डोंबिवली बलात्कार : 15 वर्षांची मुलगी, सामूहिक बलात्कार आणि 33 आरोपी, काय आहे संपूर्ण प्रकरण?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
22 सप्टेंबर 2021 रोजी 15 वर्षांची एक मुलगी डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस स्टेशनला पोहोचली. संध्याकाळची वेळ होती. पोलिसांना तिची अवस्था मानसिक आणि शाररिकदृष्ट्या कमजोर वाटली.
पण पुढच्या काही क्षणांत तिने जे सांगितलं ते पोलिसांना हादरवणारं होतं. ती म्हणाली, "गेल्या 9 महिन्यांत 33 जणांनी माझ्यावर सामूहिक बलात्कार केला."
"जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्यात आपल्यासोबत अनेक मुलांनी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले," अशी तक्रार पीडितेने पोलिसांकडे केली.
पोक्सोअंतर्गत (POCSSO) 33 जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. डोंबिवलीच्या भोपर परिसरातून पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली. बघता बघता काही तासांत 20 ते 25 वयोगटातील 21 आरोपींना तर 18 वर्षांखालील दोन आरोपींना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं.
ही घटना नेमकी कशी घडत गेली? 9 महिने पीडितेने तक्रार न करण्यामागे काय कारणं आहेत? पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे का? काही राजकीय पक्षांचा याच्याशी संबंध असल्याच्या चर्चेत कितपत तथ्य आहे? अशा सर्व प्रश्नांचा आढावा आपण घेणार आहोत.
'सोशल मीडियावर ओळख झाली'
ही घटना सगळ्यांसाठी जशी धक्कादायक होती तशी आम्हा पत्रकारांसाठीही गंभीर होती.
आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा मानपाडा पोलीस स्टेशनबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. काही संघटनांच्या महिलांची गर्दीसुद्धा होती.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष पथक नेमण्यात आलं आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांच्या नेतृत्वाखाली या पथकाचा तपास सुरू असल्याचं आम्हाला कळालं आणि त्यांना भेटण्यासाठी आम्ही आतमध्ये गेलो.

फोटो स्रोत, Deepali Jagtap/BBC
अर्थात पोलीस स्टेशनमध्ये प्रचंड वर्दळ सुरू होती. गर्दीतून रस्ता काढत अखेर आमची भेट त्यांच्याशी झाली.
त्या म्हणाल्या, "पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिची प्रकृती स्थिर आहे. आम्ही आतापर्यंत 29 आरोपींना पकडलं आहे. त्यापैकी 2 जण अल्पवयीन आहेत."
"पीडितेवर डोंबिवली, रबाळे, मुरबाड अशा विविध ठिकाणी सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार आहे. आम्ही तपासासाठी सर्व आरोपींचे मोबाईल ताब्यात घेतले आहेत. बहुतांश आरोपींची आणि पीडितेची ओळख फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर झाली,"
काही राजकीय पक्षांचा या प्रकरणाशी संबंध आहे का? यासंदर्भात त्यांनी अद्याप अशी कोणतीही माहिती समोर आली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
'व्हीडिओ काढून ब्लॅकमेल केलं'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर सर्वात महत्त्वाचं होतं ते म्हणजे पीडितेने आपल्या तक्रारीत नेमकं काय म्हटलं? गेल्या 9 महिन्यात तिच्यासोबत नेमकं काय झालं होतं?
"29 जानेवारी, 2021 मध्ये पीडितेला तिच्या मित्राने सकाळी 9.30 च्या सुमारास भेटण्यासाठी बोलवलं. पीडित मुलगी सकाळी 11 वाजता त्याला भेटायला गेली. मुख्य आरोपी त्याच्या मित्रासोबत आला होता जो ऑटो चालवत होता. त्याने मित्राच्या घरी जाण्याचा बेत आखला होता. वाटेत दुसरा मुलगा त्यांच्या ऑटोमध्ये बसला. मित्राच्या घरी जाण्याऐवजी आरोपी तिला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला.
या दरम्यान, मुख्य आरोपीने पीडितेला तिचे नग्न फोटो दाखवून ब्लॅकमेल केले, जे पीडितेने डिसेंबर 2020 मध्ये शेअर केले होते. नंतर मुख्य आरोपीने पीडितेवर बलात्कार केला आणि तिसऱ्या आरोपीने व्हिडिओ बनवला. यानंतर तिन्ही मुलांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित मुलगी तिच्या कुटुंबासह राहण्यासाठी वेगळ्या ठिकाणी गेली. या दरम्यान मुख्य आरोपी तिला सतत फोन करायचा, पण ती त्याचे कॉल टाळत होती.
20 फेब्रुवारी, 2021 रोजी मुख्य आरोपीने तिला वेगळ्या क्रमांकावरून फोन केला आणि तिला भेटायला सांगितलं पण तिने नकार दिला.

