तमिळ टायगर्स : राजीव गांधींनी आपलं बुलेटप्रुफ जाकीट प्रभाकरनला दिलं होतं पण...

प्रभाकरन

फोटो स्रोत, ROBERT NICKELSBERG/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, प्रभाकरन
    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

निवडणूक प्रचारादरम्यान 21 मे 1991 रोजी श्रीपेरूबुंदूरच्या सभेत धानू नावाच्या एलटीटीईच्या महिला सदस्याने आत्मघाती बॉम्बहल्ला केला. त्यात भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मृत्यू झाला.

त्यानंतर भारत सरकारने एलटीटीईला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं. 1987 साली भारत सरकारने श्रीलंकेत शांतीसेना पाठवली होती. त्याचा बदला घेण्यासाठी एलटीटीईने त्यांची हत्या केली असं सरकारचं म्हणणं आहे. एलटीटीईने या हत्येबद्दल भारताची क्षमाही मागितली होती. आता 2019 मध्ये भारत सरकारने एलटीटीईवरची बंदी आणखी पाच वर्षांनी वाढवलीय.

एलटीटीईचा सर्वेसर्वा प्रभाकरन याने आपलं हित चिंतणाऱ्या, बुलेटप्रूफ जाकीट देणाऱ्या व्यक्तीचाच खून केला. त्याच्या आयुष्यातल्या काही घटनांचा हा लेखाजोखा.

करिकलन किंवा काळ्या पायाचा माणूस म्हणून ओळखला जाणारा वेलापुल्लई प्रभाकरन काही लोकांसाठी स्वातंत्र्यसैनिक होता तर अनेकांसाठी तो क्रूर दहशतवादी होता. त्याचं दहशतीचं साम्राज्य तामिळनाडू आणि श्रीलंकेत पसरलेलं होतं.

एक राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या, श्रीलंकेच्या आणखी एका राष्ट्रपतींच्या खुनाचा प्रयत्न, शेकडो राजनैतिक खून, अनेक आत्मघाती हल्ले, हजारो निरपराध लोक आणि सैनिकांच्या मृत्यूंचा कलंक त्याच्या नावासमोर लागलाय. त्याचं नाव इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिलं गेलंय. या सगळ्यावरून एक गोष्ट तर निश्चित की तो खूप भयंकर होता आणि थंड रक्ताचा क्रूरकर्मा होता.

ओसामा बिन लादेनच्या आदेशावरून न्यूयॉर्कचं वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडलं गेलं. पण त्याआधीच प्रभाकरनने कोलंबोतल्या गर्दीच्या ठिकाणी त्याच नावाची तितकीच महत्त्वाची इमारत नेस्तनाबूत केली होती. पण या दोघांमध्ये एक फरक होता. ओसामासारखा प्रभाकरन श्रीमंत घरातला नव्हता. तो या सगळ्या दहशतवादी कारवाया करण्यासाठी दुसऱ्या देशात लपून बसला नव्हता आणि त्याच्या या दुष्कृत्यांचं मूळ कारण धार्मिकता नव्हती. त्याचा एकमेव धर्म होता. तो म्हणजे तामिळ राष्ट्रवाद. त्याला तामिळी जनतेचं एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करायचं होतं.

अवघ्या एका दशकाच्या कालावधीत त्याने साधी हत्यारं वापरणाऱ्या 50 लोकांच्या समूहापासून 10 हजार प्रशिक्षित सशस्त्र तामिळ टायगर्स तयार केले. लिबरेशन ऑफ तमिळ टायगर्स ईलम (एलटीटीई) स्थापन केली. हे कडवे टायगर्स एखाद्या देशाच्या निष्णात सैन्यालाही टक्कर देऊ शकत होते.

प्रभाकरन दोन भारतीय स्वातंत्र्यसैनिकांना आदर्श मानायचा- एक म्हणजे 1931 साली ब्रिटिशांनी फाशी दिलेले स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग आणि दुसरे आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस.

काळ्या पायाचा माणूस

1972 मध्ये एकदा एका झाडाखाली काही लोक बॉम्ब बनवत होते. प्रभाकरन बॉम्ब कसा बनवतात ते बघत होता. त्यावेळी अचानक स्फोट झाला आणि प्रभाकरन थोडक्यात वाचला. पण या दुर्घटनेत त्याचा उजवा पाय होरपळून काळा झाला. तेव्हापासून त्याला 'करिकलन' म्हणजे काळ्या पायाचा माणूस या नावाने ओळखलं जाऊ लागलं.

