करुणानिधी : हिंदी भाषा आणि ब्राह्मणांना विरोध करणारा नेता, अशी होती त्यांची कारकीर्द

करुणानिधी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मुरलीधरन काशिविश्वनाथन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

60 वर्षं लोकप्रतिनिधी राहिलेले एम. करुणानिधी यांचं 7 ऑगस्ट 2018 ला वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. त्यावेळेस बीबीसी बीबीसी तामिळ प्रतिनिधी मुरलीधरन काशिविश्वनाथन यांनी करुणानिधींच्या कारकीर्दीची ओळख करून दिली होती. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुन्हा वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत :

करुणानिधी हे वैयक्तिकरीत्या एकही निवडणूक हरले नाहीत.

एवढंच नव्हे तर पाचवेळा मुख्यमंत्रिपद भूषवून तामिळनाडूला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्य बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

करुणानिधी यांचा जन्म 3 जून 1924ला तामिळनाडू राज्यातील नागापट्टनम जिल्ह्यात झाला. त्यांचा पूर्ण नाव मुथुवेल करुणानिधी. पण लोक त्यांना आदराने 'कलैंग्यार' ( याचा अर्थ कलाकार) म्हणायचे.

लहानपणापासून त्यांचा कल लिखाणाकडे होता. त्यावेळच्या जस्टिस पार्टीचे नेते अळगिरीसामी यांच्या भाषणांचा त्यांच्यावर इतका प्रभाव होता की त्यातून ते राजकारणाकडे ओढले गेले.

जस्टिस पार्टीचे नेते आणि मद्रास प्रांताचे माजी मुख्यमंत्री 'पनगल किंग' रामअय्यंगार यांच्यावरील एका 50 पानी पुस्तकानेही त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला. आणि तरुण वयात ते राजकारणात आले.

लेखनाची गोडी

तो काळ होता जेव्हा तामिळ नाडू मद्रास प्रांत होतं आणि तिथल्या शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीची होती.

विरोधात होत असलेल्या आंदोलनात त्यांनी उडी घेतली आणि तिथून त्यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली.

वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी 'तामिळ स्टुडंट्स फोरम'ची स्थापना केली आणि एक हस्तलिखित मासिकही सुरू केलं. याच दरम्यान 1940च्या दशकात त्यांची भेट सी. एन. अण्णादुराई यांच्याबरोबर झाली. अण्णादुराई हे त्यांचे राजकीय गुरू ठरले.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लहानपणापासून त्यांचा कल लिखाणाकडे होता. त्यावेळच्या जस्टिस पार्टीचे नेते अळगिरीसामी यांच्या भाषणांचा त्यांच्यावर इतका प्रभाव होता की त्यातून ते राजकारणाकडे ओढले गेले.

अण्णा दुराई यांनी 'पेरियार' E. V. रामास्वामी यांच्या द्रविड कळघम (D.K.) या संघटनेतून बाहेर पडत द्रविड मु्न्नेत्र कळघम (DMK किंवा द्रमुक) या वेगळ्या पक्षाची स्थापना केली.

त्यावेळी 25 वर्षांचे करुणानिधी त्यांच्या अधिकच जवळचे झाले होते. म्हणून इतक्या कमी वयात करुणानिधी यांची निवड पक्षाच्या प्रसिद्धी आणि प्रचार समितीवर करण्यात आली.

(डावीकडून) अण्णादुराई, करुणानिधी, MGR आणि पेरियार

फोटो स्रोत, BBC Archives

फोटो कॅप्शन, (डावीकडून) अण्णादुराई, करुणानिधी, MGR आणि पेरियार

त्याच दरम्यान तामिळ सिनेसृष्टीत संवादलेखक म्हणून त्यांनी काम सुरू केलं. 'राजकुमारी' या सिनेमासाठी त्यांनी पहिल्यांदा डायलॉग लिहिले. त्यांना या कामात यश मिळू लागलं. त्यांनी लिहिलेले संवाद प्रागतिक आणि सामाजिक बदलाचा संदेश देणारे असायचे.

