एलटीटीई प्रमुख प्रभाकरनचा मृत्यू होण्याआधी शेवटचे काही तास नेमकं काय घडलं होतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
27 नोव्हेंबर 2008 ला प्रभाकरननं केलेलं भाषण त्याच्या आयुष्यातील शेवटचं भाषण ठरलं.
काही महिन्यातच त्याचा शेवट होणार आहे, या गोष्टीचा अंदाज कुणालाच नव्हता. मात्र आयुष्याच्या शेवटच्या क्षणीदेखील प्रभाकरनचा बाणा, दृष्टीकोन बदलला नाही.
1975 मध्ये श्रीलंकेतील जाफनामध्ये तामिळ महापौराची हत्या केल्यानंतर आणि त्यानंतर एक वर्षानं एलटीटीई (लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम) या संघटनेची स्थापना करूनदेखील प्रभारकन प्रदीर्घ काळ जगासाठी तसा अज्ञात व्यक्तीच राहिला. त्याच्याविषयी जगाला अनेक गोष्टी माहीत नव्हत्या.
मे 1982 मध्ये प्रभाकरनला पहिल्यांदा आणि शेवटचं चेन्नईत (तेव्हाचं मद्रास) अटक करण्यात आली होती.
त्यावेळेस भारतीय प्रशासनानं त्याला फारसं महत्त्व दिलं नव्हतं. भारतीय प्रशासनानं प्रभाकरनला एक साधारण गुन्हेगारचं मानलं होतं.
1983 मध्ये त्याला 13 सिंहला सैनिकांच्या हत्येसाठी जबाबदार ठरवण्यात आलं, तेव्हा तामिळ अल्पसंख्यांकाविरोधात वातावरण तापलं. त्यातून श्रीलंकेचं भवितव्य कायमचं बदलून गेलं.
तोपर्यंत श्रीलंका हा देश जगात चहा आणि निसर्गरम्य स्थळांसाठीच प्रसिद्ध होता.
प्रभाकरनची कार्यशैली
चार वर्षांमध्येच प्रभाकरनचा प्रभाव आणि आत्मविश्वास इतका वाढला की त्यानं भारताच्या लष्करी शक्तीला आव्हान देण्यास देखील मागेपुढे पाहिलं नाही.
अनुराधापुरा या श्रीलंकेतील पवित्र शहरात सिंहली बौद्ध लोकांची हत्या झाल्यानंतर प्रभाकरनच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली.
त्यानंतर लगेचच श्रीलंकेतील प्रभाकरनच्या प्रतिस्पर्धी तामिळ संघटनांच्या नेत्यांच्या हत्या होऊ लागल्या.
प्रभाकरनला तामिळ समुदायाचा एकमेव नेता व्हायचं आहे आणि त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून या हत्या होत असल्याचं मानलं गेलं.

फोटो स्रोत, Getty Images
प्रसिद्ध पत्रकार एम. के. नारायण स्वामी यांनी 'द राउट ऑफ प्रभाकरन' हे पुस्तक लिहिलं आहे.
या पुस्तकात त्यांनी लिहिलं, "प्रभाकरनचा प्रत्येक शब्द हा कायदाच असायचा. त्याला आव्हान देता यायचं नाही. जर तुम्ही त्याच्यासमोर मान वाकवली आणि त्याची प्रत्येक गोष्ट मान्य केली, तरच तुम्हाला तामिळ ईलमसाठी लढता यायचं."
"जर तुमचे प्रभाकरनशी मतभेद असतील, तर एक तर तुम्हाला एलटीटीई सोडावी लागायची किंवा या जगाचा तरी निरोप घ्यावा लागायचा. त्याला विरोध करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 'देशद्रोही' ठरवलं जायचं."
"सोविएत युनियनचे नेते ज्याप्रकारे त्यांच्या विरोधकांना संपवायचे तसंच प्रभाकरनदेखील त्याच्या विरोधकांना संपवायचा."
हत्यांची प्रदीर्घ मालिका
प्रभाकरनच्या संघटनेनं फक्त श्रीलंकेतच नाही, तर भारतातील खास लोकांनादेखील लक्ष्य केलं. यातील काहीजण तर असेदेखील होते, ज्यांनी प्रभाकरन किंवा एलटीटीईची कधीतरी मदत केली होती.
