'आता भीती आणि किळस वाटतेय'; नसरापूर प्रकरणानंतर पालक काय म्हणत आहेत?

नसरापूर गावामध्ये एका साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर नसरापूर गावातील सुपर मार्केट चौकात समस्त ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं होतं.

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, नसरापूर गावामध्ये एका साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर लोक रस्त्यावर उतरले होते.
    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

"आमच्या नातीला खाली चल म्हणलं तर ती नाही म्हणते. ती घाबरली आहे. मुलांना भीती बसली आहे." नसरापूर मधल्या महिला सांगत होत्या.

गावात जिथे ही घटना घडली तिथे जवळ शाळा आहे. त्या शाळेत मुलांना कसं पाठवायचं असा प्रश्न पालक विचारत असल्याचं त्या सांगतात.

बहुतांश घरांमधील लहान मुलं जी खाली रस्त्यावर मैदानावर खेळायला यायची त्यांना एक तर पालक सोडत नाहीत किंवा ती यायला तयार होत नाहीत, असं ग्रामस्थ सांगतात.

एका कुटुंबात तर घटना घडली त्याच दिवशी त्यांची लेक नातीसह सुट्टीत रहायला आली होती. घटनेबाबत कळल्यानंतर त्यांच्या मुलीने त्याच दिवशी सासरी परत जाण्याचा निर्णय घेतला.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "अशी घटना कळल्यामुळे मुलगी रात्रीच निघून गेली. नवऱ्याला बोलावून घेतलं. मला खूप धक्का बसलाय म्हणाली. मी जाते म्हणली. मी आणि ती दोघी घाबरलो. त्यामुळे मी म्हणलं तू तुझ्या घरी सुखरूप जा."

"नवरा आल्यानंतर नातीसोबत आजोबा पण गेले. दोघं तिघं मिळून सुखरूप सोडवू म्हणून. दोन अडीच वर्षांची नात सुट्टीला आली होती. पण आजीपाशी कसं सोडायचं नातीला असं तिला वाटलं."

नसरापूर घटना

नसरापूरच्या घटनेनंतर गावातल्या महिलांशी बोलताना त्यांनी नोंदवलेल्या या प्रातिनिधीक प्रतिक्रिया. गावात घटना घडून गेल्यावर पोलिसांनीही बैठक घेतली. ग्रामस्थांचं आंदोलनही झालं. आरोपीला अटक झाली आहे.

घटनेच्या 2 दिवसांनी बाजारपेठ सुरू झाली आणि गाव पूर्वपदावर यायला सुरुवात झाली. पण लोकांच्या मनातली भीती मात्र कमी व्हायला तयार नाही.

एकीकडे भीती आणि दुसरीकडे राग व्यक्त करत आपल्या मुलांच्या नातवंडांच्या सुरक्षेची काळजी करत हे ग्रामस्थ राहत आहेत.

पण हे भीतीचं वातावरण फक्त नसरापूर पुरतं मर्यादित नाही. या घटनेनंतर अनेक घरांमधून अशाच प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत.

समाज माध्यमांमुळे प्रतिक्रिया बदलल्या असल्याचं नेहा महाजन यांनी नोंदवलं. महाजन यांची मुलगी प्राथमिक शाळेत शिकते.

नसरापूरच्या घटनेनंतर त्यांच्या स्वत:कडूनच नव्हे तर घरातल्या सगळ्याच लोकांकडून प्रतिक्रिया आल्याचं त्यांनी नोंदवलं.

अगदी पुण्यातील नवले पुलावर बरेच तास वाहतूक रोखून धरण्यात आली होती.
फोटो कॅप्शन, अगदी पुण्यातील नवले पुलावर बरेच तास वाहतूक रोखून धरण्यात आली होती.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "मी एकत्र कुटुंबात राहते. आत्तापर्यंत आपण मुलींना धडाडीचं बनवलं पाहिजे असा संवाद आणि मान्यता कुटुंबात होता. मात्र या घटनेनंतर ते बदललं आहे. आपण मुलांना कराटे शिकवू, सेल्फ डिफेन्स शिकवू, पण त्यांच्यासमोर जास्त ताकदीचा माणूस आला तर काय असा प्रश्न विचारला जात आहे."

"मा‍झ्या पालकांनी मला बोलावून घेतलं आणि यापुढे मुलीला इतरांकडे रहायला पाठवणं बंद कर, असं सांगितलं. तिला खेळायला, काही शिकायला पाठवल्यावर तिथे थांबून रहा असंही सांगितलं. मला वाटतं यापूर्वी घटना घडल्या तेव्हा सार्वत्रिक चीड आणि वाईट वाटणं ही भावना होती. आता भीती आणि किळस वाटतेय."

