अभिनेता विजय कसा बनला चाहत्यांचा 'थलपती'? सिनेमाचा पडदा ते राजकीय मंचापर्यंतचा प्रवास, जाणून घ्या

फोटो स्रोत, ANI
हजारो-लाखोंची गर्दी खेचण्यासाठी दक्षिण भारतात 'सुपरस्टार विजय' हे दोन शब्दच पुरेसे आहेत. इतकी प्रचंड लोकप्रियता आहे अभिनेता विजयची.
हिंदी डब सिनेमांमुळे आता तो हिंदी सिनेमांच्या प्रेक्षकांमध्ये कमालीचा प्रसिद्ध आहे. त्याचे चाहते त्याला 'थलपती' म्हणतात.
सिनेमासृष्टीतल्या प्रसिद्धी आणि यशानंतर विजय आता राजकारणातही सक्रीय झालाय.
तामिळनाडूतील करूरमध्ये 'तामिळगा वेत्री कळघम' या विजय यांच्या पक्षाच्या प्रचार रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी झाली. विजय या रॅलीत उपस्थितांशी संवाद साधत होता.
या घटनेत 39 जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर विजय यांनी सोशल मीडियावरून दुःख व्यक्त केलं.
त्याचबरोबर मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 20 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली.
विजयचे आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखेच राहिले आहे. अगदी जन्मही एकप्रकारे चित्रपटसृष्टीतच, लहानपणापासून अभिनयाची सुरुवात, संघर्षानंतर मिळवलेले स्टारडम, वडिलांशी मतभेद आणि आता राजकारणात प्रवेश.
बालकलाकार म्हणून सुरुवात
विजयचं पूर्ण नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे. त्याचा जन्म 22 जून 1974 रोजी चेन्नई येथे झाला. त्याचे वडील एस. ए. चंद्रशेखर हे तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक होते आणि आई शोभा गायिका होत्या.
चित्रपटाच्या वातावरणात वाढलेल्या विजय यांनी अगदी लहानपणापासून अभिनयास सुरुवात केली.
त्यांच्या वडिलांनी त्यांना 'वेत्री' चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी दिली. लहान वयातच विजय यांनी आपला भविष्यकाळ चित्रपटसृष्टीतच असेल हे ठरवले होते.

फोटो स्रोत, ACTORVIJAY/KAYALDEVARAJ
कॉलेजमध्ये त्यांनी व्हिज्युअल मीडिया विषयात शिक्षण घेतलं. पण अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं.
नंतर त्यांच्या आई शोभा यांनी एक पटकथा लिहिली आणि वडिलांनी त्यावर 'नालैय्या थिरपू' (1992) हा चित्रपट बनवला.
याच चित्रपटातून विजय यांनी नायक म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही, मात्र, त्यातून विजयच्या करिअरची पायाभरणी झाली.
चाहत्यांचा 'थलपती' कसा बनला विजय?
विजयच्या सुरुवातीचे बहुतांश सिनेमे अॅक्शन आणि रोमँटिक गाण्यांनी भरलेले असायचे. पण कालांतराने त्याने असे काही सिनेमे केले, ज्यातून त्याची प्रतिमा बदलत गेली.
कॉमेडी, अॅक्शन आणि सामाजिक विषयांवरील चित्रपटांतून त्याने वेगळी छाप पाडली आणि साध्या हिरोपासून हळूहळू तो चाहत्यांसाठी 'थलपती' (सेनापती) बनला.

'गिल्ली'सारख्या सुपरहिट चित्रपटाने विजयला 'मास हिरो'ची ओळख मिळवून दिली. 'कथी' चित्रपटाने त्याच्या अभिनयाला सामाजिक आणि राजकीय विषयाशी जोडले, तर 'थेरी', 'मर्सल' आणि 'बिगिल'ने बॉक्स ऑफिसवर कमाईत विक्रम केले.
अभिनयासोबतच विजय उत्तम डान्सर म्हणूनही ओळखला जातो.
विजयचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे?
विजयच्या वैयक्तिक आयुष्यातील महत्वाचा टप्पा म्हणजे त्याचा विवाह.
लंडनमध्ये वाढलेली संगीता विजयची चाहती बनली होती. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर हे नातं पुढे सरकत लग्नापर्यंत पोहोचलं. 25 ऑगस्ट 1999 रोजी दोघांच्याही कुटुंबांच्या सहमतीने विजयने संगीताशी विवाह केला.
लग्नानंतर संगीता विजयची कॉस्च्युम डिझायनर बनली आणि असं म्हटलं जातं की, आजही संगीताने निवडून दिलेले कपडेच विजय परिधान करतो.
राजकारणात प्रवेश
फेब्रुवारी 2024 मध्ये विजयने औपचारिकरित्या राजकारणात प्रवेश केला आणि 'तामिळगा वेत्री कळघम' या नव्या पक्षाची स्थापना केली.
पक्षाच्या स्थापनेवेळी विजयनं स्पष्ट केलं होतं की, 2024 च्या लोकसभा निवडणूक ते लढवणार नाहीत किंवा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाहीत. त्यांचा भर 2026 च्या विधानसभा निवडणुकीवर असेल.
राजकारणात प्रवेश करतानाच विजयने चित्रपटसृष्टी सोडत असल्याचीही घोषणा केली.