प्रसिद्ध पत्रकार आणि लेखिका अनीता प्रताप यांनी 'आयलँड ऑफ ब्लड' हे पुस्तक लिहिलं आहे.
या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे की, "प्रभाकरनच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर पुस्तक लिहिण्याची योजना तयार करणाऱ्या एका व्यक्तीला पॅरिसमधील घरासमोर गोळी मारण्यात आली होती."
"पूर्व आणि उत्तर श्रीलंकेतील गरिब कुटुंबांमधील तामिळ मुलांना त्यांच्या पालकांच्या इच्छेविरुद्ध एलटीटीईसाठी लढण्यासाठी भाग पाडण्यात आलं. तर प्रभाकरन स्वत: मात्र त्याच्या तीन मुलांना मात्र वेगळं वागवत होता. खडतर, कठीण आयुष्याऐवजी त्यांना खेळणी आणि सुखी आयुष्य देत होता."
"त्यानं त्याच्या एका जुन्या सहकाऱ्याची हत्या केली होती. तो सहकारी भारतासाठी हेरगिरी करत असल्याचा संशय आल्यामुळे प्रभाकरननं त्याची हत्या केली होती."

फोटो स्रोत, Getty Images
श्रीलंकेच्या एका संरक्षणमंत्र्याची एलटीटीईनं हत्या केली होती. ते मंत्री त्यांच्या कार्यालयात जात असताना ही हत्या करण्यात आली होती. एका तामिळ परराष्ट्रमंत्र्याची ते स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना हत्या करण्यात आली होती.
तसंच श्रीलंकेचे एक राष्ट्राध्यक्ष मे दिनाच्या एका प्रचंड सभेत भाषण करत असताना त्यांची हत्या करण्यात आली होती.
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी निवडणुकीच्या काळात तामिळनाडूत प्रचार करण्यासाठी आलेले असताना त्यांचीदेखील आत्मघातकी मानवी बॉम्बद्वारे हत्या करण्यात आली.
प्रभाकरन आणि एलटीटीईचं नियंत्रण संपुष्टात
प्रभाकरनला असं कधीच वाटलं नव्हतं की छोट्याशा गोष्टींच्या बाबतीत हिंसेचा आधार घेणं हे एक दिवस त्याच्याही विनाशाचं कारण ठरेल.
एलटीटीईचा प्रभाव शिखरावर असताना श्रीलंकेच्या जवळपास एक तृतियांश भूप्रदेशावर या संघटनेचं नियंत्रण होतं. मात्र, एक वेळ अशी आली की, एका फुटबॉलएवढ्या मैदानाच्या आकाराएवढ्या भूप्रदेशापुरतं प्रभाकरनचं नियंत्रण राहिलं होतं.
'तामिळ ईलम'च्या एका 'टायगर'नं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, "त्यावेळेस मी पहिल्यांदा एलटीटीईच्या सैनिकांच्या डोळ्यात भीतीची छटा पाहिली. अनेक वर्षे एलटीटीईला खूप जवळून पाहणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीसाठी ही पूर्णपणे नवीन गोष्ट होती."

फोटो स्रोत, Getty Images
17 मे ला प्रभाकरननं त्याच्या जवळच्या लोकांना सांगितलं की "तो लढाईचं मैदान सोडणार नाही आणि शरणदेखील जाणार नाही. जर कोणाला लढायचं नसेल तर तसं करण्यासाठी ते स्वतंत्र आहेत. ते सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळून त्यांची शस्त्रं सोडून जाऊ शकतात. ज्यांना शत्रूच्या हाती न पडता मरायचं आहे ते सायनाईडची गोळी खाऊ शकतात."
हा अशा व्यक्तीनं दिलेला शेवटचा संदेश होता, ज्याला त्याचे अनुयायी सूर्य देवतेचा अवतार समजायचे. त्याच्या अनुयायांना वाटायचं की, त्याचा पराभव कधीच होऊ शकत नाही.