"समाज माध्यमांचा परिणाम होत आहे. समाज माध्यमांवर त्या मुलीचा फोटो, त्याचे रिल्स शेअर केले गेले. ते पाहून ती फोटोग्राफिक मेमरी निर्माण होतेय त्याचा परिणाम दिसत आहे. फोटोग्राफिक मेमरीची काही गरज नाही खरंतर," असं मत त्यांनी व्यक्त केलं.

ग्राफिक्स
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

प्राथमिक शाळेतच शिकणाऱ्या मुलीच्या आणखी एका पालकांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "पूर्वी आम्ही कामासाठी जवळच असणार्‍या ठिकाणी जायचो, तेव्हा मुलीच्या मैत्रिणी सहज सोबत यायच्या. आता मात्र त्यांच्या पालकांनी त्यांचं बाहेर येणं बंद केलं आहे."

"बाहेर चांगले लोक नाहीत म्हणून बाहेर जायचं नाही असं सांगितलं जातंय. मलाही भीती वाटतेच. रस्त्यावर हल्ली अपघात झाला तरी कोणी मदतीला येत नाही. अशा परिस्थितीत कोणी येईल का याची भीती वाटत राहते," अशी भावना ते व्यक्त करतात.

फक्त मुलीच नाही तर मुलांच्या पालकांच्याही प्रतिक्रिया या घटनेनंतर टोकाच्या आहेत.

बीबीसी मराठीशी बोलताना सारिका पाटील म्हणाल्या, "सुरुवातीला मला खूप राग आला कारण इतकी छोटी मुलगी होती आणि तो अत्याचार करणारा माणूस मोठा होता. त्या माणसाची वृत्ती कशी असेल? पालकांनी आपलं मूल कोणासोबत वेळ घालवतंय हे पाहिलं पाहिजे."

घरांमध्ये उमटणाऱ्या या प्रतिक्रियांचं प्रतिबिंब समाज माध्यमांवरही उमटताना दिसत आहे. एकीकडे अनेकजण हतबलता व्यक्त करताना दिसतात.

तर दुसरीकडे आईने मुलीला नेमकं काय शिकवावं किंवा शिकवलं याचं कौतुक करणारे रील्सही व्हायरल होताना दिसत आहेत.

या रील्समध्ये अगदी लहान वयोगटातील मुलगी बाहेर कोणासोबत जायचं? खायला काही घ्यायचं का नाही? याबाबत आईशी संवाद साधताना दिसते.

नसरापूर घटना

नेहा महाजन यांच्या मते या विषयाकडे पॉलिसी म्हणूनच पाहीलं जाणं गरजेचं आहे.

"आत्ताच्या घटनेनंतर काही जण आम्ही मुलांना हे शिकवलं बघा. गुड टच बॅड टच किंवा या घटनेबद्दल मुलांशी बोललो असं सगळं मांडताना दिसतात. मात्र याचं टोकनिझम होऊन उपयोग नाही."

"शाळांमध्ये लहान वयापासून सेक्स एज्युकेशन बंधनकारक करणं किंवा पुरुषही वाढताना काय पद्धतीने घडवला जातोय, तो काय पहातोय याबद्दल मांडणी होणं गरजेचं आहे. राजकारणी याबद्दल बोलताना दिसत नाहीत. पॉलिसी लेव्हलला याचा विचार झाला पाहिजे"

तर सारिका पाटील यांच्या मते मुलांना आपलं शरीर आणि आपले हक्क हे शिकवलं जाणं गरजेचं आहे असं वाटतं. त्याबद्दल संवाद वाढला पाहिजे, कोणावर विश्वास ठेवायचा हे मुलांशी बोललं गेलं पाहिजे, असं त्या मांडतात.

ग्राफिक्स

नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोची आकडेवारी सांगते की 2024 मध्ये पॉक्सो अंतर्गत देशभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये 5.9 टक्के वाढ झाली.

या प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा होण्याचं प्रमाण 32.3 टक्के आहे. तर कोर्टात सुनावणी सुरू असलेल्या केसेसचं प्रमाण आहे 87.7 टक्के.

नसरापूरच्या प्रकरणात पोलिसांचा धाक किंवा वावरच गावात नव्हता, असा दावा माजी सरपंच आणि प्रशासक उषा कदम यांनी केला.

