लैंगिक आरोग्यः ओरल सेक्समुळे तरुणांमध्ये त्वचारोगांचं (herpes) प्रमाण वाढतंय?

फोटो स्रोत, BSIP/gettyimages
- Author, शैलजा चंदू
- Role, बीबीसी तेलुगूसाठी
जननेंद्रियांपाशी होणारा त्वचारोग हा किशोरवयीन मुलांमध्ये होणारा सगळ्यात सामान्यपणे आढळून येणारा त्वचारोग आहे. जननेंद्रियांचा त्वचारोग किशोरवयीन मुलांमध्ये नियमितपणे सेक्स करणाऱ्या लोकांच्या तुलनेत जास्त आढळतो.
हर्पिज असं इंग्रजी नाव असणाऱ्या या त्वचारोगाचे दोन प्रकार आहेत.
- हर्पिज टाईप 1 - यामुळे तोंड येणं, तोंडात फोड येणं असे प्रकार घडतात.
- हर्पिज टाईप 2 - जननेंद्रियात फोड येतात.
हा रोग झाला असेल तरी अनेकदा त्याची लक्षणं दिसत नाहीत त्यामुळे लोकांना हे कळत नाही की त्यांना अशा प्रकारचा त्वचारोग झाला आहे. पण याचा विषाणू शरीरात घर करून असतो.
ज्यांच्या शरीरात हा व्हायरस आहे त्यांच्याशी जर दुसऱ्या व्यक्तीने लैंगिक संबंध प्रस्थापित केले तर या रोगाचं संक्रमण होण्याची शक्यता जास्त असते.

फोटो स्रोत, BSIP/gettyimages
जेव्हा गुप्तांगापाशी पहिल्यांदा संक्रमण होतं तेव्हा त्याला प्राथमिक संक्रमण असं म्हणतात.
हर्पिज संक्रमणाचे लक्षणं कोणती?
गुप्तांगापाशी मोठ्या प्रमाणावर सूज, दुर्गंधी येणारा स्राव वाहणं आणि लघवी करताना होणारी जळजळ ही या रोगाची प्रमुख लक्षणं आहेत.
यातली कोणतीही लक्षणं आढळून आली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
सेक्स झाल्यानंतर 4 ते 7 दिवसांनी जननेंद्रियापाशी लहान फोड, पू असलेले फोड येतात आणि काही दिवसात त्या फोडांचा आकारही वाढतो आणि तिथे सूजही येते. महिलांना तिथे प्रचंड वेदना होतात आणि सूज येते.
अशावेळी लघवी करणं अत्यंत त्रासदायक ठरतं.

फोटो स्रोत, BSIP/gettyimages
हर्पिज हा रोग पुन्हा पुन्हा देखील होऊ शकतो. प्राथमिक संक्रमणातून बरं झाल्यानंतरही हा विषाणू त्या व्यक्तीच्या शरीरात काहीकाळ सुप्तावस्थेत तगून राहतो.
अशा व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती जर कधी कमी झाली तर पुन्हा संक्रमण होतं. अशा प्रकारच्या संक्रमणाला वारंवार होणारं संक्रमण (रिकरंट इन्फेक्शन) असं म्हणतात.
या विषाणू संक्रमणाची कारणं काय?
शरीरात निष्क्रिय अवस्थेत असलेला हा विषाणू जागृत होण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी व्हावी लागते. जर ताप आला, अतिनील किरणांशी संबंध आला, महिलांची मासिक पाळी सुरू असेल तर, मानसिक तणावातून जात असाल तर किंवा शरीराला कुठे जखम झाली तर हा विषाणू जागृत होतो.
वारंवार होणारं संक्रमणाची लक्षण म्हणजे नसांमध्ये वेदना होणं आणि त्वचेची संवेदना हरपणं ही आहेत. सहसा विषाणूचं पूर्णपणे संक्रमण व्हायच्या आधी एक ते दोन दिवस ही लक्षण दिसायला लागतात.

फोटो स्रोत, Getty Images
या प्रकारची लक्षण प्राथमिक संक्रमणापेक्षा कमी प्रमाणात आढळतात. जसंजसं वय वाढतं तसंतसं वारंवार होणाऱ्या हर्पिज संक्रमणाचा धोका कमी होतो.
हर्पिजचं संक्रमण आईकडून पोटातल्या बाळाला होऊ शकतं का?
या रोगाचं संक्रमण आईकडून पोटातल्या बाळाला होण्याची शक्यता असते. कधीकधी यामुळे गर्भपात व्हायचीही शक्यता असते.

