राजीव गांधींच्या हत्येनंतर शिवरासन जयललितांची हत्या करणार होता? 'द हंट' सीरीजमुळे उपस्थित झाले प्रश्न

राजीव गांधी, शिवरासन (उजवीकडे)
फोटो कॅप्शन, राजीव गांधी, शिवरासन (उजवीकडे)
    • Author, मुलरीधरन काशीविश्वनाथन
    • Role, बीबीसी तामिळ

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत सहभागी असलेले शिवरासन, सुभा आणि इतर जणांचा शोध घेतला जात असतानाच, 19 ऑगस्ट 1991 रोजी ते बंगळुरूजवळ मृतावस्थेत सापडले. या शोधमोहिमेच्या दरम्यान नेमकं काय घडलं? हे सर्वजण आणखी काहीजणांची हत्या करण्याची योजना आखत होते का?

ते 1991 साल होतं. माजी पंतप्रधान आणि काँग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राजीव गांधी निवडणुकीत प्रचार करण्यासाठी तामिळनाडूत आलेले होते. ते श्रीपेरुम्बुदुर इथे एका प्रचारसभेला आले असताना त्यांची हत्या करण्यात आली.

राजीव गांधी यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी सीबीआयच्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली होती. या पथकाचे प्रमुख होते डी. आर. कार्तिकेयन.

त्यांनी तपास सुरू करत शोधमोहीम हाती घेतली. या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या सर्वांना अटक करत ते पुढील तपास करत होते.

या हत्येच्या प्रकरणात सीबीआय शिवरासनचा सक्रियपणे शोध घेत होतं. राजीव गांधींच्या हत्येचा कट शिवरासन यानंच आखला आणि त्यानंच तो अंमलात आणला, असं मानलं जात होतं.

मात्र, एसआयटीला शिवरासनला पकडण्यात यश येत नव्हतं. शेवटी एका टप्प्यावर सीबीआयचं पथक शिवरासनपर्यंत पोहोचलं. मात्र, शिवरासननं त्यांच्यावर हल्ला केला. अखेर शिवरासन मृतावस्थेत सापडला होता.

राजीव गांधी हत्या प्रकरणावर आधारित एक वेबसीरीज अलीकडेच प्रदर्शित झाली. या वेबसीरीजचं नाव आहे 'द हंट: द राजीव गांधी असॅसिनेशन केस'.

राजीव गांधींच्या हत्येपासून ते शिवरासन याच्या मृत्यूपर्यंतचा काळ या वेब सीरीजमध्ये दाखवण्यात आला आहे.

ही वेब सीरीज प्रदर्शित झाल्यानंतर, त्यातील काही पैलू वादग्रस्त ठरले. विशेषकरून या वेब सीरीजमध्ये दाखवण्यात आलं आहे की शिवरासननं राजीव गांधीची हत्या केल्यानंतर जेव्हा त्याचा शोध घेतला जात होता, तेव्हाच तो इतरही काही नेत्यांची हत्या करण्याचा कट आखत होता. यात मुख्यमंत्री जे. जयललिता यांचाही समावेश होता. वेबसीरीजनं असं दाखवून मोठीच खळबळ उडवून दिली.

त्या क्षणी नेमकं काय घडलं होतं?

माजी पंतप्रधान राजीव गांधी 21 मे 1991 च्या रात्री श्रीपेरुम्बुदुर इथं निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी आलेले होते. तिथे एका आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात त्यांची हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात एकूण 16 जण मारले गेले. त्यात 9 पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.

त्याच्या पुढच्याच दिवशी, या हत्येच्या कटाच्या तपासाचं नेतृत्व डी. आर. कार्तिकेयन यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्तिकेयन तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दक्षिण विभागाचे महानिरीक्षक होते.

त्यांनी ही जबाबदारी स्वीकारताच, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली.

या पथकात सीबीआयच्या चेन्नई शाखेतील अधिकारी, तामिळनाडू पोलीस दलातील अधिकारी, सीआरपीएफमधील अधिकारी आणि केंद्र तसंच राज्य सरकारच्या यंत्रणांमधील अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर काही वेळातच पोलीस महानिरीक्षक आर. के. राघवन यांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले होते. यात एक कॅमेरादेखील होता. मृत फोटोग्राफर हरिबाबू याच्या शरीरावर हा कॅमेरा सापडला होता.