  • 14व्या वर्षी शाळा सोडली आणि विद्यार्थी चळवळीत उडी घेतली.
  • दक्षिण भारतात त्या वेळी प्रभावी असणाऱ्या ब्राह्मणी वर्चस्ववाद, जातीवाद याला विरोध आणि नागरी चळवळीला सुरुवात
  • हिंदी भाषेच्या सक्तीला त्यांचा तीव्र विरोध होता आणि त्यांच्या या भूमिकेला संपूर्ण तामिळनाडू राज्यातून पाठिंबा होता. तत्कालीन भारत सरकारने हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरोधात त्यांनी आंदोलन सुरू केलं.
  • करुणानिधी शब्दपांडित्य वादातीत होतं. नर्मविनोदी भाषण, नकला आणि वाक्चातुर्य यामुळे तामिळनाडूच्या राजकारणाची रीत त्यांनी बदलली. त्यांच्या वक्तृत्वशैलीचे लाखो चाहते होते.

1952ला 'परासख्ती' या सिनेमासाठी त्यांनी लिहिलेले डायलॉग प्रचंड गाजले. त्यामुळेच हा सिनेमा तामिळ सिनेसृष्टीत मैलाचा दगड मानला जातो. अंधश्रद्धा, धार्मिक अवडंबर आणि प्रचलित समाजव्यवस्था यावर प्रहार करणारे या सिनेमातील संवाद लोकांनी डोक्यावर घेतले होते.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, other

फोटो कॅप्शन, 1952ला 'परासख्ती' या सिनेमासाठी करुणानिधींनी लिहिलेले डायलॉग प्रचंड गाजले.

तामिळनाडूतील एक ठिकाणाचं नाव कल्लकुडीवरून बदलून दलमियापुरम करण्यासाठी झालेल्या आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना सहा महिने तुरुंगात राहावं लागलं.

या तुरुंगवासाचा त्यांना एकप्रकारे फायदाच झाला, कारण पक्षात त्यांचा प्रभाव अधिकाधिक वाढू लागला.

आपल्या विचारांचा अधिक ताकदीने प्रसार करण्यासाठी त्यांनी 'मुरसोली' या वृत्तपत्राला नव्याने प्रकाशित करायला सुरुवात केली. हे वृत्तपत्र नंतर द्रमुक पक्षाचं मुखपत्र बनलं.

करुणानिधी आणि शिवाजी गणेशन

फोटो स्रोत, BBC Archives

फोटो कॅप्शन, करुणानिधी आणि शिवाजी गणेशन

यासोबतच 'मलाईकल्लन', 'मनोहरा' सारख्या चित्रपटांसाठी लिहिलेल्या संवादांनी ते या क्षेत्रातही शिखरावर पोहोचले होते.

कधीही निवडणूक हरले नाहीत

करुणानिधी यांनी प्रथम 1957 साली निवडणूक लढवली. ते कुलिदलाई येथून आमदार झाले. तर त्यांची शेवटची निवडणूक 2016 साली होती, जेव्हा ते थिरुवरूरमधून निवडून आले.

अशाप्रकारे त्यांनी एकूण 13 वेळा विधानसभा निवडणूक लढवली आणि एकदाही पराभूत झाले नाहीत.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, करुणानिधींनी 13 वेळा विधानसभा निवडणूक लढवली आणि एकदाही पराभूत झाले नाहीत.

1967 साली जेव्हा DMK पहिल्यांदा तामिळनाडूमध्ये सत्तेत आलं, तेव्हा ते सरकारमध्ये मुख्यमंत्री अण्णादुराई आणि नेडुचेळियन यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ मंत्री होते. सुरुवातीला त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक खाती देण्यात आली. तेव्हा त्यांनी खासगी बसेसचं राष्ट्रीयीकरण केलं आणि दुर्गम गावांपर्यंत बस व्यवस्था नेण्याचं काम केलं.

1969 साली C. N. अण्णादुराई यांचं निधन झालं, त्यानंतर करुणानिधी मुख्यमंत्री झाले. तामिळनाडूच्या राजकारणात ही एक नवी सुरुवात होती.

मुख्यमंत्री म्हणून कामगिरी

तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून करुणानिधी यांनी अनेक दूरगामी निर्णय घेतले.

लँड सिलिंग 15 एकरपर्यंत कमी करण्यात आलं. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांचं आरक्षण 25 टक्क्यांवरून 31 टक्के करण्यात आलं.

सर्व जातींतील लोकांना मंदिरातील पुजारी होता येईल, असा कायदा करण्यात आला.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून करुणानिधी यांनी अनेक दूरगामी निर्णय घेतले.

19व्या शतकातील नाटककार मनोमनियम सुंदरनार यांची एक कविता तामिळ गीत बनवण्यात आलं आणि सर्व सरकारी कार्यक्रमांची सुरुवात या गीताने करण्याचा कायदा त्यांना संमत करवून घेतला. शाळांतील धार्मिक प्रार्थनांची जागाही या गीताने घेतली.

