Sri Lanka Civil War: LTTE-श्रीलंका संघर्षातले 20 हजार बेपत्ता लोक मृत – गोटाभया राजपक्षे

फोटो स्रोत, Reuters
श्रीलंकेतील यादवी युद्धादरम्यान बेपत्ता झालेले 20 हजारांहून अधिक लोक मरण पावले, असं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षे यांनी प्रथमच मान्य केलं आहे.
कोलंबोमध्ये पार पडलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रतिनिधी सोबतच्या बैठकीत राजपक्षे यांनी ही कबुली दिली. या सर्व लोकांच्या मरणाचे दाखले देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असं राजपक्षे यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
बेपत्ता झालेल्या लोकांचे कुटुंबीय काही वर्षांपासून आपल्या प्रिय व्यक्ती कोठे आहेत, हे जाणून घेण्यासाठी धडपडत आहेत. त्यासाठी त्यांनी आंदोलनंही केली आहेत.
आपले नातेवाईक जिवंत आहेत, अशी आशा आजही अनेकांना आहे. बेपत्ता झालेले लोक हे लष्कराच्या ताब्यात आहेत, असाही त्यांचा समज आहे. हे सर्व लोक दररोज एकत्र येऊन आंदोलन करतात आणि त्यांच्या आप्तेष्टांच्या स्मृती जिवंत ठेवतात.
यादवी युद्धाची पार्श्वभूमी काय?
श्रीलंकन लष्करानं मे 2009 मध्ये तामिळ टायगर बंडखोरांचा बीमोड केला. लष्कर आणि बंडखोरांमधला संघर्ष हा जवळपास 26 वर्षं सुरू होता.
या संघर्षामुळे श्रीलंकेत वांशिक आधारावर उघडउघड दोन तट पडले होते- बौद्ध सिंहलींचा प्रभाव असलेलं सरकार विरुद्ध स्वतंत्र राज्याची मागणी करणारे तामीळ बंडखोर.
या संघर्षात जवळपास लाखभर लोकांनी प्राण गमावले आणि 20 हजार जण बेपत्ता झाले.
राष्ट्राध्यक्ष राजपक्षे हे तेव्हा संरक्षण सचिव होते आणि बंडखोरांचा बीमोड करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक सिंहलींसाठी ते 'हिरो' होते, पण तामीळ समुदाय मात्र त्यांच्या पाठीशी नव्हता.

फोटो स्रोत, Getty Images
युद्ध संपल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी दोन्ही बाजूंना संघर्षातील हिंसाचारासाठी जबाबदार धरलं होतं. शरण आलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या तामीळ बंडखोरांच्या हत्येच्याही अनेक घटना घडल्या होत्या. यासंबंधीचे अनेक व्हीडिओ प्रसिद्ध झाल्यानंतरही सरकारनं हे आरोप फेटाळून लावले होते.
हळूहळू राजपक्षे आणि त्यांचे भाऊ महिंदा, जे तेव्हा राष्ट्राध्यक्ष होते, यांना विरोध करणारे उद्योजक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्तेही युद्धकाळात 'गायब' झाले होते.
राजपक्षे यांनी अर्थातच यामध्ये सरकारचा हात असल्याचं नाकारलं होतं. यावर्षी गोटाभाया राजपक्षे यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं, की त्यांच्याविरोधातील युद्ध गुन्ह्यांचे आरोप हे पूर्णपणे निराधार आहेत.
सरकारचं काय आहे म्हणणं?
राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षे यांच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या समन्वयक हाना सिंगर यांच्यासोबतच्या बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं होतं, की अनेक बेपत्ता झालेल्या लोकांना लिबरेशन टायगर्स ऑफ तामीळ ईलमनं जबरदस्तीनं भरती करून घेतलं होतं.
"हे बेपत्ता लोक मृत झाल्याचं राष्ट्रध्यक्ष राजपक्षे यांनी स्पष्ट केलं आहे," असं निवेदनात म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"त्यांच्या कुटुंबीयांना याची खातरजमा पटवून देणं आवश्यक आहे. कारण त्यांना आपल्या स्वकीयांसोबत काय झालंय हे निश्चित माहीत नाही आणि त्यामुळेच ते त्यांना बेपत्ता समजतात."
श्रीलंकेच्या कायद्यानुसार मृत्यूचा दाखला नसेल तर संबंधित व्यक्तिचे कुटुंबीय त्याच्या मालमत्तेवर, बँकेतील तसंच वारसाहक्कानं मिळणाऱ्या संपत्तीवर हक्क सांगू शकत नाहीत.
संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर मानवी हक्क आयोगांनं श्रीलंका सरकारवर युद्ध गुन्ह्यांच्या चौकशीसाठी लवाद स्थापन करण्यासाठी वारंवार दबाव आणला आहे. मात्र सध्याच्या सरकारनं ही भूमिका फेटाळून लावली आहे. हा देशांतर्गत प्रश्न असून त्याची अंतर्गत चौकशी होईल अशी भूमिका श्रीलंकन सरकानं व्यक्त केली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)










