नसरापूर घटना : मुलीचे वडील म्हणाले, 'गुन्हेगाराला फाशी होईपर्यंत राजकारण्यांनी भेटायला येऊ नये'

फोटो स्रोत, UGC
पुणे जिल्ह्यात नसरापूर गावामध्ये एका साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या आरोपात एका संशयिताला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
शुक्रवारी (1 मे) सायंकाळच्या सुमारास ही घटना समोर आली होती.
या घटनेनं संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून गावात शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू करत दीड तासांच्या आत आरोपीला अटक केली.
या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तपास सुरू आहे.
घटनेनंतर परिसरात लोकांमध्ये संताप निर्माण झाला आणि काही वेळासाठी नागरिक रस्त्यावर उतरले. मात्र पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.
नसरापूरच्या घटनेतील मुलीच्या वडिलांनी व्हीडिओ जारी करत प्रतिक्रिया दिलीय. ANI या वृत्तसेवा संस्थेनं यासंबंधी माहिती दिली.
या व्हीडिओत मुलीचे वडील म्हणतात की, "माझ्या कुटुंबाची आणि माझी एकच विनंती आहे : माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत आणि गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होईपर्यंत, कोणत्याही राजकीय नेत्यानं आम्हाला भेटण्यासाठी आमच्या घरी येऊ नये. ही आमची नम्र विनंती आहे. त्या गुन्हेगाराला मृत्युदंडाची शिक्षा झाल्यानंतरच आम्ही राजकीय नेते किंवा आम्हाला भेटू इच्छिणाऱ्या कोणालाही भेटू. तोपर्यंत शोक व्यक्त करण्यासाठी कोणत्याही राजकारण्यानं माझ्या घरी येऊ नये."
या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतली आहे.
या घटनेवर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पुण्यातील घटना अत्यंत निंदनीय आहे. आरोपीला शक्य तितक्या लवकर मृत्युदंड मिळावा, अशी मागणी आम्ही न्यायालयात करणार आहोत."
आरोपीविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
या संपूर्ण घटनेचा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे, असं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल
राष्ट्रीय महिला आयोगाने पुण्यातील नसरापूर गावच्या एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
आयोगाने म्हटलं, "या भयानक गुन्ह्यामुळे तीव्र वेदना आणि संताप व्यक्त होत आहे. लहान मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त झाली आहे. या अमानवी कृत्याचा तीव्र निषेध. असे गुन्हे हे बालकांच्या हक्कांचे गंभीर उल्लंघन आहे आणि समाजाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण करतात."
आयोगाच्या अध्यक्षांनी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याचे, तपासावर लक्ष ठेवण्याचे आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे, अशीही माहिती या निवेदनात देण्यात आली.
त्याच वेळी पीडितेच्या कुटुंबाला तातडीची मदत व भरपाई देणे, पॉक्सो अंतर्गत वेळेत आरोपपत्र दाखल करणे आणि फास्ट ट्रॅक न्यायालयात जलद सुनावणी सुनिश्चित करण्यावरही भर असल्याचं आयोगानं म्हटलं.
पोलीस बंदोबस्त तैनात
घटनेनंतर नसरापूर गावातील सुपर मार्केट चौकात समस्त ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. एसआरपीएफच्या तीन तुकड्या आणि ग्रामीण पोलीस देखील या ठिकाणी दाखल झाले आहे.
पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
"हे कृत्य करणाऱ्याला आमच्या ताब्यात द्या, हवं तर आमच्यावर गुन्हा दाखल करा आम्ही त्याचं काय करायचं ते बघून घेऊ," अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिलेली आहे.
याबाबत माहिती देताना पुणे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल म्हणाले की, "नसरापूर येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर आहे.
"संबंधित मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या दीड तासांत आरोपीला अटक केली. या प्रकरणात पॉक्सो कायद्यासह अन्य गंभीर कलमं लावण्यात आली आहेत.
"आरोपीविरोधात यापूर्वी 1998 आणि 2015 मध्ये विनयभंगाचे गुन्हे दाखल होते, मात्र त्यातून तो मुक्त झाला होता. आम्ही तातडीने दोषारोपपत्र दाखल करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, यासाठी आग्रही आहोत."
सर्वपक्षीय नेत्यांकडून तीव्र निषेध
या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्याची मागणी केली आहे.
हा प्रश्न राजकारणाचा नसून मानवतेचा आहे आणि पीडित चिमुकलीसाठी न्याय मिळालाच पाहिजे, अशी सर्वपक्षीय भूमिका समोर येत आहे.
"भोर-नसरापूरची घटना ऐकून रक्त उसळतंय! अशा नराधमांना समाजात स्थान नाही. कायदा आपले काम करेलच, पण ही लढाई आता केवळ त्या लेकीसाठी नसून प्रत्येक मुलीच्या सुरक्षिततेसाठी आहे. गुन्हेगाराला फाशीच हवी," असं शिवसेना खासदार ज्योती वाघमारे म्हणाल्या.

फोटो स्रोत, UGC
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
"पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील अतिशय संताप आणणारी घटना घडली आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या नराधमाला काहीही करून फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करा. शासनाला जमत नसेल तर त्याला गावकऱ्यांच्या ताब्यात द्या, गावकरी त्याला योग्य ती अद्दल घडवेल", अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेवरून सरकारवर टीका केली आहे.
"चार वर्षाच्या मुलीला अत्याचार करून ठेचून मारला जातं यावर गृहमंत्र्यांचा राजीनामा अजिबात आपण मागू नये, कारण सर्वसामान्य माणूस जगला की मेला याच्याशी त्यांना काय देणं घेणं? मी कसा शक्तिशाली हे ठसवण्यात सगळे व्यस्त आहेत. तिथं सर्वसामान्यांचं जगणं अवघड झालं आहे. आपण फक्त एवढेच लक्षात ठेवूया की आपण एका अत्यंत असुरक्षित राज्यांमध्ये राहत आहोत," असं त्या म्हणाल्या.
भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनीही याचा निषेध केला.
"पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावची ही घटना केवळ गुन्हा नाही, ती आपल्या समाजाच्या विवेकाला हादरवणारी वेदना आहे. त्या 4 वर्षांच्या चिमुकलीसाठी न्याय हीच खरी लढाई, आणि ती शेवटपर्यंत लढली जाईल. राजकारण नव्हे, मानवता जिंकली पाहिजे," असं वाघ यांनी म्हटलं.
शक्ती कायद्याची अंमलबजावणी करा- रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही कठोर कारवाईची मागणी केली आहे.
एक्स हँडलवर त्यांनी म्हटलं की, भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना अत्यंत भयावह आहे.
"ही केस तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या नराधमाला कठोरात कठोर अशी फाशीचीच शिक्षा द्यावी, तरच अशा नराधमांना चाप बसेल. या नराधमाने याआधीही दोन तीन चिमुकलींवर अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे.
दर आठवड्यात अशी एकतरी दुर्दैवी घटना समोर येत असून आज राज्यात चिमुकल्या देखील सुरक्षित नाहीत. 2025 मध्ये राज्यात 8643 म्हणजेच दिवसाला 24 तर दर तासाला बलात्काराची घटना घडली हे महाराष्ट्राला शोभणारे नाही.
या गुन्हेगारांना चाप बसवायचा असेल तर तत्काळ शक्ती कायद्याची अंमलबजावणी करायला हवी. सरकारने एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवून तत्काळ शक्ती कायदा लागू करावा, ही विनंती!", असं रोहित पवार यांनी म्हटलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























