अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 39 वर, नेमकं काय घडलं?

दाक्षिणात्य अभिनेता विजयच्या प्रचार रॅलीत चेंगराचेंगरी

फोटो स्रोत, BBC/ANI

तामिळनाडूतील करूरमध्ये 'तामिळगा वेत्री कळघम' या पक्षाचे नेते आणि अभिनेते विजय यांच्या प्रचार रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी झाली.

या घटनेत 39 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तामिळनाडूचे आरोग्य सचिव पी. सेंथिल कुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तर, एकूण 95 जखमी रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.

यावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनीही प्रतिक्रिया दिली. घटनेनंतर रात्री उशिरा एका निवेदनाद्वारे स्टॅलिन यांनी ही माहिती दिली.

प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई देणार असल्याचं स्टॅलिन यांनी जाहीर केलं आहे.

या घटनेच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीश अरुणा जगदीशन या समितीच्या प्रमुख असतील, असं स्टॅलिन यांनी निवेदनात म्हटलं आहे.

बीबीसी तामिळने दिलेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीमध्ये महिला आणि मुलांसह अनेक लोक बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना करूरमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. सोशल मीाडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं, "पीडितांच्या कुटुंबांप्रती मी संवेदना व्यक्त करते. तसंच जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करते."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं.

दरम्यान, अभिनेता विजय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. हे दु:ख शब्दांत मांडता येणं शक्य नसल्याच्या भावना त्यांनी पोस्टमधून व्यक्त केल्या.

या दरम्यान, करूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही रुग्णालयाला भेट दिली आहे.

पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी एम. थंगवेल म्हणाले की, "करूर सरकारी रुग्णालयातील डॉक्टर जखमींवर उपचार करत आहेत. सध्या याहून अधिक काही सांगता येणार नाही."

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबाबत दु:ख व्यक्त करणारं ट्विट केलं आहे.

त्यांनी म्हटलंय की, "तामिळनाडूतील करूरमध्ये एका राजकीय रॅलीदरम्यान घडलेली दुर्दैवी घटना अत्यंत दुःखद आहे.

ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, माझ्या भावना त्यांच्यासोबत आहेत. या कठीण काळात त्यांना शक्ती मिळो अशी प्रार्थना. जखमी झालेले सर्वजण लवकरात लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना."

दाक्षिणात्य अभिनेता विजयच्या प्रचार रॅलीतील गर्दीत अनेक जण बेशुद्ध

तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी यासंदर्भात म्हटलंय की, "करूरमधील राजकीय रॅलीदरम्यान झालेल्या निष्पाप जीवितहानीमुळे मला खूप दुःख झालं आहे.

या दुर्घटनेत लहान मुलांचाही समावेश आहे. या दुःखाच्या काळात शोकग्रस्त कुटुंबीयांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करतो.."

तामिळनाडू सरकारनं काय म्हटलं?

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करत म्हटलंय की, "करूरमधून येणारी बातमी चिंताजनक आहे."

"गर्दीमुळे बेशुद्ध पडलेल्या आणि रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी माननीय मंत्री एम. सुब्रमण्यम आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे," असं ते म्हणाले.

दाक्षिणात्य अभिनेता विजयच्या प्रचार रॅलीतील गर्दीत अनेक जण बेशुद्ध

पुढे त्यांनी असंही म्हटलं की, डॉक्टर आणि पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती ते जनतेला करू इच्छितात.

पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री एम. सुब्रमण्यम म्हणाले की, "करूरमध्ये अभिनेता विजय यांच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांना रुग्णालयात नेण्यात येत आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, त्रिचीहून एक वैद्यकीय पथक करूरला जात आहे. त्याचप्रमाणे, मीही आज रात्री करूरला जात आहे."

नेमकं काय घडलं?

तमिळनाडूचे माजी मंत्री आणि द्रमुक (डीएमके) नेते सेंथिल बालाजी शनिवारी (27 सप्टेंबर) रात्री करूरच्या सरकारी मेडिकल कॉलेज व रुग्णालयात पोहोचले.

तेथे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने चौकशी करत जिल्हाधिकारी, एसपी आणि त्यांना रुग्णालयात पोहोचण्याचे आदेश दिले.

दरम्यान, आरोग्यमंत्री एम. सुब्रमण्यम पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "करूर येथे अभिनेता विजय यांच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात नेण्यात येत आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्रिचीहून एक मेडिकल टीम करूरकडे रवाना झाली आहे. मीही आज रात्री करूरला जात आहे."

अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, रुग्णवाहिकांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत होत्या.

तमिळनाडूचे विरोधी पक्षनेते आणि एआयएडीएमकेचे सरचिटणीस के. पलानीस्वामी यांनी एक्सवर (पूर्वीचं ट्विटर) लिहिलं, "करूरमध्ये तमिळगा वेत्री कडगम पक्षाच्या प्रचाररॅलीत, विजय यांच्या भाषणादरम्यान उफाळलेल्या गर्दीत गोंधळ उडून अनेकांचा मृत्यू झाला तर अनेकजण बेशुद्ध पडले, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे."

पलानीस्वामींनी पुढे लिहिलं, "ही अतिशय दु:खद घटना आहे. या घटनेत आपल्या आप्तजनांना गमावलेल्यांप्रती मी माझ्या मनःपूर्वक संवेदना आणि दुःख व्यक्त करतो."

दाक्षिणात्य अभिनेता विजयच्या प्रचार रॅलीत चेंगराचेंगरी

फोटो स्रोत, ANI/BBC

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, विजय सभेला संबोधित करत असताना लोकांची गर्दी वाढत जाऊन नियंत्रणाबाहेर गेली. दरम्यान अनेक लोक बेशुद्ध होऊन पडले आणि गोंधळ उडाला.

यानंतर विजय यांनी आपले भाषण थांबवून, खास तयार केलेल्या प्रचार बसवरून लोकांसाठी पाण्याच्या बाटल्या फेकल्या.

एजन्सीच्या मते, प्रचंड गर्दीमुळे रुग्णवाहिकेलाही घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत होत्या.

(ही बातमी अपडेट होत आहे)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)