बालासिंघमसोबत प्रभाकरन

फोटो स्रोत, SENA VIDANAGAMA/AFP/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, बालासिंघमसोबत प्रभाकरन

प्रभाकरनला चॉकलेट आणि खेकडे उकडून खायचं प्रचंड वेड होतं. त्याने आपल्या अनुयायांवर सिगारेट आणि दारूची तसंच लैंगिक संबंधांची बंदी घातली होती. एलटीटीईच्या सैनिकांना प्रेमात पडायची बंदी होती आणि गद्दारांना एकच दंड असायचा- मृत्यूदंड.

आपल्या एका पुरूष आणि महिला अंगरक्षकांनी लैंगिक संबंध ठेवले म्हणून ठार मारायचा आदेश त्याने दिला होता. पण गंमतीची गोष्ट अशी की प्रभाकरनने स्वतःच्या बाबतीत या नियमाला मुरड घालून मतिवत्थनी इराम्बूशी लग्न केलं. तिने रंगपंचमी खेळताना रंगाने भरलेली बादली प्रभाकरनवर ओतली. तेव्हाच तो तिच्याकडे आकर्षित झाला असं म्हटलं जातं.

प्रभाकरनचं पत्रकार संमेलन

त्याने एप्रिल 2002 मध्ये जवळपास 12 वर्षांनी पत्रकार संमेलन आयोजित केलं होतं. त्यात 'इनसाइड एन एल्यूसिव माइंड प्रभाकरन' हे प्रभाकरनचं जीवनचरित्र लिहिणारे एम. आर. नारायणस्वामीदेखील उपस्थित होते.

नारायणस्वामी सांगतात, "आम्ही रात्री एलटीटीईच्या कॅम्पमध्ये राहिलो. सकाळी विहिरीच्या पाण्याने आंघोळ केली. माझ्या32 वर्षांच्या पत्रकारितेच्या करियरमध्ये इतका कडेकोट बंदोबस्त मी कधीच पाहिला नव्हता. त्याने सगळ्या पत्रकारांना एकेक करून खोलीत बोलावलं आणि आमच्याकडची पेनं, पेन्सिली आणि वह्या नीट तपासल्या. वह्या आणि पेनं तर त्याने दिलीच नाहीत."

प्रभाकरन

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES

"त्याने आमच्या सगळ्यांचे एकेकटे फोटो काढले आणि कॅमेरे बाजूला एका तराजूत ठेवायला सांगितलं. त्याला प्रत्येक कॅमेऱ्याचं मूळ वजन माहीत होतं हे आम्हाला नंतर कळलं. कॅमेऱ्याचं वजन वाढवणारं काही साहित्य त्यात लावलेलं तर नाही ना हे त्याला पाहायचं होतं. त्याने आमचे दंड अक्षरशः दाबून बघितले. आम्ही पत्रकारांच्या वेशात आलेले प्रशिक्षित सैनिक आहोत का हेही तो बघत होता."

सायनाइड कॅप्सूल

प्रभाकरनचं पहिलं हत्यार म्हणजे एक बेचकी होती. तिने तो चिमण्या, सरडे आणि खारींवर नेम धरायचा. नंतर त्याला एक एअरगन मिळाली. त्या एअरगनवर सराव करून त्याने आपली नेमबाजी अचूक केली होती.

नारायणस्वामी म्हणतात की, "प्रभाकरन कधीकधी आपल्या शर्टमध्ये रिव्हॉल्व्हर ठेवून हळूहळू चालत जायचा आणि अचानक वेगाने वळून काल्पनिक शत्रूचा वेध घ्यायचा. हॉलीवूडचे सिनेमे बघून प्रभाकरनला एक आयडिया मिळाली. मग एलटीटीईने आपल्या सगळ्या सैनिकांकडे चामड्याचे होल्स्टर असलेच पाहिजेत असा आदेश दिला."