फोटो स्रोत, Getty Images
या रोगाचं संक्रमण झालं तर बाळ पोटातच मृत्युमुखी पडू शकतं, बाळाला व्यंग येऊ शकतं किंवा बाळाच्या त्वचेवर आणि डोळ्यांमध्ये सूज आणि चट्टे उठू शकतात.
ओरल सेक्समुळे होतंय संक्रमण?
जननेंद्रियांचा हर्पिज लैंगिक संबंधातून पसरतो. काही लोकांना त्याची लक्षणं जाणवत नसली तर त्यांच्या विषाणू सुप्तावस्थेत असू शकतो. या लोकांकडून आपल्या लैंगिक जोडीदाराला संक्रमण होऊ शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
अभ्यासातून लक्षात आलंय की गेल्या काही वर्षांत हर्पिज टाईप 1 प्रकारचं संक्रमण वाढीला लागलं आहे. एका अभ्यासात असंही लक्षात आलंय की या विषाणूचं संक्रमण किशोरवयीन मुलांमध्ये जास्त प्रमाणात होतंय.
तोंडात होणाऱ्या संक्रमणाचं कारण ही मुलं ओरल सेक्सवर जास्त भर देत आहेत हे आहे.
या रोगाचं संक्रमण झालंय की नाही हे कसं कळणार?
जननेंद्रियावर झालेल्या फोडांच्या स्रावाचा नमुना घेऊन त्याची तपासणी केल्यास या रोगाचं संक्रमण झालंय की नाही हे कळतं. काही प्रसंगी, रक्ताची चाचणी करून शरीरात हर्पिजविरोधी प्रतिपिंड तयार झालीत की नाही हेही कळतं.
प्रतिपिंडांच्या चाचणीवरून हे कळू शकतं की व्यक्तीला प्राथमिक संक्रमण झालंय की वारंवार होणारं हर्पिज संक्रमण झालंय.

फोटो स्रोत, Getty Images
या रोगावर परिणामकारक औषधं उपलब्ध आहेत, फक्त ती औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
हर्पिज असणारे लोक सेक्स करू शकतात का?
जर तुम्ही या रोगाने ग्रस्त असाल तर तुमच्या जोडीदाराशी आधी बोला. त्यांना या रोगाची आणि त्याच्या धोक्याची कल्पना द्या.
या रोगाचा धोका टाळण्यासाठी कॉंडमचा वापर करा. पण लक्षात घ्या कॉंडममुळे पूर्णतः धोका टळत नाही. गुप्तांगावर सूज किंवा फोड असतील तर या रोगाच्या संक्रमणाचा धोका वाढतो.

फोटो स्रोत, Getty Images
तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणं दिसत नसली तरी तुमच्यामुळे तुमच्या लैंगिक जोडीदाराला संक्रमण होऊ शकतं.
हर्पिज झालेल्या महिलांचं सिझेरियन करावं लागतं का?
जर गरोदर महिलेला या रोगाचं संक्रमण झालं तर पहिल्या काही महिन्यात गर्भपात होण्याचा धोका असतो. बाळाला कदाचित व्यंगत्वही येऊ शकतं.
या रोगाचं संक्रमण झालेल्या महिलेची जर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर बाळाला या रोगाचं संक्रमण होण्याचा धोका वाढतो. आईच्या जननेंद्रियात असलेल्या स्रावाने बाळाला संक्रमण होऊ शकतं.
नवजात अर्भकांचा हर्पिज त्वचा, डोळे आणि तोंडातून पसरतो. याची लक्षणं हलक्या स्वरूपाची असतात त्यामुळे याचा धोका कमी असतो. पण जर याचं संक्रमण बाळाच्या प्रत्येक अवयवाला झालं तर मात्र ते बाळासाठी जीवघेणं ठरू शकतं.
अशा प्रकारच्या संक्रमणात औषधोपचार जरी केले तरी बाळाचा जीव जाण्याची 30 टक्के शक्यता असते.
अशा प्रकारचा धोकादायक हर्पिज वेळेआधी जन्मलेल्या बाळांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. जर आईला प्राथमिक संक्रमण झालं असेल किंवा बाळाचा जन्म व्हायच्या 6 आठवडे आधी आईला हर्पिज झाल्याचं निदान झालं असेल तर अशा महिलांची चुकूनही नॉर्मल डिलीव्हरी करता कामा नये. यामुळे बाळाचा जीव धोक्यात येऊ शकतो.
आणि म्हणूनच आईच्या जननेंद्रियाच्या स्रावातून बाळाला संक्रमण होऊ नये म्हणून सिझेरियन करण्याची आवश्यकता असते.
पण आईला जर वारंवार होणाऱ्या संक्रमणाचा हर्पिज असेल तर बाळाला संक्रमणाचा धोका नसतो. अशा वेळेस आईची नॉर्मल डिलीव्हरी करता येऊ शकते. आईला वारंवार संक्रमणाचा हर्पिज असेल तर आईकडून बाळाला या रोगापासून संरक्षण करणारी प्रतिपिंड मिळालेली असतात.
या रोगाचा धोका कशा प्रकारे टाळता येऊ शकतो?
मोठ्या काळासाठी एकच लैंगिक जोडीदार असेल, ज्याला हा रोग झालेला नसेल तर हर्पिजचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो.
हर्पिजचा विषाणू सेक्सव्दारेच पसरतो.
कॉंडमचा वापर केला तर काही अंशी संरक्षण मिळू शकतं. त्यामुळे सेक्सआधी प्रत्येक वेळेस रबरी कॉंडमचा वापर केला पाहिजे.
पण रबरी कॉंडम हर्पिजचं संक्रमण असेल असा सगळा भाग झाकून टाकत नाही. तसं शरीरातले हर्पिजचं संक्रमण न झालेल्या फोडही या विषाणूसाठी वाहक म्हणून काम करतात त्यामुळे कॉंडम वापरून संरक्षण होईलच असं नाही.
या रोगाबद्दल काळजी वाटणं साहजिक आहे, त्यामुळे कायमच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
(लेखातले विचार लेखिकेचे वैयक्तिक विचार आहेत.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








