बलात्कारः 'मासिक पाळी सुरू असतानाही नवऱ्यानं तोंड दाबलं आणि बलात्कार केला'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, वईल हुसेन
- Role, बीबीसी न्यूज, इजिप्त
इजिप्तमधील महिला सध्या लैंगिक हिंसाचाराच्या संदर्भात खुलेपणानं बोलत आहेत. वैवाहिक जीवनात त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांवर त्या चर्चा करत आहेत. सर्वसाधारणपणे इजिप्तमध्ये या मुद्द्यावर फारच कमी चर्चा केली जाते.
इशारा : या लेखात लैंगिक हिंसाचारावर चर्चा करण्यात आली आहे.
34 वर्षांच्या साफा यांच्या मधुचंद्राच्या रात्रीच त्यांच्या पतीनं त्यांच्यावर बलात्कार केला. या लैंगिक हल्ल्यामुळं त्यांचे गुप्तांग, हाताचं मनगट आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या.
'माझी मासिक पाळी सुरू होती आणि त्यामुळं मी शारीरिक संबंधांसाठी (सेक्ससाठी) तयार नव्हते. मी संबंध ठेवायला टाळाटाळ करत आहे असं पतीला वाटलं. त्यानं मला मारहाण केली, हात बांधले, तोंड दाबलं आणि बलात्कार केला,' असं त्यांनी सांगितलं.
समाजात बदनामी होण्याच्या भीतीनं साफा यांनी पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली नाही.
इजिप्तमध्ये पितृसत्ताक कुटुंबपद्धती असून पीडित महिलांवरच आरोप करण्याची संस्कृती येथील समाजात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
साफा यांनी रमजानच्या महिन्यात टीव्हीवर प्रसारीत होणाऱ्या न्यूटन्स क्रेडल नावाच्या मालिकेत एक दृश्य पाहिल्यानंतर, त्यांच्या जीवनात बदलाला सुरुवात झाली. यात एक पती पत्नीवर बलात्कार करत असल्याचं दृश्य दाखवण्यात आलं होतं.
हे दृश्य पाहून अनेक महिलांच्या वाईट आठवणी पुन्हा समोर उभ्या राहिल्या. त्यामुळं याविषयी त्या सोशल मीडियावर मोकळेपणानं बोलू लागल्या आणि त्यांचे अनुभव कथन करू लागल्या.
काही आठवड्यांमध्येच शेकडो महिलांनी सोशल मीडियावर त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत लिहिलं. फेसबूकवर स्पीक अप नावानं एक पेज तयार करण्यात आलं होतं. त्यावर सातशेपेक्षा अधिक महिलांनी त्यांचं म्हणणं मांडलं.
यात 27 वर्षीय सना यांचाही समावेश होता.
'ते माझ्यासाठी देवदुतासारखे होते. लग्नाच्या एका वर्षातच मी गर्भवती राहिले, माझी प्रसुती होणार होती.'
प्रचलित सामाजिक कुप्रथा
'एका किरकोळ मुद्द्यावरून आमच्यात भांडण झालं आणि त्यांनी मला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी माझ्यावर बळजबरी केली आणि माझा गर्भपात झाला,' असं सना यांनी लिहिलं आहे.
सना एकट्याच घटस्फोटाची लढाई लढल्या. सध्या त्या पतीपासून वेगळ्या राहतात. पण मुलांच्या आठवणींनी आजही त्यांना रडू येतं.

फोटो स्रोत, Getty Images
इजिप्तच्या अनेक भागांमध्ये पत्नीबरोबर बळजबरी सेक्स करणं, विशेषतः मधुचंद्राच्या रात्री ही एक प्रचलित सामाजिक कुप्रथा बनली आहे.
एका चर्चित गायकाच्या पूर्वीच्या पत्नीनंही याबाबत इन्स्टाग्रामवर अनुभव मांडले होते. त्यानंतर या मुद्द्यावर अधिक जोमानं चर्चा सुरू झाली.
त्यांनी रडत रडत त्यांच्या वैवाहिक जीवनात झालेल्या बलात्काराची कहाणी ऐकवली होती. त्यानंतर हा व्हीडिओ इजिप्तमध्ये व्हायरल झाला. त्यावर माध्यमांमध्ये बरंच काही छापूनही आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
पतीनं याचं उत्तर देताना इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ पोस्ट करून सर्व आरोप तथ्यहीन असल्याचं सांगत ते फेटाळले होते.