त्यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या. त्यांच्या काळात शेतीपंपासाठी लागणारी वीज मोफत करण्यात आली.

त्यांनी सर्वांत मागास जात (Most backward Caste) हा स्वतंत्र प्रवर्ग बनवला आणि त्यासाठी सरकारी नोकरी आणि शिक्षणात 20टक्के आरक्षणाची तरतूद केली.

प्रातिनिधिक फोटो

चेन्नईसाठी मेट्रो ट्रेन, रेशन दुकानांमधून एक रुपया प्रतिकिलो दराने तांदूळ विक्री, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण, मोफत सार्वजनिक आरोग्य विमा, दलितांसाठी मोफत घरं, हातरिक्षांवर बंदी, असे काही महत्त्वाचे निर्णय ते 19 वर्षं मुख्यमंत्रिपदी असताना घेण्यात आले.

त्यांनी 'समदुवापुरम' ही गृहयोजना सुरू केली होती. यामध्ये दलित आणि सवर्णांना एका अटीवर मोफत घरं देण्यात आली.

ही अट म्हणजे या लोकांनी त्यांच्यामधल्या जातीय भिंती पाडून गुण्यागोविंदाने एकत्र राहावं. या योजनेमुळे दलितांना सवर्णांच्या शेजारी घरं मिळाली.

पक्षात दोनदा फूट

करुणानिधी यांच्या कार्यकाळात द्रमुकमध्ये दोनदा मोठी फूट पडली. एकेकाळचे तामिळ अभिनेते M. G. रामचंद्रन किंवा MGR यांनी द्रमुकमधून बाहेर पडत 'अण्णाद्रमुक' (AIADMK) पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर पुढच्या निवडणुकीत राज्यात सत्ता मिळवली.

दुसरी फूट पडली 1993 साली जेव्हा वायको यांनी द्रमुकतून बाहेर पडत MDMKची स्थापना केली.

यामुळे अनेक जिल्ह्यांतील पक्ष सचिव वायको यांच्यासमवेत गेले. पण करुणानिधी यांनी पक्ष भक्कम ठेवत पुन्हा सत्ता मिळवली.

राष्ट्रीय राजकारण

1989 साली जेव्हा V. P. सिंह यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आघाडी केंद्रात सत्तेत आली तेव्हा करुणानिधींनी DMK ला या युतीत सामील केलं. हे करुणानिधींचं राष्ट्रीय राजकारणात पहिलं पाऊल होतं.

V. P. सिंह यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आघाडीने मंडल आयोगाची अंमलबजावणी केली, ज्यानुसार मागासलेल्या जातींसाठी केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्यात आलं. त्यामध्ये करुणानिधी यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

करुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक 1998 ते 2014 मध्ये केंद्रात सत्तेत सहभागी होता.

UPAच्या पहिल्या सरकारमध्ये, म्हणजे डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात तामिळनाडूमधले 12 मंत्री होते. द्रमुककडे दूरसंचारसारखं महत्त्वाचं खातं होतं.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, UPAच्या पहिल्या सरकारमध्ये, म्हणजे डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात तामिळनाडूमधले 12 मंत्री होते, द्रमुककडे दूरसंचारसारखं महत्त्वाचं खातं होतं.

केंद्रीय सत्तेतील सहभागावरून करुणानिधी यांना टीकेलाही समोर जावं लागलं आहे. विशेषत: द्रमुकची भाजपबरोबर युती आणि सत्तेत सहभाग, यावर बरीच टीका झाली.

करुणानिधी यांच्या कुटुंबीयांचा सरकारमधील प्रभाव आणि त्यांना मिळणारा राजाश्रय यामुळंही पक्षावर टीका झाली.

श्रीलंकेतील नागरी युद्धात अखेरच्या काळात तामिळ नागरिकांच्या संरक्षणासाठी करुणानिधी यांनी केंद्रातील आपलं वजन वापरून पुरेसे प्रयत्न केले नाहीत, अशीही टीका त्यांच्यावर झाली.

पण भारतात राज्यांना स्वायत्तता मिळावी, यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले, आवाज उठवला. 1969 साली त्यांच्या सरकारने न्यायमूर्ती राजमन्नार यांच्या अधिपत्याखाली The Centre-State Relations Inquiry Committee समिती स्थापन केली.

राज्य आणि केंद्रामधले संबंध कसे असावे, यावर या समितीने शिफारशी केल्या होत्या. करुणानिधी यांच्या प्रयत्नांमुळे अखेर मुख्यमंत्र्यांनाही स्वातंत्र्यदिनाला राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान मिळाला.

