझा मित्र आहे. त्याचा दृष्टिकोन चांगला आहे, पण त्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं नाही."
आबे यांना बैठकीतून काय हवं आहे?
ट्रंप अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी अनेकदा त्यांची भेट घेतली आहे. बैठकीची घोषणा झाल्यापासून जपानचे हितसंबंध जपले जावेत, यासाठी आबे प्रयत्नशील आहेत.

फोटो स्रोत, AFP
जपानी भाषा आणि संस्कृती समजून घेण्यासाठी 1970 आणि 1980च्या दशकात उत्तर कोरियाने जपानच्या नागरिकांचं अपहरण केलं होतं. यामुळे जपानला उत्तर कोरियाबद्दल धास्ती आहे. ट्रंप जपानची भूमिका समजून घेतील अशी खात्री आहे, असं आबे यांनी सांगितलं.
जपानच्या 13 नागरिकांचं अपहरण केल्याची कबुली उत्तर कोरियाने दिली असली तरी प्रत्यक्षात हा आकडा जास्त असण्याची शक्यता आहे.
"उत्तर कोरियाशी समोरासमोर चर्चा करायची आहे, जेणेकरून अपहरणासंदर्भात स्पष्टपणे चर्चा करता येईल आणि प्रश्न मार्गी लागेल," असं अबे म्हणाले.
आशियाई उपखंडात शांतता प्रस्थापित व्हावी अशी जपानची इच्छा आहे. उत्तर कोरियानेही त्या दिशेने पावलं उचलल्यास त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल, असं आबे यांनी सांगितलं.
सिंगापूर बैठकीच्या पार्श्वभूमीवर आशियाई उपखंडातील नेते अमेरिकेला भेट देत आहेत. आबे यांची अमेरिका भेट याच उपक्रमाचा भाग आहे.
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेओ लावरोव्ह यांनी उत्तर कोरियातील प्याँगयांगमध्ये किम यांची भेट घेतली. किम मॉस्कोमध्ये व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत.
किम यांनी गेल्या महिन्याभरात दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांची दोनदा भेट घेतली. त्यादरम्यान मून यांनी अमेरिकेत ट्रंप यांचीही भेट घेतली होती.
उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील चर्चेच्या दृष्टीने चीनची भूमिका निर्णायक आहे. किम यांनी बीजिंगमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