'द हंट' या वेब सीरिजमध्ये, शिवरासनची व्यक्तिरेखा आहे.

फोटो स्रोत, Sony Liv

फोटो कॅप्शन, 'द हंट' या वेब सीरिजमध्ये, शिवरासनची व्यक्तिरेखा आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

राघवन यांनी तो पोलीस दलाच्या फोटोग्राफरला दिला आणि त्याला त्या रोलवरून फोटो तयार करण्यास सांगितलं. त्या कॅमेरामधील रोल रंगीत होता. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्याच्यावरून फोटो विकसित करता आला नाही.

त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्यांमुळे, त्या कॅमेरातील फोटो 23 मे च्या पहाटेच छापण्यात आले.

त्यात एकूण 10 फोटो होते. त्यातील एका फोटोमध्ये एक महिला होती, जिनं सलवार कमीज घातलेली होती. ती हातात चंदनाची माळ घेऊन काँग्रेस पक्षाच्या सदस्य लता कन्नन आणि त्यांची मुलगी कोकिला यांच्याबरोबर उभी होती. त्यांच्या थोडं बाजूला एक माणूस उभा होता. त्यानं कुर्ता आणि पायजमा घातला होता.

विशेष तपास पथकानं त्या माणसाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतरच्या तपासात "फोटोग्राफर हरिबाबू, मृत मानवी बॉम्ब आणि कुर्ता पायजमा घातलेला अज्ञात इसम यांच्या आपसातील संबंधांची पुष्टी झाली," असं 'राजीव गांधी असॅसिनेशन-ॲन इन्व्हेस्टिगेशन' या पुस्तकात म्हटलं आहे.

विशेष तपास पथकाचे प्रमुख असलेले डी. आर. कार्तिकेयन आणि आणखी एक वरिष्ठ अधिकारी राधा विनोद राजू या दोघांनी मिळून हे पुस्तक लिहिलं आहे.

यानंतर, विशेष तपास पथकानं या प्रकरणातील संशयित खुनी, म्हणजे कुर्ता-पायजमा घातलेल्या माणसाचे फोटो प्रसिद्ध केले. त्याच्याबद्दल माहिती असणाऱ्याला पुढे येण्याचं आवाहन करण्यात आलं.

दरम्यान, तंजावरमधील तामिळनाडू पोलिसांनी शंकर उर्फ रुसो याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांना नलिनी आणि दास यांचे फोन नंबर मिळाले. त्याच्याकडून मिळालेल्या अतिरिक्त माहितीच्या आधारे थिरुथुराईपुंडी येथील एका स्मगलिंग पॉईंटवर छापा टाकण्यात आला.

रुसो याची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यानं सांगितलं की कुर्ता पायजमा घातलेला व्यक्ती म्हणजे शिवरासन आहे. तो लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमचा (एलटीटीई) सदस्य होता.

मानवी बॉम्ब झालेल्या त्या मुलीचं नाव थानू आहे

फोटो स्रोत, Sony Liv

फोटो कॅप्शन, मानवी बॉम्ब झालेल्या त्या मुलीचं नाव थानू आहे

दरम्यान, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक टीम कोलंबोला गेली होती. ती टीम चेन्नईला परतली. या टीमनं, कुर्ता-पायजमा घातलेला व्यक्ती म्हणजे 'एलटीटीई'चा सिवराजा मास्टर असल्याची ओळख पटवली.

त्यानंतर, नलिनीचा भाऊ पाक्यनाथन याची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यानंदेखील या माहितीला दुजोरा दिला.

नंतर माहिती समोर आली की त्या मानवी बॉम्ब बनलेल्या महिलेचं नाव थानू आहे. तिच्या मैत्रिणीचं नाव सुबा आणि शिवरासनचं एलटीटीईमधील नाव रघु आहे. दरम्यान रॉबर्ट पायस, जयकुमार, पेरारीवलन आणि इतरांना अटक करण्यात आली.