पूर्वी पोलीस चौकी ही गावात होती आणि त्यावेळी पोलिसांचा वावर देखील असायचा. मात्र ती इमारत धोकादायक झाल्यानंतर गावातली चौकी हायवे लगत हलवण्यात आली. त्यानंतर वारंवार मागणी करूनही गावात पोलीस गस्त घालण्यासाठीही येत नसल्याचं त्या म्हणाल्या.

बीबीसी मराठीशी बोलताना कदम म्हणाल्या, "आम्ही अनेकदा पत्रव्यवहार केला. साधं ट्रॅफिक जॅम होतंय त्यासाठी एखादा पोलीस पाठवा म्हणून विनंती केली, पण ते देखील केलं गेलं नाही"

नसरापूर घटनेनंतर लोकांमध्ये संताप निर्माण झाला आणि नागरिक रस्त्यावर उतरले होते.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, नसरापूर घटनेनंतर लोकांमध्ये संताप निर्माण झाला आणि नागरिक रस्त्यावर उतरले होते.

पेंडन्सीचं हे प्रमाण आणि गुन्हा सिद्ध न होण्याचं प्रमाण हे लोकांच्या मनात अविश्वास निर्माण होणं, भीती निर्माण होण्याचं एक प्रमुख कारण असल्याचं तज्ज्ञ मांडतात.

बीबीसी मराठीशी बोलताना मानसोपचार तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांनी लोकांच्या मनातली भीती ही साहजिक प्रतिक्रिया असल्याचं मांडलं. मात्र पालकांनी मुलांचं स्वातंत्र्य आणि बंधनं याचाही समतोल राखणं गरजेचं असल्याचं म्हटलं.

डॉ. दाभोलकर म्हणाले, "अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे हे सिस्टिमचं फेल्युअर आहे असं मला वाटतं. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पालकांना भीती वाटणं साहजिक आहे. पण पालकांनी हा विचारही केला पाहिजे की याचा परिणाम मुलांच्या वाढीवर होणार नाही."

"पालकांनी सजग राहणं आवश्यक आहे. मात्र मुलांचं स्वातंत्र्य आणि काळजी याचाही समतोल राखायला हवा. खूप बंधनं आणली जाणार नाहीत हे पाहिलं पाहिजे."

"कायदा सुव्यवस्था म्हणून लोकांना विश्वास वाटत नाही हे दिसतंय. कायद्याच्या राज्यासाठी हे धोकादायक आहे. कायदे कडक करण्याबाबत बोललं जातं. पण 'शक्ती कायदा' आला त्याचं पुढे काय झालं ते दिसत नाही."

"समाज हस्तक्षेप करेल आणि त्यांच्या मदतीला सिस्टीम येईल याचा विश्वास वाटत नाही. त्यामुळे समाजाच्या एकूण विश्वासार्हतेला तडा जाताना दिसतोय. चाईल्ड सेक्शुअल अब्युज हा गुंतागुंतीचा विषय आहे. त्यात समाज, राजकारणी आणि प्रशासन यांनी एकत्रित प्रयत्न करायला हवे. एकमेकांकडे बोटं दाखवून हा प्रश्न सुटणार नाही."

ग्राफिक्स

तर अ‍ॅड. रमा सरोदे यांनी प्रतिबंधात्मक दृष्टीने विचार होणं आवश्यक असल्याचं मांडलं.

त्यांच्या मते, "पालकांमध्ये भीती असणं स्वाभाविक आहे. आकडेवारी पाहिली तर यात बहुतांश लोक हे ओळखीचे असतात. मुलांना सेफ स्पेस तयार होणं गरजेचं आहे. पोलिसांच्या पातळीवर ट्रॉमा इन्फॉर्म्ड अप्रोच असावा याचं प्रशिक्षण पाहिजे. इतर गुन्हे तसंच हा गुन्हा किंवा नुसता कायदा माहीत असून उपयोग नाही."

"आपल्याकडे प्रतिबंधात्मक पद्धतीने विचार होत नाही. समजा एखादी बाई माझ्यावर हात उगारला हे सांगते, पण तेव्हा तिचा मुद्दा लक्षात घेतला जात नाही. पण मारहाण झाली म्हटलं की, दखल घेतली जाते."

"आपली सामाजिक व्यवस्थाही पुरुषसत्ताक आहे. त्यामुळे प्रतिक्रिया म्हणून महिलांना मुलांना घरात ठेवा अशी मानसिकता आहे. मुलींना घरात ठेवा म्हणण्यापेक्षा अत्याचार करणाऱ्याला कशी शिक्षा होईल याचा प्रयत्न होत नाही. यातल्या सगळ्या स्टेकहोल्डर्सनी एकत्र येत काम करायला हवं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)