नॉर्वेचे परराष्ट्र मंत्री जॉन पीटरसन यांच्यासोबत हस्तांदोलन करताना प्रभाकरण आणि बालासिंघम (फोटो - 11 नोव्हेंबर, 2004)

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, नॉर्वेचे परराष्ट्र मंत्री जॉन पीटरसन यांच्यासोबत हस्तांदोलन करताना प्रभाकरण आणि बालासिंघम (फोटो - 11 नोव्हेंबर, 2004)

एलटीटीईचा प्रत्येक सैनिक आपल्या गळ्यात सायनाइडची कॅप्सूल घालून वावरेल. पकडलं गेल्यावर त्याने ती गोळी खाऊन मरण पत्करायचं, असा त्याचा आदेशच होता. त्याच्या गळ्यातदेखील काळ्या धाग्यात सायनाइडची कॅप्सूल बांधलेली असायची. तो तिला आपल्या खिशात ओळखपत्रासारखं ठेवून वावरायचा.

विश्वासाची कसोटी

प्रभाकरनला स्वयंपाक करायला आवडायचं. चेन्नईच्या प्रवासादरम्यान तो संध्याकाळी आपल्या साथीदारांसोबत भाज्या चिरायचा. त्याला चिकन करी खूप आवडायची. पण काहीच उपलब्ध नसताना ब्रेड आणि जॅमनेसुद्धा काम भागायचं. तो कायम उकळलेलं पाणी प्यायचा कारण त्याला प्यायला स्वच्छच पाणी लागायचं.

कुठे बैठकीला गेला तर प्रभाकरन फक्त सोडा प्यायचा. तेही बाटली त्याच्यासमोर उघडलेली असेल तरच. 1987 मध्ये तो एकदा जाफनातल्या इरॉसच्या ऑफिसमध्ये गेला होता. तिथले प्रमुख बालाकुमार यांनी त्याला प्यायला कोक दिला. त्यांचा एक कर्मचारी ट्रेमध्ये कोकच्या तीन बाटल्या आणि ओपनर घेऊन आला. प्रभाकरनने एक बाटली उघडून बालाकुमारना दिली. स्वतःसाठी बाटली उघडण्यापूर्वी तो बालाकुमार कोकचा घोट कधी घेतात याची वाट बघत राहिला. "मी चहासुद्धा फक्त स्वतः किंवा माझ्या बायकोने बनवलेलाच पितो," असं त्याने आपल्या एका मित्राला सांगितल्याचं नारायणस्वामी सांगतात.

स्वच्छतेचं वेड

प्रभाकरन दररोज दाढी करायचा. एलटीटीईची प्रसिद्धी जसजशी वाढत गेली तसतसं त्याचं स्वच्छतेचं वेडही वाढत गेलं. सोफ्यावर बसताना तो कायम सोफ्याच्या हातांना लागलेली धूळ साफ करायचा. त्याला कोळीष्टकांचा राग यायचा. जळमटं दिसली की लगेच साफ करायला लावायचा.

त्याला टापटीप आणि नेटकेपणाची प्रचंड आवड होती. एलटीटीईच्या चेन्नईतल्या ऑफिसमध्ये सगळ्या खोल्या आणि सहा सात बाइकच्या किल्ल्या एका ठरलेल्या ठिकाणी अडकवलेल्या असायच्या. शौचालय साफच असलं पाहिजे असा त्याचा दंडक होता.

प्रभाकरन

फोटो स्रोत, ROBERT NICKELSBERG/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, प्रभाकरन

प्रभाकरन एकदा चेन्नईला तामिळ नेते नेदुमारन यांच्या घरी उतरला होता. तो दुसऱ्या कोणाचेतरी कपडे धूत असताना नेदुमारन यांनी त्याला पाहिलं. त्यांनी विचारलं, "हे काय करतोयस तू?" त्यावर प्रभाकरन म्हणाला, "मला आज काही काम नाहीये. म्हणून माझ्या साथीदारांचे कपडे धुतोय."

चेन्नईचे एक ख्यातनाम पत्रकार सदानंद मेनन सांगतात की प्रभाकरनसारखा शांत माणूस आजपर्यंत त्यांनी पाहिलेला नाही. सीएनएनच्या भारतातल्या माजी ब्युरो प्रमुख अनिता प्रतापसुद्धा असंच म्हणतात.

फोटोग्राफिक स्मरणशक्ती

एकदा प्रभाकरनच्या मुलाखतीनंतर त्यांनी लिहिलं होतं, "मला तर तो अगदी साधा माणूस वाटला. सौम्य निळ्या रंगाचा शर्ट आणि सिलेटी पँट घालून वावरणारा प्रभाकरन पहिल्या नजरेत कोणालाही तामिळ व्यापारीच वाटेल."

