अमेरिकेचा इराणवर पुन्हा बॉम्बहल्ला, ट्रम्प यांनी सांगितलं कारण

अमेरिकेचा इराणवर पुन्हा बॉम्बहल्ला, ट्रम्प यांनी सांगितलं कारण

फोटो स्रोत, U.S. Central Command/Getty Images

वाचन वेळ: 3 मिनिटे

इराणच्या लष्करी ठिकाणांवर बॉम्बहल्ले केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने अमेरिकन जहाजांवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं.

परंतु, आधी इराणच्या एका तेल टँकरवर हल्ला करण्यात आला होता, त्यामुळेच क्षेपणास्त्रं डागण्यात आल्याचं इराणने म्हटलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 6 मे रोजी सायंकाळी इराणबरोबरचा संघर्ष लवकरच संपुष्टात येईल, असं म्हटलं होतं.

युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) एका निवेदनात सांगितलं, "जेव्हा अमेरिकन नौदलाची गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून ओमानच्या आखाताकडे जात होती, तेव्हा इराणकडून झालेले हल्ले रोखण्यात आले आणि स्वतःच्या बचावासाठी अमेरिकन सैन्याने त्यांना प्रत्युत्तर दिलं."

अमेरिकन जहाजं या भागातून जात असताना इराणच्या सैन्याने क्षेपणास्त्रं, ड्रोन आणि लहान बोटींच्या मदतीने हल्ला केला, असं निवेदनात पुढे म्हटलं आहे.

'अमेरिकेनं शस्त्रसंधीचं उल्लंघन' केल्याचा इराणचा आरोप

दुसरीकडे, इराणच्या सर्वोच्च लष्करी कमांडने अमेरिकेवर 'शस्त्रसंधीचे उल्लंघन' केल्याचा आरोप केला आहे.

अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे जात असलेल्या एका इराणी तेल टँकरवर हल्ला केला, असं इराणची सरकारी प्रसारण संस्था आयआरआयबीने टेलिग्रामवर दिलेल्या निवेदनात म्हटलं.

इराणने सांगितलं की, त्यांच्या सशस्त्र दलांनी तात्काळ प्रत्युत्तर देत अमेरिकेच्या सैन्य जहाजांवर हल्ला केला आणि त्यांचं मोठं नुकसान केलं.

इराणच्या नौदलानं सांगितलं की, त्यांनी 'तीव्र स्फोटक शस्त्रांनी' प्रत्युत्तर दिलं आणि त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार यामुळे 'अमेरिकेचं मोठं नुकसान झालं' आहे.

तसेच 'घुसखोरी करणारी शत्रूची जहाजं वेगाने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून निघून गेली', असंही त्यांनी म्हटलं.

इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अमेरिका-इराण तणाव कमी होणार? 14 कलमी कराराची चर्चा, ट्रम्प काय म्हणाले?

डोनाल्ड ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दरम्यान, इराणबरोबर सुरू असलेला संघर्ष लवकरच संपुष्टात येईल, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 6 मे रोजी सायंकाळी केला होता.

होर्मुझची सामुद्रधुनी आणि इराणच्या आण्विक कार्यक्रमाबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जॉर्जियाच्या गव्हर्नर पदाचे रिपब्लिकन उमेदवार बर्ट जोन्स यांच्या प्रचारसभेत ट्रम्प बोलत होते.

ते म्हणाले, "आम्ही हे अत्यंत महत्त्वाच्या कारणासाठी करत आहोत. इराणला अण्वस्त्रं तयार करू देता येणार नाही. बहुतांश लोकांना माहीत आहे की, आम्ही योग्य निर्णय घेत आहोत आणि हा संघर्ष लवकरच संपेल."

सीएनएनच्या वृत्तानुसार, इराण आज (7 मे) मध्यस्थांच्या मार्फत अमेरिकेच्या प्रस्तावावर आपलं उत्तर देणार आहे.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई म्हणाले की, आम्ही अमेरिकेच्या या प्रस्तावावरील आमचं मत पाकिस्तानी मध्यस्थांच्या मार्फत शेअर करू.

सीएनएनने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, अमेरिका आणि इराण दोघेही संघर्ष थांबवण्यासाठी कराराच्या दिशेने पुढे जात आहेत. परंतु, अमेरिकेकडून आलेल्या प्रस्तावावर अजून विचार सुरू आहे, असं इराणने सांगितलं.

इराण अमेरिकेच्या प्रस्तावावर विचार करतोय; पाकिस्तानने काय म्हटलं?

संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेने दिलेल्या प्रस्तावावर विचार करत असल्याचे इराणने म्हटलं आहे. माध्यमांत आलेल्या काही वृत्तांनुसार, दोन्ही देश लवकरच कराराच्या जवळ पोहोचू शकतात.

अमेरिकेतील न्यूज आऊटलेट ॲक्सियोसच्या वृत्तानुसार, इराणसोबत लवकरच 14 मुद्द्यांवर आधारित करार होऊ शकतो, अशी व्हाईट हाऊसला आशा आहे.

पाकिस्तानची भूमिका असेल?

अमेरिकेच्या प्रस्तावाबाबतचं आमचं मत आम्ही पाकिस्तानी मध्यस्थांशी शेअर करू, असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं.

दरम्यान, इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत असल्याची माहिती पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इसहाक डार यांनी दिली.

अमेरिकेने मागील 24 तासांत इराणबरोबर खूप चांगली चर्चा केली आहे आणि लवकरच एक करार होऊ शकतो, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.

ॲक्सियोसच्या वृत्तानुसार, या करारात इराणचा आण्विक कार्यक्रम थांबवणे, निर्बंध हटवणे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचा समावेश आहे.

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात 28 फेब्रुवारीपासून संघर्ष सुरू झाला होता. परंतु, गेल्या काही आठवड्यांपासून शस्त्रसंधी लागू आहे. हा संघर्ष कायमचा थांबवण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थीची म्हणून भूमिका बजावत आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)