नंबर 8 आणि प्रभाकरनची अंधश्रद्धा
प्रभाकरनला त्याच्या साथीदारांना शेवटचा जो संदेश द्यायचा होता, ते सांगण्यासाठी त्यानं 17 मेचा दिवस निवडला होता. ही योगायोगाची गोष्ट नव्हती.
राजेश कुमार हे प्रभाकरनचे जुने सहकारी आहेत. ते ब्रिटनमध्ये राहतात आणि राघवन या नावानं ओळखले जातात.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "प्रभाकरन 8 या आकड्याला अशुभ मानायचा. ज्या कामात पुढे संकट येण्याची शंका असेल अशी कोणतीही कामं प्रभाकरन 8, 17 आणि 26 या तारखांना करायचं टाळायचा."
"तो इतका अंधश्रद्धाळू होता की या तारखांना तो संपूर्ण दिवसभर त्याच्या तळावर लपून राहायचा आणि दुसऱ्याच दिवशी बाहेर पडायचा."
राघवन म्हणतात, "1980 च्या दशकात तामिळनाडूत एलटीटीईची दहा प्रशिक्षण शिबिरं घेण्यात आली होती. प्रत्यक्षात एकूण नऊच प्रशिक्षण शिबिरं घेण्यात आली होती. कारण आठवं प्रशिक्षण शिबिर मुद्दाम घेण्यात आलं नव्हतं. यामागचं कारणदेखील प्रभाकरनचा आठ या आकड्याबद्दलचा विचारच असावा."
सातत्यानं होणाऱ्या अनेक पराभवांमुळे मनोबल खचलं
एप्रिल 2008 ला मन्नारचा वायव्य जिल्हा श्रीलेकंच्या लष्कराच्या ताब्यात आला होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये लष्करीदृष्ट्या महत्त्वाचे अशणारे पूनेरिन आणि मानकुलम ही ठिकाणंदेखील तामिळ टायगर्सना सोडावी लागली होती.
प्रभाकरना सर्वात मोठा धक्का मे 2008 मध्ये बसला. तेव्हा एलटीईटीचा सर्वात अनुभवी लष्करी कमांडर कांदिया बालासेखरन उर्फ बलराज याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता.
बालासेखरनच्या सन्मानार्थ एलटीटीईनं तीन दिवसांच्या दुखवट्याची घोषणा केली होती. तामिळ टायगर्सच्या अनेक माजी बंडखोरांना वाटतं की जर बलराजचा मृत्यू झाला नसता तर श्रीलंकेच्या लष्कराबरोबरच्या एलटीटीईच्या युद्धाचा शेवट वेगळाच झाला असता.

फोटो स्रोत, Getty Images
2009 येईपर्यंत प्रभाकरनना आणखी धक्के बसले होते. श्रीलंकेच्या सैन्यानं आधी परनतन ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्या जवळचंच किलिनोच्ची देखील लष्कराच्या ताब्यात आलं.
किलिनोच्ची हे एलटीटीईसाठी अत्यंत महत्त्वाचं ठिकाण होतं. कारण ते एलटीटीईच्या नियंत्रणाखालील प्रदेशाची एकप्रकारे राजधानी मानलं जायचं.
इथेच तामिळ टायगर्सचं नेतृत्व परदेशी पाहुण्यांची भेट घ्यायचं. एप्रिल 2002 मध्ये प्रभाकरननं तिथेच त्याची शेवटची पत्रकार परिषद घेतली होती.
किलोनोच्चीतील पराभवामुळे तामिळ टायगर्सच्या मनोधैर्यावर खूपच परिणाम झाला होता.
श्रीलंकेवर युद्ध थांबवण्यासाठी दबाब
एलटीटीईचे हाय प्रोफाईल मीडिया समन्वयक वेलायुधन दयानिधी उर्फ दया मास्टर आणि प्रभाकरनच्या भाषणांचं भाषांतर करणारे कुमार पंचरतनम उर्फ जॉर्ज यांनी विजय मिळवून आगेकूच करणाऱ्या श्रीलंकेच्या लष्करासमोर आत्मसमपर्ण केलं तेव्हा एलटीटीईला मोठ्या अपमानाला सामोरं जावं लागलं.