सिनेमा आणि लेखनातील योगदान

करुणानिधी यांनी 1947 ते 2011पर्यंत सिनेमांसाठी संवाद लेखन केलं. या बाबतीत कोणताही राजकीय नेता त्यांची बरोबरी करू शकत नाही.

त्यांनी टीव्ही मालिकांसाठीही लिखाण केलं आहे. अंथरुणाला खिळेपर्यंत ते 'रामानुजम' या टीव्ही मालिकेसाठी संवाद लिहीत होते.

पत्रकार आणि लेखक म्हणून त्यांची कामगिरी उत्तुंग आहे. त्यांनी आतापर्यंत दोन लाख पानं लिहिली आहेत. मुरसोली या पक्षाच्या मुखपत्रात ते 'उडनपिरप्पे' म्हणजे 'मित्रहो...' हा कॉलम लिहीत होते.

वृत्तपत्रांच्या जागतिक इतिहासातील हा कदाचित सर्वाधिक काळ चाललेला स्तंभ असावा.

करुणानिधी नेहमी पिवळी शाल का घ्यायचे?

करुणानिधी यांच्या खांद्यावर नेहमी पांढरी शाल असायची. पण 1994 पासून पांढऱ्या शालची जागा निळ्या शालीनं घेतील. 1994मध्ये त्यांना लाळग्रंथींचा आजार झाला होता.

या ग्रंथींना सूज येत असे आणि ही सूज त्यांच्या गालांवर दिसायची. डॉक्टरांनी त्यांना गळा उबदार ठेवण्यासाठी नेहमी शाल घेण्याचा सल्ला दिला होता.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, करुणानिधी यांच्या खांद्यावर नेहमी पांढरी शाल असायची.

त्यानंतर त्यांनी पिवळी शाल गळ्याभोवती घ्यायला सुरुवात केली. त्यांचे मित्र, कुटुंबीय यांनी त्यांना ही शाल शोभून दिसते असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी गळ्याभोवती पिवळी शाल कायम ठेवली.

पिवळी शाल ही करुणानिधी यांची अंधश्रद्धा आहे, अशी टीकाही त्यांच्यावर झाली होती.

याला उत्तर देताना त्यांनी ओशोंच्या एका वाक्याचा संदर्भ देत म्हटलं होतं, "जे स्वतःवर राज्य करतात आणि जे प्रकाशासारखे सत्य असतात ते पिवळे वस्त्र परिधान करतात."

करुणानिधी यांच्या डाव्या डोळ्याला काय झालं होतं?

1953ला परामाकुडी इथून रामनाथपुरमला येत असताना करुणानिधी यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डाव्या डोळ्याला इजा झाली होती. या डोळ्यावर 12 शस्त्रक्रिया झाल्या होत्या.

1967ला पुन्हा अपघात झाला आणि त्यात त्यांच्या याच डोळ्याला पुन्हा दुखापत झाली. डोळा सतत दुखत असल्याने त्यावर 19971ला अमेरिकेत शस्त्रक्रिया करावी लागली होती.

त्यानंतर त्यांनी डोळे दिसणार नाहीत, असा काळा चष्मा वापरणं सुरू केलं. 2000पासून त्यांनी पारदर्शक काळा चष्मा वापरायला सुरुवात केली. या चष्म्यामुळे त्यांचे डोळे दिसू शकत होते.

हिंदू असूनही करुणानिधी यांचं दफन का?

करुणानिधी हिंदू घरात जन्माला आले होते, तरीही हिंदू पद्धतीप्रमाणे त्यांच्या पार्थिवाचं दहन न करता दफन का करण्यात आलं?

तमिळ नेते, विचारवंत आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार यांचा करुणानिधी यांच्यावर मोठा प्रभाव होता. हिंदू धर्मातल्या प्रथांचा ते प्रथमपासूनच विरोध करत असत.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अण्णा दुराई या त्यांच्या राजकीय गुरुंप्रमाणे करुणानिधी यांच्या पार्थिवाचंही चेन्नईच्या मरीना बीचवर दफन करण्यात आलं.

करुणानिधी टोकाचे नास्तिकही होते. म्हणूनच हिंदू धर्माच्या प्रथांवर त्यांचा विश्वास नव्हता.

त्यामुळे अण्णा दुराई या त्यांच्या राजकीय गुरुंप्रमाणे करुणानिधी यांच्या पार्थिवाचंही चेन्नईच्या मरीना बीचवर दफन करण्यात आलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.