हस्तमैथुन आरोग्यासाठी चांगलं की वाईट?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
'डॉक्टर मला हस्तमैथुनाची 'वाईट' सवय लागली आहे, डॉक्टर हस्तमैथुनाने माझ्या शरीराची वाढ खुंटली आहे', अशा प्रकारचे प्रश्न साधारणतः वर्तमानपत्रांमधल्या, मासिकांमधल्या प्रश्नोत्तरांमध्ये विचारले जात असल्याचं तुम्ही वाचलं असेल. कमी-अधिक फरकाने असे प्रश्न बहुतांश लोकांच्या मनामध्ये असतात.
सेक्स आणि त्यासंदर्भात बहुतांश गोष्टी 'टॅबू' म्हणजेच निषिद्ध, त्याज्य मानल्यामुळे हस्तमैथुनासह अनेक विषयांवरचे प्रश्न तसेच राहिले जातात.
ज्या वयात सेक्स आणि हस्तमैथुनाबद्दल कुतुहल जागृत होते, प्रश्न पडायला लागतात त्या वयापासूनच त्यांची उत्तरं देण्यासाठी कोणी उपलब्ध नसते. त्यामुळे अयोग्य व्यक्तींना प्रश्न विचारलं जाणं आणि चुकीची उत्तरं मिळण्याचा धोका जास्त असतो.
हस्तमैथुनाबद्दल उघड बोललं जात नसल्यामुळे चुकीच्या कल्पना, अफवा, भीती पसरवणारे विचार, अयोग्य मार्गदर्शन यांचा धोका जास्त असतो. त्यामुळे व्यक्तीचा गोंधळ वाढण्याचीच शक्यता जास्त असते.
हस्तमैथुन म्हणजे काय?
हस्तमैथुन याचा अर्थ व्यक्ती आपल्या लैंगिक अवयवांना स्पर्श करून 'शारीर'सुखाचा आनंद घेते. हस्तमैथुन करताना व्यक्ती काही कल्पना डोळ्यांसमोर आणून, शारीरसुखाचा विचार करून स्वतःला उत्तेजित करून वीर्यस्खलन करतात. प्रत्येक व्यक्ती ही प्रक्रीया वेगवेगळ्या पद्धतीने करते.
याला हस्तमैथुन अशी एक संज्ञा वापरली जात असली तरी अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून वीर्यस्खलन करतात. त्यामुळे हस्तमैथुन संकल्पनेतील हाताचा वापर प्रत्येक व्यक्ती करेलच असे नाही.

फोटो स्रोत, Getty Images
'समग्र कामजीवन' पुस्तकाचे लेखक आणि लैंगिक समस्या तज्ज्ञ डॉ. राजन भोसले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "हस्तमैथुन शब्दात जरी हात या शब्दाचा उल्लेख असला तरी प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते. स्वतः आनंद मिळवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. ज्याप्रमाणे आपण हाताने खातो, चमच्याने खातो, काट्याने खातो तसंच स्वसुख मिळवण्याच्या पद्धतीही बदलू शकतात, पण त्याचं ध्येय वीर्यस्खलन होऊन स्वतः सुख मिळवणे हेच असतं. त्यामुळे आजकाल हस्तमैथुनाला (Masturbation) ला 'सेल्फ प्लेजर' असा शब्द वापरला जातो."
हस्तमैथुन वाईट असतं का?
हस्तमैथुनामध्ये वाईट काहीही नाही. व्यक्तीने स्वतःच शारीरसुखाचा आनंद मिळवण्यात काहीही चूक नाही. ही अत्यंत खासगी, वैयक्तिक बाब आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी हस्तमैथुन करणं गुन्हा आहे.
हस्तमैथुनाचे तब्येतीवर वाईट परिणाम होतात? त्यामुळे प्रतिकाक्षमता कमी होते?
हस्तमैथुनामुळे कोणतेही शारीरिक नुकसान होत नाही. त्यामुळे प्रजननावर, वीर्यनिर्मितीवर परिणाम होत नाही किंवा डोळ्याखाली काळी वर्तुळं येणं असे बदलही होत नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
हस्तमैथुनामुळे प्रतिकारक्षमतेवर आजिबात परिणाम होत नाही. कोणत्याही प्रकारचा अशक्तपणा येत नाही. याबाबत 'मिथ्स अँड फॅक्ट्स ऑफ मास्टरबेशन' पुस्तकाचे लेखक आणि लैंगिक समस्या तज्ज्ञ डॉ. प्रसन्न गद्रे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना अधिक माहिती दिली.
ते म्हणाले, "कोरोनाच्या काळात हस्तमैथुन करावं का असाही प्रश्न विचारला जातो, तर कोरोनाच्या काळातही हस्तमैथुन करायला काहीही हरकत नाही. फक्त कोरोनामुळे ऑक्सिजनची पातळी खालावली असल्यास कोणत्याही प्रकारचा शारीरिक, मानसिक ताण घेऊ नये. कोव्हिड होऊन गेल्यावर ऑक्सिजन पातळी योग्य असेल आणि दुसरा कोणताही त्रास नसेल तर हस्तमैथुन करायला हरकत नाही.
हस्तमैथुनामुळे रक्त कमी होतं का?
हस्तमैथुनातून वीर्य जातं आणि त्यामुळे रक्त कमी होतं व शेवटी प्रतिकारक्षमता कमी होते असा एक गैरसमज असतो त्यावर बोलताना डॉ. गद्रे म्हणाले, "पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी यांचं प्रमाण आणि वीर्य यांचा काहीही संबंध नाही. वीर्य गेल्यामुळे रक्त कमी होऊन प्रतिकारक्षमता कमी होते हा अत्यंत चुकीचा समज आहे. असं काहीही नसतं."