पत्रकारांना मुलाखती देताना तो कायम समोर एक रिस्टवॉच ठेवायचा. त्याची ठरलेली वेळ झाली की तो लगेच मुलाखत संपल्याची खूण करायचा. त्याची स्मरणशक्ती तगडी होती. एकदा भेटलेल्या व्यक्तीचा चेहरा तो कधीच विसरायचा नाही.

प्रभाकरन

भारत- श्रीलंकेदरम्यान 1986 मध्ये समझोत्यावर चर्चा सुरू होती. भारताने प्रभाकरनला आणण्यासाठी श्रीलंकेच्या परवानगीने भारतीय वायूसेनेची दोन हेलिकॉप्टर्स जाफन्याला पाठवली होती. त्यातून भारतीय परदेश सेवेतील तत्कालीन वरिष्ठ अधिकारी हरदीप पुरी गेले होते. ते सध्या केंद्रीय मंत्रीमंडळात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आहेत. एलटीटीईचा एक सदस्य त्यांच्या कानात कुजबुजला, "तुम्ही आमचा राष्ट्रीय खजिना सोबत नेताय." पुरी म्हणाले, "आम्ही ज्या ठिकाणाहून प्रभाकरनला घेऊन चाललोय तिथेच त्याला आणून सोडू. मग चर्चेचा निष्कर्ष काहीही असो. हे माझं वचन आहे."

पोळी आणि पिस्तूल

चेन्नई विमानतळावर व्हीआयपी लाऊंजमध्ये पुरी यांनी चिकन करी आणि भात मागवला. त्यांना वाटत होतं की प्रभाकरनला हे जेवण आवडेल. पण प्रभाकरनने पोळीची मागणी केली. भात खाल्ल्यावर पिस्तुलाचं ट्रिगर दाबणाऱ्या बोटावर परिणाम होतो, असं त्याचं मत होतं.

दिल्लीला गेल्यावर त्याला अशोक हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं. 25 जुलैला हरदीप पुरी यांनी त्याला सामंजस्य कराराच्या अटी वाचून दाखवल्या. प्रभाकरनचा साथीदार बालासिंघमने त्याचं तामिळ भाषांतर केलं. प्रभाकरनने या अटी तात्काळ फेटाळून लावल्या. आपण तामिळ ईलमची मागणी सोडणार नाही असं त्याने सांगितलं.

प्रभाकरनने चर्चेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमजीआर यांनाही सहभागी करून घेण्यात यावं अशी मागणी केली. राजीव गांधी यांनी ही मागणी मान्य केली. एमजीआर यांनी लगेच दिल्ली गाठली. राजीव गांधींनी आपल्या अधिकाऱ्यांवर प्रभाकरनला समझोत्यासाठी तयार करण्यासाठी दबाव टाकला होता.

राजीव गांधी

फोटो स्रोत, PETER TURNLEY/CORBIS/VCG VIA GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, राजीव गांधी

"तो हट्टी आहे. पण या समझोत्यात त्याची भूमिका खूप महत्त्वाची आहे," असं त्यांचं म्हणणं होतं. प्रभाकरन आणि त्याच्या शिष्टमंडळाला पत्रकारांना भेटू दिलं गेलं नाही. त्यामुळे आपल्याला जबरदस्तीने समझोत्यावर सही करायला लावत असल्याचं त्याला वाटत होतं. राजीव गांधींना तर त्याला भेटायचंही नव्हतं.

शेवटी तामिळनाडूचे एक मंत्री आणि त्याचा साथीदार बालासिंघम त्याच्यासोबत गेले. प्रभाकरन म्हणाला की श्रीलंकन सरकारवर आपल्याला विश्वास ठेवता येणार नाही. मात्र, आपण तामिळ लोकांच्या कल्याणासाठी काम करतोय असं सांगून राजीव गांधींनी त्याचं मन वळवलं. मग प्रभाकरन भारत-श्रीलंकेतल्या समझोत्यासाठी तयार झाला.

बुलेटप्रूफ जाकीट

नारायणस्वामी सांगतात की राजीव गांधींना या गोष्टीचा खूप आनंद झाला. त्यांनी प्रभाकरनसाठी जेवण मागवलं. तो त्यांच्या घरून निघाला तेव्हा त्यांनी राहुल गांधींना आपलं बुलेटप्रूफ जाकीट आणायला सांगितलं. ते जाकीट प्रभाकरनला देत ते म्हणाले, "तुम्ही स्वतःची काळजी घ्या."