फोटो स्रोत, ANI
'तामिळगा वेत्री कळघम' म्हणजेच टीव्हीकेची पहिली सभा 27 ऑक्टोबर 2024 रोजी तमिळनाडूच्या विलुपुरम जिल्ह्यातील विक्रवंडी येथे झाली. या सभेला प्रचंड गर्दी झाली होती.
या सभेतून विजय यांनी लोकांमध्ये दुफळी माजवणारं राजकारण करणाऱ्या पक्षांवर टीका केली होती. असा भेद निर्माण करणाऱ्या पक्षांच्या विचारसरणीला आपला विरोध असल्याचंही विजयनं त्यावेळी सांगितलं होतं.
"द्रविड मॉडेलच्या नावाखाली फसवणूक" आणि "एका कुटुंबाने राज्य लुटल्या"चा आरोपही विजयनं त्यावेळी केला होता.
राजकारणात येण्यापूर्वी विजयच्या कुटुंबातही वाद निर्माण झाला. त्याचे वडील एस. ए. चंद्रशेखर यांनी ऑल इंडिया थलपती विजय मक्कल इयक्कम नावाने आधीच पक्ष स्थापन केला होता. यावरून विजय आणि त्याच्या वडिलांमध्ये मतभेद झाले होते.
विजयने आई-वडिलांसह 11 जणांविरुद्ध खटला दाखल केला होता आणि आपल्या नावाचा वापर कोणत्याही राजकीय कारणासाठी किंवा लोकांना एकत्र करण्यासाठी करू नये, अशी मागणी केली होती.
चित्रपटसृष्टी सोडण्याची घोषणा
एका सभेत भाषण करताना विजय म्हणाला होता की, राजकारणात येण्यासाठी अभिनयाची कारकीर्द आणि त्यातून होणारी कमाई दोन्ही गोष्टी मागे सोडल्या आहेत.
राजकारणात सक्रीय झाल्यानंतर पूर्णवेळ समाजसेवेसाठी काम करण्याचं विजय म्हणाला होता.
सप्टेंबर 2024 मध्ये केव्हीएन प्रॉडक्शन हाऊसने अधिकृत घोषणा केली होती की, 30 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणारा 'थलपती 69' हा विजयचा शेवटचा चित्रपट असेल.

फोटो स्रोत, ANI
'इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, याआधीही चंद्रशेखर यांनी विजयच्या फॅन क्लबला ऑल इंडिया थलपती विजय मक्कल इयक्कम या नावाने राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्याचा प्रयत्न केला होता.
या वादानंतर विजय यांनी जाहीर केलं होतं की, "मी माझ्या चाहत्यांना आणि लोकांना सांगू इच्छितो की, माझ्या वडिलांच्या राजकीय पक्षाशी माझा थेट किंवा अप्रत्यक्ष काहीही संबंध नाही."
विजयच्या पक्षाची विचारधारा काय?
पहिल्या सभेत विजय यांनी टीव्हीकेच्या विचारधारेबाबत सविस्तर भूमिका मांडली होती.
त्यात म्हटलं होतं की, "आम्ही द्रविड राष्ट्रवाद आणि तमिळ राष्ट्रवाद यांना वेगळे करणार नाही. हे दोन्ही या मातीतल्या दोन डोळ्यांसारखे आहेत. आपण स्वतःला कोणत्याही एका ओळखीपुरते मर्यादित ठेवू नये."
विजयने स्पष्ट केलं होतं की, त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांवर आधारित असेल.

तसंच, विजय पुढे म्हणाला होता की, 'टीव्हीके पेरियार यांनी दाखवलेल्या मार्गावर चालेल, ज्यात महिला सबलीकरण आणि सामाजिक न्यायाचा समावेश आहे. मात्र, पेरियार यांचे नास्तिकतेचे विचार मात्र स्वीकारणार नाहीत.'
याशिवाय विजयनं असंही स्पष्ट केलं होतं की, टीव्हीके राज्यात दोन भाषा धोरणाला समर्थन देईल. सरकारी कामकाज तमिळ आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये व्हायला हवे.
विजयनं जातीनिहाय जनगणनेलाही पाठिंबा दर्शवला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