फोटो स्रोत, Getty Images
ज्या ताणतणावामुळे प्रतिकारक्षमता कमी होते तो तणाव घालवण्यासाठी हस्तमैथुनाचा उपयोग होतो. "हस्तमैथुन करताना मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन नावाचं द्रव्य स्रवतं. मेंदूमध्ये चांगली हार्मोन्स स्रवत असतात. हस्तमैथुनाच्या काळात हृद्याच्या रक्तवाहिन्या मोठ्या होतात. हस्तमैथुन हे शाप नसून वरदान आहे, वरदानामुळे प्रतिकारक्षमता कमी होत नाही", असं डॉ. गद्रे सांगतात.
कितीहीवेळा हस्तमैथुन केलं तर चालतं का? किंवा रोज, आठवड्यातून, महिन्यातून कितीवेळा हस्तमैथुन केलं तर योग्य असे प्रश्न उपस्थित होतात.

फोटो स्रोत, REBECCA HENDIN / BBC THREE
डॉ. राजन भोसले यांनी याबाबत बोलताना सांगितलं, "असा कोणताही एक निश्चित आकडा नसतो. कितीवेळा करावं हा त्या व्यक्तीनुसार बदलत असतं. इथं आकड्याला महत्त्व नाही. प्रत्येक व्यक्तीची हस्तमैथुनाची पद्धत वेगळी असते तसंच ते कितीवेळा करावं हेसुद्धा बदलतं. मात्र त्याचं व्यसनात रुपांतर होत असेल म्हणजेच त्याचा तुमच्या रोजच्या जगण्यात, एकाग्रतेत, अभ्यासात, कामात अडथळा येत असेल तर मात्र त्यावर विचार व्हायला पाहिजे.
हे इतर कोणत्याही बाबतीत लागू होते. कोणतीही सवय किंवा व्यसन तुमच्या आयुष्यात अडथळा निर्माण करत असेल तर ती समस्या होऊ शकते तसंच हस्तमैथुनाच्या बाबतीतही आहे."
हस्तमैथुन केलं नाही तर?
सध्याच्या काळात हस्तमैथुन करू नये, एखादा पूर्ण महिना हस्तमैथुन टाळून स्वतःच्या मनावर ताबा मिळवावा अशा प्रकारच्या मोहिमा इंटरनेटवर दिसून येतात.
हस्तमैथुन टाळल्यामुळे एकाग्र होता येतं, असे दावेही केले जातात. त्यामुळे याबाबतही लोकांच्या मनात शंका असतात.

फोटो स्रोत, Getty Images
लैंगिक समस्या तज्ज्ञ डॉ. प्रकाश कोठारी यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना हस्तमैथुनाबाबत असणाऱ्या गैरसमजांबाबतही भाष्य केलं होतं.
त्यात ते म्हणाले होते, "मी आतापर्यंत साधारणपणे 50 हजार रुग्णांना भेटलो आहे. हस्तमैथुनाबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. हस्तमैथुनाची प्रक्रिया सेक्ससारखीच आहे. दोन्हींमध्ये एकच काम होतं. त्यामुळे हस्तमैथुनामुळे कोणत्याही प्रकारचं शारीरिक नुकसान होत नाही."