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांचे छोटे भाऊ गोटाबाया राजपक्षे त्यावेळेस श्रीलंकेचे संरक्षण मंत्री होते. एलटीटीईच्या विरोधातील लष्करी मोहिमेचे नेतृत्व तेच करत होते.

फोटो स्रोत, Getty Images
एमआर नारायण स्वामी यांनी लिहिलं आहे, "गोटाबाया राजपक्षे यांच्यावर अमेरिकेचा प्रचंड दबाव आला की त्यांनी हे युद्ध लगेच थांबवावं. राजपक्षे यांच्याकडे अमेरिकेचं नागरिकत्वदेखील होतं."
"त्यांनी अमेरिकेच्या पत्रकारांना कोणतंही आश्वासन दिलं नाही, मात्र 14 मे ला त्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांसमोर याबद्दल चिंता नक्कीच व्यक्त केली."
"त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की हे युद्ध आणखी किती वेळ चालेल? ते अधिकाऱ्यांना म्हणाले की हे युद्ध लवकरच संपलं पाहिजे, नाहीतर अमेरिकेच्या दबावाला तोंड देणं कठीण होईल."
प्रभाकरननं लढाई सुरू ठेवण्याचा घेतला निर्णय
16 मे ला श्रीलंकेच्या लष्करानं एलटीटीईची शेवटची संरक्षक फळी उद्ध्वस्त केली.
ही बातमी ऐकताच जी-11 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी गेलेले राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी वेळेआधीच एलटीटीईवर लष्करी विजय मिळवल्याचं जाहीर केलं.
एलटीटीईचे आंतरराष्ट्रीय विषयांचा प्रमुख कुमारन पथमंथन उर्फ केपी यानं त्याच दिवशी क्वालालंपूरमध्ये जाहीर केलं की, "लढाई शेवटच्या टप्प्यात आली आहे. आम्ही आमच्या बंदुका खाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे."

फोटो स्रोत, Getty Images
महिंदा आणि केपी या दोघांनी बोलण्याची बहुधा घाई केली होती. कारण तिन्ही बाजूंनी घेरले गेलेल्या प्रभाकरननं लढाई सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
लढाई इतकी भीषण होती की तामिळ टायगर्सनी कित्येक दिवस आंघोळ केली नव्हती. त्यांच्याजवळचा अन्नधान्याचा साठादेखील जवळपास संपला होता. काही तामिळ टायगर्सनी श्रीलंकेच्या लष्कराच्या हाती पडू नये, म्हणून आत्महत्या केली होती.
प्रभाकरन 17 मे रोजी शेवटचा जिवंत दिसला
17 मेच्या रात्री श्रीलंकेच्या लष्करानं तामिळ टायगर्सच्या शेवटच्या तुकडीला 1600 चौ. मीटर प्रदेशापुरतं मर्यादित करून टाकलं. आता तामिळ टायगर्स तिन्ही बाजूंनी वेढले गेले होते. चौथ्या बाजूला नंदीकादल सरोवर होतं. त्यावर श्रीलंकेच्या नौदलाची पाळत होती.
17 मे दिवस एलटीटीईसाठी अत्यंत दुर्दैवी ठरला. कारण त्याच दिवशी 150 हून अधिक तामिळ टायगर्स मारले गेले. त्यात त्यांचे अनेक कमांडरदेखील होते.

फोटो स्रोत, Getty Images
'एसके' या एका तामिळ टायगरनं नंतर एका मुलाखतीत सांगितलं होतं, "17 मे ला प्रभाकरन शेवटचा जिवंत दिसला होता. मी 6 वाजता प्रभाकरन असलेल्या ठिकाणी पोहोचलो होतो. आमचं सर्व अन्न संपलं होतं."
"तुमचा कदाचित विश्वास बसेल किंवा बसणार नाही, पण प्रभाकरन अतिशय सामान्य होता. अर्थात त्याला या गोष्टीची जाणीव झाली होती तामिळ ईलम स्थापन करण्याचं त्याचं स्वप्न आता विखुरण्याच्या मार्गावर आहे."