जुलै महिन्याच्या अखेरीस, कोइम्बतूरमध्ये लपून बसलेल्या तामिळी वाघांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना सायनाईड खाल्ल्यानं डिक्सन आणि गुना यांचा मृत्यू झाला. बंगळुरूमधील शोध मोहिमेदरम्यान दोन जणांचा देखील मृत्यू झाला.

बंगळुरूमध्ये मारेकऱ्यांच्या गटाला वेढा

दरम्यान सिवरासन आणि सुबा हे दोघेही बंगळुरूला पळून गेले होते. तिथे ते रंगनाथनच्या घरातील एका खोलीत राहिले. तो तिथे लेथ मशीन चालवत होता.

नंतर 16 ऑगस्टला शिवरासन आणि त्याची टीम बंगळुरूतील कोनानाकुंटे भागातील आणखी एका घरात जाऊन लपली. शोध मोहीम आणखी तीव्र होताच आणखी एक घटना घडली.

पोलिसांनी जेव्हा तामिळी वाघांच्या कर्नाटकातील मुदाडी आणि पिरुडा येथील लपण्याच्या अड्ड्यांना वेढा घातला, तेव्हा तिथे दोन घरांमध्ये राहणाऱ्या 17 जणांचा सायनाईड खाल्ल्यानं मृत्यू झाला.

मुरुगनसह नलिनी
फोटो कॅप्शन, मुरुगनसह नलिनी

शिवरासनच्या गटाला जेव्हा ही बातमी कळाली, तेव्हा रंगनाथनची पत्नी मृदुला घाबरली. मृदुलाला दम्याचा त्रास होता. ती उपचारासाठी घर सोडून तिच्या भावाकडे राहायला गेली. लवकरच पोलिसांनी मृदुला अटक केली. 18 ऑगस्टला तिला पोलिसांनी अटक केली.

त्यानंतर गेल्या 16 दिवसात एलटीटीईच्या लोकांबरोबरच्या अनुभवाबद्दल तिनं पोलिसांना सविस्तर सांगितलं. एलटीटीईचे लोक कोनाना कुंटेव्हिलमध्ये ज्या घरात राहिले होते, ते घरदेखील तिनं पोलिसांना दाखवलं.

त्यावेळेस शिवरासन आणि सुभासह पाचजण त्या घरात राहत होते. ही माहिती मिळाल्यानंतर विशेष तपास पथकानं त्या घराला वेढा घातला. डी. आर. कार्तिकेयन यांनी सीबीआयच्या संचालकांना विचारलं की पुढे काय कारवाईची करायची. त्यावर संचालकांनी ते तिथे येईपर्यंत वाट पाहण्यास सांगितलं.

सीबीआय संचालकांबरोबर डॉक्टर

सीबीआयचे संचालक जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांच्याबरोबर डॉ. रामाचारी होते. ते सायनाईड विषबाधेतील तज्ज्ञ होते. डॉ. रामाचारी म्हणाले की आणखी एका अँटीडोटची आवश्यकता आहे.

ते औषध ग्वाल्हेरहून आणावं लागलं. त्यात काही तास उलटले. दरम्यानच्या कालावधीत रंगनाथलाही अटक करण्यात आली.

19 ऑगस्टच्या पहाटे शिवरासन राहत असलेल्या घरापासून थोड्या अंतरावर एक ट्रक बिघडला. ट्रकचा ड्रायव्हर ट्रक दुरुस्त करण्यासाठी बाहेर पडला. शिवरासन आणि त्याच्या टीमला वाटलं की ते पोलीस आहेत. म्हणून त्यानं गोळीबार सुरू केला.

तोपर्यंत पहाटे पाच वाजेपर्यंत ग्वाल्हेरहून अँटी-व्हेनम आलं. सकाळी सहा वाजता ब्लॅक कॅट कमांडो आले. मात्र ते जेव्हा घरात शिरले तेव्हा आतमध्ये सातही जण मृतावस्थेत होते.

