अलास्कामध्ये 500 मीटर उंच 'मेगात्सुनामी', आजवरची दुसरी सर्वात मोठी लाट

फोटो स्रोत, Photo by Cyrus Read/U.S. Geological Survey
अलास्कामध्ये झालेली भीषण मेगात्सुनामी ही आजवर नोंद झालेल्या दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी लाट ठरली आहे. हिमनद्या वितळत असल्याने निर्माण होणाऱ्या धोक्यांची ही घटना आठवण करून देणारी असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात.
मागील उन्हाळ्यात अलास्काच्या आग्नेय भागातील एका दुर्गम फयोर्डमध्ये (हिमनद्यांनी तयार केलेली यू आकाराची दरी किंवा खाडी) ही प्रचंड लाट घुसली आणि तिच्या मार्गातील सर्वकाही उद्ध्वस्त केलं. मात्र, ही घटना त्यावेळी फारशी चर्चेत आली नव्हती.
आता करण्यात आलेल्या नव्या शास्त्रीय अभ्यासानुसार, काही लहान भूकंपांमुळे डोंगराचा मोठा भाग कोसळला आणि त्यातून ही मेगात्सुनामी निर्माण झाली होती.
तब्बल 6.4 कोटी घनमीटर खडक म्हणजेच गिझाच्या तब्बल 24 पिरॅमिड्स इतका अवघ्या एका मिनिटाच्या आत समुद्रात कोसळला.
इतक्या प्रचंड प्रमाणात खडक पाण्यात आदळल्यामुळे जवळपास 500 मीटर उंचीची महासागरातील महाकाय लाट तयार झाली.
ही घटना पहाटेच्या वेळी घडल्यामुळे त्या मार्गावर असणाऱ्या पर्यटकांच्या क्रूझ जहाजांचा धोका टळला, असं संशोधक सांगतात.
ट्रेसी आर्म फयोर्डमध्ये प्रत्यक्ष नुकसान पाहून आलेले अलास्कन भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. ब्रेटवूड हिगमन यांनी ही घटना "अतिशय जवळ येऊन टळलेला धोका" असल्याचं म्हटलं आहे
ते म्हणाले, " काही लोक चुकीच्या ठिकाणी जाण्यापासून खूप थोडक्यात वाचले. पण आपल्याला भविष्यात नेहमीच असं नशीब साथ देईल का, याबद्दल मला भीती वाटते."
भूस्खलनामुळे पाण्यात निर्माण होणाऱ्या अशा प्रचंड लाटांना मेगात्सुनामी म्हटलं जातं.
भूकंप किंवा सैल झालेला खडक अचानक पाण्यात कोसळल्यावर त्या तयार होतात. या लाटा प्रामुख्याने स्थानिक पातळीवरच परिणाम करतात आणि लवकरच त्यांची तीव्रता कमी होते.
याउलट खुल्या महासागरात होणाऱ्या त्सुनामी प्रामुख्याने मोठ्या भूकंपांमुळे किंवा क्वचित प्रसंगी पाण्याखालील ज्वालामुखींसारख्या घटनांमुळे निर्माण होतात.
2011 मध्ये जपानमध्ये आलेल्या त्सुनामीसारख्या लाटा हजारो किलोमीटर प्रवास करून लोकवस्तीच्या भागात मोठी जीवितहानी आणि विध्वंस करू शकतात.
1950 मध्ये झालेली मेगात्सुनामी ही आजवरची सर्वात मोठी असून तिची उंची 500 मीटरहून अधिक होती. अलास्कामधील ही अलीकडची घटना दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी मेगात्सुनामी ठरली आहे.
डॉ. हिगमन हे त्सुनामीनंतर काही आठवड्यांनी ट्रेसी आर्म फयोर्डमध्ये पोहोचले होते. हा भाग अलास्काची नैसर्गिक सौंदर्यस्थळं पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या क्रूझ जहाजांसाठी लोकप्रिय आहे.
त्यांना डोंगर उतारावर तुटलेली झाडं, पाण्यात भिरकावलेली खोडं आणि माती व वनस्पती पूर्णपणे खरडून काढलेले भलेमोठे खडकांचे पट्टे दिसून आले.
उभट डोंगररांगा, अरुंद फयोर्ड आणि वारंवार होणारे भूकंप यांमुळे अलास्का मेगात्सुनामीसाठी विशेषतः संवेदनशील आहे.

फोटो स्रोत, Photo by Cyrus Read/U.S. Geological Survey.
'सायन्स' या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या नव्या संशोधनानुसार, हवामान बदलामुळे होत असलेलं हिमनद्यांचं वितळणं आणि कायमस्वरूपी गोठलेली जमीन म्हणजेच पर्माफ्रॉस्ट वितळल्याने अशा दुर्घटनांची तीव्रता आणखी वाढत आहे.
संशोधकांनी प्रत्यक्ष निरीक्षणं, भूकंपीय माहिती आणि उपग्रहांवरील डेटा वापरून घटनांची साखळी उलगडली आणि लाटेची नेमकी उंची मोजली.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील डॉ. स्टीफन हिक्स म्हणाले, "आधी ही हिमनदी त्या खडकाला आधार देत होती. पण बर्फ वितळल्यानंतर डोंगराचा खालचा भाग उघडा पडला आणि त्यामुळे खडक अचानक फयोर्डमध्ये कोसळला."
डॉ. स्टीफन हिक्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक दशकांपासून त्सुनामीचा अभ्यास केला असून ते या वाढत्या धोक्याबाबत चिंतीत आहेत.
"आता अधिकाधिक लोक अशा दुर्गम भागात जात आहेत. हवामान बदल समजून घ्यायला हे पर्यटक क्रूझवर येतात, पण हे भाग धोकादायकही आहेत," असं ते म्हणाले.
डॉ. हिगमन यांनाही मेगात्सुनामीचा धोका वाढत असल्याबाबत शंका नाही.
"माझ्या मते हा धोका केवळ थोडासा नाही, तर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. कदाचित काही दशकांपूर्वी जेवढ्या घटना घडत होत्या त्यापेक्षा आज त्यांची संख्या 10 पटीने वाढली असावी," असं ते म्हणाले.
संशोधकांनी अलास्कातील संवेदनशील भागांमध्ये अशा धोक्यांचं अधिक व्यापक निरीक्षण करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव काही क्रूझ कंपन्यांनी ट्रेसी आर्मच्या दिशेने जहाजं पाठवणं थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