राजीव गांधींना एका मंत्र्याने त्यांना एलटीटीईचे लोक शस्त्र टाकत नाहीत तोपर्यंत प्रभाकरनला भारतात ठेवायचा सल्ला दिला. त्यांनी नकार दिला. "प्रभाकरनने मला शब्द दिलाय. माझा त्यांच्यावर विश्वास आहे," असं ते म्हणाले.

पण प्रभाकरनने आपला शब्द कधीच पूर्ण केला नाही. त्याने राजीव गांधींची हत्या करण्याचे आदेश दिले. जाफन्याला परतण्यापूर्वी तो चेन्नईत लेफ्टनंट जनरल देपिंदर सिंग यांना भेटला होता.

देपिंदर सिंग म्हणतात, "प्रभाकरन माझ्या खोलीबाहेर रबरी चपला काढून आत आला. त्याला माझ्याबद्दल आदर दाखवायचा असावा. मला तो थोडा काळजीत वाटला. आपण आता भारतीय परदेश मंत्रालय आणि रॉवर कधीच विश्वास ठेवणार नाही असं तो म्हणाला. मी त्याला विचारलंसुद्धा की तुम्ही तुमची हत्यारं आम्हाला कधी सोपवणार आहात (मी मुद्दाम शरणागती हा शब्द वापरला नाही.) प्रभाकरनने मला त्याची सगळ्यात महागडी मशीनगन सोपवणार असल्याचं सांगितलं. पण त्याने हे वचन पूर्ण केलं नाही. काही दिवसांनी एलटीटीईच्या तुकडीने भारतीय सैनिकांसमोर हत्यारं टाकली तेव्हा प्रभाकरन तिथे उपस्थित नव्हता."

दुर्दैवी मृत्यू

आपल्या आयुष्याच्या शेवटच्या लढाईत प्रभाकरन चारी बाजूंनी श्रीलंकन सैनिकांनी घेरला गेला होता. त्यांच्या एका गोळीने त्याच्या कपाळाचा वेध घेतला आणि त्याच्या मेंदूच्या चिंधड्या झाल्या. बाकी त्याच्या शरीरावर एकही जखम नव्हती. त्याचा मृतदेह नंतर कितीतरी तास तिथेच पडून होता.

प्रभाकरन

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES

आसपास घाणीचं साम्राज्य असतानाही त्याचा गणवेश एकदम स्वच्छ होता. त्याच्या कमरेच्या पट्ट्यात एक होलस्टर्ड पिस्तूल लटकत होती आणि सोबत जिवंत काडतुसंही होती. त्याच्या छातीवर धातूचं एक कार्ड होतं. त्यावर 001 असा नंबर लिहिलेला होता. त्याच्याजवळच्या एका छोट्या बॅगेत द्राक्षाच्या सुगंधाचं एक बॉडी लोशन होतं. ते सिंगापूरवरून आलेलं दिसत होतं. शिवाय डायबेटिसच्या गोळ्यासुद्धा पडलेल्या होत्या.

प्रभाकरनच्या आयुष्यावर पुस्तक लिहिणारे एक लेखक मेजर जनरल राज मेहता सांगतात, "प्रभाकरनला त्याच्या शेवटच्या लढाईत मोलाएतुवू क्षेत्रात तिन्ही बाजूंनी वेढा घातला गेला होता. त्याच्या चौथ्या बाजूला समुद्र होता आणि तिथेही श्रीलंकन सैन्याने सापळा रचला होता. तो वाचण्याची काहीच शक्यता नव्हती. श्रीलंकन सैन्य त्यांची चर्चा रेडिओवर ऐकत होतं. त्यांना प्रभाकरनचं लोकेशन नीट माहीत होतं. त्याला चिरडून टाकायची तयारी केली होती."

"इथून पुढच्या काळात श्रीलंकेत कुणीही अल्पसंख्याक नसेल. आता इथे फक्त दोन प्रकारचे लोक असतील. एक म्हणजे जे राष्ट्राभिमानी असतील आणि दुसरे आपल्या मातृभूमीवर जराही प्रेम न करणारे राष्ट्रद्रोही" ही घोषणा प्रभाकरनच्या मृत्यूनंतर श्रीलंकन राष्ट्रपती राजपक्षे यांनी संसदेत केली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)