या सात जणांची ओळख पटवण्यात आली. ते शिवरासन, सुभा, नेहरू, सुरेश मास्टर, अम्मान, ड्रायव्हर अण्णा आणि जमुना होते. जमुना आदल्या दिवशीच त्या घरात आली होती.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरुम्बुदुर इथं निवडणूक प्रचार सभेत हत्या झाली होती

फोटो स्रोत, Sony Liv

या सर्वांपैकी फक्त शिवरासनचाच मृत्यू गोळी लागल्यानं झाला होता. त्याला कपाळावर गोळी लागली होती. उर्वरित सर्वांचा मृत्यू सायनाईड खाल्ल्यानं झाला होता.

"आम्हाला वाटलं की दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत वाट पाहण्याऐवजी आम्ही आदल्या रात्रीच कारवाई करायला हवी होती," असं या घटनेचा संदर्भ देत डी. आर. कार्तिकेयन म्हणाले.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरुम्बुदुर इथं निवडणूक प्रचार सभेत हत्या झाली होती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरुम्बुदुर इथं निवडणूक प्रचार सभेत हत्या झाली होती

"जर कारवाई करण्याचा निर्णय आमच्यावर सोडण्यात आला असता. तर आम्ही 18 ऑगस्टलाच त्या ठिकाणावर हल्ला चढवला असता. कारवाई करताना डॉक्टर आणि सायनाईडचं इंजेक्शन सोबत असूनही आमच्यावर बेजबाबदारपणं वागल्याची टीका झाली," असं कार्तिकेयन यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.

डी. आर. कार्तिकेयन यांच्या पुस्तकात म्हटलं आहे की राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर तीन महिन्यांनी ही घटना घडली आणि योगायोगानं 20 ऑगस्टला राजीव गांधी यांचा वाढदिवस होता.

त्यामुळे यावर अनेकांनी टीका केली. काही वृत्तपत्रांनी टीका केली की माजी पंतप्रधानांना वाढदिवसाची भेट देण्यासाठी म्हणून या मृत्यूंचं नियोजन करण्यात आलं होतं का.

आणखी एक कट?

द हंट' या वेब सीरिजमध्ये राजीव गांधी यांची हत्या केल्यानंतर शिवरासन श्रीलंकेत परत जाण्याऐवजी इतर काही योजना आखत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यातील एक योजना विशेष तपास पथकाच्या मल्लीगाई इथं असलेल्या मुख्यालयावर हल्ला करण्याची होती.

दुसरी योजना, तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्यासह इतर काही महत्त्वाच्या नेत्यांची हत्या करण्याची होती. वेबसीरीजमध्ये शिवरासन त्याच्या एका सहकाऱ्याला हे सांगत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

'द हंट' ही वेब सीरिज 'नाइन्टी डेज: द ट्रू स्टोरी ऑफ द हंट फॉर राजीव गांधीज असॅसिन्स' या पुस्तकावर आधारित आहे. हे पुस्तक पत्रकार अनिरुद्ध मित्रा यांनी लिहिलं आहे.

या पुस्तकात शिवरासनच्या अशा योजनेचा उल्लेख नाही. तर ती गु्प्तहेर विभागाची कल्पना असल्याचं म्हटलं आहे.

"इंटेलिजन्स ब्युरोकडून मिळालेल्या माहितीनुसार, एलटीटीईकडे हत्या करायच्या लोकांची मोठी यादी आहे. एलटीटीईचे डेथ स्क्वॉड्स किमान तीन व्हीआयपींना मारण्याची योजना आखत आहेत. ते म्हणजे तामिळनाडूचे मुख्यमंत्री जयललिता, राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष वझापदी के रामामुर्ती आणि तामिळनाडू पोलिसांचे डीजीपी एस. श्रीपाल," असं पुस्तकात म्हटलं आहे.

अनिरुद्ध मित्रा, इंडिया टुडे मासिकासाठी राजीव गांधी यांच्या हत्येसंदर्भात विशेष तपास पथकाच्या कारवायांबद्दल सतत बातम्या गोळा करत होते.

'द हंट' या वेब सीरिजमध्ये, राजीव गांधी यांची हत्या केल्यानंतर श्रीलंकेत परतण्याऐवजी शिवरासन आणखी योजना आखत असल्याचं दाखवण्यात आलं आहे

फोटो स्रोत, Sony Liv

फोटो कॅप्शन, 'द हंट' या वेब सीरिजमध्ये, राजीव गांधी यांची हत्या केल्यानंतर श्रीलंकेत परतण्याऐवजी शिवरासन आणखी योजना आखत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

'21 ऑक्टोबर 1991 च्या इंडिया टुडे तामिळ मासिकात त्यांनी याबाबतची माहिती सविस्तरपणे नोंदवली आहे.

