श्रीलंका निवडणूक: गोताभया राजपक्षेंच्या निवडीने मुस्लिम चिंतातुर

फोटो स्रोत, EPA
- Author, जिल मैकगिव्हिंग
- Role, बीबीसी न्यूज कोलंबो
गोताभया राजपक्षे यांची श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुस्लीम समाज चिंतेत का आहे?
मतमोजणीच्या फेऱ्या होऊ लागल्या तसं गोताभया राष्ट्राध्यक्षपदी निवडून येणार हे स्पष्ट झालं. त्यांच्या समर्थकांनी कार्यालयात गर्दी केली. अनेकांची देहबोली साशंक होती. राजपक्षे कुटुंबीयांपैकी कोणीतरी पुन्हा सत्तेत आलं आहे याचा आनंद समर्थकांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
गोताभया यांचे बंधू आणि माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे दहा वर्ष यापदी कार्यरत होते. ते पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारमधल्या दोन महत्त्वपूर्ण पदांवर एकाच घरातली दोन माणसं असणार आहेत.
राजपक्षे यांच्यासाठी एक मोहीम चालवणाऱ्या वकिलांच्या एका गटातील सगाला अभयाविक्रम म्हणाले, हा आमचा विजय आहे. मी चारपेक्षा जास्त वर्षं त्यांच्याकरता काम केलं आहे.
सगाला यांच्या मते गोताभया श्रीलंकेसाठी योग्य गोष्टींची अंमलबजावणी करतील. संरक्षण मंत्री म्हणून आम्ही त्यांना पाहिलं आहे. 30 वर्षं चाललेलं युद्ध त्यांच्यामुळे थांबलं.
दहा वर्षांपूर्वी गोताभया यांच्या प्रयत्नांमुळेच एलटीटीईला नमवता आलं. गोताभया सत्तेत असते तर ईस्टर हल्ल्यासारखी घटना घडलीच नसती असं सगाला सांगतात.
राजपक्षे यांच्या आणखी एक समर्थक जनाका अरुणाशंथा सांगतात की, श्रीलंकेसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा हे मुद्दे अग्रणी आहेतच पण देश सगळ्याच आघाड्यांवर प्रगतीपथावर जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून आम्हाला खूप साऱ्या अपेक्षा आहेत.
अल्पसंख्याक समाजाला काळजी
सात महिन्यांपूर्वी इस्लामी कट्टरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यातून श्रीलंका अजून सावरलेलं नाही. या हल्ल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्हे तर विविध धर्मीयांच्या आपापसताली नाजूक संबंधांना धक्का पोहोचला आहे. या घटनेमुळे जनतेच्या सरकारवरच्या विश्वासाला तडा गेला आहे.

फोटो स्रोत, AFP
गोताभया राजपक्षे यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड ही अल्पसंख्याक समाजासाठी चिंतेचं कारण आहे. कारण त्यांच्यापैकी अनेकांनी सजीथा प्रेमदासा यांन मतदान केलं होतं.
श्रीलंकेतील मुस्लीम समाजाला प्रेमदासा अधिक उदारमतवादी असल्याचं वाटतं. श्रीलंकेतील उत्तर भाग तामीळ बहुसंख्य आहे. याठिकाणी प्रेमदासा यांना मतं मिळाली आहेत. समाजातील विविध धर्म-जात-पंथातील व्यक्तींची एकजूट राखणं आणि युद्धानंतर समेट घडवून आणणं अवघड काम आहे.
गेल्या सात महिन्यात बौद्ध समाजातील कट्टरपंथीयांनी आमच्याविरोधात चालवलेली मोहीम आता खुलेपणाने दिसत आहे असं अनेक मुसलमानांचं म्हणणं आहे.
आमची दुकानं आणि व्यवसायावर बहिष्कार घातला जात आहे असं मुस्लिमांचं म्हणणं आहे. रस्त्यात आमचा अपमान केला जातो असंही त्यांचं म्हणणं आहे. मुलांना खास नावाने हाक मारली जाते असंही त्यांनी सांगितलं.
मुस्लिमविरोधी कट्टरतावाद्यांनी पाठिशी घातल्याचा आरोप
अनेकजण बोलण्यात घाबरत आहेत मात्र राजपक्षे विजयी झाल्याने भीती वाटते असं त्यांना वाटतं. बहुसंख्य असलेल्या बौद्ध समाजाच्या हितसंबंधांना राजपक्षे प्राधान्य देत असल्याचं चित्र आहे. मुस्लिमविरोधी कट्टरतावाद्यांना राजपक्षे पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांच्यावर होतो.
त्यांच्या निवडीने आम्हाला सतत काळजी वाटते असं एका मुस्लीम महिलेनं सांगितलं. ते निवडून आल्याने हिंसा आणि नक्षलवादाला खतपाणी मिळेल. अनेक फुटीरतावादी गट त्यांच्या पक्षाशी संलग्न आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
रविवारी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल लागले. त्यावेळी राजधानी कोलंबोत शुकशुकाट होता. अधिकाऱ्यांनी आंदोलन तसंच लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घातली होती. नागरिकांच्या स्वातंत्र्याचं कारण देत कडक कारवाई केली जाते असं लोकांचं म्हणणं आहे.
भलेही राजकीय इरादा व्यवहार्य असेल मात्र निवडणुकांच्या निकालांनी श्रीलंकेतील वातावरणाचं किती ध्रुवीकरण झालं आहे हे लक्षात येतं. त्यामुळे एकजूट होणं अवघड आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








