पुणे : अल्पवयीन मुलीवर 2 दिवस सामूहिक बलात्कार, 16 जण अटकेत

बलात्कार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी

'घरी सोडतो' असं म्हणत एका 14 वर्षीय मुलीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याची घटना पुण्यात घडली होती. या प्रकरणी आता पोलिसांनी एकूण 16 जणांना अटक केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आठ जणांना अटक केली होती. त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आता आणखी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

त्यानंतर ज्या लॉजवर नेऊन आरोपींनी मुलीवर बलात्कार केला होता त्या लॉजच्या 2 लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर ज्या मित्रासोबत ती चंदीगडला जात होती त्या मित्राला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्टला ही 14 वर्षीय मुलगी तिच्या मित्राला भेटण्यासाठी रात्रीच्या वेळी पुणे रेल्वेस्टेशन जवळ आली होती. तिचा मित्र भेटण्यासाठी आला नाही.

दरम्यान, मुलगी एकटी असल्याचं पाहून एका रिक्षावाल्याने घरी सोडतो असं म्हटलं.

मुलीला रिक्षात बसवून रिक्षा चालकाने तिला भलतीकडेच नेलं. त्यानंतर त्याच्या साथीदारांना बोलावून दोन दिवस विविध ठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्या मुलीला मुंबईच्या बसमध्ये बसवून दिलं.

बलात्कार

फोटो स्रोत, Getty Images

पुण्याच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी पत्रकार परिषदेत याप्रकरणी अधिक माहिती दिली. पाटील म्हणाल्या, "मुलीच्या वडीलांनी दुसऱ्या दिवशी मुलगी हरवल्याची तक्रार वानवडी पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिचा जबाब घेतला. तिच्या जबाबातून आठ जणांना पोलिसांनी रविवारी अटक केली. आरोपींना न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे."

मुलीवर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. मुलीची आणि आरोपीची कुठलीही पूर्वीची ओळख नव्हती.

आरोपींपैकी काही रिक्षाचालक आहेत, तर 2 जण रेल्वे कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास सुरू आहे, अशीही माहिती पाटील यांनी दिली.

असा केला तपास

गुन्हेगारांनी मुलीला मुंबईच्या बसमध्ये बसवून दिले होते. त्यानंतर तिच्या मित्रासोबत ती रेल्वेने चंदिगडला जात होती.

रस्त्यात तिचा मोबाईल बंद होता. तिचा मोबाईल सुरू झाल्यानंतर पोलिसांना तिचे लोकेशनवरून ती चंदिगडला जात असल्याचे समोर आले.

त्यानंतर पुणे पोलोसांचं एक पथक चंदिगडला विमानाने गेलं. पोलिसांनी मुलीला आणि तिच्या मित्राला चंदिगडवरून ताब्यात घेतले.

ज्या लॉजवर नेऊन आरोपींनी मुलीवर बलात्कार केला होता त्या लॉजच्या 2 लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.

त्याचबरोबर ज्या मित्रासोबत ती चंदिगडला जात होती त्या मित्राला देखील पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत याप्रकरणी पोलिसांनी 16 आरोपींना अटक केली आहे.

'पूजा चव्हाण प्रकरणाचा असा तपास का झाला नाही?'

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. या प्रकरणाचा पोलिसांनी योग्य तपास केला असून चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांचं कौतुक केलं. पण याचवेळी त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणी प्रश्न उपस्थित केले.

चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण घटनेचा मात्र अशा पद्धतीने जलद गतीने तपास का केला नाही असा प्रश्न विचारला आहे. त्या म्हणाल्या, "हेच पुणे पोलीस आहेत आणि हेच ते मुख्यालय आहे. संजय राठोड प्रकरण इथेच झालं. आजपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही."

पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. यात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी त्यांचा राजीनामासुद्धा घेण्यात आला.

'बाईला भोगवस्तू म्हणून पाहणारी प्रवृत्ती बळावताना दिसत आहे'

पुण्यात घडलेल्या या घटनेबद्दल बोलताना सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे म्हणाल्या, "ही घटना समोर आल्यानंतर अस्वस्थ वाटलं. बलात्कार केल्यानंतरही आपण यातून बाहेर पडू असं आरोपींना वाटत असणार.

गुन्हेगारांना कायद्याचा धाक वाटत नाही याचा विचार करायला हवा. या प्रवृत्ती समाजात का बळावत आहेत याचा विचार करण्याची वेळ आहे. सगळ्यांनीच अंतर्मुख व्हायची वेळ आली आहे."

"अशा घटनांमधून बाईबद्दलचा द्वेष दिसून येतो. अजूनही बाईला वस्तू म्हणून वागणूक दिली जाते. मानवी मूल्यांची किंमत कमी होत चालली आहे. एक आरोपी असो की अनेक आरोपी असो प्रत्येक घटना गांभिर्यानेच घ्यायला हवी. बाईला भोगवस्तू म्हणून पाहणारी प्रवृत्ती बळावताना दिसत आहे", असंही मोघे म्हणाल्या.

12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चास गावामध्ये एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार 27 मे ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये घडला. मुलीच्या आईने 8 सप्टेंबरला पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी 27 मे ते 15 ऑगस्ट दरम्यान आरोपींनी अल्वपयीन मुलीवर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी जबरदस्ती लैंगिक अत्याचार केले. मुलीची आई धुण्याभांड्याचे काम करते. आरोपी हे एकाच गावातील असून मुलीच्या घराजवळ राहणारे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

सहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन बलात्कार

सहा वर्षांच्या मुलीला आईच्या कुशीतून घेऊन जाऊन बलात्कार केल्याची घटना पुण्यात समोर आली आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. पुणे स्टेशन बस स्थानकालगत पिडीत मुलीचे कुटुंब राहते.

मुलगी आईच्या कुशीत झोपलेली असताना आरोपी रिक्षाचालकाने मुलीचे अपहरण केले.

रिक्षाचालक मुलीला मार्केटयार्ड येथील एका पडक्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर घेऊन गेला. तिथे नेऊन आरोपीने मुलीवर बलात्कार केला.

मुलीच्या घरच्यांना जाग आल्यानंतर मुलगी नसल्याचे समोर आले. शोध घेतल्यानंतरही मुलगी मिळून न आल्याने कुटुंबीयांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

पोलिसांनी सीसीटिव्हीच्या मदतीने आरोपीचा माग काढत त्याला मार्केटयार्ड परिसरातून अटक केली. त्यानंतर मुलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)