प्रभाकरनच्या मुलाचा मृत्यू
दुसऱ्या दिवशी उरलेल्या तामिळ टायगर्सनी श्रीलंकेच्या सैन्याचा वेढा तोडण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यशदेखील आलं. मात्र, 30 मिनिटांच्या आत श्रीलंकेच्या सैनिकांनी पुन्हा मोर्चेबांधणी केली.
त्यानंतर झालेल्या कारवाईत एलटीटीईचे अनेक कमांडर आणि प्रभाकरनचा 24 वर्षांचा मुलगा चार्ल्स अँटनीदेखील मारला गेला.

फोटो स्रोत, Getty Images
श्रीलंकेच्या सैनिकांनी अँटनीच्या मृतदेहाची झडती घेतल्यावर त्यांना 23 लाख श्रीलंकन रुपये मिळाले.
53 व्या डिव्हिजनचे कमांडर कमल गुणरत्ने यांनी मान्य केलं की तोपर्यंत प्रभाकरन, पोट्टू अम्मान आणि सूसाई यांना सोडून तामिळ टायगर्सचं सर्व वरिष्ठ नेतृत्व संपलं होतं.
श्रीलंकेचे लष्करप्रमुख जनरल सनत फोन्सेका यांनी स्पष्ट केलं होतं की जोपर्यंत प्रभाकरनबद्दल कोणतीही माहिती मिळत नाही, तोपर्यंत लढाई सुरू राहील.
गुणरत्ने यांना मिळाली प्रभाकरनच्या मृत्यूची बातमी
19 मे च्या सकाळपर्यंत मेजर गुणरत्ने यांना प्रभाकरनबद्दल काहीही माहिती नव्हती.
तेव्हाच त्यांच्या एका कनिष्ठ अधिकाऱ्यानं त्यांना सांगितलं की नंदीकादल भागात चिखलानं भरलेल्या खाऱ्या पाण्यात तुंबळ लढाई सुरू झाली आहे. तिथे अनेक तामिळ टायगर्स अडकले आहेत. त्यांच्यापैकी कोणीही शस्त्र खाली टाकण्यास तयार नाही.
शेवटी लढाई संपल्यानंतर एक तासानं गुणरत्ने यांना ती बातमी मिळाली, ज्याची ते वाट पाहत होते.
गॉर्डन वाईस यांनी 'द केज, द फाईट फॉर श्रीलंका अँड द लास्ट डेज ऑफ तामिल टायगर्स' हे पुस्तक लिहिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यात त्यांनी लिहिलं आहे की, कर्नल रविप्रिया यांनी मेजर जनरल गुणरत्ने यांना सांगितलं की "सर आम्ही प्रभाकरनला मारलं आहे."
आश्चर्यचकीत झालेल्या गुणरत्ने यांनी विचारलं की 'तुम्हाला खात्री आहे का?' त्यावर कर्नल रविप्रिया यांनी उत्तर दिलं होतं, 'यस, श्युअर अॅज द सन अँड द मून, सर.'
मात्र, गुणरत्ने यांना पूर्ण खात्री करून घ्यायची होती. म्हणून त्यांनी कर्नल ललिंथा गमागे यांना त्या ठिकाणी पाठवलं. काही मिनिटांतच लष्करी टेलीफोनवर जवळपास किंचाळल्यासारखा आवाज आला, 'सर, युरेका. सर इट इज करेक्ट. इट इज प्रभाकरन.'
प्रभाकरनचा मृतदेह सापडला
पूर्ण खात्री झाल्यावर गुणरत्ने यांनी ही बातमी लष्करप्रमुख जनरल फोन्सेका यांना दिली. त्याआधी त्यांनी त्यांच्या सैनिकांना प्रभाकरनचा मृतदेह त्यांच्याकडे आणण्याच्या सूचना दिल्या.
एम. आर. नारायण स्वामी यांनी लिहिलं आहे, "तोपर्यंत ज्या ठिकाणी प्रभाकरनचा मृतदेह पडलेला होता, तिथे श्रीलंकेच्या सैन्यातील जवळपास तीन हजार सैनिक गोळा झाले होते. काही सैनिक घाणेरड्या उथळ पाण्यात उतरले आणि त्यांनी तो मृतदेह बाहेर काढला."