त्यांच्या पत्नीनं हा प्रकार गुन्हा म्हणून जाहीर करण्यासाठी कायद्यात बदल करण्याची मागणी केली आहे.
महिलेचा नकार म्हणजे पाप
इजिप्तची सरकारी संस्था नॅशनल काऊन्सिल फॉर वुमेन (राष्ट्रीय महिला परिषद) नुसार वैवाहिक जीवनातील बलात्कार, बळजबरी सेक्स आणि लैंगिक शोषणाची दरवर्षी सरासरी 6500 प्रकरणं समोर येतात.
'इजिप्तमध्ये महिला सेक्ससाठी 24 तास उपलब्ध असल्याचं गृहित धरणं हे अगदी स्वाभाविक आहे. हाच समज वैवाहिक जीवनात बलात्कारासाठी जबाबदार आहे,' असं महिलांसाठी कायदेशीर मदत उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या रेदा दानबुकी यांनी सांगितलं.
जर एखादी महिला पतीबरोबर सेक्स करण्यास नकार देत असेल तर ती पाप करत आहे आणि रात्रभर तिला देवदूत शाप देत असतात, अशी धार्मिक मान्यता आहे, असंही त्या सांगतात.
"एखादा पुरुष पत्नीवर सेक्स करण्यासाठी बळजबरी करत असेल किंवा मारहाण करत असेल तर तो गुन्हेगार आहे. महिला त्याच्या विरोधात न्यायालयात जाऊन त्याला शिक्षा मिळवून देऊ शकते," असं या मुद्द्यावरील चर्चेवर तोडगा काढण्यासंदर्भात इजिप्तमधील सर्वांत मोठी धार्मिक संस्था दारउल इफ्तानं म्हटलं आहे.
"वुमन सेंटर फॉर गाइडन्स अँड लीगल अवेअरनेसनं गेल्या दोन वर्षांमध्ये वैवाहिक जीवनात बलात्काराची 200 प्रकरणं दाखल केली आहेत. त्यापैकी बहुतांश मधुचंद्राच्या रात्री घडलेली आहेत. सेक्सबाबत त्यांना असलेली भीती हे त्यामागचं कारण होतं," असं दानाबुकी म्हणतात.
इजिप्तच्या कायद्यानुसार वैवाहिक जीवनातील बलात्कार हा गुन्हा नाही. मात्र जागतिक आरोग्य संघटना (डबल्यू एच ओ) याला लैंगिक हिंसाचाराच एक भाग मानते. न्यायालयांमध्ये असे गुन्हे सिद्ध करणं कठीण ठरतं.
इजिप्तमध्ये वैवाहिक जीवनातील बलात्काराची जी प्रकरणं न्यायालयापर्यंत पोहोचतात, त्यापैकी बहुतांश प्रकरणांमध्ये त्यांना शिक्षाच होत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचं कारण म्हणजे इजिप्तच्या दंड संहितेमधील कलम 60. यानुसार, "चांगल्या हेतूनं केलेल्या आणि शरिया कायद्यानुसार योग्य असलेल्या प्रकरणांमध्ये दंड संहिता लागू होत नाही."
"मात्र महिलांची शारीरिक तपासणी केल्यास वैवाहिक जीवनातील बलात्कार सिद्ध करता येऊ शकतात," असं दानाबुकी म्हणतात.
"महिलांच्या संपूर्ण शरिराची तपासणी करायला हवी. त्यावरील बाह्य जखमा, नखांचे ओरखडे पाहायला हवेत. मनगट, चेहरे यावरील जखमांचाही विचार करायला हवा," असं मत त्यांनी मांडलं.
इजिप्तमध्ये कोणत्याही गोष्टींत बदल हा फार संथगतीनं होतो. याठिकाणी अजूनही परंपरा आणि रुढी, प्रथा यांचा दबदबा आहे. पण आता वैवाहिक जीवनात होणाऱ्या बलात्कारांबाबत महिलांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.
(साफा आणि सना ही बदललेली नावं आहेत. त्यांची ओळख लपवण्यासाठी खरी नावं दिलेली नाहीत.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