फोटो स्रोत, Deepali Jagtap/BBC
दुसऱ्या दिवशी तो तिच्या घराजवळ गेला आणि तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिने त्याचं ऐकलं नाही तर तो तिच्या कुटुंबाला व्हीडिओ दाखवेल आणि सार्वजनिक करेल. यामुळे पीडित तरुणी घाबरली आणि त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली. मुख्य आरोपी तिला डोंबिवलीतील एका फ्लॅटमध्ये घेऊन गेला. तिथे 9 मुलं होती. त्यातील तिघांनी तिच्यावर जानेवारीमध्ये बलात्कार केला होता.
मुख्य आरोपीने तिला पांढऱ्या रंगाची पावडर पाण्यात टाकून पिण्यास सांगितलं. यामुळे ती बेशुद्ध झाली. तिला जाग आली तेव्हा तिच्या गुप्तांगात वेदना होत होत्या. दरम्यान, तिला दरवेळी अशी धमकी देऊन विविध ठिकाणी नेलं जात होतं.
या सर्व आरोपींचा वॉट्सअप ग्रुप होता. या ग्रुपमध्ये पीडितेलाही जोडण्यात आलं होतं.
15 मे, 2021 रोजी पीडित तरुणी असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हीडिओ शेअर करण्यात आला आणि धमकी देऊन पीडितेला दारू पाजण्यात आली. त्यानंतर तिच्यावर पुन्हा बलात्कार करण्यात आला. यावेळी फ्लॅटमध्ये उपस्थित असलेल्या 11 मुलांनीही तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
नंतर 22 सप्टेंबर, 2021 रोजी पुन्हा 5 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे."
त्यानंतर अखेर पीडितेने तिच्या पालकांना याची माहिती दिली आणि त्यांनी पोलीस तक्रार केली.
पोलिसांनी अद्याप रेकॉर्ड केलेले व्हीडिओ किंवा फोटो यासंदर्भात कोणतीही माहिती सांगता येणार नसल्याचं म्हटलं आहे. परंतू सर्व आरोपींचे फोन जप्त करण्यात आले आहेत.
'पोलिसांनी मोक्का अंतर्गत गुन्ह्याची नोंद करावी'
ही घटना समोर येताच विरोधकांनी तर सरकारला धारेवर धरलं. मात्र, महिला व बाल हक्क तज्ज्ञांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
महिला व बाल कल्याण समितीच्या माजी अध्यक्ष वकील मनिषा तुळपुळे यांनी याप्रकरणी मोक्काअंतर्गत गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली. त्या म्हणाल्या,"हा संघटित गुन्हा आहे. त्यामुळे पोक्सोसोबतच (Protection of children from sexual offences Act,2012) मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत गुन्हा नोंदवावा. शिवाय, यात आरोपींमध्ये पैशांचा व्यवहार आढळल्यास त्याचीही कलमं पोलिसांनी लावायला हवीत."
त्यांनी पीडितेला पोलीस स्टेशनमध्ये बोलवल्यासंदर्भात आक्षेप नोंदवला आहे. "माझ्या माहितीनुसार पीडितेला पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं. त्यावेळी आरोपींचे वकील तिथेच होते. ही योग्य प्रक्रिया नाही."
पीडिता आणि आरोपींना चौकशीसाठी समोरासमोर आणलं या दाव्यात तथ्य नाही असं सोनाली ढोले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं.

फोटो स्रोत, Getty Images
शिवाय, पीडितेला आर्थिक मदत मिळावी आणि तिचं समुपदेशन व्हावं यासाठी महिला व बाल कल्याण समिती काम करत असते.
परंतु पोलिसांनी अद्याप या समितीकडे एफआयआरची प्रत दिली नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. पोलिसांनी ही प्रक्रिया लवकर सुरू केली तर पीडितेला वेळेत मदत मिळेल असंही त्या म्हणाल्या.
पीडित मुलगी जानेवारी ते सप्टेंबर असे 9 महिने तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आली नाही, त्यामुळे अशा पीडित मुलींच्या मनातली भीती दूर करण्यासाठी समाजाने एकत्र काम करणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
"यासाठी बालक-पालक संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. मुलं आणि पालकांमध्ये विश्वासाचं नातं हवं. पालकांनी मुलींच्या मनात असा विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे." असंही मनिषा तुळपुळे म्हणाल्या.
'डोंबिवलीत हे घडलं याचा धक्का बसला'
मुंबईपासून जवळपास 47 किमी अंतरावर असलेलं डोंबिवली शहर ठाणे जिल्ह्यातील 12 लाखहून अधिक लोकसंख्या असलेलं मोठं शहर आहे.
प्रामुख्याने मराठी भाषिक राहत असलेल्या डोंबिवलीला महाराष्ट्राची उपसांस्कृतिक राजधानी मानलं जातं. ही घटना समोर आल्यानंतर डोंबिवलीकरांना काय वाटतं हे सुद्धा आम्ही जाणून घेतलं.
डोंबिवलीकर महिला महासंघाच्या सदस्या आरती मुनीश्वर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, "डोंबिवलीसारख्या सुशिक्षित शहरामध्येही अशा घटना घडू शकतात याचा धक्का बसला आणि 9 महिन्यांनी त्याला वाचा फुटते याचं वाईट वाटलं. इथे महिला सुरक्षित आहेत का असाही प्रश्न उपस्थित होतो. मुली, महिलांच्या मागे समाज उभा राहतो का याचाही विचार करण्याची गरज आहे."
डोंबिवलीकर गृहिणी आणि समाजसेविका सुलेखा गडकर म्हणाल्या, "ही घटना कळाली तेव्हा अंगावर काटा आला. मुलींनी कोणाच्या भरोवशावर बाहेर पडायचं असा प्रश्न पडतो. मुलींना घराबाहेर पाठवायचं नाही का? त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची आहे? असा गुन्हा करण्याची मुलांची हिंमत तरी कशी होते? त्यांना कायद्याचा धाक नाही का? " असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षाही डोंबिवलीकरांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