फोटो स्रोत, Getty Images
"सैनिकांनी प्रभाकरनचा मृतदेह पाहताच हवेत गोळीबार करण्यास सुरुवात केली. एका अधिकाऱ्यानं त्यांना तसं न करण्यास सांगितलं, मात्र तरीदेखील सैनिकांवर त्याचा परिणाम झाला नाही."
जनरल फोन्सेका यांना जेव्हा ही बातमी मिळाली तेव्हा ते श्रीलंकेच्या संसदेत होते. गुणरत्ने फोनवरून फोन्सेका यांना सिंहला भाषेत म्हणाले, 'महा एस इवाराई' म्हणजे 'मोठा माणूस मारला गेला.'
ओळखपत्रावर सीरियल नंबर 001
जवळपास अर्धा तास आधी म्हणजे जवळपास पाऊणे दहा वाजता प्रभाकरनचा मृत्यू झाला होता. त्यावेळेस प्रभाकरन 54 वर्षांचा होता.
एमआर नारायण स्वामी लिहिलं आहे, "त्याच्या डोक्यावर एक मोठी जखम होती. त्यामुळे त्याच्या डोक्याचे दोन भाग झाले होते. त्याचं तोंड उघडं होतं आणि त्याचे डोळे वरच्या बाजूस पाहत होते. जणूकाही त्याचा मृत्यू ज्यामुळे झाला होता, त्याकडे ते आश्चर्यानं पाहत होता. त्याच्या दाढीचे केस पांढरे होते."
"मेजर जनरल गुणरत्ने यांनी जेव्हा त्याच्या मृतदेहाला हात लावला, तेव्हा ते उबदार होतं. डोक्याव्यतिरिक्त त्याच्या शरीरावर गोळीची एकही जखम नव्हती. प्रभाकरन यांनी लष्करी गणवेश घातला होता."
"त्याच्या खिश्याची तपासणी केल्यावर त्यात एलटीटीईचं एक ओळखपत्र मिळालं. त्याचा सीरियल नंबर 001 होता आणि ते 1 जानेवारी 2007 ला जारी करण्यात आलं होतं."

फोटो स्रोत, Getty Images
याव्यतिरिक्त त्याच्याकडे मधुमेहाची काही औषधंदेखील सापडली. त्याच्याकडे द्राक्षाचा सुगंध असलेलं एक हँड लोशनदेखील मिळालं. ते सिंगापूरमधून विकत आणण्यात आलं होतं. त्याच्या डोक्यावर झालेली खोल जखम निळ्या कपड्यांनी झाकण्यात आली होती.
गॉर्डन वाईस यांनी लिहिलं आहे, "एका लष्करी अधिकाऱ्यानं मला सांगितलं की प्रभाकरनचा मृत्यू 12.7 एमएमच्या एका गोळीनं झाला होता."
श्रीलंकेच्या लष्करप्रमुख जनरल फोन्सेका यांनी आदेश दिला की प्रभाकरनचा लष्करी गणवेश काढण्यात यावा. त्यांना वाटत होतं की श्रीलंकेच्या सैनिकांव्यतिरिक्त इतर कोणालाही लष्करी गणवेश घालण्याचा अधिकार नाही.
प्रभाकरनच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली
नारायण स्वामी लिहितात, "फोन्सेका गुणरत्ने म्हणाले की, ते कर्नल करुणा आणि दया मास्टर या एलटीटीईच्या दोन माजी कमांडरना पाठवत आहेत. जेणेकरून प्रभाकरनच्या मृतदेहाची ओळख पटवता येईल."
"दोन्ही माजी तामिळ टायगर्सना लष्करी विमानानं तिथे आणण्यात आलं. त्यांना निर्जीव पडलेल्या व्यक्तीची ओळख पटवण्यास एक सेंकदांचा वेळदेखील लागला नाही."
प्रभाकरनच्या मृत्यूबरोबरच तामिळ ईलमचं सशत्र आंदोलन आणि श्रीलंकेत दशकांपासून सुरू असलेल्या रक्तरंजित यादवी युद्धाचा शेवट झाला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