फोटो स्रोत, REBECCA HENDIN / BBC THREE
हस्तमैथुन करू नये अशीही काही लोकांची धारणा असते त्याबद्दल डॉ. कोठारी म्हणाले होते, "जर तुम्ही दोन महिने चाललाच नाहीत आणि अचानक एके दिवशी दोन मैल चालायला लावलं तर तुमचे पाय दुखणारंच. दोन महिने तुम्ही मौन पाळलं आणि अचानक व्याख्यान द्यायला सांगितलं तर तुम्हाला बोलताना शब्द सापडणार नाहीत. आपल्या लैंगिक अवयवांबाबतीतही असंच आहे. कोणत्याही शास्त्रात हस्तमैथुन वाईट आहे असं लिहिलेलं नाही."
हस्तमैथुनाबाबत काय पथ्यं पाळायची?
हस्तमैथुन नैसर्गिक प्रक्रिया असली तरी ती करताना काही नियमांचे पालन केलंच पाहिजे. ते सार्वजनिक ठिकाणी करणं बेकायदेशीर आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.
तसेच हस्तमैथुन करताना स्वच्छता पाळण्याची गरज आहे.

फोटो स्रोत, Getty Images
स्वतःला उद्दिपित करून वीर्यस्खलन करताना सुरक्षित मार्गांचा वापर केला पाहिजे. धोकादायक मार्ग तसेच वस्तूंचा वापर करू नये. ते एकांतातच करणं अपेक्षित आहे, असं तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.
स्त्रिया हस्तमैथुन करतात का?
याचं उत्तर हो असंच आहे. बहुतांश लोकांना हस्तमैथुन फक्त पुरुषच करतात असं वाटत असतं. पण हा मोठा गैरसमज आहे.
"जगभरात जवळपास 62 टक्के स्त्रिया हस्तमैथुन करतात," हैद्राबाद येथील सेक्सॉलॉजिस्ट डॉ. शर्मिला मुजूमदार सांगतात.

फोटो स्रोत, LAURÈNE BOGLIO/BBC
अर्थात भारतात अशी आकडेवारी उपलब्ध होणं कठीण आहे कारण भारतीय स्त्रियांना आपण हस्तमैथुन करतो हे सांगण्यात संकोच किंवा अपराधी वाटतं.
महिलांनी हस्तमैथुन करण्याचे फायदेही त्या विषद करतात. "हस्तमैथुनामुळे वाईट काही होत नाही. उलट शरीरात मूड चांगला करणारी संप्रेरक स्रवतात. या संप्रेरकांमुळे तणाव कमी होतो आणि मासिक पाळीत होणारा त्रासही कमी होऊ शकतो. तुम्हाला लैंगिक आजार होत नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे यात गरोदरपणाचा धोका नसतो."
आणखीही फायदे आहेत. स्लीप मेडिसीन या वैज्ञानिक मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार हस्तमैथुनामुळे restless leg syndrome (मज्जासंस्थेचा एक आजार ज्यामुळे सतत पाय हलवण्याची इच्छा होते आणि बेचैन व्हायला होतं) बरा होण्यासही मदत होते.
"सतत तणावाखाली वावरणाऱ्या भारतीय महिलांना हस्तमैथुनामुळे हलकं वाटू शकतं," त्या पुढे सांगतात.
विवाहित लोकांनी हस्तमैथुन करावं का?
विवाहित लोकांनी हस्तमैथुन करू नये त्या दोघांनी मिळूनच सेक्स करावे असा एक समज पसरलेला असतो. डॉ. प्रसन्न गद्रे यांच्या मते हा समज अत्यंत चुकीचा आहे. लोकांनी कितीवेळा, कधी हस्तमैथुन करावं याचा कोणताही ठराविक आकडा नसल्याचं ते आवर्जून सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
विवाहित व्यक्तींच्या जीवनाबद्दल बोलताना ते म्हणाले, "विवाहितांनी हस्तमैथुन करण्यात काहीही चूक नाही. तसेच सुरुवातीच्या काळात संसाराची घडी बसेपर्यंत हस्तमैथुनाचा आधार घेतला जाऊ शकतो. सेक्समध्ये दोघांपैकी एका जोडीदाराला आधी तृप्ती आली तर तो दुसऱ्या जोडीदाराला हस्तमैथुनाच्या आधारे तृप्ती येईपर्यंत मदत करू शकतो."
जर पत्नी गरोदर असेल तर पहिल्या तीन आणि शेवटच्या तीन महिन्यात सेक्स करू नये असं सांगितलं जातं. डॉ. गद्रे यांच्या मते "गरोदरपणाच्या पूर्ण काळात स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच वर्तन करावं. बाळाची स्थिती, आरोग्य हे विचारूनच सेक्स करावे किंवा थेट पूर्ण 9 महिने हस्तमैथुनाचा पर्याय वापरायला हरकत नाही.
भौगोलिकदृष्ट्या पती-पत्नी एकमेकांपासून दूर असतील तर नवरा-बायको हस्तमैथुनाचा आधार घेऊ शकतात. नवरा-बायको यांच्यापैकी एखाद्या व्यक्तीला तात्पुरती किंवा दीर्घकालीन व्याधी असेल, आजारपण असेल तर अशा काळात सेक्सच्या ऐवजी हस्तमैथुन करता येऊ शकतं."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)