त्या लेखात अनिरुद्ध मित्रा यांनी म्हटलं आहे की, "राजीव गांधींची हत्या केल्यानंतर शिवरासन पळून गेला नाही, तर दोन आणखी दोन व्हीआयपींवर हल्ला करण्यासाठी तयार होता, हे समोर आल्यानं एसआयटी हादरली होती."

"यावेळेस त्यानं दिल्लीत हत्या करण्याची योजना आखली होती. जुलै महिन्यात मध्यावर, जयललिता रामामुर्तींबरोबर पी. पी. नरसिंहला भेटणार होत्या."

"कनकसबापती आणि अधिरा यांना अटक करण्यात आली तेव्हा त्यांनी सीबीआयला सांगितलं होतं की राजीव गांधी यांच्याप्रमाणेच ते जयललिता यांची हत्या करणार आहेत."

वझापदी के. रामामुर्ती यांचा मुलगा रामासुकांतन याच्याबद्दल विचारलं असता, त्यानं एवढंच सांगितलं की, "हे खरं आहे की त्यावेळेस त्यांना धोका होता. कारण ते एलटीटीईला जोरदार विरोध करत होते. त्यामुळे त्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी त्यांच्या सलेम आणि चेन्नई येथील घरांवर 24 तास पोलिसांचा पहारा होता."

मात्र डी. आर. कार्तिकेयन यांच्या पुस्तकात याबद्दल काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यांनी नमूद केलं आहे की कनकसबापथी आणि अधिराई यांना अटक करण्यात आली, तेव्हा शिवरासननं त्याला दिल्लीत एलटीटीईसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला होता.

कार्तिकेयन यांच्या पुस्तकात म्हटलं आहे की दिल्लीत एक तळ स्थापन करण्याची त्यांची योजना होती. त्यामुळे त्यांना संपूर्ण भारतातील एलटीटीईच्या कारवायांवर लक्ष ठेवता येणार होतं. तसंच परदेशात पळून जाता येणार होतं.

त्यावेळेस वरिष्ठ पत्रकार भगवान सिंह या घटनेचं सातत्यानं वार्तांकन करत होते. तेदेखील म्हणतात की एलटीटीईची इतर नेत्यांना मारण्याची कोणतीही योजना असल्याचं दिसत नाही.

ते म्हणतात, "शिवरासन तपास पथकाच्या हाती जिवंत आला नव्हता. त्याला जर जिवंत पकडलं गेलं असतं आणि त्यानं ही माहिती दिली असती, तर ती मान्य करता आली असती. त्यानं ही माहिती कोणाला तरी सांगितली आणि मग त्यांनी ती उघडपणे सांगितली हे पटण्यासारखं नाही."

"एलटीटीईचा विचार करता ते सदस्यांना तेवढीच माहिती द्यायचे जितकी माहिती असणं आवश्यक असायचं. याशिवाय त्यावेळेस एलटीटीईनं जयललिता यांची हत्या करण्याचं कोणतंही कारण नव्हतं."

ते पुढे म्हणतात, "जयललिता या एलटीटीईच्या विरोधक होत्या, हे जर त्यामागचं कारण असेल, तर राजीव गांधींच्या हत्येनंतर अनेकांची अशी मानसिकता होती. याशिवाय परदेशात असं काही करण्यामागचे परिणाम एलटीटीईला माहित होते."

"त्यामुळे राजीव गांधी यांच्या हत्येनंतर आणखी हत्या करण्याची त्यांची अशी कोणतीही योजना होती असं म्हणता येणार नाही."

टी. एस. सुब्रमण्यम हे त्यावेळेस 'द हिंदू' या वृत्तपत्रासाठी यासंबंधीच्या बातम्या गोळा करत होते. तेदेखील असं म्हणतात की त्यांनी असं काहीही ऐकलेलं नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)